खोकली माय

हिवायाचं थंड वारं

बोरी पिकल्या रानांत

आली जयगावामधीं

आली खोकल्याची सात

रस्त्यांवर वावरांत

लोक खोकल्यांत येडे

घरोघरीं खोकलंनं

जसे वाजती चौघडे

अरे, घेतले औसदं

नही राहे कुठें बाकी

तरी जायेना खोकला

सर्वे वैद्य गेले थकी

सर्वे वैद्य गेले थकी

आतां जावा कुठें तरी?

करे मनांत इचार

कोनी गांवाचा कैवारी अरे, गांवाचा कैवारी

होता मोठा हिकमती

मेहेरूनच्या रस्त्यानं

जात व्हता कुठे शेतीं

"कसा आला रे खोकला

म्हने आवंदाच्या सालीं"

गांवच्याच शिववर

कोन्ही म्हातारी भेटली

तशी म्हातारी बोलली

"कांहीं धर्म वाढ बापा

इडापीडा या गांवाची

व्हई जाईन रे सपा"

तव्हां गांवचा कैवारी

काय बोले म्हातारीले

"माझ्या गांवचा खोकला

सर्वा दान केला तुले."

ऐकीसनी म्हतारी बी

तव्हां पडे भरमांत

म्हने 'घेनंच पडीन

दान आलं जें कर्मात !'

मंग घेतला खोकला

सर्व गांव झाडीसनी

आन् बसे खोकलत

सदा गया खल्ळीसनी

गेला गेला सर्व निंघी

गांवामधला खोकला

अशा खोकल्याचा वांटा

म्हतारीनं उचलला

खोकला निंघीजायासाठीं

ध्रती म्हतारीचे पाय

हात जोडती रे लोक

खोक्ली माय खोक्ली माय

मेहेरूनच्या वाटेनं

जरा वयव रे पाय

तुले दिशीन रस्त्याले

तठे आतां खोक्ली माय


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

इंफाळ

"इंफाळ-जंगलातल्या चिमुकल्या फुला,

मोकळे करुनि सांगतो मनोगत तुला

एकलेपणा मज असह्य हा जाहला

तू विरंगुळा एकल्या जिवाला मला !

मी जखमी होउन खंदकात या पडे

मज टाकुनि गेले बांधव मम कुणिकडे ?

चहुबाजू धूसर दिसति नागटेकडया

उद्‌ध्वस्त त्यांमधे नागांच्या झोपडया

ओतितो आग तोफांचा भडिमार हा

की प्रलयंकर भूकंप होत हा महा !

सर गोळ्यांचे सोडिती यंत्रबंदुका

कित्येक चाटुनी जाती या खंदका

चढउतार भारी, किर्र रान भोवती

बेधडक त्यातुनी रणगाडे धावती

हे वनदेवीच्या मुला, नवल हे पण

या वणव्यातुन वाचलो कसे आपण ?

घरदार सोडुनी लष्करची चाकरी

का धरिली, ते तुज कसे सांगु मी तरी ?

मी कृष्णा-खोर्‍यातला मराठा गडी

या ब्रह्मी आघाडीत घेतली उडी

बोलोत शिपाई भाडोत्री मज कुणी

लढतोच तरी तळहाती शिर घेउनी

हा कुणी कुणास्तव जिंकायाचा लढा

मज याचा अजुनी झाला नच उलगडा !

इंफाळ दिशेचा सर्द वात वाहतो

कुजबुजुनी कानी काय मला सांगतो ?

रणघोष ’चलो दिल्ली’ चा हा ऐक रे !

’जयहिंद !’ हाक तव बंधूंची ऐक रे !

ते शत्रु नाहित---हिंदपुत्र फाकडे

ते सज्ज जाहले जाया दिल्लीकडे !

स्वातंत्र्यरवीला द्यायाला अर्ध्य हे

रक्ताला आहे बोलावित रक्त हे !

इंफाळ दिशेचा वारा हे हृद्गत--

सांगून म्हणे, ’ये, तुझे असो स्वागत !’

ही हाक कुणाची ? मातेची हाक ही !

ऐकून संचरे मनी चेतना नवी

घायाळ पाखरु तडफड तडफड करी

पण येत उडाया नाही त्या अंबरी !

असहाय तसा रे झालो मी सर्वथा

ही सांगु कुणा मी मनची माझ्या व्यथा !

सह्याद्री माझा माहित नाही तुला

नसशील ओळखत रानजाइच्या फुला

तुज पाहुनि होते त्यांची मधुर स्मृती

रे हास हास ! तव कौतुक करु मी किती !

जखमेतुनि गेले गळुनि रक्त घळघळा

रे थकलो मी, नच अधिक बोलवे मला

ती येइल गाडी ’अँम्ब्युलन्स’ अवचित !

मज घेउन जाइल, होइल ताटातुट !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

गस्तवाल्याचा मुलगा

चांदने फिकटले, तिनकांडे मावळले

तरि पाय आमुचे घरास नव्हते वळले

लागल्या व्हावया लांब लांब तरुछाया

जणु काय पसरिती भुताटकीची माया !

क्षितीजावर नव्हती अजुनि ’चांदणी’ आली

पक्ष्यांची किलबिल सुरुहि नव्हती झाली

अद्याप जगाची निद्रा नव्हती सुटली

परि झोप अम्हांला निशाचरांना कुठली !

चावडीपुढे रंगात तमाशा आला

करि बहार शाहिर होनाजीचा चेला

लावण्या, गौळणी ऐकुनि मानस रिझले

घटकाभर अमुचे स्मरण घराचे बुजले

’धनि रामपारबी व्हाया नव्हं का आला !

तांबडं फुटल, ’ धर्माजी बोलुनि उठला

मग बोलत बोलत घरा परतलो आम्ही

परि कान ऐकती ललकार्‍या त्या नामी !

अंगणात छाया दिसे घराची पडली

जणु त्यावर त्याची माया-पाखर जडली

त्यातून प्रगटली एक चिमुकली मूर्ती

हळुहलू यावया लागे पुढती पुढती

थरकले हृदय, थबकले आमुचे पाय

हा भुताटकीचा चमत्कार की काय !

धर्माजी बोले, ’घ्या देवाचे नाव

भेटेल तो जर का त्यावर अपुला भाव !

डावलू नका जी, बघा तरी न्याहळुनी

सांगुन का होते कधि देवाची करणी !’

तो ’बा-बा-बा-बा !’अशी बोबडी वाणी

ती बाळमूर्ति मग बोले मंजुळवाणी

आश्चर्य-भीति-हर्षाचे-वादळ उठले

क्षणभरच मनी, मग संशय सारे फिटले

धावलो पुढे, ओरडलो, ’माझ्या बाळा !’

पोटाशी धरुनी घट्ट, चुंबिले त्याला

’तू’ बालक होउनि देवा, देशी भेटी

इतुके का आहे पुण्य आमुच्या गाठी !’

धर्माजी दुरुनी पडला त्याच्या पाया

गहिवरुनी हृदयी लागे नेत्र पुसाया

तो सताड उघडे दिसे घराचे दार

माउलीस होती झोप लागली गाढ !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

रानफुले

मन फुले हर्षुनी रानफुले पाहुनी

सृष्टिची मुले साजिरी गोजिरी गुणी !

शिकविले यांस हो गोड हसाया कुणी ?

मिळविले सुखाचे निधान हे कोठुनी ?

ही इथे डोलती पिवळी ’तरवड फुले’

निष्पर्ण ’किरळ’ शेंदरी फुलांनी खुले

भुइवरी उमलली शुभ्र ’कळइची ’ फुले

कुणि यक्षिणिने का मोती हे विखुरले !

डोकावति मधुनी चंद्रापरि ’चांदिल’

तर कुठे झळकती झेंडूंचे मंदिल !

शोभती किती जांभळी निळी ’रुइफुले’

की सृष्टिसतीच्या कानांतिल चौफुले !

तृणफुले उमलली ठायि ठायि चिमुकली

नावेही त्यांची अवगत नसती मुळी

क्षण फुलून क्षणभर दुसर्‍यांना फुलविणे

का यास्तव यांचे क्षणभंगुर हे जिणे !

"रमतात यक्षिणी का तुमच्या संगती !

ही फुलपाखरे तुमच्याशिच रंगती

किति सृष्टीची करमणूक करता तुम्ही

चर्येवर तुमच्या गोड हसू नेहमी !

भावंड एक मी दुःखी कष्टी, मला

हसवून एकदा फुलवा जीवनकळा !

सहवास सुखाचा तुमचा मज लाभला

तर फुलून गाणे गाइल माझा गळा !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

सोनावळीची फुले

मी हिंडत होतो स्वैरपणे एकदा

गगनात विहरतो मेघ जसा एकटा

तो एकाएकी रानी दिसला मला

तो पिवळा पिवळा सोनावळिचा दळा

ओढयाच्या काठी तिच्या फुलांचे थवे

किती डोलत होते मंजुळ वार्‍यासवे !

सुरतरंगिणीपट चमचम करितो निशी

मज शोभा दिसली सोनावळिची तशी

हलवीत आपुली शिरे गुंग नर्तनी

पाहिली फुले लक्षावधि एक्या क्षणी

त्या खळखळ लाटा नाचत होत्या जळी

मज ’सळसळ’ यांची गोड अधिक वाटली

परिवार बघुनि हा आनंदी भोवती

मम कविच्या हृदयी हर्षा नुरली मिती

मी सूक्ष्म विचारी गढलो, नकळे परी

कोणती साठली दौलत मम अंतरी !

विमनस्कपणे वा शूनय मने कैकदा

आरामखुर्चिवरि उगीच बसतो,तदा-

नाचती फुले ती अंतर्दृष्टीपुढे

एकांतपणाचे श्रेय अहा केवढे !

तेधवा हृदय मम हर्षे ओथंबते

अन् सोनावळिच्या फुलांसवे नाचते !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

प्रचीति

इथून पश्चिमेकडे भरारि घे मनोविहंग

तिथेच दंग होत तो, नका करु समाधि-भंग !

म्हणाल दृश्य कोणते

तयास भूल पाडिते

समोर पाहिलेत का विशाल विश्व नीलरंग !

अथांग सिंधु होत हा निळया नभात एकरुप

परेश याच दर्पणी बघे स्वरुप विश्वरुप

विलीन जीव हो शिवात

उमा जशी सदाशिवात

अशी प्रचीति येउनी अमूप ये मना हुरुप

लुटून घेति लोचने प्रसन्न नीलिमा प्रशांत

गमे शरीर न्हाउनी बने तजेल नीलकान्त !

किती पहा पुढे पुढे

किती पहा पलीकडे

असीम जे, अगाध जे, कुठून ते असेल सान्त ?

मऊ नि आर्द्र सैकती उभा न मीच दीर्घकाल

उभ्या सदाच नारळी, सदा उभेच उंच ताल !

बुडी हळूच घे जळी

कसा रवी, कसा शशी !

सहर्ष हे न्यहाळिती अशी सुरम्य हालचाल !

जिथे नभात मीनला समुद्र त्या कडेवरुन

धरुन ओळ चालली सलील तारचे दुरुन !

सरोवरात राजहंस

सफेत हालवून पंख

मजेत पोहती जणू, हरेचि भान हे बघून !

कुठून चालली कुठे ? मनास होत गूढ भास

त्यजून या जगा सुरु नव्या जगाकडे प्रवास

बघा शिडेच पांढरी

अदृश्य नाखवे परी

बसून तारवात त्या अधीर मी फिरावयास !

अलीकडील बंदरा कशास खुंटवून नाव

मुशाफिरा विरामसी, तुझे पलीकडेच गाव

हळू हळू पुढे पुढे

तुझेहि तारु जाउ दे

अनंत नीलिमेत त्या कधीतरी मिळेल ठाव !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या