जीवनबाग

(नाचत म्हणावयाचे गाणे)

प्रभु माझी जीवनबाग सजव।।

कुशल तू माळी
बाग सांभाळी
स्वर्गीय सौंदर्ये ती रे खुलव।। प्रभु....।।

गत काळातिल
सगळा खळमळ
भरपूर येथे खताला सडव।। प्रभु....।।

द्वेष मत्सर
हेची फत्तर
फोडुन, प्रेमाचे वृक्ष फुलव।। प्रभु....।।

मोह विकार
बाग खाणार
वैराग्य-दंडाने त्यांना घालव।। प्रभु....।।

तव करुणेचा
मंगलतेचा
शिवतम वसंतवारा वाहव।। प्रभु....।।

दृढ श्रद्धेचे
सद्भक्तीचे
सुंदर मांदार येथे डुलव।। प्रभु....।।

उत्साहाची
आनंदाची
थुइथुई कारंजी येथे उडव।। प्रभु....।।

धृताचे अभिनव
घालुन मांडव
त्यावर शांतीचे वेल चढव।। प्रभु....।।

चारित्र्याचे
पावित्र्याचे
शीतल शांतसे कुंज घडव।। प्रभु....।।

सत्प्रतिभेचे
सतज्ञानाचे
गुंगूगुंगू मिलिंद गुंगव।। प्रभु....।।

सहजपणाचे
सतस्फूर्तीचे
करु देत विहंगम गोड रव।। प्रभु....।।

परमैक्याचा
झोला साचा
बांधुन त्यावर जीव झुलव।। प्रभु....।।

फुलवुन जीवन
तेथे निवसुन
मग गोड गोड तू वेणू वाजव।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

भाग्याचे अश्रु

अनुताप- आसवांनी। कासार मानसाचे
भरते तुडुंब तेव्हा। ती भक्तिवेल नाचे
त्या भक्तिवेलावरती। चित्पद्म ते फुलेल
येऊनिया मुकुंद। मग त्यात तो बसेल
रड तू सदैव बाळा। भरु दे तुडुंब हृदय
येईल भक्ति मग ती। होईल सच्चिदुदय
ते भाग्यवंत अश्रु। जवळी तुझ्या विपूल
हसशील लौकरीच। जरि आज तू मलूल


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मार्च १९३२

तळमळतो रे तुझा तान्हा

तळमळतो रे तुझा तान्हा।।
कामधेनु तू माझी देवा
चोरु नको रे अता पान्हा। तळमळतो....।।

धन कृपणाला जल मीनाला
तेवि मला तू सख्या कान्ह्या। तळमळतो....।।

गोकुळि गोरस सकळां दिधला
प्रभुजि अजी ते मनी आणा। तळमळतो....।।

अजुन दया जरि तू ना करिशिल
ठेवु कशाला तरि प्राणा। तळमळतो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२

निर्वाणीचे सांगणे

नाशी मोह प्रभुजि अथवा प्राण घेऊन जाई
नेई देह त्वरित अथवा ही अहंता हरावी
माझे चित्त स्थिर करि न वा थांबव श्वास देवा
पाशां तोडी सकळ, धरवे धीर ना, मृत्यु देवा।।

आनंदाने हृदयि धरु का बदबुदांचे पसारे?
मृत्युंजा का परम- रतिने पूजु सोडून तारे?
पीयूषाची प्रभुजि मजला लागलीसे पिपासा
कांजी लावू कशि मग मुखा? सिद्ध मी सर्वनाशा।।

माते प्रेमामृतजलनिधे मंगले हे उदारे
दृश्यादृश्या सृजिशि सगळे हे तुझे खेळ सारे
मच्चित्तांतर्गत तम हरी, दे प्रकाशांशु एक
आहे मी क्षुद्विकल बहुता जन्मिचा काहि फेक।।

मच्चित्ती जी सतत उठती वादळे शांत व्हावी
विध्वंसावी मम मदगृहे सर्व आसक्ति जावी
येवो चित्ती स्मरण न कधी कामिनीकांचनांचे
माते! हे दे मजसि, अथवा प्राण फेकीन साचे।।

त्वत्कारुण्यांबुधिमधिल ना बिंदू लाभे जरासा
माते! माते जरि, तरि गळ्यालागि लावीन फासा
आई होशी कृपण कशि तू बाळ जाई सुकून
त्वत्कारुण्ये जलद भरले पाठवी बिंदु दोन।।

विश्वाधारे। अगतिक तुला बाळ हा हाक मारी
दारी आला सहृदये! तारि वा त्यास मारी
हे प्रेमाब्धे! परमकरुणालंकृते! हे अनंते!
दे आधारा मज न रडवी वत्सले! स्नेहमृत!।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

कधि येशिल हृदयि रघुराया

कधि येशिल हृदयि रघुराया
कधि करुणेची करिशिल छाया।। हृदयि....।।

मोह न मजला मळि आवरती
अगतिक मी अति
पडतो पाया।। हृदयि....।।

बहुमोलाचे हे मम जीवन
हे करुणाधन
जाई वाया।। हृदयि....।।

होइल सदया जरि व दया तव
ठेवु कशास्तव
तरि मम काया।। हृदयि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

का मजला देता प्रेम?

मम हातांनी काहि न होइल काम
का मजला देता प्रेम?
मी वांझ असे, कसलि न राखा आस
ती आशा होइल खाक
जगि दु:ख नसे आशा-भंगासारे
ते प्रेम म्हणुनि ना द्या रे
प्रेमाला लायक नाही
करुणेला लायक नाही
साहाय्या लायक नाही
तुम्हि सोडुन द्या माझे सकळहि नाद
का बसता घालित वाद।।

तो प्रेमाचा पाउस मजवर होई
परि दु:ख हेच मज दाही
त्या प्रेमाला लायक मुळि नसताना
का देती मजसि कळेना
ते जो जो हे दाखवितात प्रेम
हृदयात भकता किति शरम
मी काय तयांना देऊ
मी काय तयांना दावू
मी काय तत्पदी वाहू
मद्दैन्याने डोळे ओले माझे
हृदयावर दुर्धर ओझे।।

मज्जीवन हे निष्फळ दीन दरिद्र
गतसार अतीव क्षुद्र
किति सांगु तुम्हां अश्रु न दिसती काय
ती ऐकु व ये का हाय
मम सुसकारे कानि न का ते पडले
दिसती का न डोळे भरले
जा सकळ तुम्हि माघारे
मजकडे न कुणिहि बघा रे
तुम्हि थोर कर्मकर सारे
परि मी न असे, मी न करितसे काही
मरतो ना म्हणुनी राही।।

त्या दगडाला काय घालुनी पाणी
येईल कधी ना फुलुनी
त्या मेलेल्या खोडा घालुन पाणी
येईल काय भरभरुनी
मृत देहाला अर्पुन वस्त्रे अन्ने
तो उठेल का चैतन्ये
हे व्यर्थ सर्व सायास
हा अनाठायि हो त्रास
येतील कधि न कामास
तो बंधूंनो विकाससंभव जेथे
अर्पिजे सकलही तेथे।।

मी जगती या कर्मशून्य हत जीव
का करिता माझी कीव
ना कधि काळी अंकुर मज फुटतील
ना फुलेफळे धरतील
ना छायाही देइल जीवन माझे
वदताना मन्मन भाजे
का उगाच येता प्रेम
मी निराश निष्क्रिय अधम
मी मत हत निपतित परम
का लाजविता प्रेम समर्पुन माते
हे प्रेम जाळि हृदयाते।।

ते प्रेमाचे तुमचे सदलंकार
परि मजला मारक गरल
ती प्रेमाने अर्पितसा जी मदत
मज सदैव ती रडवीत
मी प्रेम कशाला घेऊ
जगतास काय मी देऊ
मी मदत कशाला घेऊ
मी घेत असे देउन शके काही
हा विचार हृदया दाही।।

 मी तुम्हाला काय देउ परतून
मी काय देउ हो खूण
मी जगताच्या पासुन घेतो भारी
परि अजुनी रडत भिकारी
मज घालाया येईना हो भर ती
म्हणुनी हे लोचन रडती
मज किती मरावे वाटे
ते भवत्प्रेम मज काटे
मति दाटे अंतर फाटे
हा पोळितसे विचार माझ्या हृदया
म्हणुनि ना प्रेम द्या न दया।।

मजपासोनी अपेक्षा तुम्हां असती
प्रेमाची म्हणुनी वृष्टि
हा उपयोगा येइल तुम्हां वाटे
प्रेमाचे म्हणुनी नाते
मज निर्लोभी पवित्र पावन गणुनी
देतसा प्रेम आणोनी
परि तुम्हां सांगतो सत्य
करु नका अपेक्षा व्यर्थ
मी हताश दुर्बळ पतित
हा उपयोगी नाही, येइल दिसुनी
मग जाल सकलही फसुनी।।

ते पुत्राला मायबाप वाढविती
करितात किती ते प्रीती
मनि आशा की होइल मोठा पुत्र
वार्धक्यी देइल हात
हा येइल की पुत्र आमुच्या कामा
मनि इच्छुन देती प्रेमा
जरि उनाड मुलगा झाला
किति दु:ख आईबापाला
केवढा ढका आशेला
त्या हृदयीच्या खेळविलेल्या आशा
जातात सर्वही नाशा।।

तुम्हि काहिच का अपेक्षा न ठेवून
देतसा प्रेम आणून
तुम्हि काहिच का आशा ना राखून
देतसा प्रेम वाढून
मजवरि तुमचे प्रेम सदा जे दिसते
निरपेक्ष काय ते असते
प्रेमास न का फलवास
प्रेमा न कसलि का आस
जे देत असा तुम्हि द्यास
ते निरपेक्ष प्रेम असे जरि जवळ
मज त्याचा द्यावा कवळ।।

मज गंध नसे रंग नसे ना शुभ्रता
पावित्र्य नसे ना मधता
मी दुर्गंधे भरलेले हे फूल
ते विषमय फळ लागेल
या सगळ्याला असाल जरि का सिद्ध
तरि करा प्रीतिने बद्ध
होवो न निराशा तुमची
मागून थोर हृदयाची
म्हणुन ही कथा मम साची
मी सांगतसे तुमच्या चरणांपाशी
आणून अश्रू नयनांसी।।

जो पाप्याला हृदयापाशी धरिल
प्रेमाने त्या न्हाणील
ज्यापासोनी इवलिहि नाही आस
जो त्यासहि दे प्रेमास
ते प्रेम असे दुर्मिळ दुर्मिळ जगती
या भुवनि नसे तत्पाप्ति
प्रेमाच्या पाठीमागे
आशांचे असती लागे
ते प्रेम हेतुने जागे
मग रडती की प्रेम व्यर्थची केले
ते सारे मातित गेले।।

कधि केलेले प्रेम न जाई व्यर्थ
ज्याला ही श्रद्धा सत्य
तो पडलेला पर्जन्याचा थेंब
कधि तरि वरि आणिल कोंब
तो टाकीचा पडलेला जो घाव
दगडास करीलचि देव
ही आशा जरि हो अमरा
ते प्रेम तरिच तुम्हि वितरा
ना सोडा कधिही धीरा
मम जीवन हे फुलेल शतजन्मांनी
हे ठेवुनि मनि द्या पाणी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, जानेवारी १९३५

अश्रु

नको माझे अश्रु
हाचि थोर ठेवा
बाकी सारे नेई
परी हे लोचन
माझे रुप मज
हेचि तातमात
अश्रू माझे थोर
अश्रू कल्पतरु
अश्रू माझे मला
अश्रू भेटवतिल

अश्रू माझा जीव
देवा त्याच्यावीण
अश्रू वाचवीविती
माझा फुलवीती
अश्रुच्या बिंदुत
नको तो गोविंदु
सगळे हे जग
सखा माझा परी
अश्रुस पूजीन
मनी साठवून

कधी नेऊ देवा
माझा एक
धन, सुख, मान
राखी ओले
अश्रू दावितात
प्राणदाते
ज्ञानदाते गुरुवार
माझे खरे
गोड हासवतिल
माझे ध्येय

अश्रु माझा प्राण
न जगेन
अश्रू हासवीती
जीवनतरु
माझा सुखसिंधु
नेऊ कधी
तिरस्कार करी
अश्रु एक
अश्रुस ठेवीन
अहोरात्र

इवलासा अश्रु
जीवाला चढवी
इवलासा अश्रु
पाषाणाचे करी
इवलासा अश्रु
निर्मीत अवीट
इवलासा अश्रु
अमित पिकती
इवलासा अश्रु
कोट्यावधि गोष्टी
इवलासा अश्रु
देवी सरस्वती

इवलासा अश्रु
संसारी महोच्च
इवलासा तारा
परी तो मोजून
बाळकृष्णाचे ते
यशोदा ब्रह्मांड
इवलीशी मूर्ति
परी त्रैलोक्याची
इवलेसे पान
स्वामी तृप्त होत
इवलेसे पान 
लीलेने तुळीत
इवलासा अश्रु
सारे त्यात राहे

पर्वत बुडवी
मोक्षपदी
परी वज्रा चुरी
नवनीत
खारट आंबट
सुधासिंधु
ओलावा तो किती
माझे मळे
परी त्याच्या पोटी
साठलेल्या
परी बोले किती
तेथे मूक

नका मानू तुच्छ
स्थान त्याचे
दिसतो दुरुन
कोण येई?
इवलेसे तोंड
देखे त्यात
बटु वामनाची
केली मिती
पांचाळी अर्पित
ब्रह्मांडाचा
रुक्मिणी ठेवीत
विश्वंभरा
तसा माझा आहे
भाग्य माझे

इवलासा अश्रु
करीतसे तूर्ण
इवलासा अश्रु
जीवनग्रंथाला
इवलासा अश्रु
वियोग तो नसो
इवलासा अश्रु
तोवरी सकळ

अश्रु माझी आशा
अश्रु हा निर्मळ
अश्रु हा लहान
अश्रू नारायण
पोटात ठेवीन
मी ना विसंबेन

अपूर्णाला पूर्ण
सांगू काय
पूर्ण विरामाला
गोड देई
माझा मज असो
त्याचा कधी
जो माझ्याजवळ
भाग्य माझे

अश्रु माझे बाळ
जवळ असो
अश्रु हा महान
आहे माझा
डोळ्यांत ठेवीन
त्याला कधी


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मार्च १९३३