आलों -स्वतंत्र तव भाव !-स्वतंत्रतेने
आराधण्या प्रथम तन्मय आर्जवाने,
प्रेमार्तता उघड बोलुनि दाखवीली
-शब्दांत, जे ठरति बालिश अन्य वेळीं.
दोघेंच आपण सुहास, न पाहणारा,
निश्चिन्त- चित्त बघ मांडुनि हा पसारा
विश्वासपूर्ण बसलों मम भावनांचा,
रागानुराग नि विनोदमय स्तुतीचा.
किंचित क्षणांत वरती ताव दृष्टि जावी,
अन हासरी चमक लोचनिं वेड लावी !
होतें निवांत; मन संशयशून्य, भोळें;
अर्थविना सरस-वाक्पटुताहि वोळे.
किंचित पुन्हा नजर ही वरती करून
तूं हासतां बघितले फिरवून मान,
-भांबावलों-स्तिमित-बावरलों- कळेना
कोठे, कसा, कुठुनि मी……..
तों विश्वनाट्यगृहांतुन या दिगंत,
हास्य-ध्वनी दुमदुमून भरे हवेंत;
अन रंगभूमिवरला जगतांत खास
गेलों विदूषक पुरा ठरुनी सुहास !