तीरावरल्या भव्य शिलेवर एकाकी बैसुनी,

हाससी काय जलीं निरखूनी ?


मंद विखुरती मेघ गुलाबी गगनी, अवनीतली

गुलाबी पडली तत्सावली.

पादाग्राला चुंबुनि जातां झुळझुळणारे जल,

वाढवी कोमलता निर्मल.

तृणांकुरांवर बागडणारी बारिक पिवळी फुलें

पहुडलीं पदराखालीं पिले.

हिरवी राई पार पसरली हासत हलते तुला,

चालल्या कानगोष्टि कोठल्या ?

पल्लवभारे तव शीरावर लवलेल्या वेलिने

कांहि ना वनराणीला उणे !


मंजुल पवनी तरल लकेरी स्तब्ध करी पावलां,

सुचावा मार्ग कसा, जरि खुला ?

सौंदर्याचें जगतावरती पसरे बघ चांदणें

राहिले काय अता मागणें !

 वाचन-मग्ना पर्णकुटीच्या दारिं उभी टेकुनी,

कपोला अंगुलिवर ठेवुनी.


सडा शिंपुनी प्रातःकाळी, सुंदर संमार्जुनी,

काढली रांगोळी अंगणी.

कडेकडेने गुलाब फुलला टपोर कलिका किती

लाजुनी अर्ध्या तुज हासती.

बाल हरिण तव धावत येतां अनिमिष बघ लोचनीं

राहिला पाहत तुज थबकुनी.

तिरपा डोंगर-कडा भयंकर सरळ तुटे खालती,

मागुनी सूर्यकिरण फाकती.

झाडावरले पान हलेना, स्थिरचर संमोहुनी

जाहले मग्न तुझ्या चिंतनी.


पवनीं भरल्या अलकसुगंधे राणी बेहोषुनी

भारलो निश्चल त्वदर्शनीं !



 गुलाब जाई फुललेली । वाऱ्यावर करिती केली;

हास गडे त्यांच्यासंगे । सुमहृदया माला तूं गे;

नयनामधि निर्मल पाणी । सस्मित मधु अधरीं गाणीं;

गात गात आनंदूनी । नंदनवन बनवी अवनी.


मिटलेल्या कोमल कलिका । पानांमधि लपवी लतिका;

एकेकिस शोधुनि काढी । चुंबुनी ती फुलवी वेडी.

– हात नका लावूं कुणिही । कोमेजुन जातिल बाईं;

शब्द नका काढूं कुणिही । लपविल ही नाजुक जाई.


सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;

मंद गंध भवती भरती । पानपुष्प पुलकित करिती.

वर्षांच्या मागुनि वर्षे । जातिल तरि विसरुनि हर्षे;

पाहत तुज राहिन ऐसा । आनंदित वेडा जैसा.


चकित परि तन्मयता ही । प्रश्न करी आश्चर्यें की,

स्वर्गातिल सौंदर्याला । बहर कसा भूवर आला !

 दिव्यात्म प्रस्फूर्त हृग्दीत हें गोड गाईल कोणास गुंजारवी ?

आवेगुनी अंतरीचा उमाळा दाटून येतां कुठे ओतणे ?

उत्फुल्ल हृत्पुष्प ! आशादलांचा खुले रंग ! भोळी चढे टवटवी !

तत्केसरांच्या सुवासी परागां कुणां केस-भांगांतुनी पेरणे ?

उत्तुंग लाटा समुल्लोलुनी या सुहृत्सागराच्या नभीं चालल्या;

ही फेनमाला स्वर्गस्थिता कोण घेईल का तारका झेलुनी ?

मज्जीवनाच्या पहाटेस वृत्ती मनींच्या अशा तीव्र आतूरल्या;

शोधार्थ अदृष्ट रूपा ! म्हणूनी किती भागलों वाट ही चालुनी !

कुणी हासली; रम्य गोष्टी कुणांच्या; कुणी स्पर्शुनी अंग बेहोषवी;

कुणी लोभलीं; लोभ झाला कुणांचा; कुणी कीवलीं व्यर्थ रस्त्यावरी;

कित्येक ऐशी ! भ्रमिष्टापरी मी तरी – अंतरी एकला !- आळवी

रूपास ज्या, तें दिसेना कुठेही जरी थांबला सूर्य माथ्यावरी.


तें रूप येथे ! न् समुद्धारिणी भक्ति निशःब्द त्वल्लीन हो हर्षुनी

हा हाय ! निस्सार तों पार्थिवत्वांत निभ्रांत तूं राहसी गुंगुंनी.

कोणी नको अन् कांही नको, देवता तूं एकली !

हृदय जीतें अर्पिलें हें होउनी बद्धांजली !

वाटभर गे हा फुफाटा; पाय जाती पोळुनी;

सौंदर्य तूझें – सावली ही ! सार्थ झाली चालणी.

आग पोटी भावनेची ! ‘घाल तुकडी भाकरी’,

– हीहि परि गे, याचना ना आज तूझ्या मंदिरी.

मन्मनाच्या माळरानी भावना-झुडुपें जिथे

तग न धरती, प्रेम-तरु गे, फोफावणें कैचा तिथे !

जीविताचें ऊन विश्वीं जोंवरी हें तापतें,

फक्त तूझ्या दर्शनाची ही पिपासा लागते.


सौंदर्य-देवि सुहास, तूं ! मी फक्त आतुर दर्शना;

मेल्यावरी तर हीहि गे, उरणार नाहि तहान ना ! 

 सुन्न झालें मन, सुन्न भावना या,

भोवताली पसरली रात्र-छाया;

पावसाचा चुकविण्या मार घेती

पांघरूनी अंधार घरें रस्तीं.

“- व्यर्थ येतां का ? प्रेम कधी माझें

– शक्य नाही” – उतरिलें तिथे ओझें

बंद दाराशीं मग मुग्ध भावनांचे;

आणि धरिला मम मार्ग सिधा….

पावसाळी अंधार गारठ्यांत

काकडूनी हम-मार्ग-दिवे जात;

चिंब ओला जाहलों आणि थेट

दारूगुत्त्याला दिली प्रथम-भेट !

भेट शेवटली तशी प्रथम तीच,

झोपडीला परतावी माय-खेच.

माय असते, बाईल जरी नाही,

प्रेमवंतां तशि प्रेमवंचितांही.

दिवस झाले कित्येक त्या प्रसंगा;

आज आलों शोधीत गेह-रांगा;

बंद आहे तव दार; परि ओझें

आत नेलें उचलुनी कुणीं माझें !

 हां हां थांब ! नको सुहास, गमवूं तोंडातली मौत्तिके,

“देवाच्या घरचाच न्याय असला !” प्रश्नास दे उत्तर.

“झाला खेळ, अता पुरे !” वद असे धिक्कारुनी कौतुके,

जातांना उपहास-हास्य-ध्वनिही पाडीत कानांवर.


काळी भीषण रात्र कापित निघे हृत्स्वामिनी भेटण्या

काळा फत्तर तोंच होउनि पडे तारा सहाऱ्यावर.

स्वर्गाच्या मग मंदिरी चमकती जेव्हा सख्या चांदण्या,

किंचित् हासुनी तारका खुणविते – “आता कळे अंतर !”


झाला अंक समाप्त एक ! बदले ही भूमिका, वेष हा;

मी रस्त्यातिल गे भिकार कवि, तूं प्रासादशृंगीं रहा !