तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : "स्वामी विवेकानंद"
ट्यूलिपमॅनिया
‘सिलसिला’तलं अमिताभ-रेखा यांचं ‘देखा एक ख्वाब तो…’ हे गाणं नेदरलँडमधल्या कुकेनहॉफच्या प्रसिद्ध ट्यूलिप गार्डनमध्ये शूट केलं होतं. पण त्या गाण्यात बहरलेल्या बागा तिथे प्रत्यक्षात बघताना मला नेहमी एके काळी इतिहासात याच ‘ट्यूलिप्सनी’ घातलेला प्रचंड गोंधळ आठवून अंगावर ‘काटा’ यायचा! १६३६-३७च्या काळात ‘ट्यूलिपमॅनिया’नं नेदरलँडमधे अक्षरश: धुमाकूळ घातला. १८४३ साली चार्लस् मॅकेनं त्याच्या ‘एक्स्ट्रॉऑर्डिनरी पॉप्युलर डिल्युजन्स अँड द मॅडनेस ऑफ क्राऊड्ज’ या पुस्तकात याविषयी बरंच लिहिलंय. १५९३ साली कार्लोस क्लासियस या वनस्पतिशास्त्रज्ञानं ट्यूलिप्स प्रथम हॉलंडला संशोधनासाठी आणले. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची फुलं बघितली. त्यांना ती आवडल्यानं त्यांनी ती चोरून विकायला सुरुवात केली. यातूनच हे खूळ चालू झालं. १६०० सालापासून कॉन्स्टॅन्टिनोपोलहूनच व्हिएन्नामार्गे युरोपमधे या फुलांचे कंद यायला सुरुवात झाली आणि मग भराभर ते वादळासारखे पसरले. याच काळात नेदरलँडमध्ये व्यापाराच्या जोरावर श्रीमंत झालेल्या मंडळींना ट्यूलिपची फुलं बाळगणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटू लागलं. ट्यूलिपची फुलं वेगवेगळ्या रंगांची असत. ज्याच्याकडे ही फुलं नसत, त्याला अरसिक समजलं जायचं. यामुळे आणि मागणीच्या मानानं ट्यूलिपच्या फुलांचा पुरवठा कमी असल्यानंही त्यांच्या किमती भरमसाठ वाढायला लागल्या. आणि मग स्वस्त भावानं ट्यूलिप्सचे कंद विकत घेऊन जास्त भावानं ती विकण्याची सट्टेबाजी सुरू झाली! याच काळात या फुलांना कसल्यातरी व्हायरसनं ग्रासलं. पण त्यामुळे त्यांच्यावर रंगांचे जे पट्टे उमटले ते आणखीनच छान दिसत. त्यामुळे ती फुलं आणखीनच दुर्मिळ झाली आणि त्यांचे भाव जास्तच कडाडले! या किमती इतक्या वाढल्या को सामान्य डच लोकांचं वार्षिक सरासरी उत्पन्न दरडोई १५० डच गिल्डर्स किंवा १५० फ्लोरिन्स असताना ट्यूलिपच्या ‘सेम्पर ऑगस्टस’ या प्रसिद्ध जातीच्या एका कंदाची किंमत त्याच्या ४० पट किंवा ६००० फ्लोरिन्स झाली होती! त्या वेळच्या किमती लक्षात घेता त्या वेळचा १ फ्लॉरिन म्हणजे २००२ सालचे १०.२८ युरोज किंवा साधारणपणे ५०० रु. होतात. म्हणजे त्या वेळच्या एका कंदाची किंमत आजच्या रुपयात ६००० x ५०० म्हणजे ३० लाख रु. होत होती! १६३६ सालच्या सुरुवातीला हॉलंडमधे सेम्पर ऑगस्टसचे फक्त दोनच कंद उपलब्ध होते. त्यातल्या हार्लेममधल्या एका कंदासाठी १२ एकर जमीन; तर अॅमस्टरडॅममध्ये त्याचसाठी ४६०० फ्लोरिन्स, २ घोडे आणि नवीन घोडागाडी एका सट्टेबाजानं दिली!! ही कित्येकांची आयुष्याची कमाई होती! कित्येक व्यापारी या व्यापारातून दरमहा ६००० फ्लॉरिन्स कमावत. १६३६ साली ट्यूलिप्सचे कंद चक्क स्टॉक एक्स्चेंजवर जाऊन थडकले. समाजातले तथाकथित प्रतिष्ठित, सर्वसामान्य लोक, मोलकरणी, कामगार, छोटे व्यापारी आणि अगदी सफाई कामगारसुद्धा या ट्यूलिपच्या व्यापाराकडे आपलाही काही फायदा होईल म्हणून आपले उद्योग सोडून वळत होते! यातल्या सट्टेबाजीमुळे काही अतिश्रीमंत झाले तर काही कंगाल! १६३६-३७च्या हिवाळ्यात तर एका दिवसात किमान दहावेळा एकाच कंदाची खरेदी-विक्री प्रत्येक वेळी आधीच्यापेक्षा जास्त दरानं होत होती! स्टॉक एक्स्चेंजेस नसलेल्या गावात चक्क दारूच्या गुत्त्यात नाचगाणी आणि जेवणासमवेत ट्यूलिपचे लिलाव होत. तिथे फुलदाण्यांमधून या फुलांचं प्रदर्शन करत.
नंतर मग कंदाचे भाव एवढे वाढले की ते कंद नगाऐवजी वजनावर विकले जाऊ लागले. पूर्वी खूप कमी वजनाच्या वस्तूंना ग्रेन हे माप असे. ४८० ग्रेन्स म्हणजे १ औंस होई. पण आता पेरिट्स हे ग्रेन्सपेक्षाही कमी वजनाचं माप वापरलं जाऊ लागलं. कारण प्रचंड किमतीमुळे वजनातल्या अगदी थोड्या फरकानंही किंमत खूपच बदलणार होती. ट्यूलिपच्या वेगवेगळ्या जातींप्रमाणे ही किंमत बदलत होती. ४०० पेरिट्स वजनाचे अॅडमिरल लिफकेन या जातीचे कंद प्रत्येकी ४४०० फ्लोरिन्सला तर व्हिसरी जातीचे तितकेच कंद प्रत्येकी ३००० फ्लोरिन्सला मिळत होते!
या सट्टेबाजीचा कहर झाला तो म्हणजे एका गंमतशीर व्यवहारात. सात अनाथ मुलांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी ठेवलेली संपत्ती होती मौल्यवान ट्यूलिपचे ७० कंद! या कंदांच्या लिलावात एका कंदाची बोली ५२०० फ्लॉरिन्स तर एकूण कंदांचा व्यवहार ५३००० फ्लॉरिन्स इतका झाला होता! हार्लेमच्या एका व्यापाऱ्यानं तर त्याच्या अर्ध्या आयुष्याची कमाई नफा न मिळवता केवळ मित्रमंडळींकडून कौतुक करून घेण्यासाठी या ट्यूलिपच्या कंदांसाठी खर्च केली! आणखी एकदा अशीच धमाल झाली. एका श्रीमंत व्यापाऱ्यानं ३००० फ्लोरिन्सला (त्या काळातले २८० पौंड स्टर्लिंग!) सेम्पर ऑगस्टसचे कंद विकत घेतले होते. दुसऱ्या दिवशी ते जागेवर न दिसल्यानं अस्वस्थपणे तो ते शोधत असताना ते घेऊन येणारा नावाडी ट्यूलिपलाच कांदा समजून खाताना त्याला दिसला. भयंकर संतापून त्या व्यापाऱ्यानं त्या नावाड्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि या गुन्ह्याकरता त्या नावाड्याला मग अनेक महिने तुरुंगाची हवा खावी लागली! असंच एकदा एक वनस्पतिशास्त्रज्ही एका डच व्यापाऱ्याकडे पाहुणा म्हणून आलेला असताना पूर्वी न बघितलेला ट्यूलिपचा कंद एक दुर्मिळ कांदा समजून तो त्याचं विच्छेदन करायला लागला. चिडून त्या डच व्यापाऱ्यानं त्या वनस्पतिशास्त्रज्ञाला रस्त्यातून अक्षरश: फरफटत नेऊन मॅजिस्ट्रेटसमोर नेलं, तेव्हा त्याला त्या ‘कांद्या’ची किंमत ४००० फ्लोरिन्स आहे हे कळलं! त्यालाही बराच दंड आणि तुरुंगवास भोगावा लागला होता! असे बरेच किस्से त्या काळात घडत!
ट्यूलिपला मिळणारी प्रचंड मोठी बाजारपेठ बघून अनेकांनी मग भविष्यातल्या भावांच्या अंदाजाप्रमाणे ‘फ्युचर काँन्ट्रॅक्ट्स’ करून कोवळ्या रोपांची सट्टेबाजी सुरू केली. याला ‘विंड ट्रेड’ असं म्हणायला लागले. १६१० साली अशा व्यापाराला कायद्यानं बंदी घालूनही सगळ्यांनीच ट्यूलिपच्या बाबतीत कायद्याचं बेधडकपणे उल्लंघन करायला सुरुवात केली! पण हा वेडेपणा कुठेतरी थांबणारच होता. आणि झालं तसंच! १६२७च्या फेब्रुवारी महिन्यात ३ तारखेला हार्लेमच्या बाजारात एक दिवस अचानकपणे या कंदांसाठी ग्राहक कमी झाले. आणि मग ते कमी होतच गेले. मागणी घटतीय, त्यामुळे आता भाव घटतच राहणार आणि आपला तोटा होणार, त्यापेक्षा आत्ताच ते कंद विकलेले बरे असं समजून सगळ्यांनी ते विकण्यासाठी ही गर्दी केली. मग काय विचारता? मागणीच्या मानानं पुरवठा वाढल्यानं ट्यूलिपच्या किमती आणखीनच धडाधड कोसळायला लागल्या. कालांतरानं मग जे कंद पूर्वी ५००० फ्लॉरिन्सला विकले जात होते ते ४००० फ्लॉरिन्स, ३००० फ्लॉरिन्स असं करत-करत शेवटी जेमतेम १०० फ्लॉरिन्सला विकले जायला लागले! त्याचा परिणाम अर्थातच भयानक झाला. असंख्य व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचंही त्यात अतोनात नुकसान झालं. शेकडो मंडळी कंगाल होऊन भिकेला लागली. पूर्वी वाढीव भावानं खरीदण्याचे जे करार (फ्यूचर काँट्रॅक्ट्स) कित्येकांनी केले होते ती मंडळी आता ते करार पाळेनात. यावर मग भांडणं सुरू झाली. अनेक वादविवाद, चर्चा यांच्यानंतर १६३६च्या नोव्हेंबरपूर्वीचे करार रद्द ठरवले गेले आणि त्यानंतर करार केलेल्या ग्राहकांना एकूण व्यवहाराच्या १०% रक्कम विक्रेत्यानं द्यावी, असं सांगितलं गेलं. या निर्णयानं अर्थातच कोणाचंच समाधान झालं नाही. मग मंडळी कोर्टात गेली. फ्यूचर काँन्ट्रॅक्टस् केलेल्यांना कोर्टाकडूनही काही मदत मिळाली नाही. कारण असे व्यवहार अगोदरच बेकायदेशीर ठरवले असल्यानं या काँन्ट्रॅक्ट्समधले लोक अक्षरश: देशोधडीला लागले आणि अनेक रावांचे रंक झाले! ट्यूलिपचा हा बुडबुडा असा फुटल्यानं नेदरलँडस्मध्ये नंतर बराच काळ मंदीचं वातावरण निर्माण झालं.
व्हिलन (खलनायक)
सरंजामशाही पद्धतीतून युरोपमध्ये भांडवलशाही उभी राहत होती. तो काळ होता १५व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंतचा. सरंजामशाहीमधे जमीनदार आपल्या आलिशान घरात राहत आणि गावातली आजूबाजूची जमीनही त्यांच्याच मालकीची असे. भांडवलशाहीसाठी कामगार, भांडवल आणि भांडवली नीतिमूल्यं/कायदे या सगळ्यांची गरज होती. पण सरंजामशाहीमध्ये भूदास हे जमिनीला बांधलेले होते. जमीनदार स्वत:साठी मोठी जमीन ठेवून उरलेल्यातले लहान-लहान तुकडे भूदासांना भाड्यानं देत. या भूदासांमध्येही फ्रीमेन, व्हिलेन्स, कॉटेजर्स आणि गुलाम असे बरेच प्रकार आणि पातळ्या होत्या. यातले ‘फ्रीमेन’ हे जमीनदाराला भाडं दिल्यावर इतर काहीही करू शकत. ‘व्हिलेस’ या मंडळींना जमीनदाराची जमीन कसून आणि त्याची इतरही बरीच कामं करून उरलेल्या वेळातच स्वत:ची जमीन कसता येई. त्यांना गाव सोडून कायद्यानं कुठे जाताही येत नसे. कॉटेजर्सना तर दिवसभर जमीनदारांकडे काम करून राहायला फक्त झोपडी आणि खाण्यापुरतं अन्न मिळे. गुलामांना सगळ्यात कमी हक्क असत. थोडक्यात, जमीनदाराची मोठी जमीन, भूदासांना ‘भाड्यानं’ कसायला दिलेले जमिनीचे लहान-लहान तुकडे आणि गुरांना चरण्यासाठी एक सामायिक जमीन असं जमिनीचं वाटप त्या काळी असे. त्याच वेळी इंग्लंडमधल्या लोकरीला भाव चांगला यायला लागला. मग स्वत:च्या मेंढ्यांना चरायला जास्त जमीन मिळावी म्हणून जमीनदारांनी सामायिक चरण्याची जमीन कुंपण लावून (एन्क्लोज करून) इतरांच्या गुरांना वापरायला परवानगी नाकारायला सुरुवात केली. यातूनच पुढे ‘एन्क्लोजर’ चळवळ चालू झाली. शेवटी त्या वेळचं सरकार हे जमीनदारांच्याच बाजूनं असल्यानं त्याविषयीचे ‘ॲक्ट्स ऑफ एन्क्लोजर्स’ असे त्याविषयी कायदेही करण्यात आले. यामुळे मग अनेक भूदासांना शेती करणंच अशक्य होऊन बसलं. मग शेतीतल्या लोकांचा लोंढा शहरांकडे यायला लागला. ही मंडळी शहरांत येऊन लहानसहान कामं करणं, भीक मागणं याबरोबरच चोऱ्या-माऱ्याही करायला लागली. तेव्हापासून या ‘व्हिलेन’वरूनच ‘व्हिलन (खलनायक)’ हा शब्द निघाला. पण पुढे-पुढे त्यातली हुशार, तरुण मुलं यंत्रांवर कामं करायला लागली आणि अशा तऱ्हेनं जगातले पहिले औद्योगिक कामगार तयार झाले.
शिशिरागम - बा. सी. मर्ढेकर
शिशिरागम हा बा. सी. मर्ढेकरांचा पहिला काव्यसंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला.
कवितांना शीर्षक नाहीत, क्रमांक आहेत. 'शिशिरागम' ही पहिली कविता. बहुतेक कविता या शृंगाररसातील आहेत. चित्रदर्शी आणि गेय आहेत.
बहुतेक कविता 'सुनीत' वृत्तात रचल्या आहेत.
एकूण वीस कवितांचा हा संग्रह
मर्ढेकरांच्या शिशिरागम ह्या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितांवर रविकिरण मंडळाची−विशेषतः त्यातील माधव ज्यूलियन् ह्यांची−छाया दिसून येते.