नातरीं येथिचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।

 तो तेथें तरी पाडवा । दीपचि कीं ।।

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसऱ्या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म आहे. चहुकडे केवळ प्रकाशच देणारा जसा दिवा असतो

गुलमोहर - व पु काळे

1. आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही हेवा वाटावा इतरांना – आणि व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये – चांगलं दोनशे फुटांवरून पडावं. माणूस किती उंचीवर पोहचला होता ते तरी जगाला कळेल


2. प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.

3. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो.

4. पहिलं दु:ख येतं ते डोळ्यांवाटे. पहिला मोह नजरेचा. ही नजर एकदा बिघडली की माणूस बिघडला

5. बाह्य जगावर, सजावटीवर भुललेला माणूस स्वत:त डोकावून पाहूच शकत नाही. पापमार्गाकडे वेगाने नेते ती दृष्टी.

6. आपली सतत कीव केली जाते यासारखी दु:खदायक गोष्ट नाही.

7. पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.

8. चोरांना, दरोडेखोरांना किंवा खुन्यांना, एवढं माहीत असतं की देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही. तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काय भीती आहे ती माणसाची माणसाला. माणूसच माणसाला केव्हातरी पकडतो. माणसाला चुकवलं म्हणजे झालं.

9. अनोळखी माणसंच ओळखीची होतात आणि ओळख नसतानाच्या काळातले प्रश्न विचारून केव्हा केव्हा बेजार करतात.

10. देवाला दु:ख म्हणजे काय हे कळलं असतं तर त्यानं ते निर्माणच होऊ दिलं नसतं.

11. आपण वाहतो म्हणून ढग हालचाल करतात, समुद्रावर लाटा येतात, वणवा भडकतो, पाचोळा उडतो, त्याची जाणीव वाऱ्याला नसेल का? तो वाहतोच.

12. पळून जाणं एकदम सोपं. तेव्हा ते केव्हाही करता येतं. पळण्याची वाट केव्हाही हाताशी आहे हे गृहीत धर आणि परत आपल्या घरी जा. आधी जे अवघड आहे ते सोडवायचा प्रयत्न कर. कारण सोपी गोष्ट आपल्या मालकीची आहे

13. खरं प्रेम कमी पडतं; पण खोट्या प्रेमाला तूट पडायचं कारणच नव्हतं. अभिनयच करायचा हेच जिथं ठरवलेलं तेव्हा कमी पडायचं कारणच नव्हतं.

14. आजारी माणसाच्या बुद्धीवर ताबा असतो तो त्रासलेल्या शरीराचा. आजारपणातले माणसाचे निर्णय कधीच व्यवहार्य नसतात.

15. प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण फक्त स्टेशनपर्यंतच पोचवतो. पुढचा प्रवास त्यालाच करावा लागतो.

16. स्वत:च्या रूपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं.

17. माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात.

18. जोडीदाराची निवड कानांनी करावी, डोळ्यांनी करू नये.

19. प्रेमाच्या राज्यात माणूस कधीच मोठा-वयस्कर होत नाही.

20. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वत:ला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

21. अति ऊ-तिला खाज नाही आणि अति ऋण त्याला लाज नाही.

22. मासळी आणि पाहुणा कितीही चांगला असला तरी तीन दिवसांनंतर वास मारू लागतात.

 चोखाळपण रत्नांचे । रत्नावरी किरणांचे ।

 तैसे पुढा मन जयाचें । करणें पाठी ।।

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रत्नाचे शुद्धपण जे असते तेच फार वेधक असते. त्यावर किरण पडल्यावर त्या शुद्धपणाला झळाळी प्राप्त होते. ती रत्नाची आभा अधिक चोखळ होते. अगदी तसेच काहींचे मन असते. शुद्ध, स्फटिकासारखे स्वच्छ आणि पारदर्शक, ते मन सतत प्रकाशत रहाते त्या रत्नासारखे. त्याची स्वयंप्रकाशी झळाळणारी कृती मग मागोमाग उमटतेच. पण प्रकाशाचा मार्ग ते रत्न पहिल्यांदा दाखवते.

 जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । 

तैसा सर्वस्वे जो मज भजें । तो मी होऊनि ठाकी ।।

दिव्याने दिवा लावला की सर्वच दिवे उजळू लागतात आणि मग ह्या प्रकाशाच्या वाटेवरचा पहिला कोणता तेच लक्षात येईनासे होते. तसे कृष्णभक्तीत सर्वस्वाने बुडून गेलेला अर्जुन शेवटी श्रीकृष्णरूप होऊनच उरतो.

 सुखी संतोषा न यावें । दुःखी विषादां न भजावे ।

 आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ।

सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान होऊन नाचू नये की दुःखाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये. मनातल्या अंतर्मनातसुद्धा लाभ आणि हानी यांची चित्रे उमटू देऊ नयेत,

वपू 85

1. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

2. जिथं आव्हान असतं, तिथंच ताजेपणा असतो.

3. भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्यानं होणाऱ्या अपमानांची शल्यं बोथट होतात.

4. स्वप्नं आपली काळजी घेतात. आपणही त्यांची देखभाल करायची असते.

5. आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात, तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्यानं एकदा स्वतःची गती घेतली, की उरलेला प्रवास आपोआप होतो. तसंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात, की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

6. जी माणसं जाणिवेनं जगतात, ती नुसतीच दुःखाची कारणमीमांसा शोधून थांबत नाहीत, तर एखाद्या सौख्याचेही आपण भागीदार का झालो, याचाही ते वेध घेतात. अशी माणसं, ज्या सुखाला आपण पात्र नाही, त्याकडे पाठ फिरवतात. कधी-कधी.

7. सिंहगड पाहायचा असेल, तर तो पायी चढत चढतच बघायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात, की विज्ञानाचा चमत्कार समजतो, इतिहास समजत नाही.

8. व्यक्तींच्या वृत्ती वास्तूंना व्यापून उरतात. काही काही वास्तू ‘याच’ म्हणतात. काही काही ‘यायचं असेल, तर या’ इथपासून ‘नाही आलात, तरी चालेल’ इथपर्यंत सगळं सांगतात.

9. प्रारंभासाठी सगुण-साकाराची ओढ ही महत्त्वाची बाब आहे; पण कितीही देखणेपणा-देखणेपणा म्हटलं, तरी त्याला सगुण-साकाराच्याच मर्यादा छळतात. नावीन्य आणि परिचय या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिणी! मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जुळतात, म्हणून! मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून! नावीन्याची ओढ ही एक सहजावस्था आहे.

10. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते, हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.

11. अर्थात परमेश्वराचं देणं असंच असतं. मोजमाप नाही, हिशेब नाही.

12. किंमत मोजल्यावरच एखाद्या गोष्टीचा लाभ होतो, असा दृष्टिकोन ठेवला, तर सौख्याला कडकडून भिडता येतं.7

13. फुप्फुसं तुडुंब होईतो प्राणवायू घेता येणं हे जगातलं सर्वश्रेष्ठ असं, इंद्रपदापेक्षा श्रेष्ठ सौख्य आहे

14. जे अमूर्त आहे, त्याला मूर्त करू नये. जे अमूर्त आहे, ते निराकार आहे. जे निराकार असतं, ते अनंत असतं. विश्व व्यापून उरतं. स्वप्नं तशीच असतात. ती तशीच ठेवा. तुम्ही स्वप्नांची छायाचित्रं बनवलीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत. छायाचित्रं सप्तरंगात कोंडता येतात. रंगांनी ओथंबलेली छायाचित्रं थोड्याच वेळात जुनी का वाटतात? आणि स्वप्नं कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो. त्याचं नाव अंतरंग. तुम्ही तुमची स्वप्नदृष्टी चौकटीत बांधायला निघालात, मग कोंडमारा का होणार नाही

15. प्रत्येकानं काही ना काही वेड घेतलेलं असतं. केवळ शरीरानं जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात. मन नावाची ठिणगी आहे, ती सातत्यानं प्राणवायूच्या शोधात असते. पण तरीही, आपण घेतलेल्या वेडाला, कुणीतरी ते वेड नसून शहाणपण आहे, असं म्हणावं, ही इच्छा असते. अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेनं चालू असतो.

16. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, याचं उत्तर पण नियतीजवळच असतं.

17. कोर्टात न्याय मिळत नसून, कोर्टात जे मिळतं, त्याला न्याय म्हणावा लागतो.

18. वेगवेगळ्या मुखवट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो. सुख, शांती, समाधान या स्वयंप्रकाशित गोष्टी असतात. तृप्त माणसाला नैराश्याचा आव आणताच येत नाही.

19. गणित येत नसलं की त्याची भीती वाटते. मग घड्याळाचीही दहशत वाटते. कारण काळवेळाचं भान म्हणजेच गणित! पण आकडेमोडीतली गंमत कळायला लागली की गणित हा खेळ होतो. माझ्या मुलांना मी आयुष्य खेळायचं कसं हे पटवलं.

20. कारण सांगूच नका, सगळी गंमत निघून जाईल. पृथक्करणाच्या पलीकडे काही आनंद असावेत.

21. जाब न विचारणारी एक जागा प्रत्येक कर्तबगार व्यक्तीला हवी असते.

22. रंगलेल्या गप्पा संपल्या, की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरू करण्यात आणखी एक आनंद असतो. गप्पा चालू असताना शब्दाधीन असलेला आनंद मिळवायचा असतो, तर नंतरच्या स्वगत मैफलीत शब्दातीत आनंद शोधायचा असतो. पहिल्या मैफलीत नाद असतो तर दुसऱ्यात गंध!

23. आपलं आयुष्य, आपणच त्याचे साक्षी होऊन बघायचं असतं

24. पूजेला काहीही चालतं, याचा अर्थच हा, की धर्म सांगतो, साधनांसाठी थांबून राहू नकोस. कार्य करीत राहा. तो वरचा, आकाशातला बाप तर तुमच्याकडे काहीच मागत नाही. बाजारातून एकूणएक वस्तू जरी गायब झाल्या, तरी आपल्या धर्मात पूजाअर्चा होऊ शकते. दोन हात आणि एक मस्तक तर नाहीसं होत नाही ना?

25. जे आहे, ते लपत नाही. जे मुळातच नसतं, ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. शब्द तिथं कमी पडतात.

26. प्रेमाची भावना ही इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे की, नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.

27. माणूस तसा हा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्त्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.

28. सांत्वनाच्या भाबड्या शब्दांच्या आधारापेक्षा एक नवी विचारांची दिशा जास्त धीर देते

29. रडण्याचं नातं दुबळेपणाशी जोडण्यात काही अर्थ नाही. रडण्यात कृतज्ञता असते.

30. कोणतीही संस्था प्रामाणिक व स्वाभिमानी सेवकांच्या जिवावरच चालते. पदाधिकाऱ्यांना मात्र तोंडपुजे लोक हवे असतात.

31. आपलं सामान काही काळच दुसरा माणूस उचलतो, हेच खरं! ओझं त्याच्या हातात, पण दडपण आपल्यावर!

32. ज्याच्यामागे चिकार कामं असतात, तोच आणखी काम घेऊ शकतो, कारण त्याला पहिली कामं संपवावी लागतात.

33. जो नवा विचार देतो, तो गुरू!

34. प्रेमाचा उत्स्फूर्त पुकार हा एकेरीच असतो.

35. प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं. अर्पणभावाचा कोंब त्याशिवाय फुटत नाही. देतं कोण, घेतं कोण, हा उखाणा न सुटण्यातच समागमाची लज्जत असते.

36. वर्तमानकाळ मानणारा माणूस अत्यंत अमानुष होतो, असा मला अनुभव येत होता. कारण या माणसाच्या गरजा क्षणांशी निगडित असतात. कार्यक्षेत्रच संकुचित निवडलं, की यशस्वी ठरायला वेळ लागत नाही. भूतकाळाचं ओझं पेलायलाही सामर्थ्य लागतं. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला भूतकाळ ओझंच टाकतो का? काही रम्य आठवणींचे नजराणे देण्याचं सामर्थ्यही भूतकाळातच असतं. अनेक माणसांचा उपयोग आपण शिडीसारखा केलेला असतो. ज्यांना हे मोठेपण नाकारायचं असतं, तीच माणसं गेलेल्या काळाचं काही देणं लागत नाहीत.

37. हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं.

38. वृत्तीप्रमाणे माणूस समर्थन शोधतो

39. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या गुणवान माणसांचा आक्रोश म्हणजे इतिहास!

40. वेळेवर न भेटणाऱ्या माणसांपेक्षा, मठ्ठ पण हव्या त्या क्षणी हजर होणाऱ्या माणसांवरच आपली मदार असते.

41. झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात, तेव्हा ती झाडांपेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाडं वाढतात, तेव्हा ती फक्त जगतात. वाढत नाहीत. फक्त दिसतात, पण त्यांची वाढ खुंटलेली असते.

संधी

मी काळाला एक संधी देतो आहे

आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे

तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे…

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी
की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे…!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे…

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे…

-संदीप खरे