(वृत्त – शार्दूलविक्रीडित)
श्रीमत्कौरवराजराज्यशकटश्रीची प्रजापालनीं
कैशी वृत्ति असे ? – भली उलट वा ? वार्ता अशी काढुनी –
आणाया, द्विजवेष देउनि असा, होता दुरी प्रेषिला,
द्वैताख्यीं विपिनीं किरात फिरुनी धर्मांसि तो भेटला. १
त्यानें नम्रपणें प्रणाम करुनी राजेश सन्मानिला,
शत्रूनें मग जिंकिलें धरणिला तें वृत्त तो ठाकला –
सांगायास, तयीं व्यथा नच मनीं त्याच्या उभी राहिली,
कांकी उक्ति हितेच्छू ते न वदती खोटी जरी चांगली. २
दुष्टांचा करण्या विघात हृदयीं जो धर्म इच्छा धऱी,
एकान्तीं मग घेतली वनचरें त्याची अनुज्ञा शिरीं;
जीचा अर्थ उदार निश्चित तसा, वर्णी जिच्या माधुरी
बोलाया सरसावला मग अशी त्याचेसर्वे वैखुरी :- ३
“डोळे हेरचि होत हे नृपतिचे, यालागुनी राजया !
त्यांहीं त्यास बरें नसे ठकविणें, हें बोलणें कासया ?
तेव्हां साधु असाधु वा मम वचा सोसावया अर्हशी,
वाणी कारण दुर्लभा हितकरा चेतोहराही तशी. ४
“स्वामीला नच तो हितास कथितो, तो हो सखा कायसा?
मित्राचा हितवाद ऐकूनि न घे, स्वामी म्हणों तो कसा ? –
अन्योन्यां अनुकूल होऊनि सदा जे या जगीं नांदती
राजे आणि अमात्य, त्यांवरि करी ती राजलक्ष्मी रति. ५
“तीं दुर्बोध निसर्गसिद्ध, चरितें कोठें नृपांची बरें!
राजन् ! मत्सम अप्रबुद्धमतिचीं कोठें बरें पामरें !
ऐसें हें असुनीहि गुप्त अरिची मी काढिली बातमी,
हा तों स्पष्ट प्रभावचि असे, ही बोलतों बात मी. ६
“तुम्हांपासुनि तो पराभव मनीं शंकी, जरी काननीं
तुम्ही राहतसां, सुयोधन जरी बैसे स्वराज्यसनी;
यालागूनि, दुरोदरीं मिळविली पृथ्वी, अतां इच्छितो
न्यायानें वश ती समग्र करण्या, गांधारिचा सुनु तो. ७
“जिंकायास तुम्हांस तो खल सदा इच्छा धरुनी, जनीं
कीर्तीला पसरीतसे, निजगुणां कार्यी भल्या लावुनी;
मोठ्याशीं बरवे रिपुत्वहि खलस्नेहाहुनी फारसें,
ज्याअर्थी अति उन्नतीस सहसा लोकांस तें नेतसें. ८
“कामद्यारि सहा हटें हटवुनी, वैवस्ततें घातली,
ती दुष्प्राप्यहि राज्यरीतिपदवी पावावयाची भली –
इच्छा तो धरुनी मनीं, अलसही टाकूनि, रात्रंदिन
नेमें वाढवितो पराक्रम, नयें वागोनि दुर्योधन. ९
“मृत्यांला अपुल्या निबद्धहृदयस्नेह्यांपरी लेखितो,
स्नेह्यांलाहि समान मान अपुल्या बंधूंसवें दावितो,
कौशल्यें निजबांधवां, दडवुनी सारी अहंभावना,
राजाहूनि अह्मी कमी नच, अशी लावी करूं कल्पना. १०
“आसक्ती कवणावरीहि न कधीं तो ठेवितां फार ती,
चित्तीं किन्तु समानभक्ति धऱुनी, धर्मार्थकामांप्रती-
आराधी उचित क्रिया करुनियां, सारे गुणासक्त ते-
होती मित्र तिघे, परस्पर कसे व्हावेत ते बाधते ? ११
“दानावांचुनि साम तें नच कधीं सम्पूर्ण त्याचें असे,
सत्काराविण दान तो नच कधीं लोकांमधीं देतसे,
स्फूर्तीला न कधीं तशी चढतसे तत्सत्क्रिया शालिनी,
पात्रांच्याचि जनांचिया गुणगुणें संबोधिल्यावांचुनी. १२
“द्रव्यातें अभिलाषुनी न, अथ त्या क्रोधामुळें वा न, तो
राजांचा परि धर्मच स्मरुनियां, दुष्टां वशी दण्डितो;
धर्मातिक्रम केलियास, रिपुच्या पुत्राचियाही वरी,
न्यायाधीशजनीं असे कथियली तो तीच शिक्षा करी. १३
“आत्मीयांस सभोवतीं निरवितो चाणाक्ष संरक्षणीं,
नि:शंकाकृतिला धरी वरिवरी, शंकी जरी तो मनीं;
कोणीं कार्य समाप्तिला मिळवितां, तो पारिसंतोषकें –
अर्पी, तत्कृतज्ञता पसरिती लोकांत तीं गायके. १४
“योग्यायोग्य’ विचार पाहुनि, सदा पात्रीं अशा तो नरीं
सत्कारा सुचवावयास अपुल्या, नाना उपायां करी;
अन्योन्यांत, उपाय ते, करुनिया स्पर्धा जणूं सम्पदा –
देती आणुनियां चिरस्थिर अशा, दुर्योधनाला सदा १५
“भूपांचे रथ आणि अश्व भिडती ज्यामाजि रात्रंदिन
तें दुर्योधनमन्दिराजवळचें ओलें असें अंगण;
गन्धें सातवणाचिया सदृश त्या दानोदकें, राजया!
भेटीदाखल धाडिले नरवरीं नागेन्द्र जे त्यांचियां ! १६
किंवा –
“भेटीदाखल धाडिले नरवरीं नागेन्द्र जे त्यांचिया;
गन्धें सातवणाचिया सदृश्य त्या दानोदकें, राजया !
ते दुर्योधनमन्दिराजवळचें ओलें असे अंगण,
भूपांचे रथ आणि अश्व भिडती ज्यामाजि रात्रंदिन !
“ भूय:कर्षण केलियाविण जिथें संपादिती कर्षण
सौकर्यं सगळीं पिकें विपुल, तो राजा ! नदीमातृक
मोठा कौरवदेश आक्रमितसे उत्कर्षसोपान रे,
ज्याची क्षेमकरें धुरा धरियली दुर्योधनाचे करें. १७
“त्राणोपाय करुनि, तो हटवुनी बाधा दयावान् दुरी,
देशोत्कर्ष करी, म्हणूनि धवला कीर्ति स्वयें त्या वरी;
त्याचे सद्दुण पाहुनी द्रवुनियां चित्तामधें मेदिनी,
पान्हा त्या वसुमूर्तिला वसुमिषें ती सोडिते नन्दिनी. १८
“ज्यांचे तेज विशेष, मान धन ज्यां, प्रख्यातही जे युधीं,
ज्यांची वृत्ति चळे न, सोडुनि न जे जाती स्वनाथा कधीं,
धन्वी यापरिचे सुयोधन धनें पूजीतसे तो बळी,
तेही तत्प्रिय साधण्या नरहरें ! देती जिवाचा बळी. १९
“कर्तव्ये अपुलीं करुनि सगळी, हेरां भल्या योजुनी,
राजांच्या सगळ्या नृपा ! मसलती जो घेतसे जाणुनी;
उत्कर्षा करुनी हितास करिती ऐशीं फलें पाहुनी,
धात्याच्या परि गूढ त्या खटपटी याच्या, कळे हें जनी ! २०
“ त्याला सज्ज करावयास न कधी कोदंड तो लागला,
त्याचा सुन्दर चेहराहि न कधी कोपामुळें भंगला;
जैशीं तीं सुमभूषणें नरमणे ! त्याचीं तशीं शासनें
पृथ्वीचे पति सर्वही निजशिरीं घेती गुणांकारणें. २१
“ज्याचें अप्रतिकार्य शासन, असा तो यौवराज्यावरी
स्वामी त्या नवयौवनोद्धत अशा दु:शासनाला करी;
भूपा! आणिक तो सदा, अनुमतें विद्वान पुरोधांचिया
यज्ञीं तृप्त करावया हुतवडा अर्पी हवि: संचया. २२
“जीच्यांतील समस्त भूप नमुनी याला सदा वागती,
तो आवारिधी भूमि हा नियमितो आहे जरी स्मप्रति,
धाकानें तुझिया तरी झुरकते हा राजया ! अन्तरीं! -
मोठ्यांची रिपुता निरन्तर अहो दुष्टावसना खरी ! २३
‘कोणी भाषणसंगतींत वदतां नामाप्रती तूझिया
चित्ती आठवुनी विलक्षण अशा शौर्यासि पार्थाचिया,
ज्या दु:सह मन्त्रशब्द अहि तो ऐकूनि, हाही तसा
खाली घालूनि आनना व्यथित कीं होतो मनीं फारसा ! २४
किंवा –
(वृत्त – वंशस्थ)
“ कथाप्रसंगें तव नाम बोलतां
कुणीहि, आखण्डलसूनुशूरता
स्मरोनि, नम्रानन तो जळे मनीं,
सुदु:सहें मंत्रपदें जसा फणी.
(शार्दूलविक्रीडित)
“यासाठींच तुला अपाय करण्या आहे टपूनी बरें!-
जें कांही करणें असेल तुजला तें तूं पहा सत्वरें !
लोकांची वचनें जमा करित जे माझ्यापरी हिंडती,
वार्तायुक्तचि कुन्तिकायजवरा ! त्यांच्या गिरा राहती !” २५
(वृत्त-वंशस्थ)
वदूनि हें, घेउनि पारितोषक,
निघूनि गेला वनवासिनायक;
रिघूनि कृष्णासदनीं, युधिष्ठिर
स्वबान्धवां तें वदला सविस्तर २६
कवी -
केशवसुत
जून १८८७