नाही ज्यापरि डोंगळा कधिंहि तो गेला झणी साखरे

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

नाही ज्यापरि डोंगळा कधिंहि तो गेला झणीं साखरे,
नाहीं ज्यापरि चालला कधिंहि तो मार्जार साईकडे,
नाहीं कृष्ण कधींहि ज्यापरि सखे गेला दह्यांडीप्रत,
तैसा येइन मी समुत्सुक गडे तूझ्याकडे चालत!                १


भिक्षूनें निजदक्षिणा नच कधीं स्वीकारिली जेंवि की,
तत्पानें नच ज्यापरी धरियली गंगाजळी हस्तकीं,
हंसानें बिसिनी जशी व धरिली चंचूपटीं आदरें,
तैशी घेइन मी तुला निजकरीं तारे ! त्वरेनें बरें !               २


जैशी ती मलयानिलें न वनिका केव्हांहि आलिंगिली,
नाहीं ज्यापरि पर्वती कधिंहि ती धाराधरें वेष्टिली,
जैशी इन्द्रधनुष्करें उड्डुपथें मेघालि नाश्लेषिली,
आलिंगीन तशी तुला दृढ उरीं गे मंजुळे ! चांगली.             ३

मद्यासक्त नरें जशी नच कधीं कान्ते ! कुपी झोंकिली,
भृंगानें अथवा जशी कमलिनी नाहीं कधी चोखिली,
राहूनेंहि न सेविली सखि ! सुधाधारा जशी सत्वर,
तैशी सेविन गोड ओष्ठवटिका तूझी गडे ! सुन्दर.              ४


कवी - केशवसुत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा