दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं
मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं
श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,
सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव
पार्कात विराजती उद्यान गणेश
नांवाजलेली शाळा-कॊलेजं
म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!
विद्यार्जन नि विद्यादानाला
जे सदैव सप्रेम सादर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं!
वसंत देसाई, वसंत प्रभू
सी रामचंद्र नि सुधीर फडके
दादरचेच तर होते
ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर
चक्क नौशादसाहेब झोपत होते!
मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची
‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे
लताजींची रिहर्सल चालायची!
असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…
म्हणूनच गडया,
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...
छबिलदासचा फर्मास बटाटावडा
नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’
नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर
नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,
खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं
दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं
ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...
शिवाजी पार्कच्या मैदानाला
एक किलोमीटरचा कटटा असतो,
तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत
इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!
चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो
’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा
मात्र निराळाच ढंग असतो!
पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी
काला-खटटा च्या गाडीवर मात्र
गि-हाईक हमेशा हजर असतं...
नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं
हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत
साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत
लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत
फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!
पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ
फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ
भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का
गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का
अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत
दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!
हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...
पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर
नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर
इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण
नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण
सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं
ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई
त्याच लोकांचं इथे घर असतं,
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा