आकाश

गुंतवितां मिठी 
गर्द झाले श्वास, 
सुजलें आकाश 
पाठीवरी.

अशा रंगापाशीं 
मातीचें चांदणें, 
पल्याडचें जिणें 
जन्माआधीं.

ओळख

 मालविल्या सांज - दिव्यांची
तम-मार्गावरतीं खंत,
वृद्धेच्या ओवींमधला
उरिं दाटुन
ये भगवंत.

पानांच्या जाळींमधलें
वाऱ्याचें कुंडल डुलतें,
ओठांची मिथिला ल्याया
पदरांतुन नभ व्याकुळतें.

तुटलेली ओळख विणतां
प्राणांची फुटते वाणी,
पायांतुन माझ्या फिरतो
अवकाश निळा अनवाणी.

राघववेळ

 नभाला धरबंद नाहीं
तळहातावरील वळीव स्पर्शाचा.
उशालगतच्या गंधगार रात्रींत
गुरफटलेले क्षितिज दूर ढकललेंस
आणि बुडून गेलास...
विमुक्त, तरल, उदविलेल्या, श्यामल
टेकड्यांच्या ढगाळांत.
उरलेल्या स्पर्शाच्या ओळींत सजतांना
थिटीं पडलींत माझ्या प्रारब्धांतील अक्षरें !
अनाहूत अशा विलक्षण विश्वासानें,
तडकलींत माझीं घरकुलें,
शेंदरी देठांचे प्राजक्ती स्मशान
ओंजळींतून गळतांना !
तुझ्याच आघातानें कां टळून जात नाहीं
सुरंगी गात्रांना कुरतडणाऱ्या
राघववेळेचा प्रहर ?

सोन्याच्या मोहरा

सोन्याच्या मोहरा
गेलें उकरून घर,
नाहीं भिंतींना ओलावा ;
भर ओंजळीं चांदणें,
करूं पांचूचा गिलावा.

आण लिंबोणी सावल्या,
नाहीं आढ्याला छप्पर ;
वळचणीच्या धारांना
लावूं चंद्राची झालर.

पाय ओढत्या वाळूची
आण तेव्हांची टोपली;
कधीं खेळेल अंगणीं
तुझी - माझीच सावली ?

गेलें उकरून घर
जाऊं धुक्यांत माघारा,
कधीं पुरून ठेवल्या
आणूं सोन्याच्या मोहरा.