रामवेडा

मला हसता का? हसा हसा सारे। चित्त माझे परि रडे शोकभारे
मनामधिल खुडू केवि मोहमोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

मला झडकार कुणि राम दाखवा रे। तयावीण मला शून्य गमे सारे
कोण उकलिल त्यावीण मोहवेढा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

मला पत्ता सांगाल काय कोणी। राम राहे तो कोणत्या ठिकाणी
रामसीतेचा कुठे असे जोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

द्याल कोणी का मला वदा राम। द्याल कोणी तो का मुनीजन- विश्राम
कुणी माझ्या पुरवील काय कोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

उठा सत्वर मज राममूर्ती दावा। जया ध्यावे जो अहोरात्र गावा
मला धरवेना धीर अता थोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

राम कोठे? तव अंतरंगि आहे। राम कोठे? सर्वत्र शोभहाते
नयन वेड्या! उघडून बघे नीट। धीट होऊन घे, ऊठ रामभेट।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा