करुणाष्टक

अहा चित्त जाई सदा हे जळून। मला दु:ख भारी, श्रमे मी रडून
पुशी कोण नेत्रांतली अश्रुधार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

वनी निर्जनी दीप जेवी दिसावा। दिसोनी झणि तोहि वाते विझावा
तसा येउनी जातसे सद्विचार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

मला षड्रिपू भाजिती गांजिताती। मला वासना सर्वदा नागवीती
तुझ्या भक्तिची वाजू दे एकतार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

मदीयांतरी दिव्य पावित्र्य साजो। तया पाहुनी सर्वही पाप लाजो
असो मन्मती सन्मतीचे अगार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

असज्जीवने मी अहोरात्र खिन्न। न ये नीज माते, रुचे ते न अन्न
मदीयांतरंगावरी घोर भार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझा एक आधार ना अन्य माते। तुझा बाळ सांभाळ हे विश्वमाते
मला कष्टवीतात नाना विकार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझा एक विश्वास विश्वा समस्त। असत्कल्पनांचा करी शीघ्र अस्त
कृपेने मनाचा हरी अंधकार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

दिसो प्रेमळा निर्मळा वृत्ती नेत्री। वसो पुण्यता माझिया नित्य वक्त्रीं
मनी नित्य नांदोत ते सद्विचार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझे फूल मी होउ दे सद्विकास। तुझे मूल माते तुझी एक आस
किती प्रार्थु मी सांगु मी काय फार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा