अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला हे देखील शिकवा - जगात प्रत्येक बदमाषगकणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही, स्वार्थी राजकारणी असतात. जगात तसे असतात, अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात, टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही!

मला माहीत आहे. सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमांन घ्यायला !

तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा, शिकवा त्याला, आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडाना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वांत सोपं असतं!

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्‍भुत वैभव मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी... सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर... आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं!

शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी!

त्याला सांगा, त्यांन भल्यांशी भलाईनं वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी. त्याला हे पुरेपूर समजवा, की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून... पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा! धिक्कार करणार्‍यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर सत्य व न्यायासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका. आणि हेही त्याला सांगा, ऐकावं जनांचं, अगदी सर्वांत.... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निकं सत्व तेवढं स्वीकारावं.

आगती तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा, अधीर व्हायचं धैर्य, अन् धरला पाहिजे धीर त्यांन जर गाजवायचं असेल शौर्य!

आणखीही एक सांगत रहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा-हसत रहावं उरातलं दु:ख दाबून, आणि म्हणावं त्याला, आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको त्याला शिकवा, तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला, ‍अन चाटुगिरीपासून सावध रहायला. माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे... पण पहा... जमेल तेवढं अवश्य कराच!

माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो तो!!!

अब्राहम लिंकन

महासर्प

कोणरे तूं ?
चल दूर होः
- या गुलाबाच्या फुलाला पुनः हात लाव कीं तुला अगदीं कडकडून डसलोंच म्हणून समज !
- अरे तुम्ही माणसें आपसांत काय वाटेल तें करा
- एकमेकांचे गळे कापा
- रक्त प्राशन करा
- आणि खुशाल मजेनें ढेकर देत बसा !
त्या तुमच्या सुखाच्या आड कोणी येत नाहीं !
- जा बरें, बाबा !
असंतोषानें रात्रंदिवस डोकीं कोरीत बसणार्‍या त्या आपल्या मनुष्यसृष्टींत खुशाल जाऊन बैस !
अरे, आपलीं मनें उजाड करतां तीं करतां
- आणि आमच्या या सुंदर वनालाही उजाड करुं पाहतां ?
किती सुंदर गुलाबाचें फूल हें !
पहा कसें आनंदानें उड्या मारीत आहे !
- तो पहा !
तो ढग आकाशांत दूर एकटाच फिरत आहे !
- त्यालासुद्धां याच्या बाललीला पाहून किती आनंद झाला आहे !
- या वनांतील मौज पहात तो कसा स्वस्थ उभा आहे !
- नको !
हें सुंदर - चिमकुलें - फूल तोडूं नकोस !
अरे, हें आमचें भावंड आहे !
समज, हें तूं तोडून नेलेंसे, तर
- मला, माझ्या या सगळ्या भावंडांना, या ढगाला, आणखी आमच्या प्रेमळ आईला किती दुःख होईल !
- तुमचें लहानसे बालक काळानें आपल्या घरीं खेळायला नेलें, तर तुम्हांला किती बरें शोक होतो !
- कमलाकरा, या सुंदर - सुवासिक - फुलाला आमच्या हातूंन हिसकावून नेऊन तूं काय करणार ?
आपल्या पत्नीलाच देणार ना !
अरे, आईच्या स्तनापासून तूं तट्कन ओढून आणलेलें हें मूल तिनें पाहिलें, तर ती चट्कन रडायला लागेल !
- जा, तुझ्या प्रियेलाच येथें घेऊन ये, म्हणजे ती या पुष्पाचें चुंबन घेईल, त्याच्याकरितां गाणीं गाईल,
- आणखी, तिचें मधुर गायन ऐकून मला - आमच्या आईला - या वनाला - एकंदर सर्व सृष्टीला - किती आनंद होईल !
तुझी लाडकी प्रेमाचा वीणा वाजवायला लागूं दे, कीं आनंदानें मी अगदी डोलायला लागेन !
मी अतिशय रागीट आहें खरा,
- पण प्रेमानें मला कोणी जवळ घेतलें, तर कधीं कोणावर मी रागावेन का ?....

एका हलवायाचें दुकान

काय कारट्यांची कटकट आहे पाहा !
मरत नाहींत एकदांची !
- हं, काय म्हटलेंत रावसाहेब !
आपल्याला पुष्कळशीं साखरेची चित्रें पाहिजे आहेत ?
घ्या; आपल्याला लागतील तितकीं घ्या.
छे ! छे !
भावामध्यें आपल्याशीं बिलकूल लबाडी होणार नाही !
अगदीं देवाची शपथ घेऊन सांगतों कीं, माझ्याजवळ फसवाफसवीचा असा व्यवहारच नाही !
- अग ए !
कोठें मरायला गेली आहे कोणाला ठाऊक !
गप बसारे !
काय, काय म्हणालांत आतां आपण ?
हीं साखरेंची चित्रें फार चांगलीं साधली आहेत ?
अहो, आपणच काय - पण या दुकानावरुन जाणारा प्रत्येक जण असेंच म्हणतो कीं, हीं साखरेचीं केलेलीं पांखरें - झालेंच तर ही माणसेंसुद्धा !
- अगदी हुबेहुब साधली आहेत म्हणून !
- काय ?
मीं दिलेले हे पांखरांवरचे रंग कदाचित् विषारी असतील ?
छे हो !
भलतेंच एखादें !
हा घ्या, कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे, खाऊन पहा !
अहो निव्वळ साखर आहे साखर !
फार कशाला ?
हीं सगळीं चित्रें जरी आपल्याच सारखीं जिवंत होऊन नाचायला उडायला लागलीं - तरी देखील यांच्यांत असलेल्या साखरेचा कण - एक कणसुद्धां कमी होणार नाहीं !
रावसाहेब, माझें कामच असें गोड आहे !
- अरेच्या !
काय त्रास आहे पाहा !
अरे पोरट्यांनो, तुम्हीं गप बसतां कीं नाहीं ?
का या चुलींत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढूं ?
तुमची आई कोठें जळाली वाटतें ?
- का हो रावसाहेब, असे गप कां बसलांत ?
बोला कीं मग किती चित्रें घ्यायचें ठरलें तें ? ....

एः ! फारच बोबा !

आमचे वासुदेवराव शेक्सपीअर किती उत्तम शिकवितात म्हणून सांगूं तुला !
त्यांतून अथेल्लो तर, फारच, फारच चांगलें सांगतात !
तिकडे काय पाहात आहेस रे ?
अरे ती एक तरुण विधवा उगीच रडत आहे झालें !
तुला काय करायचें आहे तिच्या रडण्याशीं ?
- हो, तुला एक असें विचारायचें आहे कीं, या नाटकांतल्या यागोच्या कॅरेक्टरविषयीं तुझें काय मत आहे रे ?
- फारच बेमालूम साधली आहे म्हणतोस ?
- छे: !
आपलें तर मत अगदीं साफ विरुद्ध आहे !
कसें म्हणून विचारशील, तर असें पाहा कीं, मनुष्याच्या दुष्ट स्वभावाला शेक्सपीअरनें वाजवीपेक्षां फाजील - अगदीं लाल भडक - असा रंग चढविला आहे झालें !
- नाहीं, तें कबूल आहे रे !
नाट्यसृष्टींत हें पात्र उत्तम - चांगलें उठावदार दिसत असेल, हें मलासुद्धां मान्य आहे !
पण तेंच आपल्या खर्‍या सृष्टींत दुष्टपणाचा पारा इतका वर चढेल कीं नाहीं याची मला तर बोवा शंकाच आहे !
इतका कठोरपणा माणसाच्या अंगीं असणें शक्य तरी आहे ?
ए: !
फारच बोवा !
तूं कांहीं म्हण.
निदान अशीं दुष्ट माणसें माझ्या तरी पाहण्यांत आजपर्यंत कधींही आली नाहींत, हें मात्र खास !
- स्सुक् !
ती पहा, ती पहा !
त्या खिडकींत उभी आहे ती !
- कां ?
कशी सुंदर आहे ?
आहे कीं नाहीं ?
- हं, हं !
- तरी रडून रडून, हिच्या तोंडावरचा तजेला पुष्कळच कमी झाला आहे !
नाहींतर किती सुंदर !
- आहे, त्या धुरकटलेल्या घरामध्यें, माझें जाळें विणण्याचें काम चांगलेंच पार पडत आलें आहे !
एकदां संपण्याचा अवकाश, कीं ही येऊन त्याच्यांत अडकलीच म्हणून समज !
हः हः.....

आनंद ! कोठें आहे येथें ?

देवानें शेवटी माझी अशी निराशा केली !
हाय !
स्वर्गलोकाला सोडून मी येथें कशाला बरें आलों ?
जिकडे तिकडे अगदीं अंधार - अंधार आहे येथें !
भूलोक समजून मी चुकून नरकांत तर नाहीं ना आलों ?
अरे मला घोडाघोडा खेळायला कोणी एक तरी सूर्यकिरण द्या रे !
तीन दिवस झाले, पण मला प्यायला, एकसुद्धां स्वच्छ व गोड असा वायूचा थेंब अजून मिळाला नाहीं !
देवा !
तूंच नाहीं का मला सांगितलेंस कीं, या मृत्युलोकांत आनंद आहे म्हणून ?
मग कोठें आहे रे तो आनंद ?
हाय ?
नऊ महिने सारखा अंधारांत धडपडत, ठेंचा खात, वारंवार नरड्याला वेलीनीं घट्ट बसविलेले कांटेरी फांस सोडवीत खोल अशा घाणेरडया चिखलाच्या डबक्यांतून रडत रडत, मोठ्या आशेनें मीं प्रवास केला, पण शेवटी काय ?
- नको !
अरे काळोखा !
असे कडकडा दांत खाऊन जिकडे तिकडे अशी तेलकट घाण पसरुं नकोस !
- माझ्या जिवाला आग लागली !
मला तडफडून मारुं नका रे !
- आ !
माझ्या तोंडावरचा हा धुराचा बोळा काढा !
नाहीं !
मी पुनः येथें येणार नाहीं !
अरेरे !
माझ्या आशेचा उंच डोलारा शेवटीं या काळोखांत विरुन गेला ना !
काय ?
येथें मोठमोठ्यानें रडायला सुरवात झाली ?
चला !
आधीं आपल्या स्वर्गाला परत चला ! ...

अवघें पाउणशें वयमान

अहो छे हो !
तिला आणखी तिच्या मुलाला मरुन अजून पुरते दोन महिनेसुद्धां झाले नाहींत !
प्लेगचेच दिवस होते ते !
कांही फार दिवसांची गोष्ट नाहीं मी सांगत तुम्हांला - हं !
तिला विचारीला स्मशनांत एकटीला चैन पडलें नसेल, म्हणून माझ्या दामूलाही घेऊन गेली असेल झालें !
असो, जशी ईश्वराची इच्छा !
- यमू म्हणजे माझी प्रत्यक्ष सख्खी चुलत बहीण !
ती प्लेगानें आजारी पडून, तिला वायु झाला आहे, हीं अक्षरें दामूच्या पत्रांत दिसायचा अवकाश, तों मला जें कांहीं रडूं कोसळलें, तें कांहीं पुसूंच नका !
किती वेळां तरी मनांत आलें कीं, तिच्याकडे जावें म्हणून !
पण अगदी नाइलाज होता !
- एक तर ते प्लेगचेच दिवस; व दुसरें असें कीं, घरामध्यें इकडे माझ्या नातवाचा दिवाळसण !
आणि त्यांतून, पुण्यापासून मुंबईपर्यतच्या प्रवासाची दगदग !
या वृद्धावस्थेंत, दम्यानें अगदीं गांजलेल्या या जिवाला, कशी बरें सहन झाली असती !
नाहीं, तुम्हीच सांगा !
- अनंतराव, काय सांगूं तुम्हांला !
ते दोन दिवस माझा जीव कसा अगदीं काळजीच्या भोंवर्‍यांत सांपडला होता !
- अहो पुढें काय ?
प्रारब्ध माझें !
दामूच्या पत्रानंतर अगदीं चौथ्या दिवशी सकाळींच, त्याच्या एक स्नेह्याचें पत्र आलें कीं, माझी यमू व तिचा तो दामू, दोघेंही बिचारी प्लेगाच्या वणव्यांत सांपडून तडफडून मेली म्हणून !
दुःखाचा अगदीं पर्वत कोसळला होता माझ्यावर !
- पण तसाच धडपडत कसा तरी एकदांचा चार - पांच तास मुंबईस जाऊन, दामूच्या मित्रानें - मोठा सच्चा माणूस !
जें कांहीं त्यांचें किडूकमिडूक ठेवलें होतें, तें सगळें कांहीं मी येथें घेऊन आलों !
- आतां त्यांच्या घरादारांची व शेतांची कांहीं तरी व्यवस्था मला नको का करायला ?
माझ्या यमूला आतां मीच काय तो एकटा वारस - हर हर !
या प्लेगाच्या वादळानें त्यांचा वंशवृक्षच किं हो कोसळून पडला !
कठीण !
- काळ मोठा कठीण येत चालला आहे !
असो !
पण का हो अनंतराव, माझ्या यमूची घरेंदारें व शेतें आतां माझ्या कबजांत यायला मार्गात कांहीं अडचणी तर नाही ना येणार ? ....

मग तो दिवा कोणता ?

सखे !
दुसरा दिवा आणतेस ना ?
- अरेरे !
या माझ्या दिव्यांत कितीतरी किड्यांचा बुजबुजाट झाला आहे !
माझ्या तेलाची घाण झाली !
- घाण झाली !!
- काय ?
काजळाचा बर्फ पडत आहे !
- सखे !
अग सखे !
येतेस ना लवकर ?
- अग, माझ्या खोलींत जिकडेतिकडे हा दिवा काजळ उधळीत आहे !
अरे दिव्या !
माझ्यावर जितका काजळाचा वर्षाव करावयाचा असेल तितका कर !
- पण माझ्या या शेक्सपीअरवर व ब्राउनिंगवर एक कणसुद्धां टाकूं नकोस !
- हाय !
हें तेल किती स्वच्छ होतें !
पण आतां !
- हे किडे उसळून उडया मारायला लागले म्हणजे हेंच तेल, निळें, पिंवळें, हिरवें, तांबडे लाल !
- पहा, पहा !
कसें आतां काळें झालें आहे तें !
 - दिवा भडकला !
- काय म्हटलेंस ?
दुसरा दिवा नाहीं ?
तुला कोणीं धरुन ठेवलें आहे !
- हाय !
माझ्या तुळईला आग लागली !
- माझें घर पेटलें !
 - धांवा ! धांवा !!
मी भाजून मेलों !
मला कोणी तरी वांचवा हो !
 काय हा आगीचा डोंब !
देवा ! देवा !!
 - हं !
येथें तर कांहीं नाहीं !
शांततेच्या मांडीवर काळोख तर स्वस्थ घोरत आहे !
आग नाहीं, कांही नाहीं !
मग, तो दिवा कोणता बरें भडकला होता ? ....

दिव्याभोंवती पतंग उडत आहेत

काय म्हटलेंस ?
आपल्या जीविताचा तुला कंटाळा आहे ?
- हे बघ, हे बघ, या दिव्याभोंवती कसे पतंग उडत आहेत
- कसे पण प्रेमानें अगदी तर्रर्र होऊन भोंवतलच्या जिनसांवर तडातड उड्या मारीत आहेत !
हा पहा, या लहानशा पुस्तकावर कसा सारखा धिरट्या घालीत आहे !
- प्रेमशोधनच आहे हं !
- अग नको, नको, त्याला हात नको लावूंस !
- बाबांनो, या दिव्याच्या ज्योतीला खुशाल आनंदानें प्रदक्षिणा घाला !
- काय पहा ! त्या ज्योतीच्या लाटांमध्ये पोहण्यासाठीं, बिचारे चिमणीवर कसे धडक्यावर धडक्या घेत आहेत !
- कशाला !
- अंतः करणातील प्रेमाची प्रखरता, प्रकाशाच्या - ईश्वरी प्रेमाच्या - प्रखरतेमध्यें मिसळायला !
- तें ज्योतीमध्यें बुडून गेलेलें दीपगृह आहे ना ?
 अग तें अंगुस्तानासारखें दिसत आहे तें ?
- तेथें जायचें आहे त्यांना !
अरेरे !
बिचारे पहा कसे मरुन पडले आहेत ते !!
धडपड, धडपड केली खरी, त्यासारखें, यांच्या आत्म्यांना तर तें दीपगृह मिळालें !
- त्या लहानशा ठिकाणीं कितीतरी जोडपीं आनंदानें, प्रेमानें नांदत असतील नाहीं !
- आपल्या या अफाट जगांत सारखा कलह सुरु आहे !
पण तोंच त्या चिमुकल्या स्वर्गातून, कलहाचा एक तरी - अगदीं लहानसा तरी - सुस्कारा आपल्याला ऐकूं येत आहे का ! खरेंच ! या पतंगांचें जीवित कितांतरी सुखाचें, प्रेमाचें आहे ! आपलेंही - ! ...

अहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही !

काय करावें !
आज दारुलाबी खिशांत पैशे नाहींत !
- काय कोंडाबाई !
अहो कोंडाबाई !
काय तुमचें भांडण तरी काय आहे ?
अशा आमच्यावर रागावलांत कां ?
- काय म्हटलेंत ?
काल तुम्हांला ओझ्याला बोलावलें नाहीं, म्हणून तुम्ही माझ्यावर इतक्या रागावलां ?
जाऊं द्या कीं !
उद्यां लागतील तितकीं गिर्‍हाइकें येतील !
मग सगळ्या गवर्‍या तुम्हीच मसणांत नेऊन टाका !
मग तर झालें ?
अहो, गिर्‍हाइकें येऊं द्या कीं, मग तुम्हांला पैशेच - पैशे !
- काय त्रास आहे पहा !
अग ए !
कां उगीच गागत आहेस ?
गांवांत कोण प्लेग चालला आहे !
- अहो, कोणाचे जीव बी सुचित नाहींत, - आणि ही सटवी मधासधरुन उगीचच भांडत आहे !
- बरें झालें घरांत तेल नाहीं तर !
आणूं कोठून पैशे ?
- काय सांगूं कोंडाबाई !
हिच्या रोजच्या या काहारामुळें मला आपल्या जिवाचा अक्शी कंटाळा आला आहे !
- कोण आहे ?
दौलतशेट !
या शेटजी, जयगोपाळ, बसा.
खरोखर, तुम्हीं तर माझी अगदीं पाठ पुरवली आहे बुवा !
किती पंचवीसच रुपये बाकी राहिली आहे ना ?
देऊन टाकीन,
- उद्यां संध्याकाळच्या आंत, सगळे पैशे चुकते करतों !
- आतां काय सांगावें !
रामाशपथ, या वेळेला खिशांत एक पैसुद्धं नाहीं !
अहो, आतांपर्यंत मुळी गिर्‍हाइकच आलें नाहीं ! ...

अहो कुंभारदादा !

' कां रडतों ! ' रावसाहेब, मी आपल्या जन्माकरतां रडतों आहें !
हीच ती जागा !
आणखी, याच दिवशीं सकाळीं - नुकतें अकरावें वर्ष लागलें होतें मला - कोंवळ्या उन्हामध्यें, वार्‍यानें भुरभुर उडणार्‍या या भट्टीतल्या विस्तवाच्या कुरळ केसांवर हात फिरवीत, मोठ्या मजेमध्यें बसलों होतों मी !
इतक्यांत दोन गोळ्या माझ्या पाठींत शिरल्या !
बाबा अन आई रडायला लागलीं !
पण मी मात्र येथें, मृत्युलोक व परलोक यांच्यामध्यें झोके घेत खुशाल निजलों होतों !
पुढें, अंधारांत वाट चुकलेल्या कालाचा चुकून माझ्या जखमेवर हात पडला मात्र, तोंच सगळ्याच शिरा झणाणून ' नको ! ' म्हणून ओरडल्या !
डोळे उघडून जों पाहतों तोंच, एक मोठी थोरली बंदूक घेतलेला धिप्पाड पुरुष - त्याच्या अंगाभोंवतीं किती तरी लहानमोठे तारे इकडून तिकडे फिरत होते !
- माझ्या हदयावरुन आपला हात उचलतांना दृष्टीस पडला !
- व हंसत हंसत तो काय म्हणाला, ' नको ! तर राहिलें !
असाच रडत बैस, पुनः मात्र मी लवकर येणार नाहीं ! '
- पुढें काय ? अंधार !
रावसाहेब, या गोष्टीला आज पन्नास वर्षे झाली.
आई मेली, बाप मेला !
पण मी मात्र दुर्दैवामध्यें तडफडत आहें !
मधून मधून काय सुखाचे झुळझुळ वारे वाहतील तेवढेच !
- ऐका, सातांचे ठोके पडत आहेत.
रावसाहेब, हा शहराच्या मध्यावर असलेला घड्याळाचा उंच मनोरा या माझ्या भट्टींतून तयार झालेल्या विटांनीं बांधलेला आहे !
हा मनोराच काय, पण गांवांत दिसणार्‍या मोठमोठ्या इमारतींनाही मींच विटा पुरविल्या आहेत !
- हा मनोरा बांधल्याला जवळजवळ आठ वर्षे झालीं; पण आकाशांत मोठमोठ्या वावटळी सुटून जरी सारखा धो धो पाऊस पडत होता, वर आणखी विजाही कडकडत होत्या, तरी हा आपला छाती काढून त्यांच्याकडे टक लावून पाहत उभाच !
कितीही कडक ऊन पडो, पण एक वेळसुद्धां यानें हुश्श म्हणून केलें नाहीं !
माझ्या हातच्या विटांचा मनोरा हा !
- नरकामध्यें माझ्या पापकर्माची मनोरा उभारलेला आहे !
नाहीं असें नाहीं !
- पण हाय !
माझीं ही व्यसनी मुलें व त्यांचे फाजील लाड करणारी माझी बायको, या प्राण्यांच्या दुर्दैवाला मदतीला घेऊन सर्व जण, रोज सकाळपासून रात्री दिसेनासें होईपर्यत मी रावून तयार केलेला
- या हदयांतील प्रचंड असा आशेचा मनोरा रोजच्या रोज भांडणांची वादळे उत्पन्न करुन ढासळून कीं हो टाकतात !
काय सांगूं !
रात्रीं झोपेकरतां डोकें टेकायचा अवकाश, की ' नको ! नको ! म्हणून भेसूर गळा काढून माझी उशी रडायला कीं हो लागते !
- अरे पांडुरंगा ! हाय रे पांडुरंगा !! ....

तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी !

.... या आळीला का ?
' ख्राइस्ट लेन ' असें म्हणतात.
त्या समोरच दिसणार्‍या खांबाच्या कपाळावर काळ्या अक्षरांनीं लिहिलेली पाटी ठोकलेली आहे, तिकडे आपण पाहिलेंच नाहीं वाटतें ?
- ते पहा, अजून रक्ताचे डाग आहेत त्या खांबावर !
फळीवरही थोडेसे शिंतोडे उडालेच आहेत.
- अहो, परवां रात्रीचीच गोष्ट.
दारुबाज नवर्‍यानें घराबाहेर हाकून दिलें म्हणून ज्या बिचारीनें
- किती गरीब आणि सद्गुणी होती ती !
- रागाच्या आवेशांत त्याच, त्याच, खांबावर आपलें कपाळ फोडून जीव दिला, त्याच बाईच्या आत्म्यानें जातां जातां ' ख्राइस्ट ' या अक्षरांवर ते रक्ताचे शिंतोडे उडविले आहेत !
- हें झालें ?
तसेंच एकदां त्या खांबाजवळ एक मूल
- अरेरे ! त्या अर्मकाच्या नरड्याला व छातीला पांच, पंचवीस खिळे ठोकलेले !
- असें तें मूल, कोणीं चांडाळानें आणून टाकलें होतें !
- जाऊं द्या कीं !
आपल्याला काय करायचें आहे या गोष्टीशी म्हणा !
- काय चिरुट ?
कोणत्या छापाचा आहे ?
वेलिंग्टन चिरुट असेल, तर मग हरकत
- नाहीं !
अहो परवां काय झालें !
जवळच इमर्सन चौकांत विस्मार्क कंपनीचें दुकान आहे
- तेथें मीं जवळजवळ दोन शिलिंगाचे पैगंबर छापाचे चिरुट, जो तो त्यांची स्तुति करायला लागला, म्हणून मोठ्या हौसेनें विकत घेतले !
- झालें !
थोड्या वेळानें मी जो त्यांतला एक ओढून पाहातों तों काय !
सारखा अर्धा तास ठसका !
- असा कांहीं संताप आला कीं, ते सगळे चिरुट घेतले, अन् लागलीच शेजारच्या गटारांत फेंकून दिले !
- नांवें मात्र मोठमोठ्यांचीं, पण येथून तेथून बदमाषगिरी !
- अरे वा !
तुमचा नेपोलियन शू बराच टिकला आहे कीं !
- मी तुम्हांला सांगत नव्हतों कीं तो सॉक्रेटिस बूट घेऊं नका म्हणून ?
असो.
आपण आमच्या देशामध्यें, माझ्या घरीं पाहुणचार घेत कांहीं दिवस तरी राहिलेंच पाहिजे.
पहिल्यानेंच येथें आलां आहांत
- तो पहा !
आमच्या वाइजमनच्या बहिरी ससाण्यानें कसा पक्षी धरुन आणला आहे !
- मोठा चलाख आहे !
जवळजवळ रोज तीसपासून पस्तीसपर्यत पांखरें धरुन आणतो !
त्याचें नांव काय ठेवलें आहे ठाऊक आहे का ?
- शेक्सपीअर ?
- कारण तो म्हणतो कीं, जसा कविराज शेक्सपीअर, माणसाच्या अंतःकरणांत अगदीं सांदीकोपर्‍यांत दडून बसलेले विचार पकडून आणण्यांत मोठा हुशार होता, तस्सा माझा हा ससाणा पांखरें धरुन आणण्यांत मोठा वस्ताद आहे !
हः हः हः का ?
आहे कीं नाहीं ! ....

कार्ट्या !

.... थांब !
अशानें थोडाच तूं ताळ्यावर येणार आहेस !
नुसत्या छडीनें नाहीं भागायचें - चांगला या चाबकानेंच तुला सडकला पाहिजे !
- चूप !
खबरदार ओरडशील तर !
आणलीस तापवलेली पळी ?
ठीक.
आण ती इकडे !
धर याला नीट, - अस्सा !
चांगला चरचरुन डाग बसला तोंडाला !
- रडूं दे, रडूं दे लागेल तितका !
काय ग, या त्रिंब्याला अक्कल तरी केव्हां येणार ?
आतां का हा लहान आहे ?
चांगला सहा वर्षाचा घोडा झाला आहे !
पण अजून कसें तें व्यवहारज्ञान नाहीं !
- नाहीं पण मी म्हणतों, कांहीं जरुर पडली होती मध्यें बोलण्याची याला ?
मी इकडे गणपतरावांना सांगतों आहे कीं, तुमची दहा रुपयांची नोट पडलेली इथें कांहीं कोणाला सांपडली नाहीं म्हणून !
पण इतक्यांत आमचे हे दिवटे चिरंजीव आले ना !
आल्याबरोबर यानें त्या गृहस्थाला सांगितलें कीं,
- तरी मी इकडे चांगला डोळ्यांनी दाबतों आहें !
- पण या गाढवाचें लक्ष असेल तर !
- म्हणे ' तुमच्या खिशांतून काल कागद पडला होता, तो किनई मी बाबांच्याजवळ नेऊन दिला '
- चूप बैस ! खोटें बोलतोस आणखी ?
असें नाहीं तूं त्यांना म्हणालास ?
- अग यानें सांगितल्याबरोबर, माझ्या जीवाची कोण इकडे त्रेधा !
मग कांहीं तरी आठवल्यासारखे केलें, मुद्दाम कागदपत्रांची दहापांच पुडकीं उलथी पालथी केलीं, अन् खिशांत असलेली नोट हळूच कशी तरी त्या गणपतरावांना काढून दिली !
- असा संताप आला होता त्या वेळेला या कार्ट्याचा !
- पण त्यांच्या देखत ' नेहमीं अशींच मला शहाणपणानें आठवण करीत जा बरें बाळ ! ' असें म्हणून ते जाईपर्यंत या त्रिंब्याची मला वरचेवर पाठ थोपटावी लागली !
कशी लक्ष्मी चांगली घरांत चालून आली होती !
- पण या कार्ट्यापायीं;
- अरे कार्ट्या !
अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं !
- तें कांही नाहीं !
या पोरट्यांना उठतां बसतां नेहमीं सडकलेंच पाहिजे !
त्याशिवाय नाहीं यांना जगांतलें ज्ञान यायचें !
- स्वयंपाक झाला आहे म्हणतेस ?
चला तर घ्या आटपून. चंडिकेश्वराच्या देवळांत लवकर मला गेलेंच पाहिजे !
आजपासून तिथें प्रख्यात काशीकरशास्त्री श्रीमदभगवद्गीतेवर पुराण सांगायला सुरुवात करणार आहेत !
चला तर लवकर !
- ' त्रिंब्या, थांबलें कीं नाही तुझें अजून रडणें ?
का पाहिजे आहेत तडाखे आणखी ? '....

किती रमणीय देखावा हा !

.... देवि !
तुझी बाग किती सुंदर आहे ही !
राघू - मैना, कोकिळा - बदकें - कबुतरें - सगळीं निजलीं आहेत !
दिवसां बदकांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबरच आनंदानें उडया मारणारें तें लहानसें सरोवर - अहाहा !
- कांहीं कमळांची काव्यें आतांच पुरीं झालीं आहेत, व कांहीं दिवसभर हदयांत सांठविलेल्या सूर्यतेजानें अगदीं रसरसून जाऊन आपली काव्यें लिहिण्यामध्यें काय पण गढून गेलीं आहेत !
- पाहिलेंस ना ?
तेंच सरोवर चंद्रबिंबाशीं आतां कसे तन्मय होऊन गेलें आहे !
खरेंच, किती तरी तुझें ऐश्वर्य हें !
अहाहा !
मुग्धावस्थेंतून नुकतीच बाहेर पडून, आपल्या प्रियकराच्या गालावर गाल ठेवून, ती कलिका आपल्या पतीकरितां - त्या गुलाबाकरितां - आपलें प्रेमळ हदय हळूहळू उमलायला लागली हें पाहून त्या गुलाबाच्या नेत्रांतून - बध - कसे - दोनच - दोनच प्रेमाश्रु बाहेर पडले आहेत ते !
तसेंच इकडे पाहिलेंस ना ?
या जोडर्‍याच्याखालींच किती तरी मोगर्‍याचीं फुलें उमललीं आहेत !
झालेंच तर, त्या प्रेमळ पतिपत्नीला चंद्रकिरणांचा फारसा ताप लागूं नये, म्हणून वर दोन गुलछबूची फुलेंही उगवलीं आहेत ! वा !
तुझ्या या बागेमध्यें किती तरी चित्रविचित्र आणि सुंदर फुलझाडें आहेत हीं !
कांहीं सुवासिक आहेत, कांहीं सुंदर आहेत, आणि कांहीं तर दोनही गुणांनी नटलेली आहेत !
पण सगळी फुलझाडें परस्परांना व शेजारच्या लतावृक्षांना कशा प्रेमाच्या गुजगोष्टी सांगत आहेत !
भगवति, तुझ्या या वनसृष्टीचा प्रेमळ आत्मा, आकाशांत प्रकाशणार्‍या या स्वर्गीय आत्म्याशीं एकरुप होऊन गेल्यामुळें
- अहाहा !
काय चोहोंकडे प्रेमाचा उज्ज्वल
- शांत ! असा. हा प्रकाश पडला आहे !
- अरे ! पण हें काय ?
- हें काय ? किती उंच प्रचंड असा हा प्रेतांचा पर्वत तरी !
अबब !
किती माणसें या पर्वतावर चढावयाला लागलीं आहेत हीं !
- काय ?
' तूं चढूं नकोस !
मी चढणार !
' हा !
काय भयंकर कत्तल चालली आहे ही !
कडकडणार्‍या रक्तामध्यें
- ते पहा
- किती तरी आत्मे तडातड उडत आहेत !
नका ओरडूं !
अरे असे रडूं नका !
- अरे बापरे !
- रक्ताचा काय महासागर उसळला आहे हा !
- अरे !
अंधार पडायला लागला वाटतें ?
छे !
अगदीं पाहवत नाहीं कीं !
तापलेल्या लाल गोळ्याप्रमाणे हा सूर्यच दिसत आहे का ?
- कोण ?
कोण आहेस तूं ?
- हावरेपणा ?
- किती लांबलचक मुंडक्यांची माळ तरी ही !
- अरे नको !
माझ्या नरडयावर पाय देऊं नकोस !
मेलों ! मेलों !!
- हुश ! काय भयंकर स्वप्न तरी ?
- अरे ! चांगलेंच फटफटलें आहे कीं !....

अशा शुभदिनी रडून कसें चालेल ?

... एकूण तें सगळें खोटेंच तर ?
माझ्या या कपाळावरचें कुंकूं हळूच आपल्या प्रेमळ
- हो !
कसचें प्रेमळ !
- बोटानें
- हेंच नव्हे का तें ?
- यानेंच पुसून टाकून आपण कोणीकडे बरें गेलां होतां ?
स्वर्गाला ?
- नाथ !
या हदयांतून
- सदैव प्रेमाची गाणीं म्हणणार्‍या माझ्या या अंतःकरणांतून
- बाहेर पडायला आपण मला कधीं बरें विचारले होतें ?
आणी मी कधीं जा म्हणून सांगितलें ?
- पण जाऊं द्या आतां !
तें सगळें स्वप्नच होतें ।
कारण, या स्वच्छ व झुळझुळ वाहणार्‍या प्रवाहामध्यें माझ्या कपाळावरचा कुंकुमतिलक कसा नक्षत्रासारखा आनंदानें चमकत आहे !
प्रेमानें नाचत आहे !
प्राणनाथ !
या हिरव्यागार गालिचावर आपणाला बसवून
- मी नाहीं जा !
या मांडीवर बसून अश्शी मी या गळ्याला निरंतर मिठी मारुन बसणार !
अगबाई !
पाऊस पडत आहे !
आहाहा ! नाथ !
कसें सुंदर इंद्रधनुष्य उगवलें आहे इकडे !
काय म्हटलेंत ?
हें स्वर्गाचें महाद्वार उघडलें आहे ?
खरेंच !
या सायंकाळच्या वेळेला आपल्या नुकत्याच उमलेल्या गुलाबासारखी, लोंकर आहे त्यांच्या अंगावरची !
- या मेंढ्याना घेऊन हा मेघ
- हा वृद्ध मेंढपाळ
- नेत्रांतून आनंदाश्रु गाळीत कसा त्या स्वर्गद्वाराकडे हळूहळू चालला आहे पण !
- असें काय गडे !
कोठें जायचे आहे आपणांला ?
- हंसतां काय ?
- बोला गडे !
- मी आपणांला आतां क्षणभरसुद्धां कोठें जाऊं द्यायची नाहीं !
- थांबा ! कोठें जायचें आहे तें मला नाहीं का सांगत ?
नाथ ! मी येऊं का
- येऊं का आपल्याबरोबर ?
खरेंच सांगतें, आपण जर मला टाकून गेलां, तर तडफडून मरेन हो !
आपल्याशिवाय मला आतां कोण बरं प्रेमाने जवळ घेणार आहे ?
- दोनच महिने झाले, माझी आई किं नाहीं मला टाकून गेली आहे !
- नाहीं ! नाही !!
माझ्या या घट्ट मिठींतून मी आपणाला मुळींच जाऊं देणार नाहीं !
प्राणनाथ !
माझे हात तुटले तरी
- हाय ! हाय !!
येथें कोण आहे !
- काय ?
मला कायमचे टाकून गेले ?
आतां त्यांना मी मिठी मारली होती ना ?
मग या घट्ट मिठींत काय आहे । तडफडणारें !
- न मरणारें !
- हें माझेंच हदय आहे !
- काय ?
बाहेर बेंडबाजा वाजत आहे !
समजलें !
बाबा आतां नव्या आईला आणायला चालले आहेत !
- इतकी कशी गाढ झोंप मला लागली पण ?
- किती गोड स्वप्न !
पण तें स्वप्नच ! आई ! - आई !!
- तडफडूं नकोस ! हदया ! तडफडूं नकोस !!
बाबा, हंसायला लाग ! कारण
- अशा शुमदिनी रडून कसें बरें चालेल ?....

बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें !

.... बाळ वेणुबाई !
असें काय बरें वेड्यासारखें करावें ?
हें बघ, हा नारळ किं नाहीं, फोडण्याकरितां देव्हार्‍यांत ठेवलेला नाहीं !
याला रोज सकाळी गंध, अक्षता, फुलें वाहून याची पूजा करायची !
- पूजा कशाला करायची ?
वेडी पोर !
ऐक, मी काय सांगतो तें.
एके दिवशी रात्रीं काय झालें,
- आपल्या बागेंत बंगल्याशेजारी नारळाचें झाड आहे तें ?
- त्या झाडाखाली, श्रीरामचंद्र, लक्ष्मण
- सीतामाईबरोबर गोष्टी सांगत बसलेले तुझ्या पणजोबांना स्वप्नांत दिसले ?
सकाळीं ते जे उठून पाहतात, तों आपला एक नारळ त्या झाडाखालीं पडलेला !
झालें !
देवाचा प्रसाद म्हणून पणजोबांनीं तो घरीं आणला, त्याची सालपटें काढलीं, मग देव्हार्‍यांत ठेवून त्याची पूजा केली !
रोज या नारळाची पूजा करावयाची असा त्यांनीं आपला नेम चालविला.
पुढें देवाच्या दयेनें त्यांना पुष्कळ पैसा मिळाल्यावर, त्यांनीं याला चांगला सोन्यानें मढविला !
बघ, कशी खर्‍या नारळाच्या शेंडीसारखी जरीची शेंडी आहे ती !
झालेंच तर ही मखमलीची पिशवी, त्याला बसायला रेशमी कापडाची मऊ मऊ गादी - पाहिलीस ना कशी छानदार आहे ती ?
- काय ? काय म्हटलेंस ?
या नारळांत - या जरीनें, सोन्यानें मढविलेल्या नारळांत
- गोड गोड पाणी !
- चांगलें खोबरें असेल ?
हः हः वेडी रे वेडी !
बेटा वेणुबाई !
या नारळांत आतां कोठून खोबरें व पाणी असायला ?
पणजोबांना ज्या वेळेस तो झाडाखाली सांपडला त्या वेळेस त्याच्यांत खोबरें आणि पाणी असेल !
त्या गोष्टीला जवळजवळ आतां दोनशें वर्षे व्हायला आलीं !
आतां या नारळांतलें पाणीही नाहींसें झालें आहे, व खोबरेंही नाहींसें झालें आहे !
- मग यांत आहे काय ?
बेटा, कवटी सोन्याची, शेंडी जरीची, पण आंत किं नाहीं, सडलेली, कुचकी, अशी निवळ घाण आहे !
आतां कांहीं तो खाण्याच्या उपयोगाचा नाहीं !
समजलें आतां ?
तो देण्याबद्दल आतां पुनः नाहींना कधीं हट्ट धरायची ?....

सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ?

... उगीच कशाला खोटें सांगूं !
डॉक्टरसाहेब, माझी सगळी दौलत जर म्हणाल, तर दोन हजार रुपये.
ते मीं कधींच बायकोच्या नांवानें बँकेत करुन ठेवले आहेत.
घर नाहीं, शेत नाहीं, कांहीसुद्धां नाहीं बरें आपण विचाराल, कीं हे दोन हजार रुपये तरी कोठून आले ?
तर, माझ्या वडिलांनी मरायच्या आधीं, जे काय घरामध्यें डागडागिने होते ते सगळे मोडून टाकले.
अन् त्यांचे जे हे रुपये आले, ते त्यांनी आईच्या नांवानें बँकेत ठेवून दिले. झालें !
वडील वारले तेव्हां मी अगदीच लहान होतों.
आई नुकतीच वारली !
आणि मीही पण लवकरच
- हं ! डॉक्टरसाहेब !
माझ्या डोळ्यांवर दुर्दैवानें रचीत आणलेली ही काळोखाची भिंत, चारपांचशें रुपये खर्च केल्याशिवाय, कांहीं आतां उतरतां यायची नाहीं ना ?
अहो !
महिना बारा - पंधरा रुपये मिळविणारा मी माणूस - हा !
वर्षभर तर जवळजवळ मी घरींच बसून आहें कीं ! आतां मी आणूं कोठले इतके रुपये !
- काय निघालां ? हे घ्या. ही तुमची डोळे तपासायची पांच रुपये फी. - कांही नाही ! अशक्तपणामुळें माझा हात इतका कांपत आहे ! - घेतलीत ? आपले माझ्यावर फार उपकार झालें ! डॉक्टरसाहेब ! या बरें !....

... माझ्या या त्रासानें नासलेल्या मस्तकांतील किडयांचें गुणगुणणें आतां थांबणार तरी केव्हां ?
- ' तूं आपले डोळे लवकर बरे कर, नाहीं तर जन्मभर ही काळतोंडी मध्यानरात्र - बाबा रे !
- एकसुद्धां, अगदीं लहानसा तारासुद्धां आतां चमकलेला दिसायचा नाहीं !
- जिवाचें रक्त शोषीत सारखी तुझ्या डोळ्यांत बसेल !
आयुष्यभर रडत बसावें लागेल !
डोळे मुठींत धरुन, तुला रडत बसावें रे लागेल ! '
- काय ? माझ्या - नाहीं, माझ्या लाडकीच्या दोन हजारांतले चारशें रुपये खर्च करुं ?
आणि डोळे बरे झालेच नाहींत तर ? मग कसें !
- थांबलें कीं नाही अजुन तुमचें गुणगुणणें ?
का अशी ताडकन् थप्पड
- अरे ! हें काय !
माझ्या हाताच्या फटकार्‍यानें हा ग्लासच फुटला वाटतें ?
हाताला किती बारीक बारीक तुकडे लागत आहेस हे !
- हं : काय पहा ! हाताच्या एका फटकार्‍यासरशीं हें काचेचें भांडें फुटलें !
- पण, अहोरात्र मनः संतापाचें कडकडून दांत चावणें, व जोरानें वळलेल्या मुठीचे धडाधड प्रहार होणें चाललेलें असतें, तरी हा जीव कांही केल्या फुटतच नाहीं !
आंधळ्या !
तूं आतां जगून तरी काय करणार ?
अरे ! आपल्या मेलेल्या जिवंतपणानें तिला आतां नको रे छळीत बसूं !
- सखे !
- अरे नको नको, निजूं दे तिला.
चांगली गाढ झोंप लागली आहे
- ही काय वाटी सांपडली वाटतें !
फार छान झालें !
या काचांचे बारीक तुकडे करुन, देतों या नरडयांत ती पूड ओतून; म्हणजे चांगली आंतडी तुटून जिवाची कायमची सुटका तरी होईल !
पण थांबा, मी जर असा जीव दिला, तर माझ्यामागें हिचे किती बरें हाल होतील !
हिला किती यातना सोसाव्या लागतील !
- सखें, माझ्यामागें तुला कोण बरें प्रेमाने वागवील ?
- नको ते मरणाचे भयंकर विचार !
- हो, हा हाताला काचेचा चुरा फेंकूनच द्यावा; पण - जिवंत राहून हिला जन्मभर रडविण्यापेक्षां, एकदांचें मरुन जाऊन थोडेच दिवस रडविणें बरे नव्हे का ?
- अरे नको थांबूं आतां !
आटप लवकर !
जिवा !
अशी घाई कां ?
बाबा रे, आत्महत्या करुन आपल्या बायकोला जर दुःखांत लोटलें, तर जग मला काय बरें म्हणेल ?
दुष्ट नाहीं का म्हणणार ? - काय ? तुझ्या तडफडण्यापुढें जनावापवादाला मान देऊं नको ?
- जा !
- अशा धडक्या घेऊं नकोस !
सोडतों तुला !
- सगळा चुरा पोटांत गेला !
- आतां मी कायमचा सुटणार !
- हाय ! सखे !
मी तुला आतां टाकून
- हां चूप रहा !
निजूं दे तिला !
- देवा !
या जगांतल्या प्रत्येक वस्तूला आपल्या पापी नजरेनें भ्रष्ट केल्यामुळें, आंधळा झालेला हा दुरात्मा आतां नरकांत
- आलों ! थांबा - ....

देवा !

.... अरे !
जिन्यांत तर अगदीं अंधार आहे !
अजून आठही वाजले नाहींत, तोंच जिकडे तिकडे अगदीं सामसूम !
ही कोठें बाहेर तर नाहीं गेली ?
- छेः !
दाराच्या फटींतून दिव्याचा अंधुक अंधुक उजेड तर दिसत आहे.
आणि अशा रात्रीच्या वेळेला ती कशाला उगीच बाहेर
- पण हें काय ?
कोणाच्या बरें फुटक्या हदयांतून हा रडका हुंदका बाहेर पडला !
- माझें हदय कसें धडधडायला
- चला, हळूच वर जाऊन दाराच्या फटींतून, आपल्या फाटत चाललेल्या संसाराचें चित्र पाहूं !
- जिवा, असा मधेंच खचून जाऊं नकोस ! आधीं वर चल !
- पहा ! आपला हा संसार नीट डोळे उघडून पहा !
- दारिद्यानें संतापून जाऊन अगदीं त्रासानें अंगावर फेंकलेलें तें फाटकेंतुटकें लुगडें नेसून माझी बायको कशी हुंदके देऊन रडत आहे ती !
तो पहा !
ढणढण जळणार्‍या त्या घासलेटच्या डबड्याशेजारी, आगपिणीनें खाजवून
- बाळ ! नको रे आपल्या चिमुकल्या जिवाला असा नखांनीं ओरबडूंस !
- रक्तानें न्हालेल्या, व मधून मधून आपल्या आईकडे, व दोन - तीन वर्षानीं वडील अशा आंधळ्या बहिणीकडे, केविलवाण्या मुद्रेंनें रडत रडत पाहणार्‍या, माझ्या त्या दोन वर्षाच्या लेंकराकडे पाहिलेंस का ? - काय म्हटलेंस ?
माझी गोदी कशानें अशी आंधळी झाली ? दोन अडीच वर्षे झाली, देवीच्या तडाख्यांतून अगदी मरतां मरतां वांचली !
पण बिचारी जिवाऐवजी डोळेच घालवून बसली आहे !
- एकंदरींत, माझें आयुष्य या गरीब बिचार्‍या आत्म्यांचे हाल हाल करण्यांतच चाललें आहे कीं नाहीं !
- ऐकलेंस ? तिघेंही माझ्या या अस्तित्वाच्या लोखंडी चरकांत सांपडून, कशीं रडक्या स्वरानें मोठमोठ्यानें कण्हत आहेत तीं !
- हा !
- आगपिणीनें कुरतडला जाणारा, अहोरात्र अंधारांत तळमळणारा, व माझ्या हदयाचें हें भिकार डबडें मिळाल्यामुळें हा ढणढण जळणारा !
- अरेरे !
असे हे तीन आत्मे देवाला काय बरें म्हणत असतील ?
- जिवा !
तुला नाहीं का रे ऐकूं येत ?
- अरे !
ते म्हणत आहेत कीं, ' देवा, हा नरक लोक निर्माण झाला !
म्हणूनच आम्ही असे तडफडत आहों बरें ! '
- खरेंच !
माझी बायको लग्नापूर्वी आपल्या श्रीमंत पित्याच्या घरीं, कशी सुखांत आणि आनंदांत होती नाहीं ?
पण शेवटी, स्वर्गात हंसणार्‍या व येथें रडविणार्‍या मंगळानें
- या आनंदानें चिरकाल हंसूं इच्छिणार्‍या मुक्या प्राण्याचा, आपल्या पापकर्मात चिलबिळणार्‍या या दुरात्म्याशी विवाह
- मंगल विवाह !
- लावून दिला !
परमेश्वरा !
तुझी स्वर्गात आनंदानें प्रकाशणारी नक्षत्रें, आह्मां माणसांच्या दृष्टीला, आमच्या मेंदूलाच, रडकी कशीं रे दिसतात !
- बाळांनो !
आपला बाप जन्माला कां आला, म्हणून देवाला विचारीत असेच निरंतर रडत बसा !
- पण मी म्हणतों, या मुलांचें तरी आयुष्य असें दुःखांत कां बरें जावें ? बरोबर !
- कां नाही या मुलांनी तडफडावें !
- अरे !
निष्प्रेमाच्या अत्यंत विषारी जागेमध्ये दारिद्यरसानें अधिकाधिक फोंफावणार्‍या कामवासनेला गोड फळें येतील, का ' कडू जहर ?
- नासकीं अशीं फळें येतील ?
हां, बरोबर विचारलेंस.
मला जर येवढें कळत होतें तर मीं या गरीब बिचारीशीं विवाह करुन तिला अशी दुःखसागरांत कां लोटली ?
- पण जिवा !
या घरांत निर्माण झालेल्या दुःखाला मीच कारण आहें असें मी कधी बरें म्हणत नाहीं ?
- आतां मी विवाहच कां केला, तर बाबा रे, मीच तुला उलट असें विचारतों कीं, पापकर्मात गटांगळ्या खाणार्‍या प्राण्याला कधीं एकटें मरावेंसें वाटेल का ?
- जितके आपल्या मिठींत सांपडतील, तितक्यांना घेऊन तो रसातळाला जाणार !
मग मीच एकटा या जगांत कसा बरें तडफडूं !
देवा !
मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! !....

मुंबईत मजा गमतीची ।

.... अहो तें सगळें खरें !
पण माझ्या मागची ही व्याद टळेल, तेव्हं तुमची मुंबई, आणखी तिची मजा ना ?
तुमची शपथ, मला अगदीं त्रास आला आहे !
वर्ष होत आलें, पण माझी बायको बाळंतरोगानें आपली अधिकाधिक कुजतेच आहे !
अहो, मी म्हणतों, एकदां बरें तरी व्हावें, किंवा कायमचें मरुन तरी जावें !
प्लेगचीं माणसें नाहीं, कशी चोवीस अगर छत्तीस तासांत निकाल !
- रागावूं नको तर काय करुं ? सगळें जग लोटलें आहे मौज पाह्यला !
फार लांब कशाला ? माझ्या शेजारचाच तो गणू शिंपी.
घरांत बायको एक दिवसाची बाळंतीण, गावांत तर प्लेगचा कहर, असें असून घरांतली दोन मोठीं भांडी घेतली, तीं माझ्याकडे आणून ठेवलीं, पंधरा रुपये घेतले, आणि लागलीच पठ्ठ्या मुंबईस चालता झाला !
- कां ? आहे कीं नाहीं ?
नाहींतर आम्ही, बसलों आहोंत कीं नाहीं असे रडत !
- नाहीं ? नाहीं, आपणच सांगा की, अशी मौज, अशी लाइट, कधीं या जन्मांत तरी फिरुन आपल्याला पाह्यला सांपडेल का ?
- अहो बाबूराव, मी चांगले ठरविलें होतें कीं, बेळगांवास जावें, चंद्राजीला घ्यावी, आणि तसेच मुंबईस परस्पर चालते व्हावें !
पण म्हण आहे ना, कीं माणूस योजितो एक, आणि देव घडवून आणतो दुसरेंच !
चांगला बेळगांवास जायला निघालों, तोंच आमच्या बाईसाहेबांची प्रकृति एकाएकी बिघडली, आणि काय ?
घटकेंत जीव जातो, घटकेंत येतो, असें आतांशा चार दिवस सारखें चाललें आहें !
शपथ !
मी तर अगदी रडकुंडीस आलों आहें बुवा !...

म्याऊं - म्याऊं - म्याऊं !

.... देवा !
माझीं पिलें भुकेनें कशीं व्याकूळ रे झालीं आहेत !
तीन वाजून गेले, पण अजून यांच्या पोटांत, घासभर कीं रे अन्न केलें नाहीं !
बाळांनो !
उगी, नका रडूं !
मी पुनः खालीं जातें - अगदी हलूं नका. या गलथ्यांतच अमळ एकमेकांशी खेळत बसा !
- स्वयंपाकघरांत जातें, आणि कांहीं उष्टें अन्न पडलें असेल, तें माझ्या बाळांकरितां घेऊन लवकर येतें !
जाऊं ?
- आज घरांत येवढें काय आहे ?
काय सांगूं तुम्हांला !
मुलांनो, आज किं नाहीं माझा वाढदिवस
- माझ्या पूर्वजन्मीच्या मनुष्यदेहाचें वर्षश्राद्ध आहे !
खरें म्हटलें, तर हें माझेंच घर
- हीं माझींच मुलें,
- पण या घरांतल्या मुलांना काय ठाऊक कीं, मी त्यांचीच आई आहें म्हणून !
त्यांना वाटतें
- त्यांनाच काय ?
- सर्व जगाला वाटतें की, आपले सगळे पूर्वज स्वर्गाला जातात म्हणून !
पण किती तरी ठिकाणी, मनुष्यदेहाचें जीर्ण वस्त्र फेंकून देऊन पशुपक्ष्यांचें कातडें अंगावर घेऊन आम्ही !
- आम्ही आपल्या मुलांलेंकरांभोंवती प्रेमानें वावरतों, त्यांची सेवा करतों
- आणि उलट त्यांच्या लाथाबुक्क्यांचे - चाबकांचे - तडाखे सोशीत धाय मोकलून रडत कीं रे असतों !
पण बाळांनो, जगाला निव्वळ देह - कातडें - माती !
- प्रिय आहे !
आत्म्यावर जगाचें खरें प्रेमच नाहीं !
जोंपर्यत मी मनुष्यदेहानें नटलें होते, तोंपर्यंत ही घरांतली माझींच मुलेंलेंकरे कशीं मजवर प्रेम करीत होतीं !
पण मी मांजर होऊन घरांत फिरुं लागल्यापासून, मला कोणी जवळसुद्धां उभें राहू देत नाहीं !
देवा !
आज माझाच वाढदिवस, आणि मलाच का रे अन्न - पानांतलें घासभर उष्टें अन्नसुद्धां मिळूं नये !
पण या घरांतल्या मुलांना तरी काय ठाऊक कीं, मी त्याचीच आई आहें ?
तसें असतें तर मघाशीं मी नुसती स्वयंपाकघरांत डोकावलें मात्र, तोंच ' रांडे ! नीघ ! ' असें म्हणून माझ्या वेणूनें - प्रत्यक्ष माझ्या लेंकीनें !
- ताडकन् माझ्या डोक्यांत लाटणें फेंकून कशाला बरें मारलें असतें !
- बाळांनो ! नका रडूं !
मी आतां खाली जाऊन येतें !.....

जातिभेद नाही कोठें ?

.... ही अशी लटपट नको आहे !
म्हणे पुष्कळांचें मत आहे कीं, ईश्वरानें जातिभेद निर्माण केला नाहीं म्हणून !
असेल !
एका पुष्कळांचें जसें हें मत आहे, तसेंच जगांतल्या दुसर्‍या पुष्कळांचेंही मत आहे कीं, ईश्वरानेंच जातिभेद निर्माण केला आहे !
- मी असें विचारतों कीं, आपल्या मानवसृष्टीखेरीज इतर जीवसृष्टींत परमेश्वरानें जातिभेद निर्माण केला आहे कीं नाहीं ?
- फार कशाला ?
या वनांतलीच मौज पहा कीं, अहो, कांहीं झाडांना नुसतीं सुवासिक फुलेंच आहेत, तर कांहीं दिखाऊ - पण अत्यंत सुंदर - अशाच फुलांनीं नटलेलीं आहेत !
पहा, तो आम्रवृक्ष पहा !
त्याला सुवासिक मोहरकी आहे व गोड फळेंही येतील !
बिचार्‍या सुरुच्या झाडांना तर फुलेंही नाहींत आणखी फळेंही नाहींत !
पण त्यांची, वायूच्या लहरीमध्यें डुलत डुलत स्वर्गाला जाऊन भिडण्याची धडपड अव्याहत चालू असते कीं नाही ?
तसेंच पक्ष्यांचे ! कोणी गाणारे आहेत, कोणी सुंदर आहेत, तर कांही
- पहा ती घार !
ओहोहो !
आकाशांत उंच भरार्‍या मारीत चालली आहे !
- हो, मग, मी तरी तेंच म्हणतों कीं, पशूंमध्येंही हाच प्रकार आहे !
अहो इतकेच नाहीं, पण गुलाबाच्या झाडामध्येंसुद्धां किती तरी जाती आहेत !
मला सांगा, सगळ्या जगांत पोपट तरी एकाच जातीचे आहेत का ?
मुळींच नाहीं. अहो, प्रत्यक्ष माणसाला कोठें नको आहे जातिभेद ?
हो, आपल्यालाच मी असें विचारतों कीं, तुम्ही आपल्या बागेंत नुसती गुलाबाचींच झाडें कां नाही लावीत ?
पाहिजे कशाला जाई - जुई - मालती - मोगरा !
- तें कांही नाहीं !
माणसाचा स्वभावच हा कीं, आपल्या वर्तनांतील दोषांचा डेरा कोणाच्या तरी माथी तो आदळीत असतो !
- वा ! काय कोकिळा मधुर गात आहे !
का हो त्रिंबकराव, आपल्याभोंवती मधून मधून जें एवढें गवत पसरलें आहे, त्यामध्यें रडून रडून वाळलेली एक तरी गवताची पात तुम्हांला दिसत आहे का ?
तीं नारळाचीं झाडें आमच्यापेक्षां कां उंच आहेत, आणि आम्हांला तूं इतकें उंच कां करीत नाहींस ?
- अशी यांची ईश्वराजवळ चालू असलेली ओरड तुम्हांला कोठें ऐकूं येत आहे का ?
कोकिळा गात आहे म्हणून इतर पक्षी गायचे थोडेच थांबले आहेत !
आपल्या बंधूजवळ जितका मोहोर आहे तितका आपल्याजवळ नाहीं, म्हणून हा आम्रवृक्ष मत्सरानें सुकून गेला आहे का ?
सांगा, अगदी लहानशा गवाताच्या पातीला जितका आपल्यांतील ईश्वरी तेजाविषयीं अभिमान वाटतो, तितकाच, उंच हात पसरुन आपल्या लहान भावंडांना वारा घालणार्‍या त्या नारळाच्या झाडालाही वाटतो !
जगाचें सौंदर्य वाढविण्याची परमेश्वरानें आपल्यावर सोंपविलेली कामगिरी, जितक्या उत्साहानें व कळकळीनें तें गुलाबाचें फूल बजावीत आहे, तितक्याच उत्साहानें व कळकळीनें हें झेंडूचें फूलही नाहीं का बजावीत?
- हें पहा !
या आनंदानें स्मित करणार्‍या व शांत वनांत दुःखाचा एक तरी सुस्कारा ऐकूं येत आहे का ?
- नाहीं तर आपल्या शहराकडे नजर फेंका !
जिकडे तिकडे मीपणाची आग भडकून त्यांत तडफडून - भाजून - निघणार्‍या तूंपणाच्या हदयांतून अव्याहत बाहेर पडणार्‍या धुराचें
- त्रिंबकराव !
- कसें हें आच्छादन पसरलें आहे !
- काय म्हटलेंत ?
हा सगळा धूर जातिभेदानें घुमसणार्‍या तंट्यांतून बाहेर पडत आहे ?
- नाहीं ! तसें नाहीं ! अहो !
ईश्वराला जाणूनबुजून पायांखाली तुडवून सर्व जगाचा मी एकटा मालक असावा, या इच्छेनें अनावर होऊन, एकमेकांवर टाळकीं फोडून घेणार्‍यांच्या मेंदूतून या वाफा निघत आहेत
- वाफा !
' मी ! मी ! ' अशी रणगर्जना जिकडे तिकडे ऐकूं येत आहे !....

कोकिलाबाई गोडबोले

.... मेले हात धुऊन पाठीस लागले आहेत जसे !
काडीइतकें सुद्धां कार्ट्यापासून सुख नाहीं !
- कस्सें, करुं तरी कसें आतां !
जेवा मुकाट्यानें !
नाहीं तर चांगली फुंकणी घालीन पाठीत एकेकाच्या !
- काय, काय म्हटलेंस गण्या ?
- मेल्या !
मी मोठमोठ्यांनें ओरडते का ?
- ऊं !
- चूप ! ओक्साबोक्शी रडतो आहे मेला !
जीव गेला ?
का घालूं आणखी पाठींत ?
- काग वेणे ?
गप कां बसलीस ?
- भाकरीवर तूप हवें ?
- मेलें माझें तोंड नाही धड आतां !
बापानें ठेवलें आहे तूप तुझ्या टवळे !
तूप पाहिजे नाहीं ?
हें घे !
- गप्प !
नाहीं तर आणखी रपके घालीन चांगले !
- मिटलें का नाही तोंड ?
का अस्सा आणखी !
- हात तुला घातले चुलींत नेऊन अवदसे !
- कोण आहे ?
कोण हांका मारते आहे बाहेर ?
- आहेत हो, आहेत !
आलें, आलें !
- या पोरट्यांच्या गागण्यानें अमळ ऐकूं येईल तर ना ?
लग्न होऊन घरांत आल्यापासून सारखी पाहत आहें, रात्रंदिवस मेला जंजाळ पाठीमागे !
- सांडलेंस पाणी ?
- बाई ! बाई !
भंडावून सोडलें आहे या पोरट्यांनी - !
पहा, आहे ? नीट मुकाट्यानें जेवायचें, त्या मिटक्या रे कशाला वाजवायच्या ?
- थांब !! हा झारा तापवून चांगला चरचरुन डाग देतें तोंडाला !
- दळिद्री कारटी !
खाऊन पिऊन मेली झालीं आहेत पहा कशीं !
मरुं घातली आहेत जशीं !
- आलांत ? आज लवकर येणें केलें ?
स्वारीचें भटकणें लवकरच संपलें म्हणायचें !
रोज उठून तीं मेलीं मंडळें का फंडळे !
कर्माची करा आपल्या मंडळें !
- उद्यां जा तर खरे, कीं ही सगळी कारटी आणून तिथें उभी करते अन् पहाते तमाशा !
- आलें हो, आलें ! - केव्हांच्या त्या मुरलीबाई हांका मारीत आहेत, तेव्हां अमळ
- ऐकलें का ?
 - असें घुम्यासारखें बसायचें नाहीं !
संभाळा या कारट्यांना, नाहीं तर मेली आग लावून देतील घरादाराला !
- आलें बाई !!....

वर्डसवर्थचें फुलपांखरुं

ओ !
स्प्लेंडिड !
ब्यूटिफुल !
- छे !
वर्डसवर्थची कविता म्हणजे काय ! - मौज आहे !
फारच सुंदर, फारच उत्कृष्ट !
या महाकवीचें अंतःकरण किती प्रेमळ - अगदी मेणासारखें आहे नाहीं ?
आनंदामध्यें इकडून तिकडे धिरट्या घालणार्‍या सूक्ष्म अशा किड्याला अगर मुंगीला, किंचित् कोणी अडथळा केला, तर या कवीच्या हदयाला लागलीच चटका बसून, अश्रूंनी डबडबलेले नेत्र त्याच्या कवितेंत ठिकठिकाणी कसे स्पष्ट दिसतात !
- हीच पहा की ' फूलपाखरुं ' ही कविता - किती बहारीची आहे !
ही एकच काय, वर्डसवर्थच्या सर्वच कविता गोड, मधुर, रसानें भरलेल्या आहेत !
- म्हणे माझी बहिण एमिलाईन आमच्या बागेंत बागडणार्‍या फूलपाखराला
- त्याच्या पंखावर बसलेली धूळ प्रेमानें हळूच पुसावयालासुद्धां बोट लावीत नसे ! कां ?
तर आपल्या नखाचा स्पर्श होऊन त्या बिचार्‍याचा नाजूक पंख कदाचित् दुखावेल
- आणि त्याच्या आनंदाचा विरस होईल ! अहाहा !
वर्डसवर्थ कवीची सृष्टि, म्हणजे जिकडे तिकडे आनंद आहे !
धन्य तो कवि, आणी धन्य तो इंग्लंड देश !
खरोखर, अशा कवीच्या अघ्ययनानें खडक देखील मेण होऊन जाईल ! मग माणूस तर
- अरे ! हें काय ?
या पुस्तकांत हा ढेंकूण कोठून आला ?
- हा थांब चोरा ! पळून जातोस काय ?
अस्सा ! बरा सांपडलास !
आतां जा कसा पळून जातोस तो !
तरी म्हटलें सकाळी येवढें चावत काय होतें !
द्यावें याला खिडकीवाटें टाकून नाहीं ?
- नको नाहीं तर, तसें नको !
 कारण, हा पुनः घरांत येऊन चावेल !
चिरडून टाकूं ? इश !
हाताला उगीच घाण येईल अशानें !
मग ?
- हां हां !
या दिव्यांतल्या चिमणीवाटें द्यावा आंत फेंकून !
म्हणजे चांगला भाजून मरेल !
पहा, पहा !
कसा चिकटून बसला आहे तो !
पडतो आहे का खालीं ?
- स्स् ! हाय !
बोट जेवायची तयारी झाली !
- चला तर लवकर,
- आपल्याला काय, जेवण झाल्यावर आणखी वर्डसवर्थ वाचूं !....

चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच

काळी आहें का म्हणावें मी ?
कशी गोरी गोरीपान आहें !
- हो हो !
आतां आमच्या चिंगीला सरी करायची, बिंदल्या करायच्या, झालंच तर बाळे, साखळ्या, सगळे सगळे दागिने करायचे ते !
- कसा छानदार मग परकर नेसायचा, पोलकें घालायचें, अन् ठुमकत शाळेंत जायचें, नाहीं बाई ?
 - शहाणी होईल बबी माझी !
मोठीं मोठीं बुकं वाचील !
अन् मग महाराज छोनीचं आमच्या लगीन !
- खरचं सोने, तुला नवरा काळा हवा, कीं गोरा ?
- का..... ळा ! - नकोग बाई !
छबीला माझ्या कसा नक्षत्रासारखा, अगदी चित्रासारखा नवरा मिळेल हो !
- अस्से थाटाचें लगीन करीन, कीं ज्याचें नांव तें !
आहात कुठें !
हजार रुपये हुंडा देईन, हजार !
ताशे, वाजंत्री, चौघडा - हो हो तर !
बेंडबाजासुद्धां लावायचा !
वरात पण वरात निघेल म्हणावें !
नळे, चंद्रज्योती, झाडें यांचा काय लकलकाट होईल !
- पण खरेंच गडे चिंगे, तूं मग भांडायसवरायची नाहींस ना ?
जर का घरांत भांडलीच, तर पहा मग !
माणसाला कसं मुठींत ठेवायला हवें बरं का !
संसार पण संसार झाला पाहिजे !
आणि हें बघ, आपलें आधींच सांगून ठेवतें, पहिलें तुझें बाळंतपण कीं नाहीं, इथें व्हायला हवें !
पुढची करा हवीं तर खुशाल आपल्या घरी !
- मोठी दैवाची होईल चिंगी माझी !
पुष्कळ मुलं होतील माझ्या बबीला !!
- पण काय ग, तुला मुलं झालेली आवडतील, का मुली ?
मुली !
- नको ग बाई, कारट्यांचा मेला तो जंजाळ !
एकापेक्षां एक, असे सगळे मुलगे होतील म्हणावें, मुलगे !
- तसेंच, गाडी - घोडे, कपडालत्ता, कश्शा कश्शाला म्हणून कांही कभी पडायचं नाहीं !
- बरं बरं ! इतक्यांत नको कांहीं चढून जायला !
मोठा दिमाख दाखवते आहे मला !
- पहा, पहा ! फुगते आहे पहा कशी !
- पण कार्टे, बोलूं तर नकोस माझ्याशीं कीं अस्सा हा गालगुच्चा .... अग बाई !
.... हें ग काय ! कसें सोन्यासारखें बोलतें आहें, अन् तुं आपली .... नाय .... नाय .... उगी, उगी माझी बाय ती ....

बोलावणं आल्याशिवाय नाहीं !

सांगूं तरि आतां किती जणांना ?
येतो तो हेंच विचारतो !
- असतील !
चार नाही छप्पन्न नोटिसा निघाल्या असतील !
करायचय काय मला त्यांच्याशीं !
जायचं असेल, त्यांनी जावं खुशाल !
मी थोडाच जातोंय तसा !
- अरे राह्यलं ! नाहीं, तर नाहीं !
इथं थोडंच माझं कांहीं अडलं आहे !
हपापलेली चार खतरुड पोरं गोळा करा, आणि हव्वं तें करा म्हणावं !
- नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा बट्याबोळ झाला, तर नांव कशाला !
- अबे जारे !
मोठा शाळेचा मला अभिमान सांगतो आहे !
आम्हांला तेवढा अभिमान असावा !
आणि शाळेला ?
तिनं हवं तसं आम्हांला लाथाडावं होय ?
- अलवत ! नाहींच भागायचं नुसल्या नोटिशीनं !
कांही थोडीथोडकी वर्ष नाहीं कामं केलेली मीं !
अन् तींही पुनः अशीं तशीं ?
- चौथींत आल्याबरोबर धडाक्याला कॅन्यूटचं काम !
सारख्या टाळ्या !
तीच तर्‍हा दुसर्‍या वर्षी !
पुढें पांचवीत येतांच .... अश्वत्थाम्याचें काम !
जो कांहीं त्यांत माझा आवाज लागला, तसा अद्याप एकाचाहीं कोणाचा लागला असेल तर शपथ !
- दोन रे का ?
पांचवीत तर ओळीनें तीन वर्ष कामं केली मीं !
अन् सहावीतली दोन ठाउकच आहेत तुम्हांला !
- नाहीं, संभाजीचं काम तें दुसर्‍या वर्षी ! वा !
त्या वर्षी तर किती जणांनीं आंत येऊन सांगितलं कीं, धंदेवाल्यापेक्षाही तुझं काम छान झालं ! '
- अरे त्या वर्षी तर स्पेशल पदक मिळालं मला !
- तेंच पुनः सातवींत आल्यावर !
पहिलंच अगदी सीझरचं काम - दुसर्‍याला चांगलं दिलेलं .... पण त्याचं काढून मुद्दाम मला दिलं !
नाटक पाह्यला कोणी युरोपियन आला होता, त्यानं काम पाहून .... विशेषतः ऍक्सेंटस ऐकून .... तोंडांत बोट घातलं म्हणतात !
- पुढं दुसर्‍या वर्षी ?
- हां बरोबर ! धुंडिराजाचं काम !
- तेव्हां तर काय .... हंसता हंसतां पुरेवाट झाली लोकांची !
अन् सगळ्यांत बाबा कळस झाला गेल्या वर्षी !
- शॉयकॉलचं काम !
- पाहून लोक इतके चिडले कीं, एकनं तर चकचकीत घोंडा मारला स्टेजवर !
- तेव्हां बोला आतां !
इतका जिथं माझा अनुभव .... आणि दर्जा वाढलेला, तिथं असल्या फासक्याफुसक्या नोटिशीनं जायचं !
- साफ नाहीं यायचा तसा मी !
मास्तरचा जर येवढा ऐटा आहे .... सांगितलं ना !
मास्तरांवाच जर इतका तोरा आहे, तर साफ यायचा नाहीं मी बोलावणं आल्याशिवाय....

शेवटची किंकाळी !

कसें कोंवळे ऊन पडलें आहे पण ! अश वेळेला नाचण्याबागडण्यानें जिवाला किती आनंद वाटतो ! - हो, हा माझा देह सडलेला असला म्हणून काय झालें ? जीव कोठें सडला आहे, आणी या कुत्र्याच्या आयुष्याला कंटाळला आहे ? - अरे ! आज असें छातींत धसके बसल्यासारखें काय होत आहे ! मघाशी त्या माणसानें हंसत हंसत माझ्यापुढें काय बरें खायला टाकले होतें ? - असेल काही तरी ! गोड होतें ना ? झालें तर ! - रात्रभर या देहाला ओरबडून - कुरतडून - खाणार्‍या यातना जर आतां अमळ थकून भागून निजल्या आहेत, तर आतां मजेनें इकडे तिकडे फिरायला काय हरकत आहे ? - चला ! जरा त्या बाजूला धांवत धांवत जाऊं ! - क्या ! क्या !! - अरे, सोड मला, इतक्या जोरानें - कडकडून - चाबूं नकोस ! सोड मला !! - हंसत आहे कोण ? मला कासावित होऊन ओरडतांना ऐकून, कोणाचें बरें राक्षसी हदय खिदळलें हें ! - अरे ! हा तर रस्त्यांतून खरडत - खरडत - गांवांत भीक मागात फिरणारा तो महारोगी ! काय रे ए ! पांगळ्या - सडक्या - महारोग्या ! माझें ओरडणें ऐकून तूं का रे असा खदखदां हंसलास ? काय ? - काय म्हटलेंस ? मला गोळी - विष - घातलें आहे ? आणि मी आतां मरणार ? अस्सें ! - पण मी - आ ! माझ्या मस्तकावर व छातीवर उभें राहून कोण बरें मला एकसारखें दडपतो आहे ? - पण मी कोठें आधीं मरायला तयार होतों ? माझी इच्छा नसतांना मला कां मारलें रे ? - तुम्ही माणसांनीं माझा कां जीव घेतला रे ! काय ? - थांब ! पुनः - पुनः बोल ! माझा त्रास होतो म्हणून मला मारले ? आपल्या वेदनांनीं विव्हळ होऊन मी रात्रभर रडत होतों - तुम्हांला त्रास देत होतों - म्हणून मला विष घातलें ? मी पिसाळेन ? तुम्हांला चावेन ? म्हणून माझा जीव घेतला ? होय ! - आणखी काय म्हटलेंस ? माझ्या जिवाला होत असलेल्या यातना तुम्हांला पाहवत नाहींत म्हणून मला विष चारलें ? बरें तर ! आपल्या जगण्यानें जर इतरांना त्रास होतो तर कशाला उगीच जगा ? - पण हो ! कायरे महारोग्या ! माझ्याप्रमाणें तूंही सडलेला नाहींस का ? माझ्याप्रमाणें तूंही नाहीं का आपल्या रडण्यानें - गागण्यानें - जगाला त्रास देत ? आपल्या मटकण्यानें तूं नाही का गांवांत महारोग पसरीत ? तुझ्या यातनांची नाहीं जगाला कीव येत ? आणि माझ्या यातनांची तेवढी येते काय ? - आ ! आ !! मला भाजलें ! मला जाळलें ! हा ! - दुष्टा ! चल, नीघ येथून ! - अरेरे ! या जगांत देहानें तडफडून सडणारी - मनानें पिसाळलेलीं - एकमेकांचें हंसत हंसत गळे कापणारी - भयंकर माणसें - किती ! - कितीतरी सांपडतील ! - कां नाहीं ? त्यांना कां नाहीं गोळी घालून - विष घालून - जाळून पोळून मारीत ? - नाहीं ! तसें नाहीं ! अरे कुत्र्या ! तीं माणसें ! - ईश्वराचीं लाडकी शहाणी माणसें आहेत ! जग त्यांचें आहे ! तुम्हां कुत्र्यांचें नाहीं ! समजलास ! नाहीं सोसवत मला या यातना ! देवा ! मला लवकर तरी मरुं देरे ! अरेरे ! नासलेलीं कुत्री जशी मारतात - तशीं नासलेलीं माणसे गोळ्या घालून कां नाही ठार करीत ! - दाबला ! माझा गळा कोणी दाबला ! - अरे कुतरड्या ! माणसाशीं बरोबरी करुं नकोस ! बरोबरी करुं नकोस ! - अरे ! मनुष्यदेहांत प्रत्यक्ष परमेश्वरानें अवतार घेतलेले आहेत ! तुम्हां कुत्र्यांमध्यें कधी - कधीं तरी त्यानें अवतार घेतला आहे का ? मग ! आदळ ! आपट आपलें टाळकें एकदांचें या दगडावर ! - जिवाला त्रासून जर आपण होऊन कोणी माणूस मेलें, तर परमेश्वर त्याला अनंत काल नरकांत लोटतो - नरकांत ! इतकी मनुष्यानें आपल्या जिवाची - आपल्या वर्तनानें ! - ईश्वराजवळ किंमत वाढवून ठेवलेली आहे ! ठाऊक आहे ! - अहा ! कसा तडफडत आहेस आतां ! - नासलेलींच काय ! - पण चांगलीं - चांगली कुत्रीसुद्धां मारुन टाकूं ! हो ! - नासलेली माणसेंसुद्धा नाही मारायची आम्हांला ! मग ! - ओरड ! लागेल तितका ओरड ! - मनुष्याची शारीरिक असो ! - किंवा मानसिक असो ! ती घाण - तो गाळ - आम्हांला काढायचा नाहीं ! तर ती जतन करण्याकरितां आम्ही अनेक संस्था काढूं ! लागतील तितके आश्रम काढूं ! पण ती जपून ठेवूं ! जपून ! हें जग कुत्र्यांसारख्या भिकार प्राण्यांकरिता नाहीं ! निवळ माणसांकरितां आहे ! - माणसांकरितां ! - जा ! चालता हो ! - असें काय ? आम्हां कुत्र्यांकरिता हें जग नाहीं काय ? ठीक आहे ! ठीक आहे ! प्रत्येक गोष्टीला अंत आहे ! तर याद राखून असा - याद राखून ! कीं आम्ही कुत्रींही कधीं तरी जगाचे मालक होऊं ! क्या ! क्या !! आणि मग तुमचीं हदयें फाडून - नरड्यांचा कडकडून चावा घेऊन रक्त पिऊं - रक्त ! कधींधी सोडणार नाहीं ! - क्या !! .....

एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे !

कान फुटले आहेत का रे तुमचे ? मघांपासून सारख्या मी इकडे हाका मारतों आहे, कुठें होतास रे तूं ? घरांत काय झोपा घेतां सगळें ? जा, आतांच्या आतां गाडी जोडून तयार ठेवायला सांग ! पेन्शन् आणायला जायचें आहे, लवकर मला गेलें पाहिजे ! - हें काय ? आपण कां उठलांत ? अहो, दोघे आपण बरोबरच गाडींत जाऊं. तुम्हांला घरी सोडतों आणि मग मी - आहो कंशाचा राग अन् काय ! चालायचेंच ! भाऊसाहेब, आमचें आपलें हें असें आहे. बोलूनचालून कच्च्या दिलाची माणसें आम्ही ! कितीसा टिकाव लागणार ! झालें, केली बडबड ! पुनर्विवाह करावा, पुनर्विवाह करावा ! अशी हवी तितकी वटवट केली ! मोठ्या दिमाखानें मारे लांबलचक व्याख्यानेंसुद्धा झोडलीं ! पण शेवटीं ? स्वतः वर पाळी आली, तेव्हां घातलें शेपूट ! आणि केलें काय ? तर बारातेरा वर्षाच्या पोरीशीं लग्न ! - नाहीं, तसें नाहीं ! मी आपला स्पष्ट बोलणारा माणूस आहे ! अहो, काय वाटेलतें करा, आमच्यासारखीं ही असायचींच ! आणि खरें आहे ! बोलल्याप्रमाणें सगळेच वागायला लागले, तर उद्यां जगाचा कारभारच आटपेल ! नाहीं का ? ह्यः ह्यः ! - गाडी तयार आहे ? - चला ! - अरे थांब, हा टाइम्सचा अंक, आणि तो स्पेन्सरचा व्हॉल्यूम, हे गाडींत नेऊन ठेव - बाकी भाऊसाहेब, तुम्ही कांही म्हणा, खरें आणि स्पष्ट बोलावयाचें, म्हणजे मीं स्वतः पुनर्विवाह केला नाही म्हणून काय झालें ? काय तेवढें बिघडलें ? अहो, आमच्यापैकी लवकरच कोणी तरी - काय, आलें का लक्ष्यांत ? म्हणजे तुमच्याकरितां सामुग्री तयार करुन ठेवलीच आहे ! अहो तसें नाही असें ! एका दृष्टीनें मी तुमच्या कार्याला साहाय्यच केलें आहे ! हीः हीः हीः - चला ! ....

पाण्यांतील बुडबुडे

अग यमे ! इकडे, इकडे ये ! बघ कशी इथं गंमत दिसते आहे ! - ये, या हौदाच्या कांठावर बसूं अन् थोडा वेळ मौज तर पाहूं ! - अबब ! किती तरी बुडबुडे हे ! तोटीचें पाणी हौदांत पडतेंच आहे, नवे बुडबुडे निघत आहेत, जुने फुटत आहेत, सारखा चालला आहे गोंधळ ! - कायग ! इथं आपण बसल्यापासून किती बुडबुडे निघाले असतील, अन् किती फुटले असतील ? शंभर, पांचशें का हजार ? - किती सांग कीं ? - काय, नाहीं सांगतां येत ? हेट् ! फजिती झाली तुझी ! - हः हः हः केवढा बुडबुडा आतां कांठाजवळ येऊन फुटला ग ! चांगला लिंबायेवढा होता कीं ! - पण येवढा मोठा व्हायला किती तरी लहान, निदान तीसचाळीस तरी, एकमेकांत मिसळावें लागले असतील नाहीं ? - गंमतच आहे ! पहिल्यानें कसा अगदी बारीक असतो ! आणि हळूहळू पुढें जायला लागला कीं, येईल त्याला ममतेनें आपल्यांत मिसळूं देतो ! शेवटी तोच बुडबुडा - बरें का यमे ? - रुपयायेवढा, नाहीं तर उगवणार्‍या सूर्याइतका किंवा चंद्रायेवढासुद्धां मोठा होतो ! - हो, सगळेच मोठे होत आहेत ! आतां तूंच बध कीं, निघाल्यापासून कांठाला येऊन फुटेपर्यत जस्सेच्या तसे - मोठे नाहींत अन् लहान नाहींत - अगदी तिळायेवढाले बारीक किती तरी निघत आहेत अन् फुटत आहेत ! अग, आतांपर्यत लाखों निघाले असतील ! पण त्यांत मोठे होऊन कांठावर शांतपणें डोकें ठेवून फुटलेले किती होते ? एक, नाहीं तर दोन ! संपलें ! - बाकीचे काय ? लडबड लडबड करतात, घाईनें मोठे होतात, अन् फटाफट फुटतात ! - आणि कांहीं तर भारीच वाईट ! एखादा बिचारा कुठें चांगला मोठा व्हायला लागला कीं, त्यांत हे हळूच शिरतात, आणि त्यालाही फोडून टाकतात, अन् आपणही फुटतात ! - पहा, पहा, यमे, आतां नीट पहा अं ! कसा बुडबुडा एकसारखा मिसळत आहे तो ! - अरे वा ! चांगला रुपयायेवढा झाला कीं ! चालला, बघ, कांठाकडे चालला ! मिसळले ! आणखी तीनचार येऊन मिळाले ! ओहो ! कसा खिशांतल्या घड्याळायेवढा झाला आहे ग ? - आला कांठाकडे - अहा ! पाहिलेंस यमे ! - कसा सूर्यानें त्याच्या डोक्यावर हिर्‍यांचा मुकुट घातला आहे तो ? - आला, टेकला कांठाला येऊन !...

रिकामी आगपेटी

हायरे दैवा ! सत्तर मुलें ! - पण सगळीं मला टाकून गेलीं ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथें असाल तेथून धांवत येऊन मला - आपल्या आईला - एकदां तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणतां ? माझी सगळी लेंकरें मरुन पडलीं आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पायां पडतें ! पण कसेंही करुन त्यांची व माझी एकदां तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचें मला शेवटचें चुंबन घेऊं द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडूं द्या ! - हाय ! त्यांची व माझी आतां मुळीच भेट व्हायची नाहीं ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठें आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशीं जातां जातां दोन शब्द तरी बोला ! - अगबाई ! एकाएकी कसला बरें गोंगाट सुरु झाला ? काय ? माझीं मुलें आली ? कोठें आहेत तीं ? मला नाहीं का - हो दिसायची तीं ? नुसतें त्यांचें बोलणेंच मला ऐकूं येईल ? थांबा ! बाळांनो ! अरे, असा गलका करुं नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेंत ? जगामध्यें गेलां होतां ? अस्सें कां ? जगामध्यें काय पाहिलें ? कसें आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करुं नका ! - सांगा ! नीट सांगा !

' १ - जग कसें आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा आपल्याला तें जग !

२ - नाहीं ग आई ! हा कांही तरीच सांगत आहे झालें ! मी सांगूं का तुला जग कसें आहे तें ? जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवासानें माझा जीव कसा अगदी आनंदानें गुंग होऊन गेला होता !

३ - खरेंच ! जगांतल्या विड्यांच्या धुरानें व शौचकुपांतील नरकाच्या घाणीनें माझा जीवसुद्धां अगदीं गुंग होऊन गेल होता ! ओकून ओकून माझी कोण पुरे वाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासानें भरलेलें आहे !

४ - कांही नाहीं ! सगळें खोटें आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्यें एक दीपगृह ! याशिवाय जगांत दुसरें तिसरें कांहीसुद्धां नाहीं !

५ - अरे काय सांगत आहांत तरी काय तुम्ही ! आई, यांचें तूं कांहीसुद्धं ऐकूं नकोस ! अबब ! काय ती लक्षावधि माणसांची धांवपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्यां आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्यानें व माणसांच्या गोंगाटानें ती प्रचंड इमारत कशी अगदीं गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझें डोकें तर अगदी फिरुन गेलें होते !

६ - ठेवलीं आहेत लक्षावधि माणसें ! जगामध्यें काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगांत जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहेत ! अहाहा ! काय तें सुंदर व लहानसें देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथें वास करीत आहे !

७ - कांहीं नाही ! जग म्हणजे निवळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोगांनीं कुजविलेल्या देहांतील घाण उपसणें किंवा प्रेतें फाडणें येवढेंच काय ते जगामध्यें आहे !

८ - नाही - नाहीं ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बिभत्स गाणीं, हसणें - खिदळणें - नाचणें -

९ - अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरें तिसरें कांहींसुद्धा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली कीं कसे शहारे येतात अंगावर !

१० - आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरितां हंसणें खोटें - रडणें खोटें - आणि प्रेम करणेंही पण खोटें ! समजलीस !

११ - छे ! छे ! भलतेंच कांहीं तरी ! सुस्वर वाद्यें - मधुर गायन आणि शुद्ध पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोंवती प्रेमानें आपला उजवा हात टाकून व डाव्या हातानें मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठांतून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई ! -

१२ - संपलें कीं नाहीं चर्‍हाट अजून तुझें ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळें जग भरलें आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटकाच्या दुसर्‍या अंकांतील दुसरा प्रवेश वाचून पहा, म्हणजे समजेल मी काय म्हणतो तें ।

१३ - कांही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगांत दुसरें कांहीं तरी आहे का ? अहाहा ! काय तें भव्य देवालय ! हजारों स्त्रीपुरुषांच्या हदयांतून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !

१४ - निवळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनीं - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुप्रदवी पशूच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणें नको !

..... हायरे दैवा ! सत्तर मुलें ! - पण सगळीं मला टाकून गेलीं ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथें असाल तेथून धांवत येऊन मला - आपल्या आईला - एकदां तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणतां ? माझी सगळी लेंकरें मरुन पडलीं आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पायां पडतें ! पण कसेंही करुन त्यांची व माझी एकदां तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचें मला शेवटचें चुंबन घेऊं द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडूं द्या ! - हाय ! त्यांची व माझी आतां मुळीच भेट व्हायची नाहीं ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठें आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशीं जातां जातां दोन शब्द तरी बोला ! - अगबाई ! एकाएकी कसला बरें गोंगाट सुरु झाला ? काय ? माझीं मुलें आली ? कोठें आहेत तीं ? मला नाहीं का - हो दिसायची तीं ? नुसतें त्यांचें बोलणेंच मला ऐकूं येईल ? थांबा ! बाळांनो ! अरे, असा गलका करुं नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेंत ? जगामध्यें गेलां होतां ? अस्सें कां ? जगामध्यें काय पाहिलें ? कसें आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करुं नका ! - सांगा ! नीट सांगा !

' १ - जग कसें आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा आपल्याला तें जग !

२ - नाहीं ग आई ! हा कांही तरीच सांगत आहे झालें ! मी सांगूं का तुला जग कसें आहे तें ? जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवासानें माझा जीव कसा अगदी आनंदानें गुंग होऊन गेला होता !

३ - खरेंच ! जगांतल्या विड्यांच्या धुरानें व शौचकुपांतील नरकाच्या घाणीनें माझा जीवसुद्धां अगदीं गुंग होऊन गेल होता ! ओकून ओकून माझी कोण पुरे वाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासानें भरलेलें आहे !

४ - कांही नाहीं ! सगळें खोटें आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्यें एक दीपगृह ! याशिवाय जगांत दुसरें तिसरें कांहीसुद्धां नाहीं !

५ - अरे काय सांगत आहांत तरी काय तुम्ही ! आई, यांचें तूं कांहीसुद्धं ऐकूं नकोस ! अबब ! काय ती लक्षावधि माणसांची धांवपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्यां आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्यानें व माणसांच्या गोंगाटानें ती प्रचंड इमारत कशी अगदीं गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझें डोकें तर अगदी फिरुन गेलें होते !

६ - ठेवलीं आहेत लक्षावधि माणसें ! जगामध्यें काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगांत जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहेत ! अहाहा ! काय तें सुंदर व लहानसें देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथें वास करीत आहे !

७ - कांहीं नाही ! जग म्हणजे निवळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोगांनीं कुजविलेल्या देहांतील घाण उपसणें किंवा प्रेतें फाडणें येवढेंच काय ते जगामध्यें आहे !

८ - नाही - नाहीं ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बिभत्स गाणीं, हसणें - खिदळणें - नाचणें -

९ - अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरें तिसरें कांहींसुद्धा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली कीं कसे शहारे येतात अंगावर !

१० - आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरितां हंसणें खोटें - रडणें खोटें - आणि प्रेम करणेंही पण खोटें ! समजलीस !

११ - छे ! छे ! भलतेंच कांहीं तरी ! सुस्वर वाद्यें - मधुर गायन आणि शुद्ध पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोंवती प्रेमानें आपला उजवा हात टाकून व डाव्या हातानें मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठांतून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई ! -

१२ - संपलें कीं नाहीं चर्‍हाट अजून तुझें ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळें जग भरलें आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटकाच्या दुसर्‍या अंकांतील दुसरा प्रवेश वाचून पहा, म्हणजे समजेल मी काय म्हणतो तें ।

१३ - कांही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगांत दुसरें कांहीं तरी आहे का ? अहाहा ! काय तें भव्य देवालय ! हजारों स्त्रीपुरुषांच्या हदयांतून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !

१४ - निवळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनीं - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुप्रदवी पशूच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणें नको !

१५ - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग म्हणजे एक सर्कस आहे सर्कस ! पशूंनीच काय, पण माणसांनींसुद्धां, त्या लहानशा वर्तुळामध्यें जगाच्या नियमाप्रमाणें वावरलें पाहिजे ! जरा कोठें चुकायचा अवकाश, कीं बसलेच चाबकाचे फटकारे अंगावर ! तेथें स्वच्छंदीपणाला यत्किंचितसुद्धां वाव नाहीं ! हो !

१६ - कांहीं तरी सांगत आहेस झालें ! सद्गुणी आत्म्यांचा छळ आणि आत्महत्या, यांनींच सगळें जग भरलें आहे ! ' नाहीं रे देवा आतां मला हा छळ सोसवत ! ' असें रडत रडत म्हणून त्या गरीब बिचार्‍या बालविधवेनें कशी धाडकन् विहिरीमध्यें उडी टाकली पण ! जग म्हणजे छळ, निराशा -

१७ - आग ! आग ! अरे बाबा, सगळें जग आगीमध्यें होरपळून - भाजून - मरत आहे ! मनाला - जिवाला - शेवटी देहालासुद्धां आग लागते आग ! शिव ! शिव ! केवढा तो भयंकर अग्नीचा डोंब ! - चार - पांचशे माणसें कशी ओरडून - ओरडून - तडफडून - अखेरीं मेलीं पण !

१८ - नाहींग आई ! ईश्वरभक्तीशिवाय जगांत दुसरें कांहीसुद्धां नाही ! महात्मा ख्राइस्टच्या तसबिरीजवळ गुडघे टेकून - हात जोडून - आणि नेत्र मिटून बसलेली व शांत अशा ईश्वरी प्रेमामध्यें बुडून गेलेली ती चौदा - पंधरा वर्षाची बालिका मीं पाहिली मात्र ! - अहाहा ! त्या वेळेस मला केवढी धन्यता आणि किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई -

१९ - अहो धांवा ! डेस्डिमोनेचा खून झाला ! कॉडेंलिया फांसावर चढली ! पांखरें मेलीं - वणवा पेटला ! धांवा ! धांवा !! हाय ! जगांत अन्याय ! अन्याय ।

२० - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग मुळीं नाहींच आहे ! हं ! कसला अन्याय ! आणि कसची ईश्वरभक्ति !

इतर मुलें - नाहीं ! तूं खोटे बोलतोस ! जग आहे ! आम्ही सांगतों जग कसें आहें तें ! ऐका ! ऐका ! गलका करुं नका ! ऐका ! '

आगपेटी - बाळांनो ! अरे थांबा ! असा गोंगाट करुं नका ! हं ! सांगा ! नीट पुनः एक एक जण सांगा ! कसें आहे म्हटलेंस जग ? - सगळाच गोंधळ ! एकाचेंही सांगणें दुसर्‍याच्या सांगण्याशीं मुळींच जुळत नाहीं ! खरें तरी कोणाचें मानूं ! - आणि खोटें तरी कोणाचें समजूं ! काय म्हटलेंस ? तूं सांगतोस खरें जग कसें आहे तें ? बरें तर, सांग पाहूं - आई ! मेलें ! मेलें ! कोणी चांडाळानें मला पायाखाली चिरडली ! मी मेलें !!.....

ओझ्याखाली बैल मेला !

ओ ! आग लागो त्या महत्त्वाकांक्षेला ! आणि त्यांत तळमळणार्‍या, तडफडणार्‍या या जीविताला ! - अरे हा गळफांस काढा - खुंटी नरड्यांत शिरली ! जूं दूर करा - मी मेलों ! - या बैलानें, चांडाळानें छळून किं हो शेवटी मला असें मारलें ! - नको ! ही यातनांची तीव्र ओढाताण ! देवा ! सोडीव आतां लवकर ! आयुष्याचा डोलारा कोसळला ! सोसाट्याच्या झंझावातांत जग गिरक्या घेऊं लागलें ? - विक्राळ अंधकारानें झडप घातली ! जीवा ! जिभेचा अडसर बाजूला काढ, - पहातोस काय ! - कानावर लाथ मारुन, नाही तर डोळे फोडून बाहेर नीघ लवकर ! हा ! नरकांतल्या धडधड पेटलेल्या आगींत अनंत काल उभें राहणें पुरवलें, - पण अंगांत शक्ति नसूनही, मोहक, कामुक अशा महत्त्वाकांक्षेच्या पुरें नादी लागून, कर्रर - कर्रर ओरडून रक्त ओकणार्‍या हाडांच्या सांपळ्यावर प्रचंड ओझीं लादून, तोंडाबाहेर दुःखांनी चघळून चघळून, जिवाचा फेंस काढीत, फरकटत ओढीत नेणारें, देवा ! हें जगांतलें बैलाचे जिणें नको ! अरे मूर्खा, अजागळा, रोडक्या बैला ! ' माझ्या इतर सशक्त सोबत्यांप्रमाणे मी आपल्या मानेवर मोठमोठी ओझीं घेऊन डौलाने, गर्वानें छाती फुगवून - जगांत कां मिरवूं नये ? ' असें पुनः एकदां वर मान करुन मला विचार पाहूं ? आ वासून रस्त्यांत धूळ चाटीत, मरणाशीं ओढाताण करीत कारे बाबा असा लोळत आहेस ? - हाय ! असा हंबरडा फोडून रडूं नकोस ! माझी चूक झाली - राग मानूं नकोस ! ये, मला एकदां कडकडून शेवटची मिठी मारुं दे । मग मी आनंदानें जाईन बरें ?....

कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.

कोण हो कोण ? - काय ! अवचितराव करकर्‍यांची सून ? आणि ती एकाएकी कशानें हो मेली ? - वाख्यानें का ? बरें झालें हो ! सुटली एकदांची आपल्या दुःखांतून ! बिचारीचा नवरा वारल्याला दोन वर्षे व्हायला आलीं असतील नाहीं ? - बाई ! बाई !! केवढा आकांत माजला होत्या त्या वेळेला या घरांत ! घरांतल्या बायकांच्या ओरडण्यानें सगळी आळी किं हो गर्जून गेली होती ! आणि आतां ? या सोळा - सतरा वर्षाच्या मुलीकरतां - आनंदीच नाहीं का हिचें नांव ? - बिचारीकरतां या घरांतलें एक चिटपांखरुं तरी आता ओरडत आहे का ? - बरोबरच आहे ! नवरा मेलेली पोर ! हिच्या मरणाबद्दल हो कोणाला वाईट वाटणार आहे ! उलट जें तें हेंच म्हणणार कीं, ' विधवा मेली ना ? बरें झालें चला ! सुटली एकदांची ! ' इतकेंच काय, पण कितीएक तर असेंसुद्धां म्हणायला कमी करीत नाहींत कीं, ' बरें झालें ! आमच्या घरांतला अपशकुन - बरेच दिवस खिळलेली अवदशा लवकरच नाहींशी झाली ' म्हणून ! नवरा मेलेल्या बायका गेल्या, तर त्यांच्याबद्दल हें अशा तर्‍हेचें दुःख जगाला होत असतें ! - सवाष्ण मेली तर ? अहो कशाचें आलें आहे ! तिची लहान मुलेंबाळें जी काय रडतील, गागतील तेवढींच ! बाकी जग तर हेंच म्हणतें, ' सवाष्ण मेली ? भाग्यवान् आहे ! बरोबर कायमचें - अखंड ! - सौभाग्य घेऊन स्वर्गाला गेली !! ' - हं: , पाहिलें तर तें ' अखंड सौभाग्य ! ' नदींत तिच्या प्रेताची पुरती राख विरघळेपर्यतसुद्धा टिकत नाहीं ! लागलीच दुसरी कोणी तरी पाठीमागून धांवत येऊन, झिंज्या धरुन, पाठींत लाथ मारुन, तें ' अखंड सौभाग्य ! ' बिचारीच्या हातांतून हिसकावून घेऊन, पुनः जगांत परत येतेही ! - खरेंच तर काय ! बायकाचें जगणे आणि मरणें, सारखेंच ! - जगल्यास जगा ! मेल्यास मरा ! अहो नाहीं तर, या आनंदीच्या नवर्‍यासाठी, तिच्या सासूसार्‍यांनी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला होता ना ? आणि आतां ? नाहीं, तुम्हींच समक्ष पाहिलें आहे म्हणून विचारतें ? अहो ! आनंदीचा नवरा जगावा म्हणून जशी यांनी खटपट केली, तशीच ही एकदांची मरावी म्हणून यंनी निष्काळजीपणाची खटपट केली असेल बरें ! - ती पहा ! ती पहा ! तिला बाहेर आणली आहे ! आई ! आई !! कशी कोंवळी पोर ! कायरे देवा हिला जगांत आणून हिची हौस पुरवलीस ? - तिला पाणी घेतलेली तिची प्रत्यक्ष आईच ना हो ती ? - जावयाकरितां कशी ऊर बडवून किं हो रडत होती ? आणी आतां ? - अहो हिच्या पोटचा गोळा ना तो ? - पण नाहीं, ही मेली म्हणून तिला - प्रत्यक्ष आईलासुद्धां - मनांतून बरें वाटत असेल ! ....

एका नटाची आत्महत्या

ओढ ! जगा, असेल नसेल तितकी शक्ति खर्च करुन ओढ ! - हं चालूं दे ! दांतओंठ खाऊन अगदी जोरानें - अस्सें ! चालूं दे ! - आलों, आलों ! थांबा, भिऊं नका ! - अरे वेडया जगा, कां उगीच धडपडत आहेस ? हं ! नको आपल्या जिवाला त्रास करुन घेऊंस ! माझें ऐक. सोड मला. एकदां दोनदा तूं मला परत फिरविलेंस - काय सांगितलेंस ? काय माझें समाधान केलेंस रे तूं ? निव्वळ आरडाओरडा ! ' वाहवा, वाहवा ! भले शाबास ! खूप बहार केलीस ! ' - बेशरम ! हंसतोस काय ? - अरेरे ! तुझ्या नादीं लागून आजपर्यत या तोंडाला रंग फासला काय - नाचलों काय - रडलों - हंसलों ! - हाय ! जिवाची चेष्टा - या जिवाची विटंबना केली ! नको ! नको !! मला ओढूं नकोस !!! - काय वार्‍याचा सोसाटा हा ! जिकडे तिकडे धूळ आणि पाचोळाच - पाचोळा उडाला आहे ! - अबब ! केवढा प्रचंड सर्प हा ! घाल, खुशाल माझ्या अंगाला विळखा घाल ! अरे जारे ! कितीही जोरानें तूं मागें ओढलेंस, तरी मी थोडाच आतां मागें फिरणार आहे ! खुपस, मस्तकांतून अगदीं पायापर्यत तूं आपला - अस्सा हा ! चालूं दे ! - दंत खुपस ! नाहीं ! मी परत फिरणार नाही जा ! - ओरडा ! मोठमोठ्यानें आरोळ्या मारा ! टाळ्या वाजवा ! नाटकी - ढोंगीपणानें सगळें जग भरलें आहे ! अरे जगायचें तर चांगलें जगा ! नाही तर - चला दूर व्हा ! अरे नका ! माझ्या तोंडाला चुना - काजळ - फांसूं नका ! कोण ? कोण तुम्ही ? मला फाडायचें आहे ? तें कां ? मी कशानें मेलों तें पाह्यचें आहे ? सलफ्यूरिक ऍसिड ! - अहाहा ! काय गार - गार - वारा सुटला आहे हा ! जिकडे तिकडे बर्फच - बर्फ ! अनंतकाल झोंप - चिरकाल झोंप ! - हः हः ! वेडया जगा ! माझीं आंतडी आपल्या कमरेभोंवती गुंडाळून मला मागें खेचण्यासाठीं कां इतका धडपडत आहेस ? अरेरे ! बिचारा रडकुंडीस आला आहे ! काय काय ? माझें आतां गूढ उकलणार ? अहाहा ! - उलथलें ! जग उलथून पडलें ! ओहो ! ....

त्यांत रे काय ऐकायचंय !

पेट्रोल वगैरे आहे ना रे भरपूर ? - ठीक आहे ! तबेल्यांतून आणलीस कीं निघालोंच आम्ही ! - छे हो ! नाहीं जमलें बोवा आज सकाळी फिरायला जायचं ! सगळा वेळ त्या बक्षीस समारंभांत मोडला ! आठ वाजल्यापासूज जें सुरु झालं, तें दहा साडेदहापर्यत चाललं होतं आपलं ! अस्सा कंटाळा आला होता कीं, ज्याचं नांव तें ! - नकोसं झालं होतं अगदीं ! बरं, मधेंच उठून येईन म्हटलं, तर तिकडूनही पंचाईत ! कारण समारंभाची मुख्य देवता .... अध्यक्षच पडलों आम्ही, तेव्हां थोडंच कुठं हालतां येतं आहे ? - हें म्हणा रे, तें म्हणा रे, स .... गळं कांहीं होईपर्यंत मग - शीः ! कसली व्यवस्था अन् काय ! .... चाललं होतं आपलं कसं तरी ! - अहो, मुळीं हेडमास्तरनाच कुणी विचारीना, तिथं कोण जुमानतो अध्यक्षाला अन् फध्यक्षाला ! मारे जोरजोरानं ओरडून बिचारा सांगत होता कीं, ' हें पहा ! हे जे आपले आजचे सन्माननीय पाहुणे आहेत कीं नाहीं, ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ! फार त्यांना शाळेचा अभिमान आहे ! ' - झा.... लं ! असं म्हणतांच, जो कांहीं टाळ्यांचा, अन् बाकांवर हातपाय आपटण्याचा धडाका सुरु झाला, तो कांहीं .... राम ! राम ! .... पुसूं नका ! म्हटलं आतां शाळा पडते कीं काय होतंय तरी काय ! पुढं हीच रड आमच्याही भाषणाच्या वेळीं ! - अहो, कारटीं आवरतां आवरेनात ! हा उठतो आहे, तो ओरडतो आहे, गोंधळ इथून तिथून ! अन् जरा कांही झालं कीं नाही, कीं टाळ्या अन् दणदणा हातपाय आपटायचे ! - काय हें ! छे बोवा ! आपल्या वेळेला होतं कांहीं असं ? - हेः ! तर्‍हाच कांही वेगळी आजची ! काय पोरं, अन् काय मास्तर ! वा रे वा !! - जाऊं द्या झालं ! सगळीच जिथं घाण .... रॉटन झालं आहे, तिथं काय आपण तरी - चला ! आली मोटार वाटतं दाराशीं - पण हे.... चिरंजीव कुणीकडे निघाले आहेत आमचे ? फिरायला न्यायचं म्हणतों मी त्याला ! - अप्पू, ए अप्पा ! कोणीकडे निघाला आहेस ? ग्राउंडांत - काय असतं रे रोज उठून तिथें ? चल आज बरोबर फिरायला ! - पुरे रे बोवा ! असेल बोलावलं मास्तरांनीं ! - आहे ठाऊक किती ऐकतां तुम्ही तें ! - हँततेच्या ! येवढंच ना ? म ... ग रे काय ! चल ये बैस लवकर ! - भिकार स्काउटिंग तें काय ! अन् त्यांत रे काय ऐकायचं येवढं त्यांचं ! ....

माझी डायरेक्ट मेथड ही !

शंभरापैकीं पंचवीस मार्क ? - कांहीं जिवाला शरम ! जा ! आतांच्या आतां हें कार्ड घेऊन, दाखव तुझ्या त्या मास्तरला नेऊन ! बेशरम ! शिकवतात का हजामती करतात ? - या ! छान झालें ! ऐन वेळेवर आलांत ! पहा हे आमच्या चिरंजिवांचे प्रताप ! इंग्रजींत सारे पंचवीस मार्क ! - काय पोरखेळ आहे ? - मोठा अगदीं तुमच्या शिफारशीचा मास्तर ! कारण तुम्ही आमचे स्नेही - अन् शिक्षणपद्धतीचे अगदी गड्डे - म्हणून तुम्हाला आम्हीं विचारलें ! - तोंडांत मारायला नव्हते कुणी त्या वेळी माझ्या - दरमहा वीस रुपयेप्रमाणें आज अडीचशें रुपये त्या मास्तरड्यांच्या उरावर घातले त्याचें हें फळ होय ? म्हणे नवीन पद्धति ! विद्वान् कीं नाहीं मोठे ! - काल मॅट्रिक झाला नाहीं, तों आज मास्तरच्या खुर्चीवर जाऊन बसतां, काय येत असतं रे तुम्हांला ? - हीच रड तुमच्या त्या सुपरिटेंडटची ! - आज एम. ए. होतो काय, अन् शाळा चालवतो काय ! इकडे पालक तर विचारायलाच नको ! सगळेच अवलिया ! स्वतःला मुलें किती आहेत याची तरी त्यांना शुद्ध असते कीं नाहीं कुणास ठाऊक ! वर आणखी नवीन नवीन खुळें हीं ! आग लावा त्यांना ! यापेक्षां आमची जुनी पद्धति खरोखरच चांगली ! एवढा मोठा ' दाऊ ' चा धडा अवघड ना ! पण एकदां चांगली गालफडांत देऊन, मास्तरांनी इ - एस - टी लावायला सांगितली कीं काय विशाद आहे पोरटें विसरेल ! पक्की जन्माची आठवण ! तें राहिलें बाजूलाच ! आतां धड ए - एस - टी नाहीं, अन् आय - एन् - जी नाहीं ! कारट्यांना पाठ म्हणून करायला नको मुळीं ! - आज त्या मास्तरकडे पाठवून याला वर्ष होत आलें, अन् खरोखर सांगतों - चेष्टा नाहीं - या टोणग्याला सी - ए - टी कॅट करतां येत नाही ! - तेव्हां नांव काढूं नका तुम्ही अगदीं ! - ' नवीन - नवीन ' म्हणतां तुम्ही हें ! पण सगळें फुकट - ऑल बॉश - आहे ! - तें कांहीं नाहीं ! यापुढे माझी डायरेक्ट मेथड आतां ही - उठतांक्षणींच कांही अपराध न केल्याबद्दल पांच छड्या, अन् निजण्यापूर्वी अपराध केल्याबद्दल पांच छड्या ! रोजचा हा खुराक ! मग पहातों कसा पोरटीं अभ्यास करीत नाहींत !....

यांतही नाहीं निदान - ?

यंदा नाहीं म्हणजे मग कायमचेंच नाहीं ! कारण कांहीं जमण्यासारखें असलें, तर तें याच वर्षी. नाहीं तर .... हो, तें खरें ! नाहीं म्हणतों आहे कुठें मी ! मार्क कमी पडले आहेत, दोन तीन विषयांत नापास झालों आहें, सर्व कांही कबूल आहे. पण .... मी तरी काय बरं करणार ? गेल्या सबंध वर्षात कोण माझी ओढाताण आणि दुर्दुशा झाली म्हणून सांगूं ! - वडलांचा तर पत्ताच नाहीं ! - कोणास ठाऊक कुठें गेले आहेत ते ! रात्री एक दिवस घरांतून नाहींसे झाले - अहो छे ! कांही भांडण नाहीं अन् कांही नाहीं ! दैव ओढवलें इतकेंच ! - झालें ! वडलांच्या शोधांत कुठें आहोंत, न आहोंत तों एक दिवस सकाळी आपळी मेहुणा गेल्याची बातमी ! भोराहून इकडे पुण्याला येत होते, तों गाडीवानाला म्हणतात रस्ता नीट दिसला नाहीं, अन जी गाडी भलतीकडे उताराला लागली, ती उपडी होऊन, पार कोणीकडच्या कोणीकडे फेकली गेली ! गाडीवाला काय तो कसाबसा जिवंत निघाला, बाकी सगळीं माणसें.... माझा मेव्हणा, त्याचा एकुलता एक बरोबरीचा मुलगा, सर्व कांहीं निकाल ! बहीण इकडे आजारी म्हणून हवा पालटायला आलेली, कळतांच जी तिची वाचा बसली, तों अद्यापपर्यंत एक शब्द नाहीं ! विचारलेंच कोणी कांहीं, तर तोंडाकडे पहाते, आणि रडूं लागते धळधळां ! - आहे ! आई आहे घरांत ! पण ती तरी काय करते बिचारी ! धीर तरी तिनें कोठवर द्यायचा ? - बरं, वडलांच्या आणि मेव्हण्यांच्या या प्रसंगांतून आम्ही कुठें हातापाय हालवतों आहोंत तों .... महिना पंधरा दिवसांचीच गोष्ट ! काय बाबाला बुद्धि झाली कुणास ठाऊक ! बंधुराज आमचे सहज कोणाबरोबर तरी पोहायला म्हणून गेले, तेही.... तिकडे कायमचेच ! - घरांत मिळवता.... आधार असा तोच काय तो उरलेला ! पण तोही असा .... तेव्हां कशाची प्रिलिमिनरी, अन् कसला अभ्यास होतो नीट ! त्यांतूनही करायची तेवढी धडपड केली मी ! आणि याहीपुढें .... येवढें सांगतों मी आपल्याला कीं, जर मिळाला फॉर्म, तर तो .... वाया नाहीं जायचा ! कारण.... काय असेल तें असो ! सारखें मला आपलें वाटतें आहे येवढें खरें ! कीं सगळीकडून असें .... इथें नाहीं, तिथें नाहीं, चोहोंकडूनच जर असें अपयश, तर .... मी म्हणतों .... देव यांतही नाहीं निदान मला ? ....

पंत मेले - राव चढले

[ पंतांच्या घरीं ]

.... असें काय ? सोड मला ! चिमणे, असें वेडयासारखें काय करावें ! रडतेस काय ? जा ! दार लावून घे - घरांत आपला गोपूबाळ निजला आहे ना ? त्याच्याजवळ जाऊन बैस हं ! रडूं नकोस, जा ! - आई आबासाहेबांकडे भात सडायला गेली आहे, ती आतां इतक्यांत परत येईल ! जाऊं मी ? रडायची नाहींस ना ? भूक लागली आहे म्हणून का तूं रडतेस ? - असें काय ? चिमे, मी येईपर्यंत तूं अगदी गप रहा हो ! - आईनें दळून ठेवलेलें हें पीठ यमुनाबाईच्या घरीं पोंचवितों, आणि तसाच माधुकरी मागून मी लवकरच परत येतों ! मग माझ्या ताईला भात, वरण, भाकरी - माधुकरी म्हणजे काय ? ताई ! माधुकरी मागणें म्हणजे भीक मागणें हो ! - लोक आपल्याला भिकारी म्हणतील ? म्हणूं दे ! बाबा देवाच्या घरीं गेले आहेत; त्यांनी देवाला सांगितलें म्हणजे मग देव आपल्याला श्रीमंत करील ! - बाबा केव्हां येतील ? छे ! ते आतां कुठलें यायला ! हें बघ ताई ! तूं बाबांच्याबद्दल पुनः कधीं आईला विचारुं नकोस हो ! ती किं नाहीं लागलीच रडायला लागते ! कोण आई ! केव्हां आलीस ? हें ग काय ! - आई ! आई !! कां ग अशी एकदम मोठमोठ्यानें रडायला लागलीस ? मी माधुकरी मागायला जातों म्हणून ? होय ? - पण आई ! तूं नाहीं का ग लोकांची भांडी घांशीत - दळण दळीत - धुणें धुवीत ? तसेंच मी - आई ! गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको जाऊं म्हणतेस ? कां बरें ? ऊन फार पडलें आहे, आणि माझे पाय फार पोळतील म्हणून ? असूं दे कीं ! मी पळत पळत जाऊन लवकर परत येतों ! जर आतां मी गेलों नाहीं तर गोपू, चिमी, तूं, मी, सगळे जण आपण भूक लागून रडायला नाहीं कां लागणार ? मग आपल्याला कोण बरें खाऊं घालील ? आई ! मी आत्तां जाऊन येतों, सोड मला !....

[ रावांच्या घरीं ]

.... खाऊ ! अरे पेढे आणले आहेत पेढे ! थांबा, थांबा ! अशी घाई करुं नका ! सगळ्यांना देतों बरें मी ! आधीं देवाला नैवेद्य दाखवूं ! आणि मग - हो, हो ! तुला आधीं देईन सोने मी ! मग तर झालें ! - पाणी आणलेंस ? शाबास ! हं, सोने, बापू, देवाच्या पायां पडा, आणि म्हणा ' जय देवबाप्पा ! असेच सुखाचे दिवस आम्हांला वरचेवर दाखवीत जा !' - अस्सें ! शाबास ! हं, हे घे सोने, तुला चार, आणि हे बापू, तुला चार, झालें ना आतां ? - कोण आहे ? रामभाऊ ? अरे वाः ! तुम्ही तर अगदीं वेळेवर आलांत बुवा ! हं, हे घ्या, - आधी खा मुकाट्यानें ! मग कारण विचारा ! मला पांच रुपये प्रमोशन झालें पगार वाढला, त्याचे हे पेढे ! समजलें ? अरे बापू ! आतां हे आंत घेऊन जा ! आणि इकडे बघ, आपल्या त्या गोविंदरावांना, आपासाहेब कर्व्याना, झालेंच तर माडीवरच्यांना, सगळ्यांचा घरी आतांच्या आतां जाऊं द्या म्हणावे ! समजलें ना ? नको, नको, मला नको ! अहो हपिसांत मीं पुष्कल खाल्ले आहेत ! - मंडळी ऐकेचनात ! तीन रुपयांचे पेढे द्यावे लागले मला ! - म्हटलें जाऊं द्या ! मंडळी आपली आहेत ? आणि पुनः असे आनंदाचे प्रसंग वरचेवर थोडेच येत आहेत ? - बरें झालें चला ! इतके दिवस आशेनें रात्रंदिवस वाट पाह्यल्याचें परमेश्वरानें शेवटीं सार्थक केलें ! अहो, पंधराचे वीस व्हायला सहा वर्षे लागली - सहा वर्षे ! नुकतेच आमचे दिवाकरपंत मेले, आणि त्यांची ही जागा मला मिळाली, बरें ! - असो, ईश्वराची कृपा होती म्हणून हे तरी दिवस दिसले ! हो ! करतां काय ? - बरें आपण आतां मुंबईला कधी जाणार ? - रविवारची ना ? मग हरकत नाहीं ! कारण मी परवांच्या दिवशीं श्रीसत्यनारायणाची पूजा करण्याचें योजले आहे ! तेव्हं म्हणतो, प्रसाद घेऊन मुंबईला जा ! - ठीक आहे ! अहो, परमेश्वरांची कृपा असली तर उत्तरोत्तर आपल्याला आणखीही असेच सुखाचे दिवस येतील ! काय ? म्हणतो तें खरें आहे कीं नाहीं ?....

पोरटें मुळावर आलें !

म्हणजे ! म्हणतेस तरी काय ? अग, काल त्याला दारावरुन जातांना मी पाहिला ! अन् तूं म्हणतेस, - चल ! कांही तरी सांगते आहेस झालं ! तसे नाही ग, तूं खोटं सांगतेस असं नाहीं म्हणत मी. पण बाई, असं होईल तरी कसं ? काल संध्याकाळी तो चांगला होता ना ? मग ? - आतां तूंच तर म्हणालीस, की ' रात्री चांगला जेवला, बाहेरुन फिरुन आला, ' अन् मग एकाएकींच हें ! - अरे ! अरे !! शेवटीं अफू खाऊन मेला ना ! - कसं तरणं ताठं पोर ! अन् काय ग त्याला आठवलं हें ! - खरंच का ? कुणाची चोरी केली होती त्यानं ? त्या .... यांची ? काय बाई तरी ! पण मी म्हणतें जीव द्यायचं काय येवढं - आपल्याला धरतील, अन् तुरुंगांत टाकतील म्हणून का? - काय - ही - संगत ! संगत भोंवली बरं त्याला ही ! - सदा मेली ती दारु अन् जुगार ! होतं नव्हतं त्याचं वाटोळं केलं, अन् शेवटीं बिचारा अस्सा जिवानिशीं गेला - अग, परवाच तो मरायचा ! या कोपर्‍यावरचीच आपल्या गोष्ट ! अंधारांत - रस्यांत आपला हा झिंगून पडलेला ! त्या टागेवाल्याची नजर केली, म्हणून बरं ! नाही तर त्याच वेळेला याचं भरायचं ! बिचारी बायको मात्र फुक्कट बुडाली हो ! - सारखी रडते आहे ना ! - रडेल नाहीं तर काय करील ? - कोणाचा आधार का आहे तिला आतां ! सांग ! - बरं, का ग, तिला कांही पोरबाळ ? - कांही नाही ना ? - बरं, कांहीं दिवसबिवस तरी ? - लोटले आहेत ना पांचसहा महिने ? - असो चला ! तेवढाच तिच्या जिवाला आधार ! - हो, तें तर खरंच ग ! आलं पोरटं तें बापाच्याच मुळावर ! ...

झूट आहे सब् !

किती ? - बारा वाजले ! - हेः ! भलताच उशीर झाला आपल्याला ! वाद करायला बसलें, कीं वेळेचं भानच राहत नाहीं बोवा ! - अरे असें काय ! चार कोळसे टाक आणखी बंबांत कीं आतां - हां हां म्हणतां - पाणी तापेल ! उगीच वेळ गेला झालं ! बरं, इतका काथ्याकूट करुन निष्पन्न कांहींच नाहीं ! - ओ हो ! काय ठिणग्या उडाल्या रे या ! ती पहा ! किती उं.... च उडाली आहे ! - पण आ .... लीच शेवटी खालीं ! - लहानपणीं विझली काय, किंवा मोठेपणीं - उंच जाऊन विझली काय, दशा शेवटीं एकच ! - म्हणजे फरक जगली किती हाच काय तो ! एकदां ठिणगी विझली .... लक्षांत आलं का ?.... प्राणी मेला, कीं संपलं सगळं ! - हो हो, सगळं संपलं ! - नाहीं रे बोवा ! कांहीं पुनर्जन्म नाहीं, अन् कांही नाही ! - असतं तसं कांहीं, तर तुझा तो शेक्सपीअर नसता कां आला पुन्हा ? चक्क येऊन सांगितलं असतं कीं, ' हीं नाटकं माझीं आहेत, मीं लिहिलेलीं आहेत ! कांहीं कुणा बेकनचा अन् फिकनचा संबंध नाहीं ! ' कशीं छान सुंदर नाटकें ! आणि तीही कांहीं थोडीथोडकी नाहींत ! ' सोडील होय कोणी ? - पण पत्ताच जिथं नाही त्याचा, तेव्हां तो पुन्हा येतो कशाचा अन् जातो कशाचा ! - हो हो, आहे ना स्वर्गात ! जा, आणा जाऊन मग ! - ठेवला आहे, स्वर्ग अन् नरक ! थोतांडं सगळी ! - अरे कुठला घेऊन बसला आहेस आत्मा ! - काय, आहे तरी काय तो ? - वारा ? का प्रकाश ? - हां, वार्‍यामध्यें किंवा प्रकाशांत मिसळणें, हें जर तुमचें स्वर्गानरकाला जाणं असेल, तर मात्र कबूल ! कारण मग राजश्री मनोविकार कुठले आले आहेत तिथं ! - तें कांही नाहीं ! तुमचा तो आत्मा कीं नाहीं, देहांत आहे तोंवरच त्याची प्रतिष्ठा ! - हो मग ? नाहीं कुठं म्हणतों आहें मी ! देहाचंही तेंच आहे ! दोघं जोंपर्यंत एकत्र तोंपर्यत ती एकमेक जिवंत ! - मेलं कीं दोन्हीही गेली पार ! मागमूस नाही कुठं मग ! - तेंच तर बाबा म्हणतों आहें मी, कीं जेवढे म्हणून प्राणी जन्माला येतात ते सगळे इथून तिथून नवीन ! आणि शेवटही त्यांचा .... ! बरं का ? शेवटही पुन्हा सगळ्यांचा एकच ! - मग पाप करा, नाहींतर पुण्य करा ! - स्वर्ग, नरक आणि तुझा तो पुनर्जन्म, सगळें - सब कांहीं झूट आहे ! ....

कशाला उगीच दुखवा !

अहो कोण विचारतो हेडक्लार्कला ! कसे दिवस काढीत आहोंत हें आमचें आम्हांलाच ठाऊक. म्हणायला हेडक्लार्क ! सत्ता पाहिली तर काडीइतकी देखील - घ्या, पान घ्या - बा ! नानासाहेब ! हें काय बोलणें ! अहो परिचय म्हणजें कांही थोडाथोडका नाहीं ! डलर्ड हायस्कुलांत असतांना रोज मधल्या सुट्टींत - आठवतें का ? - आपण एकत्र बसून चिवडा खाल्लेला आहे ! मोठे गमतींत दिवस गेले नाहीं ? - कोण सुंदरे ? काय आहे ग ? मला खालीं बोलावलें आहे ? आलों म्हणावें अं ! - कांहीं विशेष नाहीं. बसा. जरुरीचें काम आहे ? मग काय बोलणेंच खुंटलें ! भेट का ? सकाळी किंवा रात्री - केव्हांही होईल. - नको ! तें नको आतां सांगायला ! नव्याण्णव हिश्शांनी हपीसांतली जागा ही तुमच्याच मुलाला मिळेल ! कांही काळजी करायला नको, समजलें ना ? - चाललेंच आहे ! यांत कशाचे आले आहेत उपकार ! - मोठा त्रास आहे ! हपीसांत कामाची दगदग, आणि घरीं यावें तर हा त्रास ! कोण पाहिजे ? - हो ! या बसा. मलाच आप्पासाहेब म्हणतात. काय काम आहे आपलें ? - भेटले होते खरेच. काल संध्याकाळींच त्रिंबकराव मला भेटले होते ! आपलें आडनांव काय - पोंकशे नाही का ? अस्सें ! यंदांच एस. एफ. पास झालांत वाटतें ? - टाइपराइटिंगसुद्धां येतें ! मग हो काय ? फारच चागलें ! अर्ज पाठवून दिला आहे ना ? - झालें तर ! अरे ! हें काय वेडयासारखें ! उठा, उठा. रडूं नका ! मिळेल नोकरी, - काय आहे तिच्याच मोठें ! अहो, लागलें नाहीं कोणाच्या ? - सगळ्यांच्या पाठीमागें द्रारिद्य लागलें आहे ! - जा ! मनाला काही वाटूं देऊं नका. तुमच्याकरितां मी लागेल तितकी खटपट करीन बरें - एकदां हो म्हणून सांगितलें ना ? जा आतां - काय पहा ! या पोटानें माणसाला कसें अगदी भंडावून सोडलें आहे - रडायला लावले आहे ! - येवढ्याचकरितां का खाली हाक मारीत होतां मला ? अबब ! किती फोडी रे या ! कटकट कोठली ! हपीसांतल्या जागेकरितां आतांपर्यंत शंभर जणांच्या खेपा झाल्या असतील ! - खरेंच, गोडीला आंबे मोठे छान आहेत नाहीं ? - तें कांहीं नाहीं मोरु, उद्यां तुला साहेबापुढें उभा केलाच पाहिजे. नाहीं तर - हं, अरे खाल्ल्या म्हणून काय झालें ! आणखी दोन फोडी घे - मूर्ख कोठले ! प्रत्यक्ष मुलाला टाकून माझ्या हपीसांतील जागा दुसर्‍याला मी मिळूं देईन कसा ? इतकें कसें यांना - हो, तें तर खरेंच ! आपलें हो - ला हो म्हणावें, सोडून द्यावें ! कशाला उगीच कोणाला दुखवा ! ....

शिवि कोणा देऊं नये !

लेका नीट म्हण ! अशी रडल्यासारखी काय कविता म्हणतोस ? तुझ्या वरच्या मुलानें नाहीं, कशी छान गळ्यावर म्हटली ती ! - चल आटप् , म्हण पुनः नीट गळ्यावर ! म्हण, - ' शिवी को - णादे - ऊन - ये, ' - पाहा ! आहे ? लागला पुनः कुत्र्यासारखा रडायला ! चल इकडे ये, म्हसोबा ! तुला चांगला सडकला पाहिजे ! गुलामा ! चल आटप् ! - अस्सं ! लक्ष द्यायला नको, नुसता रेडयासारखा माजला आहेस ! जा, बाकावर उभा रहा ! उद्यां जर कविता नीट म्हटली नाहींस तर दाखवितों कशी सूर्याची पिल्लें आहेत तीं ! - काय आहे ? काय गडबड आहे ? काय झालें रे ? - तुला शिवि दिली ? कुणी ? - त्या आगाशानें का ? चल उभा रहा रे आगाशा ! गोखले, तुला काय शिवी दिली रे या म्हारड्यानें ? अरे टोण्या ! तूं याला गाढव म्हणालास का ? चल इकडे ये ! - इरसाल ! - चांगला अस्सा हात पुढें केलास तर मरशील का ? अं ! कोंबडीच्या, तूं याला काय म्हणून गाढव म्हणालास रे ? धेडा ! तूं कोण त्याचा बाप, का आजा, का मास्तर ? - चूप रहा, रडूं नको ! गाढवाच्या लेका, पुनः देशील का कधीं कोणाला अशा शिव्या ? डांबीस कुठला ! - शाळेंत येऊन हेंच शिकलां वाटतें ? - शिवी कोणा देऊं नये, ही कविता, काल जी येवढी घसाफोड करुन मी समजावून दिली, ती कशाकरतां रे ? तुम्ही अशा शिव्या द्याव्या म्हणून होय ? - जा ! जागेवर बैस ! गाढवा, पुनः अशा शिव्या तर दे कोणाला, कीं पायांपासून डोक्यापर्यत चांगला फोडून काढतों ! - हं, चल रे भागवत, उभा रहा कविता म्हणायला ! इब्लिस कारटीं ! शिंची गुडघ्यायेवढीं झालीं नाहींत, तों लागली आपलीं मोठ्या माणसासारखीं शिव्या द्यायला !

काय ! पेपर्स चोरीस गेले ?

तर काय हो ! जिवावर केवढी थोरली धोंड आहे माझ्या ! एक नाहीं दोन नाहीं, आठ तुकडयांचे दणदणीत पेपर्स ! शिवाय प्रत्येक तुकडींत चाळीस पंचेचाळीस काटी ! रोज एक गठ्ठा म्हटला, तरी दिवस पाहिजेत आठ ! अन् राहिलेत सारे चार ! - तितकेहि नाहींत ? अरे म्हणजे म्हणतां आहां काय तुम्ही ! बेडबडि तर नाहीं लागलें ! - एकवीस तारीख आज ? - छेः ! भलतेंच कांहीं तरी ! आणा पाहूं ती डायरी इकडे ! - उगीच आपलें कांहीं तरी .... अरे भाई, खरेंच कीं, हें तर वीस तारखेचें पान ! धडधडीत मीं लिहिलें आहे - हो, हो, अगदी शंकाच नको ! बापरे ! आज एकवीस तारीख, आणि उद्याला तर हें खलास व्हायला हवें ! राम राम ! प्राण खातील माझा आतां ! काय, करुं तरी काय आतां ! - हो, रात्रीचे आतां आठ वाजलेले, अन् सकाळींच उद्यां आठाला सगळे हजर करायचे ! तेव्हां काय जीव देऊं इथं ? - बरं, आता रातोरात बसून तपाशीन म्हटलें तर पोरटयांनी थोडं का हो लिहिलं आहे ! - आग लागो त्या पेपरांना ! नाहींसे कुठें होतील तर देव पावेल ! हो, आतां मी तरी .... अरे कोण तिकडे, काय बडबडतां आहां रे ? गोंगाट कसला येवढा ? - काय .... काय .... म्हणतोस विष्ण्या ? अरे ! काय सांगतो आहेस तरी काय ! पेपर्स चोरीस गेले ? चल ! कांही तरी बरळतो आहेस झालें ! गाढवा ! पेपर्स का कधीं चोरीस गेले आहेत ? - थांब, मीच उठून .... माय गॉड ! खरेंच कीं ! पार सगळेच्या सगळे गठ्ठे .... वा, वा ! फारच छान झालं ! पेपर्स चोरीस गेले ! बस, बस ! केवढा आनंद .... काय आनंद झाल आहे म्हणून सांगूं ! जा जा, पळ लवकर ! आधीं चहा ठेवायला सांग ! - आणि हें बघ विण्या ! साखर थोडी जादा ढकलायला सांग ! बस ! आज मैं तो बादशहा हूं ! - अरे ! काय, मांडलें आहेत काय तुम्ही ! इतक्या लवकर चहा आणलास ? - आधींच ठेवला होता होय ? शाबास ! हुशार आहांत रे सगळे तुम्ही ! पण काय रे ! हें सगळें स्वप्न तर नाहीं ना ? नाहीं तर .... हो बाकी लागतो आहे खराच .... हाताला चांगलाच पेला कढत लागतो आहे ! आणि वास काय झकास सुटला आहे ! रंगसुद्धां खुलून आला आहे कीं ! - थांब, बेटा विष्णु ! मला एकदां चांगला मनापासून .... अस्सा अगदीं हातपाय ताणून आ .... आळस - अरे ! का .... काय रे हें ! अरे काय माझ्या टाळक्यांत पडलें हें ! - हर हर ! हे तर पेपर्स ! आणि मघांशी चोरीस गेले ते ? - स्वप्नांतच का ? ....

नासलेलें संत्रें

ठरलेलेंच ! आम्ही असेंच हाल हाल होऊन - तडफडून मरायचे ! - छान झालें ! असेंच पाहिजे ! काय जोरानें त्यानें मला भिरकावून दिलें पण ! रागानें लाल झाला होता ! - अहो बरोबरच आहे ! नासलेलीं संत्रीं ! चांगल्या संत्र्यांमध्यें पाहिजे आहेत कशाला ? त्यांना असेंच झुगारुन दिलें पाहिजे ! चांगली तुडवून - डोक्यांत व अंगांत खिळे ठोकून - जाळून पोळून मारलीं पाहिजेत ! नाही तर ? अहो ही जिवंत विचारांनीं सडून - भणाणून गेलेलीं संत्री ! - जुलमी जगाला गोड मानून त्यांत आंबून - कुजून मेलेल्या संत्र्यांना आपल्यासारखींच स्वतंत्र व ईश्वरी विचारांनीं जिवंत करुन - त्यांना नाचायला लावतील ! आणि मग ? जिकडे तिकडे प्रलय होईल ! जिवंत हदयांना पिळून काढून त्यावर मस्त होऊन बसलेलें हें जुलमी जग पार उलथून पडेल ! आणि सर्वत्र ईश्वरी साम्राज्य सुरु होईल ! - पाहिलेंत ? तीं मार्केटांत डौलानें बसलेली संत्रीं माझ्याकडे पाहून कशी हंसत आहेत ! - हंसा ! खुशाल हंसा ! - मी दुर्दैवी ? तें काय म्हणून ? आणी तुम्ही काय असे मोठे सुदैवी लागून गेलां आहांत ?अरे ! जगांत येऊन फार झालें तर सात नाहीं तर आठ जिवांना तुम्ही पोसाल ! पण मी येथें एकटा हजारों जिवांना पोशीत आहें ! तुम्ही जगाचे गुलाम ! तुमच्यासारखीं लक्षावधि संत्रीं जग तेव्हांच गट्ट करुन टाकील ! - छाती नाहीं ! माझ्याकडे आ वासण्याची जगाची छाती नाहीं ! माझा प्रत्येक दाणा ईश्वरी तेजानें वळवळणारा आहे ! तुमचे सगळे दाणे - सर्व विचार - एकसारखे येथून तेथून पार मेलेले ! - ' नासलेली संत्नीं ! ' थांबा ! आम्ही नासलेलीं संत्रींच जुलमी जगाच्या पोटांत शिरुन सर्व जग लवकरच पेटवून देऊं ! - चढवा ! प्रेमानें नासलेल्या भगवान् खाइस्टला एक - नाही पन्नास वेळां क्रूसावर चढवा ! तुमचीं बिंगें बाहेर फोडणार्‍या महाकवि डँटीला खुशाल हद्दपार करा ! वाटेल तसा सैतानी धिंगाणा घाला ! पण ध्यानांत ठेवा ! लवकरच सर्व जगाला स्वातंत्र्याची - प्रेमाची - आग ! आग लागेल !! ....

स्वर्गांतील आत्मे !

कंटाळा आला बोवा आपल्याला इथचा ! - हो तर काय ? रोज तेंच, तेंच ! अग, काडीइतकासुद्धां फरक नसावा ? - उठल्या - बसल्या तें अमृत ढोसावें, आणि खुशाल टोळासारखें आपलें भटकावें ! कांहीं उद्योग दुसरा ? - छे छे छे !! ओकारी आली बोवा आपल्याला येथची ! असार ! असार आहे हा स्वर्ग निव्वळ ! - तेंच कीं ! सदा म्हणे आपला आनंद ! एक वृत्ति ! केव्हां संपते आहे कुणास ठाऊक ! - आतां थोडी कां वर्षे झाली असतील इथें येऊन ? - पण कांहीं आहे का फरक ? हें आपलें नंदनवन, होतें तस्सें आहे ! - नादीं लागलों ! आणि फुकट इथें तडफडायला आलों ! - चोर कुठले ! म्हणे ' स्वर्गात जा म्हणजे शांति मिळेल ! ' - वा ! काय छान शांति मिळते आहे इथें ! एकाला म्हणून करमत असेल तर शपथ ! नकोसें झालें आहे अगदीं ! - हें ग काय ? तूं तर रडायलाच लागलीस ! उगी ! - जाऊं ! लवकरच आपण मृत्युलोकांत जाऊं बरें ! तिथें मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील ! आणि मग काय महाराज ! - हंसली रे हंसली ! - अग तें कांहीं पुसूं नकोस ! देहलोकची मजा कांहीं और आहे ! घटकेंत आनंद आहे, तर घटकेंत दुःख आहे ! चाललें आहे ! शेंकडों वृत्तींत जिवाला बागडायला सांपडतें ! आणि हें कशामुळें ? - तर हें सगळें देहामुळें बरें का ! - आणि हो ! सगळेंच तिथें अस्थिर ! त्यामुळें अश्शी माणसाची परीक्षा होते कीं, ज्याचें नांव तें ! चांगला तावून सुलाखूनच निघतो ! उगीच नाहीं मृत्युलोक ! - बरें का ? - म्हटलें खरी मुक्ति तिथें आहे माझे बाई ! - नाहीं तर इथें ! पडा सदा आनंदांत कुजत ! - मृत्युलोकाशिवाय नाहींच तें ! सुख खरें तिथें ! अग आपलेंच काय, कंटाळा आला कीं देवसुद्धां जातो तिथें ! उगीच नाहीं अवतार घेत ! ....

कारण चरित्र लिहायचें आहे !

चरित्र काय पुढच्या अंकांत देणार आहांत का ? - छान बाळाभाऊ म्हणजे नामांकितच लेखक ! अहो वा ! त्याचा माझा स्नेह लहानपणापासूनचा ! - लंगोटीमित्रच आम्ही ! त्यामुळें हवी तितकी माहिती मला देतां येईल ! - हां, तेवढें मात्र विचारुं नका ! लेखनांत काय त्यानें तेज दाखविलें असेल तेंच ! बाकी मनुष्य आपला - तुमच्या आमच्यांतल्या गोष्टी या - मनुष्य आपला असा तसाच ! - अहो स्वभाव काय, अन् वर्तन काय ! गोंधळ ! काय सांगायचें तुम्हांला ? सरळपणा म्हणून यत्किंचित् नाहीं ! कधीं कोणाचे पैसे घेतले, आणि ते बोवा परत केले आहेत, नांव नाहीं ! याचे घे, त्याचें घे असें करुन सातआठ हजारांला तरी त्यानें बुडविलें असेल ! शिवाय लोकांची पुस्तकें दाबली ती वेगळीच ! हा जिथें साधा व्यवहार, तिथें काय बोलायचें आणखी ! हीच तर्‍हा व्यसनाची ! अहो, परवां मरायच्या आधीं महिना दोन महिन्यांतली गोष्ट ! दिवसाढवळ्या, अगदी भर चौकांत एक टांगेवाल्याशीं मारामारी केली ! बोला आतां ! - अहो, कसचें कारण अन् काय ! यथास्थित झोकली होती झालें ! - नीट नोकरी नाहीं, धंदा नाहीं, सदा चहा आणि विडया ! रोज उठून घरांत भांडणें ! - कां नाही व्हायची ! वेळ नाहीं, अवेळ नाहीं, येईल त्याच्या नरड्यांत चहा ओतायचा ! कांही त्याला सुमार ? - आपलें बोलायचें किंवा लिहायचें नाही इतकेंच ! बाकी अशा एक एक गोष्टी आहेत कीं, - चांगलें बाबांचें लग्न करुन दिलें, पण घटकाभर पटेल तर शपथ ! कारण बाहेर यांचा रोमान्स बोकाळलेला ! शेवटीं एक दिवस नवराबायकोची अशी जुंपली कीं काहीं पुसूं नका ! - झालें ! पुढें काय ? ती उठून बापाच्या घरी चालती झाली, आणि हें काय ? - यांची उप्पर मिशी ! कारण, गेली, तर गेली ! नाकावर टिच्चून दुसरें लग्न करीन मी ! - आणि ठणठणीत केलें लग्न ! तेव्हां अशा या भानगडी, पण लिहून थोडेंच चालतें आहे ? तिथें म्हणजे, ' यांना दोन बायका होत्या ही गोष्ट खरी. पण पहिलीला मूल होईना, तेव्हां ती सारखी झुरणीस लागली ! इतकी कीं, शेवटीं तिनें अंथरुण यांनीं दुसरें लग्न करावें ! शेवटीं अगदीं निरुपायानें - कारण लग्न केलें ! ' - म्हणजे अशा तर्‍हेनें सगळें फिरवून - कारण चरित्र लिहायचें आहे, तेव्हां तें -

फाटलेला पतंग

छे ! आतां कोठून मी धड व्हायला ! अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक ! - अहो ! नका ! त्या आकाशाकडे पाहूं नका ! हरहर ! हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्‍याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें ! अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ? ' - पण अरेरे ! तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली ! खालीं खेंचा ! नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ! ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ! मग काय ? खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्‍या जिवाची - हाय ! - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला ! - नको ! त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको ! अहो ! एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें ! अहाहा ! किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ! ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ! जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय ? जग कोठें मला विसरलें होतें ? माझी किंमत किती ? पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं ! शेवटीं ! जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो ! स्वर्ग जातो ! ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो ! आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो ! - नाहीं ! - नाहीं ! - नाही !! - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार ! - अहो ! माझ्या स्थितीबद्दल रडूं नका ! आधी ऐका ! एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च ! - काय सांगतें तें ऐका ! गर्वानें भरार्‍या मारुं नकोस ! भरार्‍या मारुं नकोस ! नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील !...

हें काय उगीचच ?

पन्नास - नाहीं शंभर वर्षाचें असतों म्हणून काय झालें असतें ? आहे काय त्यांत ? आणायचा अवकाश, तेव्हांच नीट करुन दिलें असतें ! - एकदा नीट पहाल तर खरें ! ऐसें झकास तुमचें घड्याळ झालें आहे, कीं नांव नको आतां पुनः बिघडण्याचे ! - अलवत् ! आमचें इस्पितळच असें आहे ! आला रोगी कीं बरा झालाच पाहिजे ! - ती पाहा ! ती बाजाची पेटी दुरुस्त करायला आणली, तेव्हां एक सूर धड असेल तर शपथ ! हाडेंन हाडें खिळखिळींत झाली होतीं ! पण तीच आतां ? अशी गोड गाते आहे कीं, ज्याचें नांव तें ! - सांगतो ना ! एकदां जिथल्या तिथं ठाकठीक होऊन जेव्हां तिचे सूर निघायला लागले, तेव्हां किती मनस्वी आनंद झाला म्हणून सांगूं तुम्हांला ! - मालक तर उड्या मारायला लागला ! - बरोबरच आहे ! करावयाचें कांहीं, तर असेंच केलें पाहिजे ! नाहीं तर सांगा, जन्माला घातलें कशाला ? - असें हें सगळें मोडलेलें चालू करावयाचें, याचकरितां कीं नाहीं ? अन् खरी मौज यांतच ! नाहीं का ? - तेव्हां एकंदर क्रमच असा आहे कीं, बिघडलेले म्हणून कांहीं राह्यचेंच नाहीं - हो मग ! शंका आहे काय ? - तें जें प्रेत चाललें आहे, तें सुद्धां पुन्हा धड व्हायलाच ! - मला सांगा, आपण केलेलें कांहीं नादुरुस्त झालें, तर काय हव्वें तें करुन, नीट करतोंच कीं नाहीं आपण ? - झालें तर ! हें जसें माणसाचें, तेंच आपल्या निर्माणकर्त्याचें ! तेव्हां इथं आपल्या हदयाचे ठोके बंद पडले, तर काय बिघडलें त्यांत ? पुनः कुठें तरी चालू होतातच ते ! - आणि असें आहे, म्हणूनच आपण सगळें हें - हव्या तशा हाल अपेष्टा सोसतों, जिवाची माणसें जातात - तेंही सोसतों, अन् सगळें हें नेटानें करीत राहातों ! - हें काय उगीचच ?...

तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !

हो, बरोबर, दोनदां आपल्याकडे येऊन गेलों मी. - नाहीं, काल नाहीं, संध्याकाळीं आलों होतों तें परवा. आणि सकाळचे जें म्हणतां, ती कालची गोष्ट. असो, गांठ पडली चला. - हो, तेंच विचारणार होतों, कीं शेजारी एवढी गडबड कसली ? सारख्या मोटारी अन् गाडया येताहेत ! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे ! - केव्हं ? आतां मघाशीं सहाच्या सुमारास ? - नाहीं बोवा, तुम्ही सांगेपर्यत वार्तासुद्धां नव्हती याची मला ! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जाता - येत नाहींत, येवढें ठाऊक होतें ! पण इतक्यांतच असें कांहीं होईलसें - बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा ! - साठ कां हो ! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या ! - असो. चला ! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली ! पेशवाईनंतर महाराष्ट्रांत इतक्या योग्यतेची मला नाहीं वाटत दुसरी कोणी असेलशी ! - खरें आहे. अगदी खरें आहे ! मनुष्य आपल्यामध्यें असतें, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते ! - स्वभावानें ना ? वा ! फारच छान ! अतिशय मनमिळाऊ आणि शांत ! कटकट म्हणून नाहीं ! - हळूहळू, थोडंथोडं, पण खरोखरच मोठं कार्य केलं ! अन् फारसा गाजावाजा न करतां ! - आधींच थोरामोठ्यांतली ती ! आणि रावसाहेबांचें वळण ! मग काय विचारतां ! - बोलणें काय, चालणें काय आणि - हो ! लिहिणेंसुद्धां - तेंच म्हणतों मी - कीं, ' आठवणी ' कशा नमुनेदार लिहिल्या आहेत ! मराठींत असें पुस्तक नाहीं आहे ! - तें काय विचारायला नको ! आज गर्दी म्हणजे - सगळा गांव लोटायचा आतां ! - मोटारी अन् गाडयांचा चालला आहे धडाका ! - काय ! खूपच लोटली आहे हो ! दर्शनाकरतां दिवाणखान्यांतच ठेवलेलें दिसतें आहे त्यांना ? - चला, येत असलांत तर .... जाऊं म्हणतों ! इतकीं माणसें जात आहेत तेव्हां - हो गर्दी तर आहेच ! - राह्यलं, तब्येत बरोबर नसली तर नाहीं गेले ! मला तरी कुठें येवढें जावेंसे वाटतें म्हणा ! कारण आतां गेले काय, अन् न गेलें काय सारखेंच ! पण बोवा ' अमूक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला ' ! तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !....

पण बॅट् नाहीं !

चक्क खोटा डिसिजन् ! कॅच असेल कोठून ? बॅटला बॉलच जर मुळीं लागला नाहीं तर - दुसरें काय ! वुइकिटकीपरनें विचारलें, अंपायरनें ' हो ' म्हटले. मामा लेकाचा ! - किती बेचाळीसच ना ? - उं: ! कांहीं फार झाल्या नाहींत ! - अरे चांगला सेट् झालों होतों, सहज सेंचरी निघाली असती ! - हुश्श ! बॉय ! सोडा लाव ! छे बोवा ! आज फारच थकलों ! छान म्हणजे ? राव बिजली आहे बिजली ! गन् अँड् मूरचा आटोग्राफ आहे ! बॅट् हलकीसलकी नाहीं ! पैसेच तसे मोजले आहेत ! - अरे तिचें आधीं केनच किती कॉस्टली आहे ! अन् खेळायला काय ! अगदीं फुलासारखी ! इतकें त्या - तो इकडचा बोलर नाहीं ? - इतकें त्याचें बोलिंग मारलें ना ! पण हाताला हूं की चूं नाहीं ! - कटिंगला तर बोलायलाच नको ! नुसती टाकायचा अवकाश, कीं ऐसा बॉल जातो आहे ! नुसते पहात रहावें ! बॅट म्हणजे दिलजान् आहे ! हजार पांचशेंतून निवडून काढली आहे ! उगीच नाहीं ! - पहा ! आहे ? अगदीं त्रिफळा उडाला ! लाख वेळां सांगितलें कीं, बॅकवर्ड खेळूं नको म्हणून ! आले आतां हाका मारीत ! नेक्सट कोण भिडे जातो आहे ना ? - जपूज खेळ रे बोवा - लेगब्रेक आहे ! जरा संभाळून ! नाहीं तर होशील बबड्याजीराव ? - काय ? बॅट् ? माझी बॅट् देऊं तुला ? हात जोडतों ! भाई माफ कर ! तेवढें नाहीं व्हायचें । दुसरें काय हव्वें तें - अगदी माझ्या जिवाचें माणूस - स्वतःचा जीव मागितलास तरी देईन ! पण बॅट् नाहीं हो !....

हें काय सांगायला हवें !

हां, आतां बरोबर ! घरचेच तुमच्या बातमीदार ! तेव्हां इतक्यांत तुम्हांला कळलें हें ठीकच ! - छे ! मला अजून वार्तासुद्धां नाहीं ! आपली कुणकुण लागली आहे इतकेंच ! - बाकि आहे काय त्यांत म्हणा ! कळेल, आज नाहीं उद्या ! - कां .... हीं खटपट नाहीं अन् कांही नाहीं ! पत्रंही कोणाला घातलीं नाहींत, किंवा कोणाकडे जोडेही फाडले नाहींत ! - अन् अर्ज तरी काय, खरडायचा म्हणून खरडला इतकेंच ! वांकडयांत असा शिरलोंच नाहीं ! म्हटलें काय होईल तें आपलें सरळ ! - नेहमीचेंच माझें आहे हें ! काम मनापासून करायचें, अन् चोखपणानें वागायचें ! हव्यात कशाला इतर खटपटी आणि लटपटी ! - आतां तुम्ही म्हणाल कीं, हें जमलें कसें ? अहो ! तेंच तर मोठें आश्चर्य आहे ! अर्ज जेव्हां म्हणतात माझा दृष्टीस पडला, तेव्हां .... आपले लोक बाजूलाच राहिले, पण एका युरोपियननें म्हणे हट्टच धरला कीं, ' अमुक एक गृहस्थ माझ्या जोडीला परीक्षक असतील, तरच मीही परीक्षक होईन ! नाहींतर साफ जरुर नाहीं मला युनव्हर्सिटीची ! ' - तेव्हां बोला आतां ! फादर लगबगमननेंच असें म्हटल्यावर ... अन् तें म्हणजे बडं प्रस्थ ! .... कोण पुढें काय बोलणार ! मुकाटयानें सगळे कबूल ! - छेः ! ओळख ना देख ! काळा कां गोरा त्यानें अजून पाहिलंसुद्धां नाहीं मला ! कुठं कांहीं लिहितों सवरतों, तें त्यानें मला वाटतें वाचलेलें ! तेवढयावरुन हें सगळें, बाकी खटपटीचें म्हणून नाव नाहीं ! - हॉ ! हॉ कसें बोललांत ! सरळ आपलें काम करीत असावें, पारख करणारा, आज ना उद्या, भेटतो कोणी तरी जगांत ! - ब .... रें ! कांही नवल विशेष ? - कुशाभाऊ जोशी; कोण बुवा हा ? - ओ ! आय् सी ! आपल्या तो .... नागुअण्णाच्या .... बयडीचा कुशा ? तो का बसणार आहे आमच्या परीक्षेला ? - काय ! इतका मोठा झाला आहे ! अहो परवां ना त्याला पाहिला आपण? धड नाकसुद्धां पुसतां येत नव्हतें ! आणि तो आतां कॉलेजांत का आला आहे ! - काय ! दिवस कसे हां हां म्हणतां जातात पहा ! - हो, तेंही खरेंच आहे ! प्रकृतीमुळें जे नागुअण्णा कोल्हापूरला गेले, ते तेही तिकडेच, आणि कुशाही तिकडेच ! तेव्हां काय मध्यंतरी दिसायचें कारण ? बरें कामाशिवाय आम्ही थोडेच कुठेंख हालतों आहों ! आपलं पुणें, नाहीं तर मुंबई ! बाकी म्हणून .... बरें आहे येऊं आतां ? - वा, वा ! भलतेंच ! त्याची नको काळजी ! कसें झालें तरी आपल्या बयडीचा कुशा ! तेव्हां हें काय सांगायला हवें ? हळूच केव्हांतरी बरं का ? - हळूच केव्हां तरी नंबर वगैरे ....