📒 *शरीरात रक्ताचे काम काय असते ?* 📒
*************************************
शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते. रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था.
रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते.
सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते.
मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही.
जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते.
रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.
रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा