लोकांची मनोवृत्ती

(लोकांच्या मनोवृत्तीचे तो तरुण पुत्र वर्णन करतो.)

“न केवळाहि भावना न केवळाहि वल्गना
विचार भावना कृती तरीच होइ उन्नती।।

उदार भावना नसे विचार ना मनी वसे
कृती म्हणाल शून्य ती कशी घडेल उन्नती।।

मनास टोचणी नसे मती सखोल ती नसे
खुशालचेंडु बैसती कशी घडेल उन्नती।।

जिवंत भाव ना तिळ तुटे न चित्त तिळतिळ
न मान-कीर्ती-चाड ती कशी घडेल उन्नती।।

पशूसमान जीवन पशूंतही किती गुण
न सत्यवस्तुची रती कशी घडेल उन्नती।।

स्वदेश न स्वधर्म न स्वकर्म न स्वशर्म न
उगीच व्यर्थ जल्पती कशी घडेल उन्नती।।

स्ववस्त्र न स्ववस्तु न स्वशस्त्र व स्वशास्त्र न
उगीच नंदि डोलती कशी घडेल उन्नती।।

मत स्व न मति स्व न कुठेच काहि राम न
अजागळापरी गती कशी घडेल उन्नती।।

समस्त हे परभृत खरा न एक पंडित
करील आत्म-आरती कशी घडेल उन्नती।।

मदांध ग्रस्त मत्सरे प्रमत्त देत उत्तरे
घमेंड की अम्हा मती कशी घडेल उन्नती।।

सदैव वृत्ति उर्मट सदैव एक तर्कट
करी टवाळि दुर्मति कशी घडेल उन्नती।।

गंभीरता विशुद्धता न ठाउकीच उद्धटा
सदैव छद्म दाविती कशी घडेल उन्नती।।

स्ववर्तनात वक्रता स्वभाषणात आढ्यता
जगास तुच्छ लेखिती कशी घडेल उन्नती।।

जगात आम्हि शाहणे नसे जणू अणू उणे
पदोपदी परि च्युति कशी घडेल उन्नती।।

हुशार राजकारण अम्हिच जाणतो खुण
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती।।

अम्हीच डाव जाणतो अम्हास कोण सांगतो
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती।।

सदुक्ति ती पटेच ना सुबुद्धि ती असेच ना
वदे तशी नसे कृती कशी घडेल उन्नती।।

समीप बुद्धि ती नसे दिली तरी न घेतसे
मनी सदा अहंकृती कशी घडेल उन्नती।।

दिवाळखोर हा असे हसे जगात होतसे
मनी परी न लाज ती कशी घडेल उन्नती।।

स्वतास मार्ग ना दिसे परास नित्य जो हसे
न यत्न ना पुढे गती कशी घडेल उन्नती।।

टपे सदे बकापरी स्वरुप साजिरे वरी
मध्येच चोच मारिती कशी घडेल उन्नती।।

महान खरे जगदगुरु सदैव यत्पदा धरु
करी न त्या नमस्कृती कशी घडेल उन्नती।।

जगात काय चालले स्वभूत केय चालले
न हे कुणीही पाहती कशी घडेल उन्नती।।

पलंगपंडिता-करी घडेल केवि चाकरी
न जोवरी खरे व्रती कशी घडेल उन्नती।।

असावि एकतानता असावि भाव-तीव्रता
तरीच होतसे कृती कृतीविणे न उन्नती।।

परंतु काय ही दशा बघुन दु:ख मानसा
न देशभक्ति ती दिसे खुशाल खातपीतसे।।

बघून देशदुर्गती खुशाल खेळ खेळती
क्षुधार्त बंधु पाहुन सुचे तयांस भोजन।।

खुशाल नाच चालती अनंत द्रव्य ओतिती
विचार येइ ना मनी दरिद्रता किती जनी।।

सहानुभूति-बिंदु न सुखी समस्त निंदुन
न चिंधि एक देतिल परस्व मात्र घेतिल।।

न सत्य ते मुळी उरे कसा समाज हा तरे
असत्यदेव पूजिती असत्य नित्य वागती।।

न बंधुभाव अल्पही दया क्षमा न नावही
न ऐक्य ते कुठे दिसे सदैव भांडखोरसे।।

घरात रोज भामडती पथात नित्य भांडती
मनी सदैव भांडती जनी समस्त भांडती।।

मजेत खेळ मांडिती तिथेही भांडु लागती
गंभीर प्रश्न काढिती तिथेही भांडती किती।।

करंट लोक हे असे कशास भाग्य येतसे
विदीर्ण होइ मन्मन बघून आपुले जन।।

यदा सुबुद्धि येइल तदाच कार्य होइल
विचार भावना मनी कृती घडेल हातुनी।।

म्हणून म्हणतो बाबा विचारा पेटवू जरी
पेटवू जनचित्ताते कृति होईल ती खरी।।

तुरुंगी असताना मी होउनी भावनिर्भर
लिहिले गीत मी एक म्हणु का गोड सुंदर।।”

मातेचे निवेदन

(एकदम प्रेमाने आई बोलू लागते)

“बाळ माझा कवी झाला केव्हापासून रे गड्या
लबाडा गीत तू केले सुराने म्हण रे खड्या।।

आवाज तव आकर्षी आधीच हृदया मम
त्यात स्वकृत गीतास वदता अमृतासम।।

केव्हापासून झालास कवि पंडित शहाणा
गाई ते गीत तू बाळा आनंदे भरि मन्मना।।

पहा हा थांबला वारा त्वदगीत परिसावया
सखया ते तुझे गाणे लाग रे लाग गावया।।”

पुत्राचे गीत

(मुलगा गाणे म्हणतो)

दीनशरण्या शुभलावण्या धन्या तू माउली
होतिस तप्त जगा साउली।।

तुझ्या विचारे येते माझे गहिवरुन गे मन
येतो कंठ किती दाटुन
इतिहास तुझा क्षणैक बसता येतो नयनांपुढे
शोके पिळवटते आतडे
हृदय गजबजे दृष्टी भरते पडति अश्रुचे सडे
वाटे सकळ चराचर रडे
अनंत देखावे भरभर गे चलच्चित्रपटसम
दिसती हृदय निर्मिती तम
उदात्त वाङमय कुठे, कुठे त्या कला कुठे ज्ञान ते
वैभव माते! आहे कुठे?
किती तपस्या त्याग किती तव वैराग्य तुझे किती
सत्त्वा नव्हति तुझ्या गे मिति
झाला अंतर्बाह्य भिकारी पुत्र तुझा आज गे
गुलाम केवळ म्हणुनी जगे
अनुकरण करी दुस-यांमागुन मंद जातसे सदा
पूजी भक्तीने परपदा
कला असो सादित्य असो वा असो राजकारण
जाई जगताच्या मागुन
स्वयंस्फूर्तिचा झरा आटला स्वतंत्र मति ती नूरे
प्रतिभा दिव्य सर्व ती मरे
जुनी संस्कृती जिवंत नाही उरले केवळ मढे
तरि किती कवटाळिति बापुडे
नव संस्कृति ती कळली नाही विचार कुणी ना करी
दारे लावुन बसती घरी
नवीन-गंभीर-विचार-गगना उड्डाणा मारुनी
तारक येइ न कुणी घेउनी
जसा मारुती गगनि उडाला जन्मताच निर्भय
दिसता रक्तभास्करोदय
मृत्युसमीपहि नचिकेता तो ज्ञानास्तव जातसे
आजी त्वत्सुत कोठे तसे
विद्या नाही, सदगुण नाही, बसलो कर जोडुन
जाई भाग्य अम्हा सोडुन
दया नसे सद्धर्म नसे तो नुरला एकहि गुण
जाई भाग्य म्हणुन सोडुन
गुणांजवळ नांदते अखंडित लक्ष्मी चंचल नसे
चंचल जनमत माते! असे
अम्ही भांडलो म्हणुनि कष्टलो, कष्टतसो रडतसो
कृतकर्मफळे भोगीतसे
सदगुण येतिल तेव्हा होइल भाग्योदय आमुचा
तोवरि पाश राहि शत्रुचा
माते! अमुच्या दुष्कृत्यांनी रडत अहा असशिल
कसचे पुत्र मनी म्हणशिल
एक सिंह तो बरा नको हे पस्तिस कोटी किडे
जाती चिरडुन ते बापुडे
एक चंद्र तो बरा कशाला अनंत त्या तारका


ज्या ना अंधकारहारिका
विशालशाखा पसरुन उभा एक पुरे वटतरु
नलगे क्षुद्रवनस्पतिभरु
येत असे असतील तुझ्या का विचार मनि अंबिके!
विमले स्नेहाळे सात्त्विके
अम्ही करंटे दुर्गुणखाणी सुत न तुझे शोभत
बसलो श्वानासम भुंकत
परिस्थिती न आकळ कळेना सांगितले ना वळे
पडलो तरिहि गर्व ना गळे
सरपटणारे सरडे सकळहि गुरुत्मान् कुणी नसे
जो तो बिळात घुसुनी बसे
चिखलामध्ये खडे फेकितो तिथेच घेतो उड्या
घेई न कोणी सागरी बुड्या
कूपमंडुकापरि अद्यापी उगाळितो गे जुने
एकच वाजवितो तुणतुणे
जगी नगारे प्रचंड भेरी वाजत माते! किती
सुस्त त्वत्सुत परि बैसती
ध्येयवाद तो नुरला, परि जरी दिसला, करिती टर
झाले पशूच उदरंभर
हसू की रडू उदास होते निराश होते मन
येइ प्रकाश का कोठुन
चैतन्याची कळा आमिच्या अंतरंगि संचरो
दिव्य स्फूर्तीने मन भरो
उत्कटता उज्वलता येवो भव्य नव्य आवडो
ध्येयी विशाल दृष्टी जडो
अनंत तेजे ज्वलन्निव असे धगधगीत लोळसे
पेटुन करु रुढी-कोळसे
किती विषारी किती भिकारी रान गवत माजले
सगळे पाहिजेत जाळले
नव प्रकाशा पहावयाला होवो सुरु धडपड
करु दे जीवात्मा तडफड
बंदिवास हो सरो, विचारा विश्व असो मोकळे
पंखा फडफडवू दे बळे
सकळ बंधने जीवात्म्याची बुद्धीची स्फूर्तिची
तुटुनी जाउ देत आजची
विशाल सुंदर नवीन गंभिर प्रश्न किती जीवनी
जाऊ भेटाया त्या झणी
होवो विक्रम मृतवत् अस्मत् स्थिति आता पालटो
त्वन्मुखशशि नवतेजे नटो
जाउ दे जाउ दे देवा! अस्तास सर्व दुर्भाग्य
येउ दे येउ दे देवा! ते मंगल शुभ सौभाग्य
होउ दे होउ दे बंधू! त्वत्कार्य कराया योग्य
शोभो पुनरपि भारतमाता जशि पूर्वी शोभली
सत्या शिवा सुंदरा भली। दीनशरण्या....।।

मातेचे उत्तर

(मुलाचे गाणे संपताच माता गहिवरून म्हणते)

“बाळा अतीव मधुरा कविता तुझा रे
कोणी तुला शिकविले मति ही भरे रे
गाणी परी कवण ऐकवि बाळ आता
जाशील सोडुन मला करुनी अनाथा।।

बाळा तुझी हृदयहारि रसाळ गाणी
साधी किती सरळ सुंदर रम्य वाणी
तू आणिशी अमुचिया नयनांत पाणी
जाशील रे करुनिया मज दीनवाणी।।

त्वत्काव्यगंध मुळि ना कळला जगाला
आला कसा तुजवरी घनघोर घाला
बाळा कळीसमच जीवन जो तुझे रे
येते तुला मरण, निघृण काळ तो रे।।”

आईची समजूत

(मुलगा आईची समजूत करावयासाठी बोलतो)

“स्वातंत्र्यसंगीत तो दिव्य भगवंत निर्मीतसे मायभूमीवर
ही जीवने आमुची त्यात होतील तानापरी आइ गे सुंदर
मज्जीवनाची तिथे गुंफिली जात सत्तान झालो अमर्त्यापरी
आई नसे स्वार्थ, या भारताची प्रभा फाकु दे रम्य विश्वांतरी।।

जरि ना लिहिले काव्य काव्याचा विषय स्वता
आइ मी जाहलो आज तू मान मनि धन्यता
स्वातंत्र्य-सत्कथा निर्मू तदर्थ मम जीवन
आइ ना दु:ख ते वाटो तू शांत करि गे मन।।

मोक्षाची पावन गंगा निर्माया भारतांतरी
मज्जीवन सदबिंदु मिळाला शोक न करी।।

बाबा तेथे तुरुंगात विचार मनि खेळत
पेटवावे जागवावे हे समग्रहि भारत।।

जेधवा तीव्र वृत्तीचे उत्कट-स्वांत ते नर
उठतील हजारांनी आपल्या भारतावर।।

तेधवा तेज ये ईल देव ना सुखलोलुपा
देव येईल मागूनी मरा आधी तुम्ही खपा।।


जेव्हा राष्ट्रामधि निपजति उन्नत ध्येयवादी
त्यागी तेजोमय तरुण ते सुव्रती सत्यवादी
खेडोपाडी करितिल जरी ते विचारप्रसार
देशोद्वारा मग तुम्हि वदा काय लागे उशीर।।

खेडोपाडी झणि उडवुनी कल्पनांचे फवारे
स्वातंत्र्याचे प्रबळ भरुनी भारती दिव्य वारे
‘कैसे तुम्ही मनुज असुनी राहता रे गुलाम
याच्यापेक्षा मरण बरवे या म्हणू सर्व राम।।

मेलेले ना पडुनि असणे मर्दसे हो उठावे
स्वीय स्थानाप्रति पुनरपि पौरुषे शीघ्र घ्यावे’
ऐसे लोकांप्रति कथुनिया पेटवू अंतरंग
पाशा तोडू करु उठुनिया शृंखलांचा विभंग।।

कोणी नाही धरणिवरि या आपणावीण दीन
तेजे तुर्क स्थिर मिरवतो तो उभा चंड चीन
पोलादाचे परि चिमुकला धन्य पोलंड देश
अफगाणाते नमुन असतो आंग्लभूचा नरेश।।

झाले जागे खडबडुन ते आज इजिप्त सुप्त
दावी तेज:प्रसर प्रगटी स्वीय सामर्थ्य गुप्त
ईशान्येला डुलत असतो वैभवाने जपान
छोटी मोठी कृति परि, तया अग्रराष्ट्रांत मान।।

आयर्लंड प्रथित भुवनी मेळवी स्वीय मोक्ष
भव्य क्रांती करित रशिया विस्मये पाहि विश्व
देशोदेशी सकळ जनता पेटलेली पहा ती
हिंदुस्थानी परि न उठती सर्व झोपाच घेती।।

स्वातंत्र्याने हसति खुलती राष्ट्रके सानसान
हिंदुस्थानाहुन शतपटीने जरी ती लहान
उत्कर्षाला करुन करिती चित्कलावाग्विलास
विश्वा देती, जरि लघु तरी, संस्कृतीचा प्रकाश।।

दु:खी पंगू पतित दुबळे राहिलो हो भिकारी
आता पृथ्वी दिपवु उठुनी तेज दावून भारी
शक्ती आहे जगति अतुला एक ती निश्चयाची
लक्ष्मी, ज्याला अविचल असे नित्य निर्धार, त्याची।।”

बाप

(बाप म्हणतो, “आपणात भांडणे किती धर्मही बुडत चालला. महारांना म्हणतात शिवा. आचार उरला नाही तर कसे होणार?”)

काय सांगाल लोकांस लोकांमध्ये नसे बळ
ऐक्य नाही धर्म नाही कोठे दाबाल रे कळ।।

स्पृश्यास्पृश्य तसे अन्य वाद माजून राहिले
भ्रष्टता माजली सारी हलकल्लोळ माजले।।

ब्राह्मणब्राह्मन्यांची खडाजंगी असे सदा
जागा न उरली कोठे बाळा टाकावया पदा।।

हिंदू आणि मुसलमान पाण्यात बघती जसे
विश्वास लव ना उरला बाळ होईल रे कसे।।

धर्मास लागतो डाग धर्म श्रेष्ठ सनातन
आचारा बुडवितात माझे हे करपे मन।।

धर्म हा प्राण जीवाचा धर्मार्थ सर्व पाहिजे
त्याच धर्मास टाकोनी बाळा चित्तांत लाजिजे।।”

मुलगा बोलतो

“बाबा होत किती मदीय हृदयी कालवाकालव
अस्पृश्यापरि मानुतो तरि कसे ते आपुले बांधव
श्रेष्ठाश्रेष्ठ समस्त ढोंग, न असे अस्पृश्य हा मानव
नाही थोर विचार तात दिसतो लोकांतरंगी लव।।

देवाचे घरि पाप घोर करितो अस्पृश्य या लेखुनी
आले नाही जगात खास समजा अस्पृश्य ते होउनी
आम्ही मानव हीन दीन तरितो त्या धर्म हो मानितो
ऐसा धर्म जळो मनुष्यहृदये जो भाजण्या सांगतो।।

कुत्री पोपट डास ढेकुण तशा मुंग्या तशी मांजरे
यांनी ती न विटाळती अपुलि हो स्वप्नांमध्येही घरे
येती पक्षिपशू खुशाल बसती देवालयी निर्भर
जाता ये परि मानवास न तिथे धिक् धिक् असा हा नय।।

कोल्ही ओरडती, स्मशान-वसती, तेथे तया राखुनी
धंदे सर्व गलिच्छ जे सकळ ते प्रेमे तया देवुनी
‘तुम्ही स्वच्छ बना, सुसंस्कृत बना, मालिन्य दूरी करा’
ऐसे हे वदणे गमे खुपसणे घोरव्रणी तो सुरा।।

बाबा एकही त्याजला न दिधला ज्ञानप्रकाशांशु तो
बाबा क्रूरपणा असीम बघुनी मज्जीव हा कापतो
वर्षे कैक हजार मानव परी केले तयांना पशू
नाही दाखविले कधीहि चुकुनी ते प्रेम वा ते असू।।

बाबा घोर कलंक हा अपुलिया ह्या थोर धर्मावरी
डागा मानितसो सुभूषण सदा हा! हा! कसे अंतरी
मानव्या अवमानितो मनुज तो धिक्कारितो प्रौढिने
पाषाणासम जाहलो जरि कशी ही आपुली हो मने।।

देवा मानितसा करी झणि उठा अस्पृश्यता ना उरो
त्यांचे क्लेश विपन्नता विकलता दुर्भाग्य सारे सरो
सारे बंधु बनू खरे निज मने प्रेमे अता रंगवू
मातेला कलहादिकी मुळि अता ना तात हो खंगवू।।”