पुत्राचे गीत

(मुलगा गाणे म्हणतो)

दीनशरण्या शुभलावण्या धन्या तू माउली
होतिस तप्त जगा साउली।।

तुझ्या विचारे येते माझे गहिवरुन गे मन
येतो कंठ किती दाटुन
इतिहास तुझा क्षणैक बसता येतो नयनांपुढे
शोके पिळवटते आतडे
हृदय गजबजे दृष्टी भरते पडति अश्रुचे सडे
वाटे सकळ चराचर रडे
अनंत देखावे भरभर गे चलच्चित्रपटसम
दिसती हृदय निर्मिती तम
उदात्त वाङमय कुठे, कुठे त्या कला कुठे ज्ञान ते
वैभव माते! आहे कुठे?
किती तपस्या त्याग किती तव वैराग्य तुझे किती
सत्त्वा नव्हति तुझ्या गे मिति
झाला अंतर्बाह्य भिकारी पुत्र तुझा आज गे
गुलाम केवळ म्हणुनी जगे
अनुकरण करी दुस-यांमागुन मंद जातसे सदा
पूजी भक्तीने परपदा
कला असो सादित्य असो वा असो राजकारण
जाई जगताच्या मागुन
स्वयंस्फूर्तिचा झरा आटला स्वतंत्र मति ती नूरे
प्रतिभा दिव्य सर्व ती मरे
जुनी संस्कृती जिवंत नाही उरले केवळ मढे
तरि किती कवटाळिति बापुडे
नव संस्कृति ती कळली नाही विचार कुणी ना करी
दारे लावुन बसती घरी
नवीन-गंभीर-विचार-गगना उड्डाणा मारुनी
तारक येइ न कुणी घेउनी
जसा मारुती गगनि उडाला जन्मताच निर्भय
दिसता रक्तभास्करोदय
मृत्युसमीपहि नचिकेता तो ज्ञानास्तव जातसे
आजी त्वत्सुत कोठे तसे
विद्या नाही, सदगुण नाही, बसलो कर जोडुन
जाई भाग्य अम्हा सोडुन
दया नसे सद्धर्म नसे तो नुरला एकहि गुण
जाई भाग्य म्हणुन सोडुन
गुणांजवळ नांदते अखंडित लक्ष्मी चंचल नसे
चंचल जनमत माते! असे
अम्ही भांडलो म्हणुनि कष्टलो, कष्टतसो रडतसो
कृतकर्मफळे भोगीतसे
सदगुण येतिल तेव्हा होइल भाग्योदय आमुचा
तोवरि पाश राहि शत्रुचा
माते! अमुच्या दुष्कृत्यांनी रडत अहा असशिल
कसचे पुत्र मनी म्हणशिल
एक सिंह तो बरा नको हे पस्तिस कोटी किडे
जाती चिरडुन ते बापुडे
एक चंद्र तो बरा कशाला अनंत त्या तारका


ज्या ना अंधकारहारिका
विशालशाखा पसरुन उभा एक पुरे वटतरु
नलगे क्षुद्रवनस्पतिभरु
येत असे असतील तुझ्या का विचार मनि अंबिके!
विमले स्नेहाळे सात्त्विके
अम्ही करंटे दुर्गुणखाणी सुत न तुझे शोभत
बसलो श्वानासम भुंकत
परिस्थिती न आकळ कळेना सांगितले ना वळे
पडलो तरिहि गर्व ना गळे
सरपटणारे सरडे सकळहि गुरुत्मान् कुणी नसे
जो तो बिळात घुसुनी बसे
चिखलामध्ये खडे फेकितो तिथेच घेतो उड्या
घेई न कोणी सागरी बुड्या
कूपमंडुकापरि अद्यापी उगाळितो गे जुने
एकच वाजवितो तुणतुणे
जगी नगारे प्रचंड भेरी वाजत माते! किती
सुस्त त्वत्सुत परि बैसती
ध्येयवाद तो नुरला, परि जरी दिसला, करिती टर
झाले पशूच उदरंभर
हसू की रडू उदास होते निराश होते मन
येइ प्रकाश का कोठुन
चैतन्याची कळा आमिच्या अंतरंगि संचरो
दिव्य स्फूर्तीने मन भरो
उत्कटता उज्वलता येवो भव्य नव्य आवडो
ध्येयी विशाल दृष्टी जडो
अनंत तेजे ज्वलन्निव असे धगधगीत लोळसे
पेटुन करु रुढी-कोळसे
किती विषारी किती भिकारी रान गवत माजले
सगळे पाहिजेत जाळले
नव प्रकाशा पहावयाला होवो सुरु धडपड
करु दे जीवात्मा तडफड
बंदिवास हो सरो, विचारा विश्व असो मोकळे
पंखा फडफडवू दे बळे
सकळ बंधने जीवात्म्याची बुद्धीची स्फूर्तिची
तुटुनी जाउ देत आजची
विशाल सुंदर नवीन गंभिर प्रश्न किती जीवनी
जाऊ भेटाया त्या झणी
होवो विक्रम मृतवत् अस्मत् स्थिति आता पालटो
त्वन्मुखशशि नवतेजे नटो
जाउ दे जाउ दे देवा! अस्तास सर्व दुर्भाग्य
येउ दे येउ दे देवा! ते मंगल शुभ सौभाग्य
होउ दे होउ दे बंधू! त्वत्कार्य कराया योग्य
शोभो पुनरपि भारतमाता जशि पूर्वी शोभली
सत्या शिवा सुंदरा भली। दीनशरण्या....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा