भूषण जगताला!

भूषण जगताला होइल, भूषण जगताला
भारत मिळवुन श्रेष्ठ पदाला।। भूषण....।।

विद्या येतिल कलाहि येतिल
भारत जरि हा स्वतंत्र झाला।। भूषण....।।

शिकविल समता, स्नेह, सुजनता
देइल जगता शांतिसुखाला।। भूषण....।।

प्रेमाच्या स्वर्गास विनिर्मिल
पूजिल मग शुभ प्रभुपद-कमला।। भूषण....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

भारतजननी सुखखनि साजो

भारतजननी सुखखनि साजो
तद्विभवाने स्वर्गहि लाजो।। भारत....।।

स्वातंत्र्याची अमृतधारा
प्राशुन निशिदिन रुचिर विराजो।। भारत....।।

विद्यावैभववाङमयशास्त्रे
कलादिकांचा डंका वाजो।। भारत....।।

पावन मोहन सुंदर शोभून
नाम तिचे शुभ भुवनी गाजो।। भारत....।।

दिव्य शांतिची अमृत-सु-धारा
संतप्त जगा सतत पाजो।। भारत....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२९

हृदय जणु तुम्हां ते नसे!

हृदय जणु तुम्हां ते नसे।।
बंधु उपाशी लाखो तरिहि
सुचित विलास कसे।। हृदय....।।

परदेशी किति वस्तू घेता
बंधुस घास नसे।। हृदय....।।

बाबू गेनू जरि ते मरती
तरिही सुस्त कसे।। हृदय....।।

खादी साधी तीहि न घेता
असुन सुशिक्षितसे।। हृदय....।।

माणुसकी कशि तीळ ना उरली
बसता स्वस्थ कसे।। हृदय....।।

जगतामध्ये निज आईचे
हरहर होइ हसे।। हृदय....।।

कोट्यावधी तुम्हि पुत्र असोनी
माता रडत बसे।। हृदय....।।

देशभक्त ते हाका मारिति
त्यांचे बसत घसे।। हृदय....।।

स्वदेशिचे ते साधे अजुनी
तत्त्व न चित्ति ठसे।। हृदय....।।

बंधू खरा जो बंधुसाठी
प्राणहि फेकितसे।। हृदय....।।

पुत्र खरा जो मातेसाठी
सर्वहि होमितसे।। हृदय....।।

बंधू रडता आई मरता
कुणि का स्वस्थ बसे।। हृदय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, सप्टेंबर १९३१

माझा महाराष्ट्र भाग्ये सजो

माझ्या महाराष्ट्रभूमीत मोठे
प्रतापी पुन्हा वीर निर्मी विभो
शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, वागीश, शिल्पी,
कलाविद् खरे थोर निर्मी प्रभो
श्री, नीति, संपत्ति, सदबुद्धि, सहकार्य
आरोग्य, ऐक्यादि येथे रुजो
धावो यशोगंध देवा! दिगंतात
माझा महाराष्ट्र भाग्ये सजो।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२९

भारतमाता माझी लावण्याची खाण!

(नाचून म्हणावयाचे गाणे)

भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
करिन तिचे ध्यान, मी करिन तिचे ध्यान
भारतमाता माझी लावण्याची खाण
प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण
भारतमाता माझी लावण्याची खाण।।

मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, मी देइन माझे प्राण
हातात घेतले आहे सतिचे मी वाण।। गाइन...।।

जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रुढिरान, मी छाटिन रुढिरान
हसवीन आइचे जे मुख झाले म्लान।। गाइन...।।

उडविन दाणादाण, मी उडविन दाणादाण
करिन धूळधाण, मी करिन धूळधाण
स्वातंत्र्य-विरोधकां देतो मी आव्हान।। गाइन...।।

विसरेन देहभान, मी विसरेन देहभान
कापुन देइन मान, मी कापुन देइन मान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान।। गाइन...।।

नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, मी काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान।। गाइन...।।

सर्वस्वाचे दान, करिन सर्वस्वाचे दान
घेतो आज आण, मी घेतो आज आण
मातेला घडविन माझ्या मोक्षामृतपान।। गाइन...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मरणही ये तरी वरिन मोदे

मरणही ये तरी वरिन मोदे
जननिचे परि जगी यश भरु दे।। मरणही....।।

वीट वन्हित पडे
दृढ तरी ती घडे
तेज कष्टे चढे
हे कळू दे।। मरणही....।।

हाल होवोत ते
चित्त ना मुळि भिते
दास्य जे जाळते
नष्ट करु दे।। मरणही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

दिव्य मी स्वर्ग निर्मीन

ध्येय देईन
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
सचिंत सगळे दिसती लोक
जिकडे तिकडे भरला शोक
करुन तयांवर अमृतसेक
तया उठवीन।। दिव्य....।।

मेल्यापरि हे दिसती बंधू
उरला न दिसे जीवनबिंदु
निर्मुन मी संजीवनसिंधु
तया जिववीन।। दिव्य....।।

गुलामवृत्ती जिकडे तिकडे
दुबळी वृत्ती जिकडे तिकडे
चैतन्याचे भरभरुन घडे
तया पाजीन।। दिव्य....।।

स्वातंत्र्याची लाविन ज्योत
स्फूर्तीचा मी निर्मिन स्त्रोत
तेजाचा मी सोडिन झोत
दैन्य दवडीन।। दिव्य....।।

भेदभाव मी जाळिन सारे
ऐक्याचे मी सोडिन वारे
दिव्यबळाच्या जयजयकारे
राष्ट्र उठवीन।। दिव्य....।।

करिन त्यागा ते उद्युक्त
निर्भयतेचे शिकविन मंत्र
नि:शस्त्राचे देइन शस्त्र
पंथ दावीन।। दिव्य....।।

आळस दवडून सेवा देइन
विलास दवडून विकास देइन
खेदा दवडून बोध देइन
भाग्य देईन।। दिव्य....।।

कळकळ शिकविन तळमळ शिकविन
सदगुण संघटना मी वितरिन
सत्याचा सत्त्वाचा शोभन
ध्वज उभवीन।। दिव्य....।।

रुढी जाळुन विचार देइन
हृदयमतीला निर्मळ करिन
श्रद्धा सद्धर्माला देइन
मोक्ष देईन।। दिव्य....।।

मंगल उज्वल ते देइन
पावन निर्मळ ते देइन
सुंदर सत्य शिवा देइन
देव देईन।। दिव्य....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२