स्वातंत्र्य

प्राण अर्पावे। स्वातंत्र्यसौख्य मिळवावे।।

केवळ बडबड ना कामाची
गरज असे निशिदिन कष्टांची
कष्टत जावे।। स्वातंत्र्य....।।

विलास-सुखभोगांना सोडा
मोह सकळ ते मारक तोडा
स्वार्थांकुर चित्तातील मोडा
निर्मळ व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

देशभक्तिचा मनात काम
भारतभूचे वदनी नाम
दृष्टि दिसावी तेजोधाम
निर्भय व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

द्वेष कलह ते विसरुन जावे
बंधुबंधुचेपरि सजावे
हाती हात प्रेमे घ्यावे
पुढे दौडावे ।। स्वातंत्र्य....।।

उचंबळोनी वृत्ती जावी
उचंबळोनी हृदये जावी
वेडावुन जणु मति ती जावी
तन्मय व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

गुलामगिरिवर हाणा घाव
दास्या देशी नुरोच ठाव
प्रयत्नावरी ठेवुन भाव
सदा झुंजावे ।। स्वातंत्र्य....।।

स्वातंत्र्याची जया तहान
धावून जाऊ घेऊ ठाण
गाठू ध्येया देऊ प्राण
व्रत हे घ्यावे ।। स्वातंत्र्य....।।

परवशतेचे तोडा पाश
तोडा तोडा हरपो त्रास
चीड न येते काय तुम्हांस
चला चमकावे ।। स्वातंत्र्य....।।

परदास्याच्या पंकी कीट
असणे याचा येवो वीट
होउन सावध नीट सुधीट
निजपद घ्यावे ।। स्वातंत्र्य....।।

स्वातंत्र्याचा ईश्वरदत्त
हक्क करोनी घेऊ प्राप्त
करु यत्नाची अपूर्व शर्थ
मरुनी जावे ।। स्वातंत्र्य....।।

निज मरणाने मंगल येइल
निज मरणाने वैभव येइल
निज मरणाने मोक्ष मिळेल
मरण वरावे ।। स्वातंत्र्य....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, जानेवारी १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा