आणि भारत सज्ज झाला.....

१४ महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन ,
आपल्या ५ वर्षांच्या मुलीला हाताने ओढत,
७ वर्षाच्या मुलीच्या कडेवर बसलेल्या
३ वर्षाच्या मुलीला बिस्किटाचा घास भरवत,
ती ६ महिन्यांची पोटुशी माऊली,
अनवाणी पायाने, 'यावेळी मुलगाच होऊ दे!',असा नवस बोलण्यासाठी मंदिरात आली..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

गळ्यात ताईत आणि मनगटाला गंडा बांधला,
नाकात दोन दोन थेंब टाकून, परातीतल्या पाण्यात हात बुडवून, कावीळ उतरवली,
आणि सापाचे विष उतरवण्यासाठी मांत्रिक गाठला!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

मुलीच्या लग्नात १० तोळे सोने आणि लाख भर हुंडा शेत विकून दिला, शिवाय तिचं बाळंतपण सुद्धा केलं!
बाळाच्या जावळाला बोकड कापून जेवणावळी घातल्या!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

बाई कमावते, नवरा दारूत उडवतो, रात्री पायाखाली तुडवतो.
तरीही वंशाचा दिवा हवा म्हणून सासू रुसून बसली!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नापिकीला कंटाळून बाप हवालदिल झालाय! तंगड्या वर करून बसलेल्या मुलाच्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय! हळदीला डीजे नाही आणला तर लग्न नाही करणार म्हणते धाकटी मुलगी!
नांदवायचं नाही म्हणताहेत सासरचे, म्हणून घरी आली मोठी मुलगी..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नव्या गाडीच्या नंबर प्लेटला  लिंबू मिरची बांधली,
राहत्या घरातले स्वयंपाकघर पूर्वेचं पाडून पश्चिमेला बांधलं,
नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्सट्रा लेटरही जोडून घेतलं
आता कुठे पोरगा बिनपगारी मास्तर म्हणून नॉन ग्रांट च्या शाळेत लागला

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा