मजुरावर उपासमारीची पाळी

धारेवरी जाउनि देव पोंचला.
हा रंगही मावतेस साजला,
सर्वत्र ही मौज पहा ! दिसे; परी
माझ्याच कां दुःख भरे बरें उरीं ?

सार्‍या दिनीं आजचिया नसे मुळीं
हातास माझ्या कवडीहि लाभली;
पोटा, करोनी मजुरीस मी भरीं;
कोणीं दिलें आज न काम हो परी !

हीं मन्दिरें हो खुलतात चांगलीं;
माझ्या वडिलींच न काय बांधिलीं ?
मी मात्र हो आज मरें भुकेमुळें ;
श्रीमंत हे नाचति मन्दिरीं भले !

हेवा तयांचा मजला मुळीं नसे,
जाडी मला भाकर ती पुरे असे;
कष्टांत देवा ! मरण्यास तत्पर,
कां मारिसी हाय ! भुकेमुळें तर ?

( सर्वांस देवा ! बघतोसि सारखा,
होतोस कां रे गरिबांस पारखा ? )
कांहींस सुग्रास सदन्न तूं दिलें,
साधी अम्हां भाकरही न कां मिळे ?

घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रती
जाती अहा ! पक्षि सुखी घरीं किती;
बाळांस हें दावुनि कारभारिण
कैसें तयां देत असेल सांगुत ?---

पक्षी जसे हे घरटयास चालती
घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रति,
घेवोनि अन्ना, तुमचा तसा पिता
येईल तो लौकरि हो, रडूं नका !”

हे लाडके ! आणिक लाडक्यांनो !
दावूं तुम्हां तोंड कसें फिरोन ?
जन्मास मी काय म्हणोनि आलों ?
येतांच वा कां न मरोनि गेलों ?


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- इंद्रवंशा
-जानेवारी १८८९

रूढि-सृष्टि-कलि

( रूढि राज्य करीत आहे, तिच्या जुलमी अंमलाखालीं लोक नाडले जात आहेत, तरी ते सृष्टीच्या नियमांस अनुसरण्यास नाखूष असून ‘ शास्त्राद्रूढिर्बलीयसी ’ असलीं वेडगळ मतें अलंघनीय मानीत आहेत. लोक, ज्याला कलि म्हणून भितात, तो त्यांच्या बर्‍याकरितां रूढीचा पाडाव करण्यासाठीं झपाटयानें ग्रंथप्रसार करीत आहे. तेव्हां लौकरच रूढिअक्का राम म्हणतील; आणि सृष्टीला लोक भजूं लागतील, असा रंग दिसत आहे. )

अज्ञानें फुगली, कुरूप अगदीं झाली, दुरी चालली
सृष्टीपासुनि रूढि; ती मग असत्सिंहासनीं बैसली.
सारे लोक पहा ! परंतु तिचिया पायीं कसे लागती,
ही कन्या दितिची असूनि इजला देवीच कीं मानिती !

देते शाप जनांप घोर, जुलमी ही दुष्ट राणी जरी,
तीं आशीर्वचनें शुभेंच गमती या मूर्ख लोकां तरी !
सृष्टीचे अमृतध्वनि दुरुनि जे कानांवरी त्यांचिया,
येती, ते परिसूनि मूर्ख सगळे घेतात चित्तीं भया !

सृष्टीनें निज भृत्य एक बलवान‍ रूढीवरी प्रेषिला,
त्याला लौकिक मूर्ख हा ‘ कलि ’ अशा नांवें म्हणूं लागला !
त्यानें कागद घेउनी सहज जे रूढीकडे फेंकिले,
त्यांहीं आसन तें तिचें डळमळूं आहे पहा लागलें !

येवी तूर्ण कले ! तुझ्या विजय तो अस्त्रांस त्या कागदी,
गाडूं ही मग रूढि विस्मृतिचिया त्या खोल खाडयामधीं !
साधो ! नांव तुझें खचीत बदलूं, बोलूं न तूतें ’ कली ’
जैजैकारुनि सृष्टिला, घ्वनि तिचा तो एक मानूं बली


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- दादर, ९ मार्च १८९१

‘ पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास

यूरोपीय कथा-पुराण-कविता-प्रन्थांतुनी चांगले,
ते आहेत कितीक धोर उमदे राऊत वाखाणिले;
ज्यांचें ब्रीद-पवित्र राहुनी, जगीं दुष्टांस दण्डूनियां
कीजें सन्तत मुक्त दुर्बल जना, मांगल्या वाढावया !

या त्यांच्या बिरुदामुळेंच बहुधा, सन्मान ते जाहले---
देते या महिलाजनांस पहिला, स्त्रीवर्गकार्यीं भले---
ते भावें रतलें, क्षणक्षण मुखें स्त्रीनाम उच्चारुनी,
भूपुष्ठस्थित आद्य दैवत जणूं त्यां वाटली भामिनी !

‘ आहे रे पण कल्पनारचित हें सारेंचि वाग्डम्बर ’
हे कोणी व्यवहारमात्रचतुर प्राणी वदे सत्वर !
‘ नाहीं ! ---वाचुनि हें पहा ! ’ म्हणुनि मी तूझी कथा दावितों,
गेले राउत ते न सर्व अजुनी !-- हा गर्व मी वाहतों !

धीरा ! उन्नतिचे पथांत उमदा राऊत तूं चालसी !
नाहीं काय ? करूनि चीत अगदीं ही रूढिकाराक्षसी,
टांकानें अपुल्या दुराग्रह जुना मर्मीं तसा विंधुनी,
स्त्रीजातीस असाच काढ वरती !-- घे कीर्ति संयादुनी १


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १९ ऑक्टोबर १८९२

मूर्तिभंजन

मूर्ति फोडा, धावा !   धावा फोडा मूर्ति,
आंतील सम्पत्ति  फस्त करा !

व्यर्थ पूजाद्रव्यें   त्यांस वाहूनियां,
नाकें घांसूनीयां  काय लभ्य ?

डोंगरींचे आम्ही  द्वाड आडदांड,
आम्हांला ते चाड   संपत्तीची !

कोडें घालूनियां  बसली कैदाशीण,
उकलिल्यावीण  खाईल ती !

तिच्या खळीमध्यें  नाहीं आम्हां जाणें,
म्हणूनि करणें  खटाटोप.

मूर्ति फोडूनीयां  देऊं जोडूनीयां
परी विकूनीयां  टाकूं न त्या !

विकूनि टाकिती  तेचि हरामखोर
तेचि खरे चोर  आम्ही नव्हें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- अभंग
- १८९६

नवा शिपाई

नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेचि पतित लीं ज आंखडिती प्रदेश साकल्याचा !

खादाड असे माझी भूक,
चतकोरानें मला न सूख;
कूपांतिल मी नच मंडूक;

मळयास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !

जिकडे जावें तिकडे माझीं भांवडें आहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;
कोठेंही जा---पायांखालीं तृणावृता भू दिसते;
कोठेंही जा---डोईवरतें दिसतें नीलांबर तें !

सांवलींत गोजिरीं मुलें,
उन्हांत दिसतो गोड फुलें,
बघतां मन हर्षून डुलें;

तीं माझीं, मी त्यांचा,---एकच ओघ अम्हांतुनि वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !

पूजितसें मी कवणाला ?--- तर मी पूजीं अपुल्याला,
आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला;
‘ मी ’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक
आणुनि तो, निजशिरीं ओढिती अनर्थ भलते देख !

लहान---मोठें मज न कळे,
साधु---अधम हें द्वयहि गळे,
दूर---जवळ हा भाव पळे;

सर्वच मोठे---साधु---जवळ, त्या सकलीं मी भरुनी राहें !
कोण मला वठणीला आणूं शकतों तें मी पाहें !

हलवा करितां तिळावर जसे कण चढती पाकाचे,
अहंस्फूर्तिच्या केन्द्राभंवतें वेष्टन तेंवि जडाचें;
आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक,
परि अन्यां बोंचाया घरितो कांटे कीं प्रत्येंक !

अशी स्थिती ही असे जनीं !
कलह कसा जाइल मिटुनी ?
चिंता वागे हीच मनीं.

शान्तीचें साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे,
प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - हरिभगिनी
- ८ मार्च १८९८

निशाणाची प्रशंसा

तुज जरि करितो काठीला लावुनियां पटखंड,
तरि तुजमध्यें वसत असे या सामर्थ्य उदंड !

कोण नेतसे समरास सांग बरें रणधीर,
माराया कीं मरावया कृतनिश्चय ते वीर ?

शूरशिरांवरी धीटपणें युद्धाच्या गर्दींत !
कोण नाचतें फडकत रे स्फुरण त्यांस आणीत ?

तारूं पसरूनि अवजारें भेदित सिंधू जाय,
तच्छिखरीं तत्साहस तूं मूर्त न दिसशीं काय ?

उंच उंच देवायतनें भव्य राजवाडे,
तुंग दुर्गही शिरी तुला धरिताती कोडें ! 

भक्ति जिथें, दिव्यत्व जिर्थे, उत्सव जेथें फार,
तेथें तेथें दिसे तुझा प्रोत्साहक आकार !

वीर्य जिथें ऐश्वर्य जिथें जेथें जयजपकार,
उंचादर तेथें तेथें दिसे तुझा आकार !

म्हणून मानवचित्ताचीं उंचावर जी धाव
तीचें चिन्हच तूं तुजला निशाण सार्थच नांव !

मिळमिळीत ज्याची कविता न असे रंडागीत,
खचित जडेलचि त्या कविची तुझ्यावरी रे प्रीत

संसारा मी समर गणीं; उचलुनि म्हणुनि निशाण,
साद घालितों---” योद्धे हो ! झटुनि भिडुनि द्या प्राण !”




कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

- दोहा 
- १८९९

गोफण केली छान !

स्वह्रदय फाडुनि निज नखरीं
चिवट तयाचे दोर
काढुनि, गोफण वळितों ही
सत्त्वाचा मी चोर !

त्वेषाचा त्या दोराला
घट्ट भरुनियां पीळ,
गांठ मारितों वैराची
जी न पीळ दवडील !

वैर तयांला, बसती जे
स्तिमितचि आलस्यांत
वैर तयांला, पोकळ जे
बडबडती तोर्‍यांत !

वैर तयांला, वैरी जे
त्यांच्या पायधुळींत
लोळुनि कृतार्थ होती जे
प्राप्त तूपपोळींत !

वैर तयांला, पूर्वींच्या
आर्त्यांचा बडिवार
गाउनि जे निज षंढत्वा
मात्र दाविती फार !

वैर तयांला, थप्पड बसतां
चोळिति जे गालांस,
शिकवितात बालांस !

गांठ मारुनी वैराची
गोफण केली छान;
कठिण शब्द या धोंडयांनीं
करितों हाणाहाण !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दोहा