गोफण केली छान !

स्वह्रदय फाडुनि निज नखरीं
चिवट तयाचे दोर
काढुनि, गोफण वळितों ही
सत्त्वाचा मी चोर !

त्वेषाचा त्या दोराला
घट्ट भरुनियां पीळ,
गांठ मारितों वैराची
जी न पीळ दवडील !

वैर तयांला, बसती जे
स्तिमितचि आलस्यांत
वैर तयांला, पोकळ जे
बडबडती तोर्‍यांत !

वैर तयांला, वैरी जे
त्यांच्या पायधुळींत
लोळुनि कृतार्थ होती जे
प्राप्त तूपपोळींत !

वैर तयांला, पूर्वींच्या
आर्त्यांचा बडिवार
गाउनि जे निज षंढत्वा
मात्र दाविती फार !

वैर तयांला, थप्पड बसतां
चोळिति जे गालांस,
शिकवितात बालांस !

गांठ मारुनी वैराची
गोफण केली छान;
कठिण शब्द या धोंडयांनीं
करितों हाणाहाण !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दोहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा