निशाणाची प्रशंसा

तुज जरि करितो काठीला लावुनियां पटखंड,
तरि तुजमध्यें वसत असे या सामर्थ्य उदंड !

कोण नेतसे समरास सांग बरें रणधीर,
माराया कीं मरावया कृतनिश्चय ते वीर ?

शूरशिरांवरी धीटपणें युद्धाच्या गर्दींत !
कोण नाचतें फडकत रे स्फुरण त्यांस आणीत ?

तारूं पसरूनि अवजारें भेदित सिंधू जाय,
तच्छिखरीं तत्साहस तूं मूर्त न दिसशीं काय ?

उंच उंच देवायतनें भव्य राजवाडे,
तुंग दुर्गही शिरी तुला धरिताती कोडें ! 

भक्ति जिथें, दिव्यत्व जिर्थे, उत्सव जेथें फार,
तेथें तेथें दिसे तुझा प्रोत्साहक आकार !

वीर्य जिथें ऐश्वर्य जिथें जेथें जयजपकार,
उंचादर तेथें तेथें दिसे तुझा आकार !

म्हणून मानवचित्ताचीं उंचावर जी धाव
तीचें चिन्हच तूं तुजला निशाण सार्थच नांव !

मिळमिळीत ज्याची कविता न असे रंडागीत,
खचित जडेलचि त्या कविची तुझ्यावरी रे प्रीत

संसारा मी समर गणीं; उचलुनि म्हणुनि निशाण,
साद घालितों---” योद्धे हो ! झटुनि भिडुनि द्या प्राण !”




कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

- दोहा 
- १८९९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा