‘ पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास

यूरोपीय कथा-पुराण-कविता-प्रन्थांतुनी चांगले,
ते आहेत कितीक धोर उमदे राऊत वाखाणिले;
ज्यांचें ब्रीद-पवित्र राहुनी, जगीं दुष्टांस दण्डूनियां
कीजें सन्तत मुक्त दुर्बल जना, मांगल्या वाढावया !

या त्यांच्या बिरुदामुळेंच बहुधा, सन्मान ते जाहले---
देते या महिलाजनांस पहिला, स्त्रीवर्गकार्यीं भले---
ते भावें रतलें, क्षणक्षण मुखें स्त्रीनाम उच्चारुनी,
भूपुष्ठस्थित आद्य दैवत जणूं त्यां वाटली भामिनी !

‘ आहे रे पण कल्पनारचित हें सारेंचि वाग्डम्बर ’
हे कोणी व्यवहारमात्रचतुर प्राणी वदे सत्वर !
‘ नाहीं ! ---वाचुनि हें पहा ! ’ म्हणुनि मी तूझी कथा दावितों,
गेले राउत ते न सर्व अजुनी !-- हा गर्व मी वाहतों !

धीरा ! उन्नतिचे पथांत उमदा राऊत तूं चालसी !
नाहीं काय ? करूनि चीत अगदीं ही रूढिकाराक्षसी,
टांकानें अपुल्या दुराग्रह जुना मर्मीं तसा विंधुनी,
स्त्रीजातीस असाच काढ वरती !-- घे कीर्ति संयादुनी १


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १९ ऑक्टोबर १८९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा