समृद्धि आणि प्रीति

एक दुसर्‍यास म्हणतोः---

आहे द्वीप सुरेख एक सखया त्या दक्षिणेच्या दिशे,
लंकेचें अजुनी भलें शकल तें राहूनि तेथें असे;
शोभे तें दिवसां सरित्पतिवरी, तेव्हां गमे इंदिरा
वैकुंठाहुनि पातली अपुलिया ताताचिया ही घरा !

तेथें कांचनमन्दिरें तळपती सम्पत्तिनें कोंदलीं,
उद्यानें जणुं काय नन्दनवनें स्वर्गाहूनी आणिलीं,
सारे भोग सदैव सिद्ध असती संगीतवाद्यादि ते ;
तेथें जाइल आयु साच मजला स्वप्नापरी वाटतें !

येतें का तूझिया मनांत वसुनी भोगां तिथें भोगणें ?
आधीं हें चुकलों परंतु तुजला सांगावया सांगणें ---
कीं येथें न शके कुणी पुरुण तो स्त्री आणण्याला कदा,
सीताशाप असे अलंघ्य असला द्वीपावरी त्या सदा !

दुसरा पहिल्यासः---

सीताशाप जरी मुळीच नसता त्या द्वीपखण्डावरी,
न्यायाला मजला जरी गवसती तेथें सखी अंतुरी,
ये तों मी न तरीहि तेथिल सुखें तीं भोगण्या आयतीं,
जीं प्रीतीस मला गमे ढकलती शाब्दावशेषाप्रति.

सीताशाप परन्तु त्यावरी असे दुर्लघ्य आतां तर;
तेव्हां पौरुषपूर्ण कोण असला राहील तेथें नर ?
आम्हांला रुचती न तीं श्रमफलें कान्ते दिल्यावांचूनी,
तेथें सेविल कोण अश्रमफलें ती एकला राहुनी ?

तूं माझ्याकरितां तरी हुडकुनी तें द्वीप रे काढणें,
जेथें रान भयाण फार असती कांटे कडे वांकणें,
जेथें वन्य पशू सदा डिरकती हिंसा जयांना प्रिया;
तेथें घेउनियां प्रिया मग मला आज्ञा करीं जावया !

कांटे झाडिन मी, पशू वधिन मी, किल्ला तिला बांधिन,
मी तीतें सुख व्हावयास अपुले हे प्राणही टाकीन;
बांधूं आम्हि परस्परांप्रत लताजालीं सुखानें गळीं;
स्वर्गाला निरयामधूनि पहिल्या काढूं अम्ही त्या स्थळीं !


कवी - केशवसुत
- शार्दूलविक्रीडित
- १८८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा