ईश्वराचा ग्रंथ

( शार्दूलविक्रीडित )

हें हो पुस्तक रम्य ज्यास ’ जग ‘ ही संज्ञा अम्हीं दीधली,
आस्थापूर्वक पत्रकें जर अम्हीं त्याचीं भलीं चाळिलीं,
केलें पुस्तक हें जयें, जपुनि जो शुद्धीहि याची करी,
बुद्धि थोर, अपूर्व ही कुशलता वाचूं तयाची तरी.
त्याची शक्ति, अतीव अद्‍भुत अशा शक्तीहि जी दाविले,
त्याची पालक दृष्टि अप्रतिहता सर्वत्र जी पोंचते,
त्याचा न्यान न जो क्षमा करितसे गर्विष्ठ दुष्टां कधीं,---
भाचूं हीं सगळीं अखण्डित अशीं प्रत्येक पत्रामधीं.
हा ! हा ! आम्हिं परन्तु मूर्ख सगळे, त्या अज्ञ बालांपरी
पुठ्‍ठे रंगित, पत्रकें कनकितें. आनन्दतों यांवरी;
गौणाला पुरवूं स्वलक्ष्य, अवघे उत्कृष्ट टाकूनियां;
त्या मोठया कविचा अम्ही न झटतों इष्टार्थ जाणावया.

( अनुष्टुभ )

किंवा, दैववशात्‍ कांहीं पाहिलें पुस्तकांत या
तर तें बहुधा चित्र कडेला पृष्ठकाचिया !


कवी - केशवसुत
- १८८८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा