निद्रामग्न मुलीस !

सुमारे १२-१३ वर्षांच्या एका निजलेल्या मुलीस पाहून सुचलेले विचार

निद्रामग्र मुली! तुझें मुख अहा! हें रम्य आहे किती! –
तें साधेपण, नम्रता, मधुरता, शान्ती, तिथें शोभती !
कौमार्य नवयौवना न अजुनी थारा दिला वाटतें.
स्वर्गातील तरीच मुग्धतरता या त्वन्मुखीं राहतें !              १

कोणी येथ जरी मनुष्य नसतें, किंवा तुझा हा लय
ब्रह्मानंदनिमग्र-यास नसतें नासावयाचें भय,
तुझे कोमल हे कपोल – मधुनी जे भासतें हांसती,
होतों मी तर त्यांस वत्सलपणें चुम्बूनी बाले! कृती.           २

ऐसें मी म्हणतों म्हणूनि ठपका कोणी न ठेवो मला,
कांकी फारच ओढितें तव गडे ! कौमार्य मद्दुष्टिला !
यासाठींच तसें वदूनि चुकलों तूतें स्वसा मानुन,
पापेच्छेस शिवाय चोदक नसे देहीं तुझे यौवन.                 ३

हा जो मी कवितेंत गे द्रवुनियां गेलों तुला पाहतां,
याचें कारण फार भिन्नच असें ते सांगतो मी अतां:-
ताई गे! तव या अनिश्चित जगीं होईल कैशी दशा,
मी शोकाकुल होऊनी गढुनियां गेलों विचारीं अशा.            ४

थोड्याशां दिवसांमधेंच तव हें कौमार्य गे जाइल;
लज्जारोधितलोललोचन असें तारुण्य तें येइल;
त्यांची फुल्ल विलोकुनी विकसनें डोळे दिपूनी तव,
या लोकविषयीं विचार तुजला येतील कैसे नव?-            ५

‘नानाभोगनियुक्त गोड किती हा संसार आहे बरें ?
जन्मापासूनि कां न तो वितसिला आम्हांवरी ईश्वरे ?”
नानाक्लुप्ति अशा कदाचित तुझ्या चित्तांत त्या येतिल;
जातांना परि लौकिकानुभव तो तूं कायसा नेशिल ?         ६

ज्या ह्या आज अजाणतेपण असे गालीं तुझे शोभतें,
ही शोभा अथवा अजाणपण ज्या गालीं भलें दावितें,
त्य गालीं कटु जाणतेपण पुढें ओढील ना नांगर ! –
त्या तासांवर जाणतेपण तसें बैसेल ना भेसूर !              ७

ह्या तुझ्या मुधरे ! मुर्खी मधुरशा, त्या सर्वही भासती   
चेतोवृत्ति समप्रमाण, न दिसे भारी अशी कोणती;
कांहीका दिवशीं तुला जर गडे ! ठेलों पहाया जरा,
सद्ववृत्तींसह  या तुझा फिरुनि मी वाचीन का चेहरा ?          ८

राहो हें सगळें, अशी कुळकथा नाहीं मुळीं संपणें.
तूं माझी भगिनी ! म्हणून तुजला आशी असे अर्पणें :-
हे माझे भगिनी ! दिनानुदिन गे दु:खें अम्हां घेरिती,
त्यांतें हाणुनियां सुखें तुज सदा भेटोत ती राखितीं !        ९


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
डिसेंबर १८८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा