मुलांस झोडपणार्‍या एका पंतोजीस

कोणें मूर्खपणें गुरुपण तुला क्रूरा ! असे रे दिलें !
कां खाटीक न जाहलास? – तुजला तें शोभतें चांगलें !
या बाळांप्रत फार निर्दयपणें कां तूं असा मारिसी ?
केला रे अपराध काय असला यांनी ? – वदें रे मशीं.                १

पाहोनी प्रतिकार-अक्षम अशीं ही बालकें, यांवर
घ्यावें हातसुखा ! – तुझ्या गुरुपणा हा डाग मोठा तर !
हातांला तुझिया जरी खुमखुमी होती, तरी ते मुके
धोंडे आणिक वृक्ष काय नव्हते ? – तांडी तयांला सुखें !           २

यांचें न्यून असेल ( हें मज कळे) कांही स्वपाठान्तरीं,
काढायास परन्तु ते भरुनियां, ही रीति नोहे बरी.
केव्हां धाकहि, पारितोषिक कधीं, गोडीगुलाबी कधीं,
शिक्षा योग्य कधीं करुनि गुरु ते नांवास येती सुधी                 ३

कोंबायास घशांत मूठभर रे बाळांचिया मृत्तिका,
त्यांचा स्वर्ग समग्रही झडपितां चोपून त्यांला फुंका !
-हें केव्हां शिवतें तरी तुमचिया का रुक्ष रे अन्तरीं ?
कांपा ! मुग्ध मुलें समोर बघुनी, जेव्हां छडी घ्या करीं !          ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- एप्रिल १८८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा