जो संसारपथावरी पसरितो मस्तिष्कपुष्पें निजें,
आहे अद्भुत रम्य का अधिक तें त्याहून कांही दुजें ?
चाले तो धरणीवरी, तर पहा ! येथून तो जातसे
धूली लागुनि त्या सुवर्णमयता तेथील कीं येतसे ! १
तो गंभीर वदे रवा, तर मुक्या पृथ्वीस लक्ष श्रुती
होती प्राप्त नव्या, समुत्सुकतया ती ऐकते मागुती ;
दृष्टी तो फिरवी वरी, तर लवे आकाश तें खालती,
तारांचे गण गावयास वरुन स्तोत्रें अहा ! लागती ! २
एकान्तांत निकुंज जो विलसतो त्याचा, तयाच्यावरी
शाखा उत्तम आपुली सुरतरु विस्तारुनी तो धरी;
आश्चर्यें अमितें सलील निघती तेथून लोकाधिकें,
तीं घ्याया अवलोकुनी कळतसे त्रैलौक्यही कौतुकें ! ३
त्या कुंजीं निजवाद्य घेउनि जधीं तद्वादनीं तो गढे
नृत्यालागुनि ऋद्धिसिद्धि करिती सानन्द त्याचेपुढें !
उत्तान ध्वनि जे नितान्त घुमुती जाती तधीं अंबरीं
ते गन्धर्व अगर्व कीं परिसती आकाशयानीं वरी ! ४
कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मे १९१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा