॥ अनुभवाचे बोल ॥

आचार्य अत्रे यांच्या नवयुग या सदरात खुसखुशीत विधाने आढळतात.

◆   सापाला दूध पाजले तरी तो उलटतो. मित्राला चहा पाजला तरी तो उलटतो.

◆   काही जण लेखनावर पैसे मिळवतात; अर्थात वडिलांना पत्र लिहून!

◆   हिशेबात तोंडमिळवणी झाली म्हणजे कॅशिअरला समाधान वाटते. प्रेमाच्या हिशेबातसुद्धा तोंडमिळवणीला महत्त्व आहे.

◆   वैद्याजवळ कधी खोटे बोलू नये. बायकोजवळ कधी खरे बोलू नये.

◆   हसणारा पुरुष व रडणारी स्त्री दोघेही लबाड असतात.

◆   स्त्रिया या घड्याळाप्रमाणे असतात. त्या फार मागे पडतात किंवा फार पुढे जातात. शिवाय घड्याळाप्रमाणे त्यांची कटकट असतेच.

◆   माणूस म्हातारपणी जमिनीकडे वाकून चालतो. जणूकाही आपले हरवलेले तारुण्य तो शोधत असतो.

◆   पुरुषांचे गुन्हे स्त्रिया नेहमीच पोटात घालून घेतात. कित्येक दुर्दैवी कुमारिका आणि विधवा‚ माता होतात याचे कारण हेच.

◆   लाथ मारीन तिथं पाणी काढीन - बायकोच्या डोळ्यातून!

◆   स्त्री आपले वय कमी सांगते. पुरुष आपला पगार जास्त सांगतो.

◆   रस्त्यात एखाद्या स्त्रीचा आपल्याला धक्का बसला आणि ती स्त्री आपलीच बायको निघाली तर केवढा धक्का बसतो.

◆   ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करावी‚ विष्णूने पालनपोषण करावे व शंकराने संहार करावा असे ठरले‚ पण सृष्टीचा छळ कोणी करावा हा प्रश्न उद्भवला आणि मग त्या सर्वांनी मिळून स्त्री निर्माण केली.

॥ मुडद्यांची सोय ॥

पुढील महिन्यापासून (मे ५३) मुंबई शहरात विजेच्या उपकरणापासून प्रेत जाळण्याची सोय होणार आहे. मुंबई कॉर्पोरेशनने पाच लाख रुपये खर्चून ही योजना सुरू केली आहे.

◆    बारा फूट उंचीच्या चितेवर रोज सरासरी तीस प्रेते जाळता येतील. एका प्रेतास बारा ते पंधरा रुपये खर्च येईल.

◆    हल्ली एक प्रेत जाळण्यास लाकूड‚ गोवऱ्या वगैरे पन्नास रुपये खर्च येतो. पण यापुढे केवळ बारा रुपयांत कोणताही मुडदा जाळता येईल.

◆    या सवलतीचा फायदा घेण्यास बरेच लोक पुढे येतील अशी आशा आहे.

◆    प्रेत दहनास बराच खर्च येतो. या काळजीने कित्येक लोक सुखाने प्राण सोडत नसत. काही कंजूष म्हातारे तर मरायलाही तयार नसत.


 इसापनीतीत नसलेल्या गोष्टी

॥ ससा आणि कासव ॥

एक होता ससा अन् एक होते कासव. एकदा काय झालं‚ ससा आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली. ससा अगदी वेगात धावणारा‚ तर कासव म्हणजे अगदी मंदगतीचे प्रतीक. शर्यतीला सुरुवात झाली. ससा आणि कासव दोघेही धावू लागले. सशाला वाटले हे कासव पळून पळून किती वेगात धावणार? म्हणून ससा अगदी रमतगमत निघाला. कासव मात्र आपली शक्ती पणाला लावून सतत धावत राहिले. सशाच्या बेफिकीर वृत्तीमुळे आणि कासवाच्या अथक प्रयत्नांमुळे कासव शर्यत जिंकले.

कासवाची सर्वांनी वाहवा केली. कासव स्तुतीने फुगून गेले. त्याला वाटू लागले आता वेगामध्ये आपणच सर्वश्रेष्ठ. पुढे त्याने एकदा वाऱ्याशी स्पर्धा करण्याचे ठरविले. आता वारा म्हणजे मूर्तिमंत वेगाचे प्रतीक‚ पण कासव म्हणाले लावा त्याच्याशी स्पर्धा. झाले! एक दिवस स्पर्धा सुरू झाली.

कासव पुढे‚ वारा मागे. वारा सतत कासवाला जोरात ढकलू लागला. कासव दमून गेले. विश्रांतीसाठी थांबू म्हणायचे तर वारा ढकलतच राहायचा. कासव थकून थकून मरून गेले.

तात्पर्य - दैवाने मिळालेले यश चिरस्थायी नसते.




॥ गाढव आणि सिंहाचे कातडे ॥

एक होते गाढव. त्याला वाटले आपण व्हावे जंगलाचे राजे. यासाठी काय करावे या विचारात ते फिरत होते. त्याला सुचली एक युक्ती. त्याने मेलेल्या सिंहाचे कातडे मिळवले. ते स्वत:च्या अंगावर लपेटून घेतले. ते जंगलातून फिरू लागले. एक दिवस ते गाढव आनंदाने ओरडू लागले. तेव्हा हा गाढवाचा आवाज ऐकून साऱ्या प्राण्यांना त्याचे खरे स्वरूप लक्षात आले. सारे प्राणी त्याला त्रास देऊ लागले. त्याची फजिती झाली.

एक दिवस एक सर्कसवाला जंगलातून चालला होता. त्याने या सिंहरूपी गाढवाला सर्कसमध्ये नेले. सिंहाचे सारे खेळ प्रेक्षकांना या गाढवाकडून करून दाखविले. कमी खर्चात सिंहाचे खेळ दाखविता येतात म्हणून सर्कस मालकही खूश होता. तेव्हा एका सहकाऱ्याने सांगितले आता गाढव ओरडण्याची शक्यता आहे. गाढवाचा आवाज प्रेक्षकांच्या कानी गेल्यावर फसवणूक झाली म्हणून ते रागावतील तेव्हा सर्कसवाल्याने घोषणा केली -

‘आता हा सिंह गाढवाचा आवाज काढून दाखवेल!’

गाढवाने तेही दाखविले! प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला!

तात्पर्य - लोक सहज फसतात. फसविता आले पाहिजे!



॥ बिरबल काळा का? ॥

 काळा म्हणून सारे दरबारी व बादशहा जोरजोरात हसत होते. बिरबल दरबारात आल्यावर सारे का हसतात हे त्याला उमजेना. त्याने विचारल्यावर बादशहाने सांगितले‚ ‘तुझा रंग काळा म्हणून सारे हसतात.’ तेव्हा बिरबल म्हणाला—

परमेश्वराने सृष्टीची रचना करण्यास सुरुवात केली तेव्हा आरंभी त्याने वृक्ष‚ वनस्पती निर्माण केल्या. तेवढ्याने समाधान न झाल्याने पक्षी व पशू निर्माण केले. काही काळ आनंदात गेल्यावर मग त्याने पशुपक्ष्यांपेक्षा उत्तम प्राणी तयार करायचे ठरविले. मानव तयार केला. मानवजातीला देण्यासाठी त्याने रूप‚ धन‚ बल आणि बुद्धी हे चार गुण निर्माण केले व ते लांब लांब अंतरावरच्या घरात साठवून ठेवले. प्रत्येकाने पाहिजे तेवढे ते गुण घ्यावेत असे प्रकटन केले. पण - घंटा वाजल्यावर थांबायचे. बरेच लोक रूप व धन घेण्यात गुंग राहिले. बिरबल बुद्धी घेत राहिला. घंटा झाली. बाकी सरदार रूपवान व धनवान झाले‚ पण त्यांना बुद्धी नाही मिळाली. बिरबल काळा असला तरी बुद्धिमान आहे. हे ऐकून सारे सरदार खजील झाले




 ॥ वेचलेली माती ॥

वाचकांसाठी वृत्तपत्रात सुविचार द्यायचे असतील तर त्या सदराला शीर्षक काय असू शकेल? ‘वेचलेले मोती’ हे सुयोग्य दिसेल. पण आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’मध्ये विडंबन म्हणून ‘वेचलेली माती’ हे सदर घातले. याचे लेखक म्हणून नाव दिलं - प्रो. कडके म्हणजे प्रा. ना. सी. फडक्यांवरचा राग इथंही काढलाच! त्या सदरातले काही विचार पाहा -

* म्हातारपण हे दैवाधीन आहे‚ पण शिष्या मिळवणं हे आपल्या आधीन आहे.

* बालपणी पाठशाळा‚ तरुणपणी नाटकशाळा आणि म्हातारपणी धर्मशाळा या पुरुषार्थाच्या तीन अवस्था आहेत.

* बालपणी माखनचोर‚ तरुणपणी कोंबडीचोर आणि म्हातारपणी वाङ्मयचोर ही खऱ्या साहित्यिकाची तीन लक्षणे आहेत.

* वर्तमानपत्र एक इसम काढू शकतो‚ पण ते बुडवायला साहाय्यक लागतात.

* बहिरा माणूस नेहमी साशंक असतो कारण लोक आपल्याला शिव्या देतात की स्तुती करतात हे त्याला कळत नाही.

 एका  मुलाने पैशाच्या लोभापायी स्वत:च्या धनाढ्य आई-वडिलांचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. त्याला हे खून काही पचले नाहीत. त्याला न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली.

त्यावर तो न्यायाधीशांना म्हणाला‚ ‘मला क्षमा करा. माझी शिक्षा कमी करा. माझ्यावर दया दाखवा‚ कारण मी पोरका आहे!

 घड्याळ आपल्या संसाराचे छोटे प्रतीक - स्त्री लहान काटा‚ पुरुष मोठा. पुरुष जीवनाचा आटापिटा करून स्त्रीसाठी भ्रमण करतो. - मध्येच ठेच लावून घेतो. स्त्री मोठेपणा मिळवून हरघडी जीवाचे बारा वाजवून आली. घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे जगाला सांगते.

संसार घडीच्या क्षेत्रात केवळ स्त्री-पुरुषांच्या काट्यांनी भागत नाही. त्यांना नियंत्रण घालणारा अपत्याचा तिसरा चिमुकला काटा असावाच लागतो

 बालगंधर्वांना अत्तराचा भारी शौक आहे. ज्या अत्तराला जास्तीत जास्त किंमत पडते ते अत्तर उत्तम असते अशीही बालगंधर्वांची समजूत आहे. तेव्हा - महायुद्धाच्या काळात त्यांनी कोणते अत्तर घ्यावे?

महायुद्धात गॅसोलिनला अतिशय भाव आला आहे. तेव्हा बालगंधर्वांनी उत्तम अत्तर म्हणून गॅसोलिन खरेदी करावे!

 एका खेडेगावात एक शिक्षक होता. कधी डेप्युटी फिरतीवर येई! एके दिवशी मास्तर शाळेतच टेबलावर पाय आडवे करून न्हाव्याकडून हजामत करून घेत होते. दाढीला साबण लावलेला होता. तोच डेप्युटी आले. शिक्षक घाबरले. न्हावी गांगरला. पण डेप्युटी म्हणाले‚ ‘तुझे काम होऊ दे‚ मागून मी करतोच!’

 चर्चिलने अशीच एक गोष्ट सांगितली आहे. एक लहान मुलगा विहिरीत पडून बुडत होता. त्याला एकाने वर काढले. इतक्यात त्याची आई तिथे आली व ‘कुणी काढले याला?’ असे तिने विचारले. बाई आपली प्रशंसा करेल असे काढणाऱ्याला वाटले. तो पुढे आला. ‘मी काढले.’ माणूस म्हणाला. बाईने विचारले‚ ‘पण याची टोपी कुठे आहे?’