इसापनीतीत नसलेल्या गोष्टी
॥ ससा आणि कासव ॥
एक होता ससा अन् एक होते कासव. एकदा काय झालं‚ ससा आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली. ससा अगदी वेगात धावणारा‚ तर कासव म्हणजे अगदी मंदगतीचे प्रतीक. शर्यतीला सुरुवात झाली. ससा आणि कासव दोघेही धावू लागले. सशाला वाटले हे कासव पळून पळून किती वेगात धावणार? म्हणून ससा अगदी रमतगमत निघाला. कासव मात्र आपली शक्ती पणाला लावून सतत धावत राहिले. सशाच्या बेफिकीर वृत्तीमुळे आणि कासवाच्या अथक प्रयत्नांमुळे कासव शर्यत जिंकले.
कासवाची सर्वांनी वाहवा केली. कासव स्तुतीने फुगून गेले. त्याला वाटू लागले आता वेगामध्ये आपणच सर्वश्रेष्ठ. पुढे त्याने एकदा वाऱ्याशी स्पर्धा करण्याचे ठरविले. आता वारा म्हणजे मूर्तिमंत वेगाचे प्रतीक‚ पण कासव म्हणाले लावा त्याच्याशी स्पर्धा. झाले! एक दिवस स्पर्धा सुरू झाली.
कासव पुढे‚ वारा मागे. वारा सतत कासवाला जोरात ढकलू लागला. कासव दमून गेले. विश्रांतीसाठी थांबू म्हणायचे तर वारा ढकलतच राहायचा. कासव थकून थकून मरून गेले.
तात्पर्य - दैवाने मिळालेले यश चिरस्थायी नसते.
॥ गाढव आणि सिंहाचे कातडे ॥
एक होते गाढव. त्याला वाटले आपण व्हावे जंगलाचे राजे. यासाठी काय करावे या विचारात ते फिरत होते. त्याला सुचली एक युक्ती. त्याने मेलेल्या सिंहाचे कातडे मिळवले. ते स्वत:च्या अंगावर लपेटून घेतले. ते जंगलातून फिरू लागले. एक दिवस ते गाढव आनंदाने ओरडू लागले. तेव्हा हा गाढवाचा आवाज ऐकून साऱ्या प्राण्यांना त्याचे खरे स्वरूप लक्षात आले. सारे प्राणी त्याला त्रास देऊ लागले. त्याची फजिती झाली.
एक दिवस एक सर्कसवाला जंगलातून चालला होता. त्याने या सिंहरूपी गाढवाला सर्कसमध्ये नेले. सिंहाचे सारे खेळ प्रेक्षकांना या गाढवाकडून करून दाखविले. कमी खर्चात सिंहाचे खेळ दाखविता येतात म्हणून सर्कस मालकही खूश होता. तेव्हा एका सहकाऱ्याने सांगितले आता गाढव ओरडण्याची शक्यता आहे. गाढवाचा आवाज प्रेक्षकांच्या कानी गेल्यावर फसवणूक झाली म्हणून ते रागावतील तेव्हा सर्कसवाल्याने घोषणा केली -
‘आता हा सिंह गाढवाचा आवाज काढून दाखवेल!’
गाढवाने तेही दाखविले! प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला!
तात्पर्य - लोक सहज फसतात. फसविता आले पाहिजे!
॥ बिरबल काळा का? ॥
काळा म्हणून सारे दरबारी व बादशहा जोरजोरात हसत होते. बिरबल दरबारात आल्यावर सारे का हसतात हे त्याला उमजेना. त्याने विचारल्यावर बादशहाने सांगितले‚ ‘तुझा रंग काळा म्हणून सारे हसतात.’ तेव्हा बिरबल म्हणाला—
परमेश्वराने सृष्टीची रचना करण्यास सुरुवात केली तेव्हा आरंभी त्याने वृक्ष‚ वनस्पती निर्माण केल्या. तेवढ्याने समाधान न झाल्याने पक्षी व पशू निर्माण केले. काही काळ आनंदात गेल्यावर मग त्याने पशुपक्ष्यांपेक्षा उत्तम प्राणी तयार करायचे ठरविले. मानव तयार केला. मानवजातीला देण्यासाठी त्याने रूप‚ धन‚ बल आणि बुद्धी हे चार गुण निर्माण केले व ते लांब लांब अंतरावरच्या घरात साठवून ठेवले. प्रत्येकाने पाहिजे तेवढे ते गुण घ्यावेत असे प्रकटन केले. पण - घंटा वाजल्यावर थांबायचे. बरेच लोक रूप व धन घेण्यात गुंग राहिले. बिरबल बुद्धी घेत राहिला. घंटा झाली. बाकी सरदार रूपवान व धनवान झाले‚ पण त्यांना बुद्धी नाही मिळाली. बिरबल काळा असला तरी बुद्धिमान आहे. हे ऐकून सारे सरदार खजील झाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा