वैरी

वाऱ्याने हलतें रान
तुझें सुनसान
हृदय गहिवरलें
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले....

डोळ्यांत शीण 
हातांत वीण
देहांत फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणुन 
निघे वैरागी......

चाळूत पाय 
सजतेस काय ? 
लाटांध समुद्राकाठी
चरणांत हरवला गंध
तुझ्या की ओठीं....

शून्यांत गर्गरे झाड 
तशी ओढाळ 
दिव्यांची नगरी
वक्षांत तिथीचा चांद 
तुझा कीं वैरी ?

वर्षाव

उन्हें उतरली 
एक सावली
पुढें दिठीवर थेंब नवा 
या वळणाशीं
दुःख उराशीं 
सूर वितळतो जणुं भगवा.

स्वप्ने अपुलीं 
कुणी सजविलीं ?
रंग तिरावर व्याकुळसा
नाद उगाळुन 
सांज-बनांतुन 
कळप गुरांचा निघे जसा.

माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा
देह अनावर 
निज मातीवर
हिम वर्षावत ये वारा....

जन्म

ऊन वेचतां मनांत
स्पर्श लाघवी जळे,
सांज-रंग पांघरून
गगन जन्मलें निळें.

स्तब्ध मी उभी तुझ्यांत
ढळत गहनता अशी ;
वळत वळत पावलांत 
वाट गुंतली पिशी.

वृक्ष-ओळ दूर....दूर ; 
तरल बावरे जिणें ;
चांदण्यांत लोचनें नि
लोचनांत चांदणें.

चांदणी उबेंत पंख, 
झोपलींत पांखरें ;
शब्द... शब्द जळत देह, 
मुक्त गान मोहरे.

रिक्त या कवेंत मी नि
शून्य ध्यान एकलें ;
रात्र घेउनी उशास 
क्षितिज गाढ झोपलें

श्रावण

हा श्रावण गळतो दूर
नदीला पूर 
तरूवर पक्षी 
घन ओलें त्यांतुन 
चंद्र दिव्यांची नक्षी....

हा श्रावण वाजवि धून
निळें अस्मान 
स्तनांवर गळलें
मन सगुण फुलांच्या
मंद क्षितीजीं जडलें....

हा श्रावण रडतो दूर
तमाला सूर
मधाची वाट
झाडांचीं चरणें
त्यांवर एक ललाट....

डोळे

एक सांज अशी
तिचा रंग जरा लाल 
माझ्या कपाळाला
तुझ्या धुळीचा गुलाल

....एक रात्र अशी 
तुझे सीतेपरी डोळे 
रूप पाहतांना
नभीं अंधार पाजळे.....

पाऊस

पाऊस कधीचा पडतो 
झाडांची हलती पानें 
हलकेच जाग मज आली 
दुःखाच्या मंद सुरानें. 

डोळ्यांत उतरले पाणी 
पाण्यावर डोळे फिरती 
रक्ताचा उडला पारा.... 
या नितळ उतरणीवरती. 

पेटून कशी उजळेना 
ही शुभ्र फुलांची ज्वाला 
ताऱ्यांच्या प्रहरापाशी 
पाऊस असा कोसळला. 

संदिग्ध घरांच्या ओळी 
आकाश ढवळतो वारा 
माझ्याच किनाऱ्यावरती 
लाटांचा आज पहारा.

भगवंत

ही चंद्र- उदयिनी वेळा घननीळ कांठ मेघांचे भरतीच्या क्षितिजावरुनी

घर दूर जसें सजणाचें....

तूं उभी अधोमुख येथें निद्रेचा उधळुन जोग गर्भात धरित्रीच्याही

ये जशी फुलांना जाग....

बहरांत दुःख अनवाणी

कीं पैलथडीची रात.... माझाच स्पर्श सर्पाचा अमृतमय माझे हात....

अंधार कडे घेऊन हें कोण रडाया आलें ?

दृष्टींत अरण्यामधलें मातीचें चंदन ओलें....

तरि तुझ्या कुशीचा रंग शरिरावर माझ्या उमटे

कीं चित्र अभंगामधला भगवंत स्मृतीवर दाटे....