भारतास!

मनोहरा भारता! मदंतर देवा! त्वन्मुखकळा
शोभेल कधी दिव्ये तेजे कळे कळेना मला
मोहरात्र संपेल कधी ही उषा कधी येइल
सदभाग्याची सुंदर किरणे कदा बरे पसरिल
स्वार्थ कधी जाईल लयाला, कलह कधी सरतिल
सद्धर्माची परमैक्याची फुले कधी फुलतिल
हे भाइभाइचे परि होतील कधी हिंदिजन
कधी हृदया मिळतिल हृदये, जोडेल मनाला मन
उठतील कधी तेजाने हातात हात घालुन
अलौकिक अपूर्वा कृति करितिल त्वत्सुत कधी निर्मळ
आनंदाश्रू त्वन्नयनांतुन वाहवतिल घळघळ।।

अस्मन्माता करु स्वतंत्रा ध्येय हेच लोचनी
त्वत्पुत्रांच्या दिसुनी केव्हा उठतिल त्वन्मोचना
जपती अजुनी निज शरिरांना अमूल्य ठेव्यापरी
मरणाची ती भीति क्षुद्रा अजुन तदीयांतरी
निज आप्तांच्या निज गेहांच्या मोही हे अडकती
रडती, पडती, प्रखरता न ता पेटवी चित्ताप्रती
तोडितील आई! केव्हा त्वत्सुत हे मायापाश
त्वत्स्वातंत्र्याचा केव्हा लागेल एक त्या ध्यास
त्वदभक्तीचा तो केव्हा दरवळेल तन्मनि वास
देशभक्त तो रक्त एकच व्रती इतर विसरुन
घेइ करी जो वाण सतीचे वज्रमूर्ति होउन।।

नयनी, वदनी, भाळी, ज्यांच्या देशभक्ति रेखिली
नररत्ने ना अशी सहस्त्रावधि अजुनी देखिली
ज्यांचे जीवन तहानलेले स्वातंत्र्यसुधेस्तव
तळमळते जळते मन ज्यांचे, धीर न धरिते लव
उच्चारी आचारी ज्यांच्या अखंडित प्रगटते
स्वातंत्र्याची मंगल गंगा, तरुण असे कितिक ते?
भोगावरती दृष्टि तयांची विलासैकजीवन
अनंतभोगी भ्रमरसम रमे नित्य तयांचे मन
भावना उज्वला नाही मेल्यापरि दिसती तरुण
स्वातंत्र्यरवीचे ज्यांनी आगामी व्हावे अरुण
हसवावे निजजननींचे मुखकमल जयांनी करुण
व्यसनशरण हे तरुण बघोनी जीव किती तडफडे
मदंतराला ठावे, माते! अश्रुसडा मम पडे।।

तुझ्या भारता! वातावरणी जिकडे तिकडे कदा
स्वातंत्र्याचे वारे उठतिल पळावया रिपु-मदा
स्वातंत्र्याचे पुरुषार्थाचे पराक्रमाचे तसे
विचार केव्हा रोमरोमिं ते भरतिल भरपूरसे
देशभक्ति पाजितील केव्हा माता निज लेकरा
देशप्रेमे दिव्ये भरतिल कधी तदीयांतरा
अज्ञानसागरी बुडती, भारतीय माता अजुनी
देशभक्ति पाजील कोण माता जरि पडती निजुनि
देशभक्ती खेळे जो ना मातांच्या नयनी वदनी
तोवरि नाही आशा, देशा! त्वदुद्धृतीची मला
दृश्य असे हे नैराश्याचे पाहुन दाटे गळा

मातापितरे शिक्षक रमतिल देशभक्तिसागरी
जेव्हा तेव्हा आशेला मम पल्लव फुटतिल तरी
जिकडे तिकडे एक दिसावे दृश्य देशभक्तिचे
कानी यावे जिकडे तिकडे शब्द देशभक्तिचे
विचारविद्युत एकच खेळो सर्वांच्या हृन्मनी
ध्येय दिसावे एक सर्वदा सर्वांना निशिदिनी
सर्वांच्या दृष्टीपुढती स्वातंत्र्यचित्र शोभावे
सर्वांनी यत्न करावे त्यासाठी जीवेभावे
प्राणचित्त वित्त असे जे सर्वस्व सुखे वेचावे
लाखो जेव्हा अशा विचारे उठतिल मग तळपला
भाग्यसूर्य तव समज भारता! संशय नाही मला

प्रसन्न होतिल दिशा, निराशानिशा नष्ट होइल
त्वदभाग्याचे जगी पवाडे सत्कवि मग गातिल
त्वन्मुखकंजी लावण्याची दिव्य चढेल प्रभा
गगनमंडपी वृंद सुरांचा राहिल येउन उभा
पुष्पवृष्टि करितील तुझ्यावर मग गंधर्वस्वर
यशोगान तव गातिल डोलत प्रेमाने निर्भर
होईल त्रिभुवनी तेव्हा सोहळा महानंहाचा
बोलतील एकामेका जन सारे नाचा नाचा
शांतीचा मांगल्याचा स्नेहाचा सौभाग्याचा
तो दिन येइल त्वत्पुत्र जरी वेडे त्वदभक्तिने
होतील, करितिल शर्थ जिवाची मरतील स्फूर्तीने।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३०

भारता ऊठ!

ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वला!
अभिनवबलवैभवयुत शोभ मंगला।।
दशदिशांत कीर्तिगंध मधुर दरवळो
त्वत्पावन-नामबळे दुरित ते पळो
धैर्य तुझे शौर्य तुझे अमित ना ढळो
जीर्ण शीर्ण सकळ आज जे तुझे गळो
दास्ये ना फिरुन कधी मुख तुझे मळो
शांता, दाता, कांता
रुचिर थोर कृति कर तू सतत निर्मळा।। ऊठ....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

वंदे मातरम्!

वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

तव गतवैभव पुनरपि मिळवू
तव सत्कीर्ति न पुनरपि मळवू
उज्वल करु तव वदन त्रिभुवनि
करु कष्ट तुझ्यासाठी निशिदिनी
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

तुज पुनरपि जननी गे हसवू
तुज राष्ट्रांच्या शीर्षी बसवू
सकळ जगाची होशिल माता
देलि हतपतिता तू हाता
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

अश्रु न आई! आता ढाळी
आइ! नआता पाही खाली
त्वत्सुत आम्ही पराक्रमाने
मिरवू तुज जगि सन्मानाने
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

ऊठ, पहा आम्हि सारे भाई
एक जाहलो द्रोह न राही
घसरु पुढती मिळवू विजया
दास्य झणी तव नेऊ विलया
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

विद्यावैभवविकास येइल
तववदनांबुज, आइ! फुलेल
तुज भाग्यगिरीवरि बघ नेऊ
त्वच्चरणी रत सतत राहू
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

भारतजननी तव शरणम्!

भारतजननी तव शरणम्। भारतमाते तव शरणम्
मोददायिनी बोधदायिनी अन्नदायिनी तव शरणम्।।

विद्यावंते तव शरणम्
वैभववंते तव शरणम्
अनंत-तेज:प्रसवे अस्मन्मानससुखदे तव शरणम्

विक्रमकारिणि तव शरणम्
पवित्रकारिणि तव शरणम्
पुण्यकर्मसत्प्रभावतंसे हे ज्ञानरसे तव शरणम्

लावण्यमये तव शरणम्
अनाद्यनंते तव शरणम्
अति-रुचिरे सुचिरस्थिरकीर्ते परमोदारे तव शरणम्

अति-महनीये तव शरणम्
अति-रमणीये तव शरणम्
सुरवर-मुनिवर-नरवर-प्रत्यह-नमनीये हे तव शरणम्

विमले कमले तव शरणम्
नित्यानंदे तव शरणम्
शरणागतजन-अभयदायिनी तापहारिणी तव शरणम्

सुजले सुफले तव शरणम्
अजरे अमरे तव शरणम्
भक्तिज्ञानामृतलेविनि हे शांतरुपिणी तव शरणम्

तपस्विनी हे तव शरणम्
महायोगिनी तव शरणम्
भाग्याभाग्ये विजयापजये सततहासिनी तव शरणम्

प्रभुप्रिये! हे तव शरणम्
प्रभुपरिपाल्ये तव शरणम्
त्वत्पदकंजी रुंझी घालू मिलिंदसम अम्हि तव शरणम्।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

सुसंस्कृत कोण?

अन्यां करील जगती निज जो गुलाम
तो दुष्ट, संस्कृति न त्या शठ तो हराम
तो रानटी मज गमे न मनुष्य खास
जो मानवा करुन ठेवितसे स्व-दास।।

पापी कृतघ्न अतिदांभिक वित्तदेव
अन्यांस नित्य लुटणे कृति ही सदैव
ऐसे असून ‘अम्हि संस्कृत’ बोलतात
ना लाज ती जणु अणूहि तदंतरात।।

जातील तेथ करिती भयद स्मशान
अन्यांस नागवुनिया करितात दीन
जे कोणि या पशुंस संस्कृत नाव देती
त्यांना नसे लव विचार उदार चित्ती।।

अन्यांस जो तुडवितो पशू त्या गणावे
त्या व्याघ्र वा वृक म्हणा, नर ना म्हणावे
तो रानटी पतित, संस्कृति ती न त्याला
न स्थान यन्मनि असे लव बंधुतेला।।

ओतीत तोफ वरती फिरवी विमाने
माने तसा विहरतो मिरवे मदाने
ही संस्कृती जरि असे, वृकव्याघ्ररीस
त्यांना सुसंस्कृत म्हणा मनुजापरीस।।

स्वार्थांध नित्य बनुनी करिती लढाई
शस्त्रे पहा अमुचि! हीच सदा बढाई
रक्तार्थ जे तृषित चाटित ओठ नित्य
माझे सुसंस्कृत तया वदती न ओठ।।

जेथे असे विजय, जेथ असेल वित्त
तेथेच सुसंस्कृत असे, न असेच सत्य
मोठे यदीय मन, सर्व समान मानी
त्यालाच संस्कृति असे, नच ती विमानी।।

मानव्य ना अवगणी न कुणाहि जाची
जो काळजी निज करी करिही पराची
अन्यापदा बघुन धावत शीघ्र जाई
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणा न दुजा कुणाही।।

कोणी न या जगि असो कधिही गुलाम
नांदो स्वतंत्र सगळे, मनि हाच काम
दीना साहाय्य करण्या निरपेक्ष धावे
त्याला ‘सुसंस्कृत’ विशेषण हे मिळावे।।

ज्याला समस्त जग हे अपुलेच वाटे
दु:खी कुणीहि बघुन स्वमनात दाटे
ज्यालास्वदेश सगळे निजबंधु सारे
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणाल तरी खरे रे।।

पोळी तुपात भिजवील न आपुलीच
संसार जो करि न अन्य लुटून नीच
मोदे मरेल इतरां हसवावयाला
तुम्ही ‘सुसंस्कृत’ खरा म्हणणे तयाला।।

ना आढ्यता, सरलता मधुरा समीप
डोळे यदीय गमती अनुराग-दीप
कापट्य ना मनि, विनम्र विशुद्ध शील
त्याला ‘सुसंस्कृत’ अशी पदवी खुलेल।।

लावीत शोध म्हणुनी न सुधारलेला
ओतील तोफ म्हणुनी न सुधारलेला
ज्याचे उदार मन अंतर ते विशाल
त्याला ‘सुसंस्कृत’ असे म्हणणे खुशाल।।

जाईन मी मरुन, ना दुसरे मरोत
जाईन मी शिणुन ना दुसरे शिणोत
ऐसे म्हणे, हृदयि जो धरि दीनरंक
त्याला ‘सुसंस्कृत’ तुम्ही म्हणणे विशंक।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

खरा हुतात्मा!

सत्याचा जगतात खून करिती, सत्यास फासावरी
देती हे मदमत्त पापनिरत स्वार्थांध हे आसुरी
अन्याया अभिषिक्त आज करिती निर्लज्ज सिंहासनी
जे जे सत् अवकाश त्यास नुरला त्या न विचारी कुणी।।

दंभाला कवटाळिती सतत हे पापासची पूजिती
संपददैवत अर्चिती गरीब जे त्यांचे बळी अर्पिती
सारासार-विवेकअल्प न दिसे सदबुद्धि झाली मृत
लोकी या भरले किती तरी पहा सर्वत्र हे दुष्कृत।।

ऐशा या समयी जगास सगळ्या सत्पंथ जो दावितो
ध्येयध्यास उदात्त आत्मकृतिने लोकांस जो लावितो
क्रांती जीवनि जो अपूर्व घडवी पाडी उभारीतसे
विश्वा उन्नत जो करी मनि धरा की तो हुतात्मा असे।।

विश्वाला कवटाळितो पसरुन प्रेमे भुजा आपुल्या
प्रेमाने बदलावया बघतसे ज्या कल्पना हो खुळ्या
क्रांती रक्तविहीन जो करितसे दीना जना उद्धरी
सोशी कष्ट अनंत त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

क्लेशाने हसतो न धार खचतो हासेल फासावरी
ध्येयप्राप्ति करावयास पशिता ती ना कधी आदरी
होवो अल्प तरीही तुष्ट हृदयी आशा सदा अंतरी
कर्तव्यार्थ जगे, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

येती संकटराशी घोर ठिक-या त्यांच्या प्रतापे करी
स्वार्थापासुन नित्य दूर, अचव श्रद्धा अमर्त्या वरी
ज्याचे निर्मळ हेतु, दंभ लव ना, निष्पाप बाळापरी
वैराग्याकर थोर, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

केले साध्य जगात काय न बघा, ते यत्न केले किती
साध्यासाठि नरे, तयावरुनिया घ्या तत्परीक्षेप्रती
ध्येयासाठि उदंड यत्न करि जो आजन्म, जाती जरी
सारे बंधु विरुद्ध, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

सोशी नित्य दुरुक्ति शांत हृदये, दारिद्र्य ज्याचे धन
जाई धावुन देखताच दुबळा दु:खार्त कष्टी जन
पापीही जवळी करी निजगुणे पावित्र्य देई, धरी
प्रेमे त्या हृदयी, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

धिक्कारी न कुणा, गुणास बघतो, तत्त्वा न सोडी कधी
देशद्रोह धरी दुरी, शिरति ते ज्याच्या मनी ना कधी
देवा एक भजे तयास हृदयी ध्यातो, न भीती धरी
कोणाचीहि जगी, तयास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

द्रव्ये मानमरातबे न, पदवीदाने न होई वश
सत्तेने दबला न जात विलसे निर्दोष ज्याचे यश
चारित्र्यावर डाग नाही इवला, घालून तेला जरी
डोळ्यांमाजि बघाल, त्यास पदवी शोभे हुतात्मा खरी।।

ध्येयी जीवनि भिन्नती न उरली ते ध्येय यज्जीवन
ना रात्री दिन वा बघे श्रमतसे खर्ची तदर्थ क्षण
ध्येयाचे अनिवार वेड, न जगी त्यागा यदीया सरी
ऐशा थोर नरास दिव्य पदवी शोभे हुतात्मा खरी।।

ऐशी थोर महा विभूति दिसते जेव्हा धरित्रीवरी
स्वार्थी दुष्ट असत्य दंभमति जे ते कापती अंतरी
सत्या स्थापुन प्रेम निर्मुन जगा देतो धडे उज्वल
जे होता पडले तयांस उठवी दे दुर्बळाला बळ।।

ऐसा एक जगात आज मजला गांधी महात्मा दिसे
दीनांसाठी सदा जळे तळमळे सत्यास पूजीतसे
होती जी मळली धुळीत पडली ती भारती संस्कृती
देवोनी उजाळा तिला करि नवी वानू किती तत्कृती।।

गांधी धर्मच, मूर्त सत्य गमती, धर्मार्थ तज्जीवन
गांधी प्रेमच मूर्त, निर्मळ सदा प्रेमार्द्र त्यांचे मन
गीता चालति बोलती मज गमे, गीतार्थ त्यांची कृती
ऐशी थोर विभूति लाभत अम्हां, भाग्यास नाही मिती।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

ऊठ झुगारुन देई बेडी

उज्वला! निर्मला
हे भारतवर्षा
हे मंगलदेशा
ऊठ झुगारुन देई बेडी दवडी स्वक्लेशा।।

कितितरि, बापा! काळ लोटला तुजला रे निजुनी
सकल बंधने तोडिश तडातड तेजस्वी बनुनी
अमृता! भारता!
शिर वर कर आता
ऊठ झणी आता
त्वत्पदावरी त्रैलोक्य उभे ठेविल रे माथा।।

पराक्रमाने तेजे आता दास्या तुडवावे
तुझे पवाडे जगात जरि रे सकळांनी गावे
पावना! मोहना!
रमणीया भव्या
स्तवनीया दिव्या
राष्ट्रांच्या तू शिरी शोभ रे अभिनव सत्सेव्या।।

तुझी संस्कृती अनंत, रुचिरा, निर्मल, अमरा, ती
धुळीत परके मिळवु पाहती, ऊठ सोड भीती
दुर्जया! निर्भया!
सुरवरमुनिपूज्या
त्रिभुवनसंस्तव्या
अनंत कीर्ती दिगंतात तू मिरवी निज दिव्या।।

तुझे बळ किती तुझी धृतिती किती ते आणी ध्यानी
अवनीवरती धन्य होउनी शोभे स्वस्थानी
प्रेमळा! कोमळा!
प्रखर बने बापा
हटवी निज तापा
दीनापरि ना पडुनी राही दूर करी पापा।।

स्वातंत्र्याच्या स्वर्गी नांदे, दास्याते तोडी
दैन्य निराशा निरानंदता सकल झणी मोडी
सद्रता! सुव्रता!
विक्रांता दावी
भाग्याला मिरवी
दु:स्थिति अपुली विपत्ति अपुली विलयाला न्यावी।।

डोळे उघडुन केवळ पाही धैर्य मनी धरुनी
नेमेल अवनी सारी निजबळ येइल तुज कळुनी
दुर्धरा! गंभिरा!
सागरसम धीरा
मेरुपरि धीरा
वीरा! वासरणिसम तळपे करि आत्मोद्धारा।।

समय असा ना पुनरपि येइल विलंब ना लावी
व्हावा स्वातंत्र्योदय आता भाग्यवेळ यावी
सिंहसा भीमसा
ऊठ त्वेषाने
झळके तेजाने
दुर्गति अपुली विक्रमसिंधो त्वरित लयाला ने।।

स्वाभिमानघन तू रे होई खितपत न पडावे
धावे, विजये जगी वैभवे तू रे शोभावे
ऊठ रे! ऊठ रे!
तू तर जगजेठी
कृति करि तू मोठी
त्वतभाग्येदूवरी लोभु दे सकल-जगतदृष्टी।।

स्वतंत्र होउन सच्छांतीच्या सुंदर संदेशा
तूच जगा दे हीच असे रे इच्छा जगदीशा
उज्वला! निर्मला
हे भारतवर्षा
हे मंगलदेशा
ऊठ झुगारुन देई बेडी दवडी स्वक्लेशा।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३१

प्रभु-प्रार्थना!

करुणाघन अघशमन मंगला जनार्दना श्रीहरी
मुकुंदा मनोहरा श्रीहरी
कृपाकटाक्षा क्षण तरि फेकी, देवा! दीनांवरी
हतबल विकल, प्रभो! जाहलो निराधार केवळ
खरोखर निराधार केवळ
पदारविंदा तुझ्या मुकुंदा पूजितसो दे बळ
पसरला निबिड अंधार
दे कर हितकर तू तार
होऊ दे अस्मदुद्धार
शिर वर करुनी जगी वावरु भाग्यश्रीला वरु
वैभवा संपत्तीला वरू
प्रपंच सुंदर करुनी देवा परमार्थाही करु।।

संकटांबुधीवरुनी येती पवन परम भीषण
भयंकर पवन परम भीषण
आशेचा ते दीप टाकिती झणी, प्रभो विझवुन
पुन:पुन्हा परि पाजळीतसो आशादीपाप्रती
उज्वला आशादीपाप्रती
धैर्याने पाउले टाकितो पुढती रे सत्पथी
त्वत्कृपा अम्हांवर असो
त्वदध्यान मानसी वसो
भयभीति न चित्ती असो
सद्धर्माचा सत्कर्माचा विजयध्वज उभवुन
सुमंगल विजयध्वज उभवुन
भूमातेच्या सशे मंगले उजळू हे त्रिभुवन।।

प्रगतिपथावर पराक्रमानं, गोविंदा, शोभवू
भारता या अमुच्या शोभवू
तदभाग्येंदूवरी सृष्टिची दृष्टि सदा लोभवू
अद्वैताचा आनंदाचा शांतीचा सुंदर
शुभंकर शांतीचा सुंदर
संदेश जगा वितरिल भारत सकलकलहसंहर
ही पवित्र मंगल क-ती
करण्यास अम्हां दे धृती
कर निर्मळ अस्मन्मती
जय जगदीशा! जय परमेशा! जयजय हे श्रीहरी
मुरारे जयजय हे श्रीहरी
धीबल वितरी, प्रेरणा करी, दे स्फूर्ती अंतरी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

राष्ट्राचे उद्यान

राष्ट्रीय जीवन
ओसाड मैदान
या रे निर्मू तेथे
या रे सारे जण
स्वार्थाचे पाषाण
करु त्यांचे चूर्ण
भीषण भुजंग
मारा आधी साचे
ठायी ठायी त्यांची
टाका विध्वंसून
अज्ञान-दलदली
होवो शुद्ध हवा
रुढींचे हे दुष्ट
कराच विध्वंस
दुष्ट आचारांची
जाळावी ही सारी

दिव्य स्वार्थत्याग
पसरु ती हाती
ऐक्याचे भरपूर
बाग सुशोभित
प्रयत्न अनंत
उद्यान समस्त
सद्विचार-वृक्ष
भेसूर भयाण
भगभगीत
रमणीय उद्यान
श्रमावया
भेदांचे पाषाण
चला आधी
क्रोध मात्सर्याचे
प्राणघेणे
वारुळे भयाण
आधी आधी
सा-या या आटवा
आरोग्याची
मारोतच डास
त्यांचा आधी
जाळी ही काटेरी
माजलेली

अमोलीक माती
आधी आधी
घालू या रे खत
तरि होई
हाच सद्वसंत
शोभवील
सदवृत्तीचे वेल
पवन वाहेल
मंदार सुंदर
बकुळ भाग्याचे
सच्छील पुष्पांचा
प्रेम अलिकुल
सत्कर्म ताटवे
उद्यान पवित्र
सदगुण-विहंग
विश्वजनमना
खरी समानता
यांच्या कल्पकता
आशेचे अखंड
स्फूर्तीचे तळपोत
नाचोत कारंजी
ख-या श्रीमंतीची
श्रद्धेची बाळके
खेळोत गोमटी
अशा राष्ट्रोद्यानी
मांडील स्वासन
सुखाचा सोहळा
पाहेल जो डोळां
पावित्र्याचा
शुभ मांगल्याचे
फुलावेत
गोड परिमल
गुंगू गुंगो
फुलोत सर्वत्र
भरारो हे
करोत कूजना
वेडावोत
दिव्य स्वतंत्रता
फोफावोत
हौद ते वाहोत
दिव्य मीन
ख-या उत्साहाची
अंतरीच्या
सच्चिद्वापीतटी
कौतुकाने
तो जगन्मोहन
शुभंकर
भाग्या चढे कळा
तोची धन्य



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२९

राष्ट्रपताका

करु वंदना प्रभाती। करु कीर्तना प्रभाती
राष्ट्रप्रभा पताका। वंदून पूजु हाती
स्वातंत्र्यमंत्रपूते। स्वातंत्र्यगीतगीते
ज्योतिर्मय अखंडे। स्वातंत्र्यसद्विभूते
हे उज्वले पताके। तेजस्वि हे पताके
तुज पाहुनी सदैव। कळिकाळ पोटी धाके
खुलतात तीन रंग। किति गोड गोड गोड
हे तीन रंग म्हणजे। शम शौर्य धर्म जोड
शांतीस दावि हरित। सत्त्वास दावि धवल
शौर्यास केशरी तो। दावीत अर्थ विमल
चकरा वरी विराजे। श्रमगौरवास दावी
समता स्वतंत्र्यचे। हे चिन्ह सुप्रभावी
रमवील उद्यमांत। सर्वांस नित्य झेंडा
देईल सर्व लोकां। साधा स्वतंत्र्य धंदा
जाळील दास्य सारे। नमवील मत्त लोक
वितरील सौख्य सर्वां। दडवील दीन-शोक
हे निर्मळे पताके। तू मोक्षमार्गदीप
न दिसेल दैन्य दास। जरि तू सदा समीप
तू मूर्त राष्ट्रवृत्ति। तू मूर्त राष्ट्रकीर्ती
तू त्याग मूर्तिमंत। तू मूर्त राष्ट्रदीप्ती
तू शौर्य धैर्य वीर्य। तू स्वाभिनामसूर्य
जे स्तव्य सेव्य भव्य। ते सर्व तू अपूर्व
राष्ट्रास तूच आस। राष्ट्रा तुझीच कास
आधार तू जनांचा। विश्वास तू अम्हास
तू ना तरी न काही। ना राष्ट्रानाम राही
ना वित्त अब्रु जीव। स्वातंत्र्यलाभ नाही
करा गर्जना धीर उर्जस्वला ती। जिला ऐकुनी कापती ते अराती
उठावे अता एकदाची समस्ती। चला झाडुनी जीवनातील सुस्ती।।
आम्हां थोर वीरां जगी कोण वारी। अम्हां दिव्य वीरां जगी कोण मारी।।
करु मुक्त आम्ही प्रिया भारताते। प्रतिज्ञा अशी ऐकवीतो जगाते।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

झेंडागीत

ऊठा बंधुनो! प्रभात झाली झेंडावंदन करु चला
प्रतापशाली गगनी फडके अमरध्वज तो पाहु चला।।

जेवि चराचरि वायु वाहुनी जीवनरस तो ओतितसे
प्रभातकाळी तेवी ध्वज हा अस्मन्मानस फुलवितसे।।

प्रभातकाळी दिनकर कोमल सुमगण जेवी हसवितसे
सुंदर हसरा ध्वज हो विजयी तेवि मनाला खुलवितसे।।

हसवी चित्ता, आशा निर्मी, स्फूर्ति अंतरी संचरवी
तेजोदायक तिमिरविदारक तळपे ध्वज हा जसा रवी।।

पहा स्वकीया करा हलवुनी आपणास तो बोलवितो
माझ्याखाली गोळा व्हा रे तमाम सारे तो वदतो।।

झेंड्याखाली तमाम सारे जमाव करु या मोदाने
अंतरंग रंगवू चला रे शौर्ये धैर्ये वीर्याने।।

राष्ट्राचा हा प्राण अमोलिक राष्ट्राचे हे जीवन हो
सर्वस्व असे अपुले जे जे ते ते झेंडा दावित हो।।

ज्या राष्ट्राते झेंडा नाही त्याते नाही जगी मान
मान तयाची वरी न होई करिती त्याचा अपमान।।

विद्या वैभव कला कीर्तिचे अब्रूचे अभिमानाचे
संरक्षण होतसे जरि वरी गगनी झेंडा हा नाचे।।

झेंडा म्हणजे जीवन अपुले झेंडा म्हणजे स्वप्राण
झेंडा म्हणजे राष्ट्र अपुले झेंडा दैवत ना आन।।

स्वातंत्र्याचे चिन्ह सुमंगल म्हणजे झेंडा हा आहे
झेंडा फडके झळके जोवरि तोवरि वैभवयश राहे।।

झेंडा चमके जोवरि अपुला विश्वी विजयी विक्रांत
राहू तोवरि आपण तेजे निर्भय निर्मळ निभ्र भर्रां
झेंडयाला या वित्ताहून प्राणांहुनहि जपा सदा
झेंडा अपुला जीव धर्मही झेंडा अपुला देव वदा।।

ऐक्याच्या वातावरणाचा झेंडा असतो निर्माता
स्वातंत्र्याच्या संगीताचा झेंडा असतो उदगाता।।

झेंड्यासाठी नाना देशी नाना विरी निजरक्त
दिले, प्राणही फेकुन दिधले, झेंड्याचे व्हा तुम्ही भक्त।।

लाखो करिती बलिदान मुदे एका या झेंड्यासाठी
झेंड्याचा महिमा न वर्णवे कधी कुणाही या ओठी।।

सर्वस्वाचे सर्वैक्याचे राष्ट्रत्वाचे हे चिन्ह
एकचित्त समूर्त जाहले धरा अंतरी ही खूण।।

एका अत्तर थेंबामध्ये लाखो कोटी सुमनांचे
ओतिले असे सर्वस्व तसे झेंड्यामध्ये राष्ट्राचे।।

झेंडा दावी परंपरेला झेंडा संस्कृति गात असे
झेंडा तुमच्या पूर्ववैभवे सदगुणवृंदे चमकतसे।।

मधमाशा त्या पोळ्यासाठी निशिदिन जेवी जपताती
झेंड्याला या राखू आपण करू प्रतिज्ञा प्राणांती।।

जे आताचे जे पूर्वीचे भविष्य काळातीलहि जे
अपुले मंगल सुंदर उज्वल ते या झेंड्यामधे सजे।।

झेंडा सुंदर थोर तिरंगी ललामभूत त्रिजगाते
त्रैलोक्य उभे अभिराम अशा या झेंड्याला नत नमते।।

प्रात:स्मरणीया रमणीया वरणीया झेंड्या नमन
तुला करितसे, तव भक्तीने जावो अमुचे भरुन मन।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

नवयुवक

हसो दिवस वा असो निशा ती। असो पौर्णिमा असो अमा ती
अम्हांस नाही लवही भीती। पुढेच घुसणे ठरली नीती

अदम्य आम्ही पुढेच जाऊ। धैर्ये शौर्ये पुढेच धावू
स्मशानशांती अम्हां रुचेना। भयनकाला करु आव्हाना

प्रचंड पर्वत पायी तुडवू। लोळ विजेचा हाती अडवू
छातीवर ती झेलू गोळी। करु मृत्युशी खेळीमेळी

दिव्य असीम प्रताप अमुचा। पुढेच घुसणे नेम सदाचा
धृवाजवळची थंडी येवो। तन अमुचीही गोठून जावो

सहारातली येवो आग। पुढेच जाऊ काढित माग
अफाट दर्या मना न भिववी। प्रचंड तटिनी मना न डरवी

भीषण दाट प्रचंड कानन। द-याखोरि जी फिरवित नयन
असोत किल्ले कडे असोत। जाऊ दृढ निज पाय रोवित

धूमकेतु ते अभद्र येवो। तुफान डोक्यावर घोंघावो
अपत्तींचे पर्वत येवो। मृत्यू येउनी सन्मुख राहो

मृत्यु असे तो मित्र आमुचा। संकट तो तर सखा जिवाचा
हे प्रिय सगळे सखे सवंगडी। आम्हावरि ते करितिल न कडी

रडावया जे आम्हां येतिल। हसवुन आम्हां तेची रडतिल
अम्हां कशाची तमा न तिळभर। रणधीर अम्ही निर्भय वीर

नवभारतसुत आम्ही दिव्य। घ्याया जाते उत्कट भव्य
जसा मारुती वरति उडाला। जन्मताच धरण्यास रवीला

तेजार्थ तसे असो भुकेले। राहु न आता मृत पडलेले
रडत झुरत ना अम्हि बसणार। भाग्यगिरीवर दृढ चढणार

खुशाल कोणी करो विरोध। झुंजार अम्ही निर्भय योध
प्राणांची ना अम्हां फिकीर। नसे कशाची अम्हां जिकीर

त्यागाने तळपणार हीर। झालो आम्ही खरे फकीर
भारतात या आणू तेज। भारतात या आणू वीज

भारतात या आणू जोम। भारतात या निर्मू प्रेम
प्राण भारती सतेज आणू। ज्ञान भारती जिवंत आणू

जन्म सफल हा तरीच मानू। स्वतंत्रता भारतात आणू
आम्ही युव नवभारत-पुत्र। व्रती पवित्र ज्वलच्चरित्र

घालित न बसू वाद वितंड। केवळ जमवित बसू न फंड
भैरव आम्ही दुर्जय चंड। करु दास्याचे तिळतिळ खंड

तेज आमुचे दिव्य उदंड। जाळिल अवघे हे ब्रह्मांड
हिमालयाला गदगद हलवू। सिंहालाही हिसडे देऊ

कोण अम्हाला करिल विरोध। झुंजार अम्ही निर्भय योध
प्राणांवर जाहलो उदार। कोण अता घेइल माघार

विचार केवळ रुचे न सतत। कृती करावी हे अमुचे व्रत
लंबकापरी आंदोलनता। देइल कधि न स्थिति समुन्नता

या जे उत्सुक नव कार्याला। चला उठा या दिव्य रणाला
काय काम ते विचारता का? ऐका तरि ते उरो न शंका

राजकीय वा सामाजिक ते। दास्य अम्हांते सहन न होते
या दास्याला पदि तुडवाया। अन्यायाला पदि तुडवाया

जगददुष्टता ही बदलाया। दु:खनिराशा दूर कराया
दुष्ट रुढींना बुडवायाला। दुष्ट धर्म ते उडवायाला

वैषम्याला दूर कराया। दारिद्र्याला दूर कराया
रोगराइला दूर कराया। दुष्काळाला दूर कराया

पापाला त्या दूर कराया। अज्ञानाला दूर कराया
संकुचिताला दूर कराया। संचयबुद्धिस दूर कराया

मदोद्धतांचा मद उतराया। उद्दामांची रग जिरवाया
पुंजपतींची पत हरवाया। सत्ता त्यांची ती हरवाया

अम्हि उठलेले युव तेजाळ। अम्हि आगीचे जळते लोळ
करी घेतले सतिचे वाण। उठलो आम्ही युव बेभान

झालो आता जसे तुफान। अम्हां कशाची नसे गुमान
मान अता ही वर करणार। कुणास आता ना डरणार

बेडर बेशक बेदरकार। पुढेच आता अम्हि घुसणार
वाटेमध्ये जे जे वाइट। टाकू करुनीच नायनाट

अवास्तविक जे जुलमाचे जे। रास्त नसे जे पाक्त नसे जे
भ्याड असे जे मलिन असे जे। दुष्ट असे जे नष्ट असे जे

जे सडलेले जे कुजलेले। निरुपयोगि जे जे मेलेले
विरोध जे जे करिल विकासा। त्याच्या त्याच्या करुच नाशा

त्या सर्वांना पृथ्वीवरुन। सुदूर देऊ भिरकावून
या जे उत्सुक या कार्याला। तेज आणु या स्वजीवनाला

या या सगळे सखे सहोदर। या जे नवयुव परम उदार
या रे सगळे, समानतेची। माधुर्याची मांगल्याची

सर्वैक्याची सारल्याची। स्वतंत्रतेची समृद्धतेची
सच्छांतीची सतज्ञानाची। सदभक्तीची सत्स्फूर्तीची

निर्मू पावन मंगल गंगा। अनंतरंगा दिव्य अभंगा
सत्प्रेमाला करु अभिषेक। सत्याला या करु अभिषेक

मानव्याला करु अभिषेक। बंधुत्वाला करु अभिषेक
यात्रेकरु हो आपण सारे। यात्रेलागी चला निघा रे

दिव्य निशाणे हाती घ्यारे। सदध्येयाची गाणी गारे
खरे तरुण नव आपण होऊ। भारतास या शोभुन राहू

धृवबाळाचे प्रल्हादाचे। सत्त्वसिंधु चिमण्या चिलयाचे
रोहिदास अभिमन्यू यांचे। सत्यकाम नचिकेता यांचे

शुकसनकांचे उपमन्यूचे। ज्ञानेशांचे शिवबाजींचे
जनकोजीचे विश्वासाचे। वंशज आपण पवित्र साचे

परंपरा ही आहे थोर। तिचा आपणा अनंत जोर
परंपरा ही पुढे चालवू। परंपरा ही कधि न मालवू

परंपरेचा नंदादीप। सदैव पेटत ठेवु समीप
स्वप्राणांचे घालू तेल। सदा दीप हा मग तेवेल

यथार्थ आपण होऊ तरुण। नव्या मनूचे होऊ अरुण
परमेशाचे करुन ध्यान। हीच घेउ या मनात आण

‘हसो दिवस वा असो निशा ती। असो पौर्णिमा असो अमा ती
अम्हांस नाही लवही भीती। पुढेच घुसणे ठरली नीती’


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२९

बाल-वृद्ध संवाद

शाळा सुटली कटकट मिटली बाळे मग जमली
वदने तेजाने फुलली
शाळा सुटते कधी अशी ते वाट बघत होते
बाळक तेजस्वी हो ते
सगळे जमले एके ठायी रांग झालि नीट
दिसती उल्हासी धीट
झेंडा घेउन नायक झाला सर्वांच्या पुढती
मग मिरवणूकीस निघती
हुकूम झाला कूच कराया मग वानरसेना
निघाली गात दिव्य गाना
उत्साहाने उल्हासाने बाळे ती निघती
मुखाने मातगीत म्हणती
जो निघाली तोच भेटला वृद्ध एक त्यांस
विचारी प्रश्न बालकांस

वृद्ध: कुठे, मुलांनो! जाता तुम्ही? निशाण हे कसले?
सांगे काम कोण असले?
लहान तुम्ही बाळ मजेने हासत खेळावे
मांडीवरती लोळावे
खावे प्यावे मौज करावी चिंता ना करणे
हसुनी इतरां हासविणे
बाल वय असे अजुनी तुमचे हसण्या रडण्याचे
क्षणात रुसण्याफुगण्याचे
कुठे जातसा निशाण घेउन? दिसता मज वेडे
परता मागे घ्या पेढे
मुलामुलींनी घरी बसावे आईशेजारी
जावे कधी न बाहेरी
चला सकळही परता तुम्ही माझे ऐकावे
वृद्धा सदैव मानावे
परता, बघता काय असे रे ऐकावे माझे
तुम्हि तर गोड बाळराजे’

एक मुलगा: अमुचा आहे नायक हा हो तुम्हा सांगेल
कसला खेळतसो खेळ
बोलत नाही आम्ही कोणी शिस्त असे अमुची
आज्ञा ऐकतसो याची
सांग गड्या रे यांना सारे यांना समजावी
शंका त्यांचि न ठेवावी
आम्ही सगळे उभे राहतो रांगेमधि नीट
त्यांना सांग, तूट धीट।।

वृद्ध: नायक तुमचा? काय बोलता? पाळितसा शिस्त? ठेउन त्याच्यावर भिस्त?
शिपायीच जणु झाला? करता थट्टा वृद्धाची नसावी बुद्धि अशी साची?

नायक: अहो खरोखर आम्ही सगळे आहोत शिपायी खोटे सांगुन करु कायी?
शिस्त पाळतो, नीट वागतो, जातो खेळाया
कसला खेळ सांगतो, या
गाणी गावी सुंदर सुंदर भारतमातेची
चित्ते हरण्या लोकांची
देशभक्तिची स्वदेशिची ती दिव्य गाणि गातो
रस्त्यांतून गात जातो
निशाण अपुल्या देशाचे हे झेंडा राष्ट्राचा
सुंदर अपूर्व तेजाचा
तीन रंग हे पहा केशरी हिरवा हा धवल
वरती चरका हा विमल
धर्मैक्याचे स्वातंत्र्याचे झेंडा हे चिन्ह
झेंडा समानता-खूण
थोरामोठ्यांनी हा केला झेंडा निर्माण
भारतसेवेची खूण
या झेंड्याची गाणी गातो करितो तत्पूजा
तेव्हा वाजवितो बाजा
लोकां करणे जागृत, जागृत करणे व्यापारी
म्हणुनी अमुचि निघे स्वारी
दुकानदारापाशी जाउन जोडुन त्या हात
वदतो काय अम्ही गोष्ट
नका विकू हो नका विकू तो परदेशी माल
होती बंधूंचे हाल
नका खरेदी करू नव्याने परदेशी माल
होती देशाचे हाल
परदेशातील मोहक वस्तू वस्त्रे न विकावी
भारतमाय न रडवावी
घरोघरीही जातो आम्ही आळीआळीत
गातो देशभक्ति- गीत
जो जो आम्हां वेळ सापडे सांभाळुन शाळा
देतो तो या कार्याला
खेळ अमुचा हाच, अम्हाला यातच आनंद
नाही इतर अम्हां छंद
कशास पेढे देता? त्यातहि साखर परदेशी
वाइट वाटे आम्हांसी।।

वृद्ध: मला वाटते भय, बाळांनो! साहस न करावे
झडकर तुम्ही घरि जावे
वाट तुमचि ते पहात असतिल घरी आइबाप
होइल त्यांस किती ताप
जा परतुन माघारे, ऐका आगित न शिरावे
स्वगृही शांतपणे जावे
जा माघारे म्हाता-याचा ऐकावा बोल
मन निज ठेवा समतोल।।

नायक: भीती न शिवे थोडी देखिल अमुच्या चित्ताला
न भितो जगात कोणाला
नि:शंक अम्ही सारे जातो गात देशगीते
आम्ही नाहि मुळी भित्रे
गांधीजींचे नाव नाचते ओठांवर नित्य
नाही कळिकाळा भीत
भारतमातेचे हो आम्ही छोटे सरदार
न रुचे खेळ, न घरदार
भारतमातेचे हो आम्ही भावी आधार
घेऊ कधी न माघार
अमुच्यामध्ये असे पहा हा सुभान त्या नाव
त्याचे तेज किति अपूर्व
लहान आहे तरि तो आहे सिंहाचा छावा
भीति न शब्द त्यास ठावा
लहान दिसतो तरि तो आहे दिव्य बालवीर
अदभुत त्याचा तो धीर
पलीकडे तो बालक दुसरा नामे शिवराम
मोठा निश्चयि अभिराम
पलीकडे तो बाळ हासतो ‘साधु’ त्यास म्हणती
त्याच्या निश्चयास ना मिति
प्रल्हाद, भिका, रामदास तो त्रिंबक तो चौथा
त्यांची स्मृति राहो चित्ता
कितिकांची मी सांगू नावे बालवीर सारे
काळहि त्यांच्याशी हारे
भीतीच्या ना सांगे गोष्टी आम्हां भय नाही
हृदयी देशदेव राही
गांधीजींचे नाव मुखी मग भीति कशी राही
भीती सर्व पळुन जाई
तीन रंगी हा झेंडा अमुचा तिम्ही जगी फिरवू
याला तेजाने मिरवू
लयास सारी चित्तामधली भयभीती जावी
सेवक देशाचे भावी
अम्ही भयाचे गिरवित बसलो धडे जरी आज
होइल पुढे केवि काज
स्वातंत्र्याला मिळवायाला मिळले राखाया
झिजवू आम्हि मुदे काया
नसे मोह तो आता आम्हां खाण्यापिण्याचा
मोह न उरला नटण्याचा

गाणी गावी झेंडा घ्यावा यातच आनंद
आम्हां इतर नुरे छंद
खेळायाला जरी आवडे वेळ नसे त्याला
करणे स्वतंत्र देशाला
स्वस्थ न आता अम्हां बैसवे आम्ही जरि बाळ
होऊ काळाचे काळ
बाळच होता धृव परि सोडुनी अन्यायी बाप
जाई देवाचे समिप
अढळपदावर नेउनिया बसवू
त्याला स्वातंत्र्ये नटवू
रोहिदास तो बाळच होता सोशी किती कष्ट
छळि जरि कौशिक तो दुष्ट
सत्त्व न त्याने ते हारविले तेजे तळपतसे
होऊ बाळहि आम्हि तसे
लहान होते किती लवांकुश तरि ना डगमगले
लढण्या रामाशी सजले
लहान होता चिमणा चिलया सत्त्वास्तव मेला
भूषण भारतास झाला
कड्यावरुन लोटिती घालिती जळत्या खाईत
परि तो प्रल्हाद न भीत
तप्त तैल कढईत टाकिती बाळ सुधन्वा तो
हसतो कृष्ण कृष्ण म्हणतो
मान न लववी श्रीशिव भूपति परक्या सत्तेला
नव्हती वर्षे ते सोळा
लहान होते समर्थ तरि ते त्यागिति घरदार
त्यांच्या धृतिस नाहि पार
जनकोजी विश्वासराव ते ते माधवराव
देती भीतीस न ठाव
सोळा सतरा वर्षे त्यांची सेनापति होती
लाखो लढायांत लढती
लहान आम्ही तरि ना भीती, काळाचे काळ
ना अळुनाळ न लडिवाळ
म्हणू नये की लहान आहे छावा सिंहाचा
घेइ प्राण गजेंद्राचा
म्हणू नये की लहान पिल्लू तल्लख नागाचे
चावे कडकडून साचे
स्फुलिंगकण तो लहान न म्हणा लहानशी ठिणगी
लाविल आग समस्त जगी
लहान न म्हणा त्वेषे सणणण करित जाइ तीर
तोडित रिपुचे झणि शीर
लहान म्हणुनी अम्हां भिवविता भिणार ना आम्ही
येऊ देशाच्या कामी
डी व्हॅलेरा होता म्हणती तीनच वरषांचा
तुडवी ध्वज रिपुचा वाचा
असे मॅझिनी बाल्यापासुन देशास्तव दु:खी
राहे सदोदित सुतकी
काळा पट्टा शोकनिदर्शक हातावर बांधी
वाचा गोष्ट त्याचि आधी
लहान म्हणुनी गोंजारुनी घरात ठेवून
फळ ते काय? जाउ मरुन
मरावयाचे तुम्हां आम्हां आहे सगळ्यांते
किमर्थ धरणे भीतीते
कर्तव्याचा रस्ता दिसतो आम्हांस समोर
येवो संकटेहि घोर
कर्तव्य अम्ही करणे त्यातच आम्हां आनंद
नाही रुचत इतर छंद

वृद्ध: मरावयाचे असे एक दिन जरि ते सगळ्यांते
आजच का जा मरण्याते
लहान तुम्ही, करा तयारी, धष्ट पुष्ट व्हावे
खावे प्यावे खेळावे
अभ्यास करा ज्ञाना मिळवा उतावीळ व्हा न
अजुनी बाळ तुम्ही सान
कर्तव्यच्युत व्हा न सांगतो, कर्तव्य कराया
आहे वेळ अजुनि राया!
मोठे व्हावे तनामनाने ज्ञानहि मिळवावे
मग ते कर्तव्य करावे
अपक्व बुद्धी अजुनी तुमची, तुम्हास ते म्हणती
मर्कट वानरसेना ती
खोड्या करणे, गंमत करणे, स्वभाव हा तुमचा
काळ प्रसन्न बाल्याचा
करा तयारी, धरुन हुशारी, भावी कार्याची
ठेवा स्मृति चित्ती त्याची
नका हट्टाला पेटू त्याने न घडे कल्याण
अंती रडतिल हे नयन
कमवायाची वेळ असे तनु ना गमवायाची
मिळवा जोडहि ज्ञानाची
घाई न करा सकळ नासती कार्ये घाईने
घ्यावे सकळहि धीराने
जा माघारे हात जोडतो होतिल रे हाल
माते बघवतिल न बाळ
राजस सुंदर बाळ तुम्ही रे मृदु जणु नवनीत
माझे अंतरंग भीत
फुलापरिस सुकुमार अरे कुणि येउन तुडवील
पाये तुम्हा कुसकरिल
सदगुण मिळवा, ज्ञाना मिळवा, करा निजविकास
यावे पुढती कामास
सुंदर शरिरे मने सुंदर करा आधि तुम्ही
पूजा पुढे मातृभूमी
भविष्य आहे अपार तुमच्या समोर का घाई
मन्मन कळवळोन जाई
अविचार नका करु मुलांनो वृद्धाचे ऐका
सोडा सर्व तुम्ही हेका
जा माघारे आईबाप ते अपुले हसवावे
त्यांच्या सन्निध नाचावे

नायक: पोक्त असे जरि सल्ला तुमचा न रुचे हृदयास
न पटे अमुच्या बुद्धीस
केवळ वाचुन घरात बसुनी ज्ञान ते न मिळते
ज्ञान प्रसंगानेच कळते
देशभक्तिचे धडे वाचुनी केवळ ना अर्थ
पुस्तक केवळ ते व्यर्थ
आली आहे संधि शिकाया देशभक्ति चीज
घेऊ केवि धरि नीज
वस्तुपाठ हा देशभक्तिचा समोर असताना
वाचिल कोण पुस्तकांना
प्रत्यक्षाचे ज्ञान असे जे महत्त्व त्या फार
उपयोगी न ग्रंथभार
भावी कार्या करण्यासाठी आजपासुनीच
मिरवू धडे जे महोच्च
धैर्य, धडाडी, त्याग, अभयता, बाणा सत्याचा
शिकतो ओनामा त्याचा
घरात बसुनी मोठा झाला कोणी ना केव्हा
बसता फसे, समय जेव्हा
वानर म्हणती! चेष्टा ना ती, तो ना अपमान
अमुचा तोच खरा मान
वानरांस त्या संगे घेई प्रभू रामचंद्र
जिंकी बलाढ्य असुरेंद्र
पालाखाऊ वानर करिती जगताला चकित
करुनी रावण रणि चित
पालाखाऊ वानर करिती करणीस अचाट
घाली जग तोंडी बोट
वानर होते परी तयांनी सुरवर सुखवीले
स्वयश त्रिभुवनि मिरवीले
वानर झाले पूज्य तयांचा नायक हनुमंत
झाला देव थोर संत
वानर नावाची न वाटते आम्हां तिळ लाज
करणे मातृभूमि-काज
गांधि महात्मा करितिल अमुचे प्रेमे कवतूक
अमुचे तेच सर्व सूख
लहान आम्ही तरी जागवू देशभक्ति हृदयी
सुखवू भारतभू- मायी
लहान तारा असे तरी तो चमके तेजाने
तिमिरा अल्प तरि लया ने
लहान असले फूल तरी ते करुनी छायेला
रक्षी मृदु दवबिंदुला
लहानासहि यथाशक्ति ये करावया काम
नलगे कीर्ति नको नाम
क्षमा करा हो मदवज्ञेची, हेतु असे शुद्ध
व्हावे अम्हावरि न कृद्ध
तुम्ही जाहला वृद्ध परि असे उल्हासी अमुची
वृत्ती निर्भय तेजाची
नका रोखु हो स्वदेशकार्या अडथळा न आणा
अमुचा निश्चय तुम्हि वाना
आशीर्वादा द्या आम्हाते अमुच्या हातून
होवो दूर माय-शीण
आशीर्वादा द्या भय न शिरो अमुच्या चित्तांत
देऊ मातृभूस हात
आशीर्वादा द्या की निश्चय राहो अविचलित
निर्मळ असो सदा चित्त
त्रास, हाल ही अम्हां भूषणे थोर अलंकार
सांगू काय तुम्हां फार
मनी शुभेच्छा तुम्ही बाळगा ‘स्वतंत्र हा देश
करु दे लौकर जगदीश’
जगदीशाला स्मरा अम्हाला उत्तेजन द्यावे
अमुचे कौतूक करावे
जरी आमुचे आइबाप ते विरोध करितील
आम्हां ओढुन नेतील
त्यांना वळवा कथुन शब्द ते धीराचे चार
की हे ‘दिव्य बाळ वीर
घडो स्वभूमीसेवा यांचे हातुन हे हीर
देऊ यांस चला धीर’

नायक वृद्धाला हे ऐसे बोलत जो बोल
जे स्फूर्तीचे कल्लोळ
तोच तिथे तो पिता तयाचा अकस्मात आला
पकडी घट्ट नायकाला

बाप: अरे कारट्या! येथे अससी शोधुन मी दमलो
वणवण करुनी मी श्रमलो
डोळा चुकवुन अहो कारटा निसटुन की आला
नाही धाक मुळी याला
कितीदा तुला बजावले की सांड सकल फंद
असेल नकोतची छंद
नको गळ्याला लावू अमुच्या फास घरी नीघ
नीघच उचल पाय शीघ्र

नायक: बाबा! बाबा! नका असे हो बोलु नका माते
होते दु:ख मन्मनाते
कटु विष वमता मला ताडिता या वाग्बाणांनी
येते मन्नयनी पाणी
घरी न बाबा मला राहवे करु तरी काय
मारी हाक देशमाय
घरी बैसणे नरक वाटतो मला मूर्तिमंत
तगमग होते चित्तात
मारुन टाका मुलगा तुमचा, तुमचा अधिकार
जावा जरि ना बाहेर
घरी बैसण्यापेक्षा मरणे रुचे तात! माते
मारा तुमच्या पुत्राते
अनेक निघती मजसम मुलगे कसा घरी राहू
माझे तोंड कुणा दावू
बाबा! राग न तुम्ही करावा, धरितो मी पाय
सांगा मी तरि करु काय?

(गाणे)

हृदयि मम भरतभूमि ‘जा’ वदे मला
‘जा’ वदे मला
घरि बसणे हा न गमे मार्ग मज भला
मार्ग मज भला
भारतभू मारि हाक
‘ये सेवेसाठि ठाक
करी मद्दास्यास खाक
पुसुन टाक मत्कलंक
उठूनिया मुला’
हृदयि मम भरतभूमि ‘जा’ वदे मला
‘जा’ वदे मला
भारतमातेच्या हाकेला ओ न कसा देऊ
कैसा घरामध्ये राहू?

बाप: तत्त्वज्ञाने तुझी नको तू मजला शिकवाया
येथून शीघ्र काढ पाया
मोठ्या गप्पा नकोत मजला येथुन चल निमुट
ऐके वदतो जी गोष्ट
बापाचा ना राग तुझ्या का ठाउक रे तुजला
चल निघ उचल पाऊलाला
खपणार मुळी नाही मजला तव वेडे चाळे
चल तू घरी ब-या बोले
गाठ असे बघ माझ्यापाशी ध्यानी धरि नीट
चल, बघ घरास तू थेट

नायक: ठार करा परि मी ना येइन घरास माघारा
तनु ही तुमची तुम्हि मारा
देहास तुम्ही माराल परी मना न माराल
तनुचे करा हालहाल
घरे सोडशुनी असली जाऊ भारतभूमीत
हिंडू स्वतंत्र अम्हि मुक्त
चला, मुलांनो! गीत म्हणा रे, मी ना जाणार
होवो जे जे होणार.

बाप: फरफटीत मी नेइन ओढुन गुरापरी तुजला
तमाशा दिसेल जगताला
घरी ये खरा थोबाड तुझे पहा रंगवीन
इंगा तुला दाखवीन
बांधुन ठेविन माळ्यावरती चार दिवस तुजला
काहि न देइन खायाला
धरुन बकोटी नेइन ओढुन काय पाहतोसी
चल बघ अपुल्या भवनासी
चल घरि, पोरा! कुठे जाशि रे पोरा! फिर मागे
आता शेवटचे सांगे

नायक: गांधि महात्मा पिता आमुचा सकळहि बाळांचा
धरितो पंथ अम्ही त्यांचा
भरतभूमि ही माय माउली आम्हां बाळांची
सेवा सदैव करु तीची
चला, मुलांनो! गीत म्हणा रे देशाचे दिव्य
करु या कृति सुंदर भव्य
चला, काय रे बघता? बाबा जातील माघारे
म्हणु या दिव्य गीत सारे

बाप: तमाशा न मी जगास इच्छित दावाया पोरा
परि करि विचार मनि सारा
पुन्हा न तुजला घरात घेइन दावु नको वदन
माझे बंद तुला सदन
मी न कुणि तुझा, तू न माझा, ऐसे समजावे
ध्यानी नीट, आणि जावे
मेला माझा मुलगा म्हणुनि साखर वाटीन
माझे बंद तुला सदन

नायक: बाबा! तुम्ही पूज्य मला जरि मज ना राहवते
जाणे भाग मला पडते
दारावरुनी झेंडा जाई तो मज बोलावी
जणु तो बोटाने खुणवी
झेंडा मजशी किती बोलतो, मारी मज हाक
माझे मलाच ठाउक
घरात आता ना माझ्याने बसवे क्षणभरही
डसती विंचु तसे होई
रागावा, ना बाबा! घ्या ना घरात, परि हृदय
राहो सदैव ते सदय
मनी तरि म्हणा, जनात न जरी ‘बाळक गुणवंत
माझा धृवचिलयामित्र’
भीती तुम्हां जरि माझी वाटे, तरि सत्संबंध
सोडा असो प्रेमबंध
‘मिळो न खाया परी असो हा चित्ती भगवान’
वदला तुकाराम धन्य
‘मिळो न खाया मरु उपाशी सत्त्व न परि गमवू’
वदला हरिश्चंद्र राऊ
परि जाऊ दे त्या हो गोष्टी, मी ना येईन
तुमचे घर न बाटवीन
हृदयसदन परि असो मोकळे, द्यावी ही भीक
मागत मी ना आणीक
नका घेउ हा बाळक अपुल्या घरात माघारा
देऊ नका तिथे थारा
मी न तुम्हाला सतावयाला घरात येईन
घेतो चरणांची आण
सांगा आईस, बाबा! माझे प्रणाम सप्रेम
करितो मातृभूमिकाम
आईची मज आइ बोलवी काय वदू फार
येई लोचनांत नीर
मनात तुमचे कृतज्ञतेने भक्तीने स्मरण
करिन स्त्रवतिल मन्नयन
कुठे तरी मी बसेन जोवर जीवन राहील
थारा भारत देईल
विशाल अंबर वरी, धरित्री खालि पसरलेली
प्रेमे स्नेहे भरलेली
दमलेले हे मदंग, बाबा! तिजवर टाकीन
जाइन आनंदे निजून
कंदमुळे मी खाइन देतिल फळे वृक्षराज
माझी राखितील लाज
कधी कधी मी गोड कोवळ्या बोख्या खाईन
चिंता काही न मी करिन
अडुळशाचि ती फुले तशी ती फुले अगस्त्याची
देतिल मधु मज मध साची
भारतभूमी समृद्ध सुंदर देइल खायास
फळमुळ अथवा पाल्यास
खाइन पाला कृतज्ञतेने मानिन मोदास
कंठिन सुखे जीवनास
नद्या, झरे ते देतिल पाणी स्फटिकासम छान
सांभाळितील मत्प्राण
वारा मजला वारा घालिल हरील मम शीण
पल्लव सुंदर पांघरिन
भारतमाता पडू न देइल कसलीही वाण
घरि परतून न येईल
घरात घ्यावे न मला,वाटे जरि मी अपराधी जो मी देशकार्य साधी
माघारा मज घेउ नका जरि तुमचे नुकसान
उघडे असो हृदयसदन
मातेहूनी स्वपित्याहूनी देव देश थोर
मजला देशाचा घोर
मातृभूमिची सेवा करिता तुमचीही सेवा
होते, कळे देवदेवा
मुलावरी या प्रेम असू दे, माया ठेवावी
माझी स्मृती असो द्यावी
काय किती मी सांगू, बाबा! उघडा मम हृदय
तेथे दिसेल भूमाय
हनुमंताच्या हृदयामाजी सदा रामराय
हृदयी मम भारतमाय
तुमच्यास्तवही आहे हृदयी भरलेले प्रेम
पहिले परी देशकाम
घ्या शेवटचा नमस्कार हा सविनय सप्रेम
धरितो भवत्पादपद्म
चला, मुलांनो! म्हणा गीत रे भारतमातेचे
आपण तत्सुत तेजाचे
चला, म्हणा रे ध्वजगीताते, जनता-चित्तांत
निर्मू स्फूर्तीचा झोत
मुले लागली गीत म्हणाया बाप बघे रागे
नायक परि न बघे मागे

‘झेंडा भारतमातेचा हा आला फडफडत
झळकत तेजे विक्रांत
झेंडा उन्मत्तांना नमविल दीना सुखवील
झेंडा जुलुम संहरील
झेंडा देइल राष्ट्राला या दिव्य स्वातंत्र्य
झेंडा हरिल पारतंत्र्य
झेंडा भारतमातेचा हा भाग्यवंत आला
बोला जय भारत बोला’

मुले निघाली गात, राहिला पिता तेथ बघत
गात्रे क्रोधे थरथरत
वृद्ध तिथे तो होता तो मग पित्याजवळ गेला
बोले सौम्य वचे त्याला
“आपण झालो पिकली पाने उपयोग न अपुला
आता राम राम बोला
नवी पिढी ही पुढेच जाइल, त्यातच आनंद
मानू, घालु न निजबंध
गुलाम न करू प्रेमे अपुल्या, देऊ मोकळीक
करोत उड्डाण विशंक
आशीर्वादा त्यांना देऊ करोत सत्कार्य
आपण भारतीय आर्य
चला, फिराया जाऊ आपण दोघे म्हातारे
बोलू मनातील सारे
दिन मावळला टेकडीवरी बैसू जाऊन
झालो पिकलेले पान”

म्हातारे ते गेले, गेली मुले गीत गात
आला भाग्योदय खचित
बाळे जी जी गाणी गातिल, गोष्टी करितील
जे जे खेळ खेळतील
भविष्यकाळाचे ते असते त्यातच सदबीज
आली जवळ भाग्यबीज
स्वतंत्र होइल, सुंदर होइल भारत हा खचित
लवकर सत्य सत्य सत्य


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, सप्टेंबर १९३१

एकच वेड

मातृभूमि! माझ्या चित्ता एक वेड लागे
मायभूमि! चिंतनि तव गे जीव नित्य जागे
झोपबीप न सुचे माते हायहाय वाटे
हीन दीन त्वस्थिति बघुनी अंतरंग फाटे।।

काय आइ! करू मी कोठे जाउ गे त्वदर्थ
परतंत्र्य पाहून वाटे जन्म सर्व व्यर्थ
चित्त वित्त बुद्धी माझी देह हा मदीय
जरी तुझ्या कामी येती धन्य धन्य होय।।

मला सदा वाटे द्यावे सर्वही त्वदर्थ
तुला वैभवावर नेता होउ दे मदस्त
देह इंद्रिये ही सारी सर्वदा खपावी
त्वदुद्धारकार्यी आई धन्य धन्य होय।।

तुझ्या ध्यानरंगी रंगो हे मदंतरंग
मुखी वसो गोड तुझ्या सत्कीर्तिचे अभंग
हात पाय बुद्धि अखंड श्रमो त्वदुद्धारा
दूर करिन झिजुनी झटुनी पारतंत्र्यभारा।।

थोर महात्म्यांना जे जे स्फुरति गे उपाय
आचरेन न गणीन मनी संकटे अपाय
तुझा शिपाई मी आई ‘का’ न मी म्हणेन
पुढे घुसुन धारातीर्थी झुंजता पडेन।।

घाव घालण्याला उत्सुक, शृंखला तुझ्या मी
तोडुनी, तुला चढविन गे आइ! मोक्षधामी
तुझ्यासाठि आई! लाखो सुत तुझे खपोत
तुझ्या शृंखला भंगू दे अंगि ना खुपोत।।

विपत् तुझी जाइल विलया दैन्य हे हरेल
तेज दिव्य त्वन्मुखकंजी माउली! फुलेल
कलाज्ञानवैभवयोगे आइ! शोभशील
निकट विश्व घेशिल राष्ट्रे सर्व हर्षतील।।

धन्य तो न दिन येइल का जो असे मदायु?
न यो, त्वदुद्धारी परि मज्जन्म सर्व जाऊ
आइ! सर्व जीवन तुझिया अर्पिले पदाला
हा विचार देइल अंती शांति मन्मनाला।।

तुझ्या पोटि जन्म पुन्हा मी घेइन प्रमोदे
पुन: पुन्हा जन्मुन सेवा करुनिया मरु दे
आइ गोड सेवा तव गे अमृतमधुर मेवा
प्रभो! देइ जन्मोजन्मी मला मातृसेवा।।

मातृसेवनाविण देवा! मागणे न काही
एक मात्र आनंद असे मजसि हाच पाही
चंदनापरी मदगात्रे सर्वदा झिजू दे
अहर्निश श्रमुनी श्रमुनी शांतिने पडू दे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

स्वातंत्र दिव्यदर्शन!

अजि घुमघुमली स्वतंत्रतेची भेरी
दुमदुमली दुनिया सारी
अजि राष्ट्राने स्वतंत्रतेची केली
घोषणा धीर या काळी
अजि राष्ट्राने सर्व शृंखला अपुल्या
तोडुनिया फेकुन दिधल्या
अजि राष्ट्राने गुलामगिरिचे पाश
फेकियले दाहि दिशांस
तरि उठा उठा हो सारे
जयनादे गगन भरा रे
निज झोप सर्व झाडा रे
जयघोष करा कोण तुम्हाते वारी
दुमदुमली दुनिया सारी।।

निज राष्ट्राने आज मांडिले ठाण
घ्या हाति सतीचे वाण
व्हा सिद्ध तुम्ही प्राणार्पण करण्याते
त्यागाविण काहि न मिळते
सूं येणा-या बंदुकिच्या गोळ्यांना
सुकुमार फुलांसम माना
निज छातीला निष्कंप करा झेला
तोफेचा तीवर गोळा
डोळ्यांत विजेचे तेज
लखलखो तुमचिया आज
प्राणांचे घाला साज
त्या स्वतंत्रदेवीच्या शुभ शरिरी
दुमदुमली दुनिया सारी।।

बहुधन्य तुम्ही यशस्वी करा काज
देशार्थ मरोनी आज
अजि सुख माना धन्य आपणा माना
की देता येतिल माना
या मातेला मोक्षामृत ते द्याया
अर्पा या अपुली काया
श्रीशिव बाजी तानाजी जनकोजी
तत्त्याग दाखवा आजी
कष्टांची पर्वा न करा
हालांची पर्वा न करा
प्राणांची पर्वा न करा
ही संधी असे आली सोन्यासारी
दुमदुमली दुनिया सारी।।

हे पहा किती करुण तरणि-तेजाळ
हे सजले कोमल बाळ
हे स्वतंत्रतेसाठी सारे उठले
अभिनव-नवतेजे नटले
तुम्ही धन्य खरे धन्या तुमची माय
हर्षेल आज शिवराय
हे तरुणांनो तेजस्वी वीरांनो
बाळांनो सुकुमारांनो
पाहुनी तेज हे तुमचे
मन खचेल त्या काळाचे
ते रविकर फिक्कट साचे
व्हा आज पुढे मोक्ष येतसे दारी
दुमदुमली दुनिया सारी।।

त्या लहरींच्या लहरी पाठोपाठ
सागरात उठति अलोट
त्या ज्वाळांच्या ज्वाळा पाठोपाठ
वणव्यात नाचती दाट
त्यापरि तुम्ही टिप्परघाई खेळा
ही स्वातंत्र्याची वेळा
घरदार अता सारे राहो दूर
भारतभू करणे थोर
मरण्याला उत्सुक व्हा रे
मोक्षास्तव उत्सुक व्हा रे
हालास मिठी मारा रे
भय कोण तुम्हां दवडिल जगि माघारी
दुमदुमली दुनिया सारी।।

या ललनाही मरण्यासाठी आल्या
मर्दानी झाशीवाल्या
अम्हि ना अबला जगता हे कळवाया
देशास्तव उठति मराया
निज बांधिति त्या धैर्ये शौर्ये पदर
करिती ना कुणाची कदर
त्या पहा पहा वीरांपरि हो सजल्या
जगताच्या दृष्टी थिजल्या
पाजावे बाळा ज्यांनी
न्हाणावे बाळा ज्यांनी
प्रेमात रमावे ज्यांनी
त्या मरणाला कवटाळिति ह्या नारी
दुमदुमली दुनिया सारी।।

कवि मरणा ना भारतकन्या डरती
मरणाते मारुन जाती
ती सावित्री मरणासन्मुख ठाके
मनि यत्किंचितहि न धोके
ती असुराशी लढते भास्वर भामा
रामासम लढली रामा
ती संयुक्ता दिव्य पद्मिनीदेवी
खाईत उडी ती घेई
ती उमा लढाया जाई
ती रमा सती हो जाई
ती लक्ष्मी तळपत राही
ही परंपरा राखिति भारतनारी
दुमदुमली दुनिया सारी।।

या मातेच्यासाठी मरण्यासाठी
उठु देत बाळके कोटी
ते धैर्याने मरण मानु दे खळ
मोक्षाची आली वेळ
निज कष्टांनी स्वातंत्र्याते आणू
मोक्ष असे मरणे जाणू
ते मज दिसते दिव्य असे स्वातंत्र्य
तो भारत दिसतो मुक्त
ते दर्शन दिव्य बघा रे
सत्प्रतिभा दाविल सारे
ही दिव्य दृष्टि तुम्हि घ्या रे
ते दृश्य पहा, ऐका ती ललकारी
दुमदुमली दुनिया सारी।।

ते अवनिवरी सुरवर-मुनिवर आले
पुण्यात्मे सारे जमले
ते श्रीराम श्रीकृष्णार्जुन येती
शिबि हरिश्चंद्र ते येती
ते वाल्मीकि व्यास मुनीश्वर आले
सनकादिक ऋषिवर आले
ते बुद्ध पहा महावीरही दिसती
शंकराचार्य लखलखती
ते पृथ्विराज दिसले का
ते प्रताप तरि दिसले का
शिवछत्रपती दिसले का
ते सर्व पहा आले पुण्याकारी
दुमदुमली दुनिया सारी।।

श्रीभारतभू मंगलासनी बसली
ती अपूर्व सुंदर दिसली
रवि कोटि जणू एके ठायी मिळले
तत्तेज तसे लखलखले
किति वाद्ये ती मंगल वाजत गोड
या प्रसंगास ना तोड
किति हार तुरे मोती माणिक-राशी
मातेच्या चरणांपाशी
अभिषेक कराया उठती
स्वातंत्र्यमंत्र ते म्हणती
‘ॐ समानी व आकूति:’
ती अभिषिक्ता जननी शोभे भारी
दुमदुमली दुनिया सारी।।

ते वस्त्र पहा दिव्य अमोलिक दिधले
परिधान जननिने केले
ती रत्नांचे अलंकार ते ल्याली
भारतभू तेजे फुलली
ते सप्तर्षी नक्षत्रांचे हार
अर्पिती अमोलिक फार
त्या दाहि दिशा तत्तेजाने धवल
धवळले विश्व हे सकळ
सर्वांनी भेटी दिधल्या
मेरुपरि राशी पडल्या
सुख-कथा अपूर्वा घडल्या
ती श्रुति तेथे शांतिगीत उच्चारी
दुमदुमली दुनिया सारी।।

त्या पतिव्रता स्वर्गामधुनी येती
श्रीसीता श्रीसावित्री
त्या भारतभूमातेची शुभ भरती
प्रेमाने मंगल ओटी
शुभ शंखादी वाद्ये मंगल झडती
ध्वनी अनंत तेथे उठती
जयघोषाची एकच झाली टाळी
आनंदे सृष्टी भरली
अक्षता स्वपुण्याईची
पिंजर ती पावित्र्याची
घेऊन करी निज साची
त्या थोर सती लाविति भारतभाळी
दुमदुमली दुनिया सारी।।

मग सकळ मुले-मुली आइच्या जवळी
आली त्या प्रेमे कवळी
ती झळंबली प्रेमे मातेलागी
बिलगली आइच्या अंगी
ते देवमुनी मुलांस आशीर्वाद
देतात धन्यतावाद
सत्कन्यांची सत्पुत्रांची आई
शोभते भरतभू माई
आनंदाश्रूंचे लोट
प्रेमाश्रूंचे लोट
खळखळा वाहती तेथ
किति सुख पिकले देव भारता तारी
दुमदुमली दुनिया सारी।।




कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९३०

भारतातील मुले

(एक अविवाहित तरुण भगिनी स्वत:ला उद्देशून म्हणते)

भारतात या नसे मुलांचा तोटा तो तिळभरी
नाही वाढविणारा परी
विचारहीनापरी वागती मायबाप बापुडे
बघति न काय मुलांचे घडे
बाळे घरात खंडीभर
नाही वस्त्रहि अंगावर
नाही खायाला भाकर
विचारमेवा दूर राहिला, रोगी अति चिरचिरी
बाळे दिसती किति घरोघरी।।

कशास तरि तू विवाह करिशी, आधिच जे बाळक
त्यांची होई तू पाळक
त्यांची होई खरीखुरी तू माता प्रेमाकरा
निर्मी निर्मळ सेवा-झरा
ठायीठायि अभागी मुले
जैशी किड्याने खाल्ली फुले
बघुनी अंतरंग हे उले
जा ते बाळक जलळी घेई प्रेमाने सत्वरी
होई त्यांची जननी खरी।।

भारतमातेच्या बागेतिल सुमने ही विकसवी
सजवी नटवी तू हासवी
खाया देई, ल्याया देई, मनोबुद्धी वाढव
यातच जावो जीवन तव
याहुन धन्य काय अन्य ते
फुलवी फुल जरि कुणि एक ते
प्रभुपद त्याला ते लाभते
हाचि धर्म गे हाचि मोक्ष गे ध्येय अंतरी घरी
या सेवेसी न दुजी सरी।।

(ती पुढील ध्येय निश्चित करते.)

गरीब कोणी कुणबी हमाल। तदीय संवर्धिन गोड बाळ
तयास मी सुंदर वाढवीन। फुलांपरी निर्मळ मी करीन।।
तयास मी घालुन न्हाण नित्य। तयास मी देइन स्वच्छ वस्त्र
तयास साधी शिकवीन गाणी। न घाण देईन पडूहि कानी।।
तयास नेईन सदा फिराया। नदीतटाकी, गिरि वा चढाया
तयासवे खेळ मुदे करीन। तयाविणे कोणि जणू मला न।।
मुलेच माझे बनतील देव। करीन तत्पूजन मी सदैव
मुलांस संवर्धुन भारताच्या। पडेन पायावरती तयाच्या।।
कळ्या मुक्या या प्रिय भारताच्या। विकासवोनी चरणी तयाच्या
समर्पुनी प्रेमभरे, मरेन। सुखे प्रभूच्या चरणी मिळेन।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

महाराष्ट्रास!

महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा शत्रुमर्मी रोवुनी
सिंहसा तू साज शौर्य ठाक तेजे खवळुनी।।

दिव्य गाणी विक्रमाची दुर्ग तूझे गाउनी
अंबरस्थां निर्जरांना हर्षवीती निशिदिनी।। महाराष्ट्रा...।।

दरीखोरी खोल, गेली वीररक्ते रंगुनी
शेष ती संतोषवीती त्वद्यशाला गाउनी।। महाराष्ट्रा...।।

अंबुराशी करित सेवा त्वत्पदा प्रक्षाळुनी
त्वत्कथेला दशदिशांना ऐकवीतो गर्जुनी।। महाराष्ट्रा...।।

म्लानता ही दीनता ही स्वत्त्वदाही दवडुनी
स्वप्रतापे तळप तरणी अखिल धरणी दिपवुनी।। महाराष्ट्रा...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

भारतमाता माझी लावण्याची खाण!

(नाचून म्हणावयाचे गाणे)

भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
करिन तिचे ध्यान, मी करिन तिचे ध्यान
भारतमाता माझी लावण्याची खाण
प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण
भारतमाता माझी लावण्याची खाण।।

मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, मी देइन माझे प्राण
हातात घेतले आहे सतिचे मी वाण।। गाइन...।।

जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रुढिरान, मी छाटिन रुढिरान
हसवीन आइचे जे मुख झाले म्लान।। गाइन...।।

उडविन दाणादाण, मी उडविन दाणादाण
करिन धूळधाण, मी करिन धूळधाण
स्वातंत्र्य-विरोधकां देतो मी आव्हान।। गाइन...।।

विसरेन देहभान, मी विसरेन देहभान
कापुन देइन मान, मी कापुन देइन मान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान।। गाइन...।।

नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, मी काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान।। गाइन...।।

सर्वस्वाचे दान, करिन सर्वस्वाचे दान
घेतो आज आण, मी घेतो आज आण
मातेला घडविन माझ्या मोक्षामृतपान।। गाइन...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

राणा प्रताप

स्वातंत्र्यसूर्य राणा। चित्ती प्रताप आणा
चारित्र्य दिव्य त्याचे। त्याचा अभंग बाणा
रजपूत पूतकीर्ती। कुळशील बाटवीत
परि थोर पूर्वजांची। राखी प्रताप नीती
तो मानसिंग तैसे। दुसरेहि अन्य मोठे
स्वार्थांध होउनीया। ठरले जगात खोटे
अभिमानशून्य झाले। रिपुगौरवास गाती
स्वकरीच पूज्य धर्मा। देतात मूठमाती
स्वार्थांदि नीचवृत्ति। याचाच पंक माजे
परि त्यामधून दिव्य। रमणीय पुष्प साजे
रजपूतभूमिपंकी। कमनीय दिव्य गंध
कमल प्रताप एक। दे भूस सौख्यकंद
सर्वत्र अंधकार। भरला भयाण घोर
त्यात प्रताप शोभे। शुभकांति चंद्रकोर
रिपु-सैन्यसागरात। भूमाय तारण्याला
धैर्य प्रताप एक। नौका अभंग झाला
जयमत्त शत्रु मागे। लोटावया न कोणी
परि एकटा प्रताप। ठाके सुरेंद्रवाणी
समरात सेलिमाला। दावून दिव्य भाला
तत्तेज हारवीले। निस्तेज शत्रु केला
हळदीत खळखळाट। रिपु-रक्त वाहवीले
निज अल्प सैन्य तरिही। आश्चर्य थोर केले
केले अनंत कष्ट। रानावनात गेला
निज शत्रुशी सदैव। लढण्यात जन्म नेला
विख्यात सत्कुलाची। ती कीर्ति निष्कलंक
राहो, म्हणून मानी। झाला प्रताप रंक
घेईन ना जरी मी। मत्प्राण तो चितोड
पेंढ्यावरी निजेन। कोंडाच अन्न गोड
सुखभोग सर्व वर्ज्य। रिपु जो धरी चितोड
करुनी अशी प्रतिज्ञा। पाळी न त्यास तोड
सिंहासमान शूर। मेरुपरी सुधीर
भीष्मापरी प्रतिज्ञा। पाळीत थोर वीर
आपत्ति घोर आल्या। तरि त्या न तो जुमानी
तारामती पतीच्या। सम सत्त्व स्वत्व मानी
निजा-मायभूमि-सेवा। करिता, न ते कुटुंब
स्मरले, सदैव हृदय। भू-भक्तिने तुडुंब
स्वातंत्र्य-रक्त वीरा। रिपु-दुर्जया सुधीरा
देवी-स्वतंत्रतेच्या। कंठामधील हिरा
स्मरण प्रभावशाली। तेजस्वि त्वत्कृतीचे
देशास जोवरी रे। भय तो न ते मृतीचे
त्वन्नाम दिव्य-मंत्र। उठवील भारताला
देईल दिव्य शक्ति। अर्पील वैभवाला
स्वातंत्र्यरक्त जीवा। त्वन्नाम स्फूर्ति देई
स्वार्थादि नीच वृत्ति। सगळ्या लयास नेई
भ्याडां करील शूर। नि:सत्त्व चेतवील
उठवील धूलीपतिता। त्वन्नाम दिव्य-शील
तू लाज भारताची। तू आस भारताची
चंद्रार्क जोवरी तो। तू कीर्ती भारताची


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

महात्माजींस

विश्वाला दिधला तुम्हीच भगवन् संदेश मोठा नवा
ज्याने जीवन सौख्यपूर्ण करणे साधेल या मानवा
ते वैराग्य किती! क्षमा किति! तपश्चर्या किती! थोरवी
कैशी एकमुखे स्तवू? मिरवता भास्वान् जसा तो रवी।।

आशा तुम्हि अम्हां सदभ्युदयही तुम्हीच आधार हो
ते चारित्र्य सुदिव्य पाहुनि अम्हां कर्तव्यसंस्फूर्ति हो
तुम्ही भूषण भारता, तुमचिया सत्कीर्तिची भूषणे
हे त्रैलोक्य धरील, धन्य तुमचे लोकार्तिहारी जिणे।।

बुद्धाचे अवतार आज गमता, येशूच किंवा नवे
प्रेमाभोधि तुम्ही, भवद्यश मला देवा! न ते वानवे
इच्छा एक मनी सदा मम भवत्पादांबुजा चिंतणे
त्याने उन्नति अल्प होइल, अशी आशा मनी राखणे।।

गीता माझि तुम्ही श्रुतिस्मृति तुम्ही तुम्हीच सत्संस्कृति
त्यांचा अर्थ मला विशंक शिकवी तो आपुली सत्कृती
पुण्याई तुम्हि मूर्त आज दिसता या भारताची शुभ
धावे दिव्य म्हणुनी आज भुवनी या भूमिचा सौरभ।।

तुम्ही दीपच भारता अविचल, प्रक्षुब्ध या सागरी
श्रद्धा निर्मितसा तुम्हीच अमुच्या निर्जीव या अंतरी
तुम्ही जीवन देतसा नव तसा उत्साह आम्हां मृतां
राष्ट्रा जागविले तुम्ही प्रभु खरे पाजूनिया अमृता।।

तुम्ही दृष्टी दिली, तुम्ही पथ दिला, आशाहि तुम्ही दिली
राष्ट्रा तेजकळा तुम्ही चळविली मार्गी प्रजा लाविली
त्या मार्गे जरि राष्ट्र सतत उभे सश्रद्ध हे जाइल
भाग्याला मिळवील, भव्य विमल स्वातंत्र्य संपादिल।।

विश्रांति क्षण ना तुम्ही जळतसा सूर्यापरी सतत
आम्हाला जगवावया झिजविता हाडे, सदा राबत
सारे जीवन होमकुंड तुमचे ते पेटलेले सदा
चिंता एक तुम्हां कशी परिहरु ही घोर दीनापदा।।

होळी पेटलिसे दिसे हृदयि ती त्या आपुल्या कोमल
देऊ पोटभरी कसा कवळ मदबंधूंस या निर्मळ
ह्याची एक अहर्निश प्रभु तुम्हां ती घोर चिंता असे
चिंताचिंतन नित्य नूतन असे उद्योग दावीतसे।।

कर्मे नित्य भवत्करी विवध ती होती सहस्त्रावधी
ती शांति स्मित ते न लोपत नसे आसक्ति चित्तामधी
शेषी शांत हरी तसेच दिसता तुम्ही पसा-यात या
सिंधु क्षुब्ध वरी न शांति परि ती आतील जाई लया।।

गाभा-यात जिवाशिवाजवळ ते संगीत जाले सदा
वीणा वाजतसे अखंड हृदयी तो थांबतो ना कदा
झोपे पार्थ तरी सुरुच भजन श्रीकृष्ण श्रीकृष्णसे
देवाचा तुमचा वियोग न कदा तो रोमरोमी वसे।।

वर्णू मी किति काय मूल जणु मी वेडावते मन्मती
पायांना प्रणति प्रभो भरति हे डोळ्यांत अश्रू किती
ज्या या भारति आपुल्यापरि महा होती विभूती, तया
आहे उज्ज्वल तो भविष्य, दिसते विश्वंभराची दया।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-अमळनेर, १९२६

खरे सनातनी

मी मांडितसे विचार साधे सरळ
हे अमृत नसे हे गरळ
मी सनातनी धर्माचा सदभक्त
मी पूजितसे ऋषिसंत
निज संस्कृतिचा अभिमान असे माते
मी पूजित भूमातेते
निज संस्कृति व्हावी थोर
ती होवो ना अनुदार
हो एकच मजला घोर
मी नम्रपणे वदतो ओतुन हृदय
तुम्हि ऐका सारे सदय।।

ज्या नवनव हो सतत पल्लव फुटती
त्या सनातन असे म्हणती
जे नवनव हो ज्ञान शुभंकर येते
तो वेदच माते गमते
तो वेद असे अनंत, हळुहळु मूर्त
होऊन दिसे जगतात
नवविचार मी घेईन
मी पुढतिपुढति जाईन
सौंदर्यसिंधु जोडीन
जो ज्ञानाला सादर सतत घेई
तो खरा सनातनी होई।।

जे नित्य नवे सनातन तया वदती
जीर्णा न सनातन म्हणती
श्रीगीतेचे नित्य नवीनच सार
ज्ञानेश्वर म्हणती थोर
ती वाढ पुरी ज्याची झाली त्याते
मरण्याचे केवळ उरते
सद्धर्म सदा वाढेल
नवनविन रंग दावील
नव अर्थ अंगिकारील
हे वाढतसे सदैव जीवनशास्त्र
तद्विकास असतो होत।।

त्या शब्दांचा अर्थ वाढतो नित्य
तो अनंत असतो अर्थ
त्या यज्ञाचा बघा तुम्ही इतिहास
किति झाला अर्थ-विकास
जन मरताती कल्पना न परि मरते
ती सतत वाढत जाते
ते विचार होती खोल
होतील कल्पना विमल
हा विकास सकक सकल
जगि चालतसे मानव जातो पुढती
मुंगीपरि जरि ती प्रगती।।

ते ठरले ना अजुनि जीवनी काही
सिद्धांत ना एकहि पाही
जगि हितकर ती हिंसा अथवा प्रेम
ना झाला अजुनि नेम
ते सत्य सदा पूजावे वा अनृत
अद्याप न मत निश्चित
हे प्रयोग सारे अजुनी
करितात महात्मे झटुनी
का बिळात बसता घुसुनी
निजबुद्धीला स्वतंत्र करुनी उठणे
नवरंगे उत्कट नटणे।।

हे बाल्यदशेमाजी जीवनशास्त्र
ना निश्चित काही त्यात
ज्याबद्दल ना शंका तिळभर कोणा
जगि ऐसे काहि दिसे ना
तो घेउनिया सादर पूर्वानुभव
संपदा ज्ञानास नव
ते पूर्वज सर्वज्ञानी
जरि म्हणाल तुम्ही कोणी
ते हसतिल तुम्हां वरुनी
ते फरक सदा होते देखा करित
ऋषि ऋषिला नाही मिळत।।

तो मागतसे देवा विश्वामित्र
मति सतेज निर्भय मुक्त
तो गायत्रीमंत्र सनातन दिव्य
मागतसे बुद्धी भव्य
तो धर्माचा पाया म्हणता वेद
वेदार्थे ज्ञानच सिद्ध
ज्ञानासम पावन नान्य
ते मिळवुन व्हा रे धन्य
परि घरात बसता घुसुन
जो घरि बसला त्यास मिळे ना काही
त्या एकच मरणे राही।।

तुम्हि उघडा रे बंधूंनो निज डोळे
ना अंध असावे भोळे
जे इतर जगी थोर विचारा करिती
जे प्रयोग नव दाखविती
तुम्हि त्याचाही विचार सादर करणे
उपयुक्त असे ते घेणे
ज्ञानाचा मक्ता न कुणा
अधिकार सर्व राष्ट्रांना
अभिमान देतसे मरणा
ते ऋषिमुनि ना केवळ येथे झाले
हे बघणे उघडुन डोळे।।

हे कलियुग ना सत्ययुगचि हे माना
प्रभुच्या न करा अपमाना
जो रवि उगवे तारा ज्या लखलखती
ते तेज न त्यांचे कमती
हे कलियुग ना गंगा पावन तीच
फळपुष्प तरु हे तेच
प्रत्येक दिवस जो दिसतो
तो अनंततेतुन येतो
पावित्र्ये तिळ ना कमि तो
तो मूर्खपणा बाष्कळपण ते सोडा
सद्विचार नवनव जोडा।।

ते ऋषिमुनि हो काय एकदा झाले
ते काय आज ना उरले
ते पुन:पुन्हा ऋषिमुनि अवतरतात
भुवनात सदा सर्वत्र
तो लेनिन तो तैसा सन्यत्सेन
हे ऋषीच जनतामान्य
नव मंत्र जगा जो देई
नव तेज जगा जो देई
वैषम्य लयाला नेई
तो ऋषि जाणा जाणा तोची संत
तुम्हि उघडा अपुले नेत्र।।

श्रीज्ञानेशे संस्कृतातले ज्ञान
सर्वांस दिले वाटून
श्रीनाथांनी चालविले ते काम
परि त्यांना छळिती अधम
ती ज्ञानाची खुली कराया दारे
झगडले संत ते सारे
तुम्हि अनंत छळिले त्यांना
परि आज देतसा माना
ह्या गोष्टी ध्यानी आणा
त्या संतांचे काम चालवा पुढती
सर्वांना देण्या मुक्ती।

ह्या भारतभूमाजी आजहि संत
आहेत करु नका खंत
हे संत खरे गांधी पावनचरित
दीनास्तव सतत झिजत
तो धर्म खरे त्यांनाच कळे सत्य
जे गीता आचरतात
अंबरांबुधीचे कळते
गांभीर्य कुणाला जगि ते
बुडि घेत उडत वा त्याते
सद्धर्माचा गाभा संतच मिळवी
तो पंडित साली चघळी।।

ती पांघरुनी शालजोडि जे बसती
प्रेमा न जगा जे देती
जगि अन्याया पाहुन जे ना उठती
जे वैषम्ये ना जळती
जगि दास्याला दंभा दैन्य बघुन
उठतात न जे पेटून
त्या जडां कळे का धर्म?
त्या मृता कळे का वर्म?
जे घोकित बसती धर्म
तो धर्म कळे आचरतो जो त्यास
ना धर्म कळे इतरांस।।

निज धर्माला ओठावर ना मिरवा
सतत्त्वे जीवनि जिरवा
तुम्हि प्रेम करा विचार करणे नित्य
जगतात बघा सर्वत्र
या देशाला दिवस चांगले आणा
नव मंगल मिरवा बाणा
बंधुता जीवनी येवो
तो विचार हृदयी येवो
ते धैर्य कृतीचे येवो
सतज्ञानाने सत्करणीने मिळवा
गेलेल्या अपुल्या विभवा।।

निजधर्माचे करा मुख तुम्ही उजळ
मति उदार होवो विमल
ज्या बंधूंचे छळण आजवर केले
पशुहून नीच ज्या गणिले
त्या अस्पृश्या हरजन पावन म्हणणे
प्रेमाने हृदयी धरणे
आचारी येवो समता
प्रेमाची वाहो सरिता
दंभाची न उरो वार्ता
तुम्हि संसारी अंध-धी न रे व्हावे
मति हृदय निज न मारावे।।

ती सोडावी क्षुद्र सकल आसक्ती
ध्येयाची लागो भक्ती
तुम्हि मानव्या उठणे पूजायास
निज मोक्षहि मिळवायास
निज कातडिला न कुणी कुरवाळावे
ध्येयास्तव सर्वहि द्यावे
सत्तेज भारती भरु दे
सदभाव भारती भरु दे
सदविचार रवि उगवू दे
ती संपू दे कार्पण्याची रजनी
राहोत कुणी ना निजुनी।।

हे सनातनी सकळ खरे होवोत
ज्ञानाते मिठि मारोत
नव ऐकुनिया विचार हे नाचोत
नव करणीस्तव जागोत
हे वैषम्या दंभा दुरि नेवोत
त्यागाने हे तळपोत
यज्ञ हे सनातन तत्त्व
ज्ञान हे सनातन तत्त्व
मोक्ष हे सनातन तत्त्व
तुम्हि त्याग करा, ज्ञान वरा, व्हा मुक्त
व्हा खरे सनातन-भक्त।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-पुणे, फेब्रुवारी १९३५

सत्याग्रही (खंडकाव्य)

सत्याग्रही या नावाचे एक खंडकाव्य गुरुजींनी १९३० मध्ये त्रिचनापल्लीस असताना लिहिले होते. त्यातील जो भाग मबळ आवृत्तीमध्ये होतो तो येथे देत आहे.

थोडा संदर्भ : श्रीमंत आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वय अठरा वर्षांचे होते. त्याचं आठ-नऊ वर्षांच्या एका मुलीशी लग्न लागलेले होते. तो सत्याग्रहात स्वयंसेवक झाला होता. तो तुरुंगात

अतिसाराने मरण पावला. त्याच्या आजारपणाची तारही खेड्यात वेळेवर पोहचली नाही. मरणाचीच तार एकदम घरी गेली. आईबापांना जबर धक्का बसला. तो मृतपुत्र रात्रीच्या वेळी दिव्य वेष धारण करुन

आईबापांची समजूत काढण्यास येतो. रात्रभर विचारवार्ता करुन त्यांचे समाधान करुन प्रभात होताच परत जातो.

मातेचा शोक

कैसा बाळ निमाला
न दया भगवंताला।। कैसा....।।

‘लडिवाळा बाळा
बाळा वेल्हाळा
ये भेटायाला।।
तुजविण कोणि न मजला।। कैसा....।।

येशिल माघारा
माझ्या पाखरा
राजस राजकुमारा
धीर असा रे धरिला।। कैसा....।।

येशिल भेटाया
आशा ही सखया
होती मम हृदया
काळ कसा परि फिरला।। कैसा....।।

बाळा काय करू
प्राणा केवि धरू
शोका केवि करू
शोक सखा मम ठरला।। कैसा....।।

हे क्रूरा काळा
कैसा रे नेला
पाझर ना फुटला
घालिशि घोर घाला।। कैसा....।।

एकुलता बाळ
माणिक बिनमोल
मोती तेजाळ
दुर्दैवी मी अबला।। कैसा....।।

शून्य दिसे सृष्टी
माता मी कष्टी
भरते ही दृष्टि
अंत न पार न दु:खाला।। कैसा....।।

घेउ कुणा जवळ
देउ कुणा कवळ
बोलु कुणा जवळ
तव मुखचंद्र अंतरला।। कैसा....।।

मुख शशि न हसेल
हृदय न सुखवील
बोल ना रिझावील
राम न जीवनि उरला।। कैसा....।।

वत्साविण गाय
मोकलिते धाय
तळमळते गाय
प्राण जावया सजला।। कैसा....।।

सुख सगळे आटे
कंठ तिचा दाटे
हृदय तिचे फाटे
शरणागत ती मरणाला।। कैसा....।।

हंबरडा फोडी
सुस्कारे सोडी
बुडते हो होडी
करुणासागर भरला।। कैसा....।।

डोळे डबडबले
मानस गजबजले
अंतर गहिवरले
माता पडली धरणीला।। कैसा....।।

पित्याची स्थिती

(माता शोकाने धरणीवर पडते. जवळच पिता असतो, त्याची स्थिती)

पिता बैसलाहे शोकमग्न खिन्न
पुशीत नयन वारंवार
कालवाकालव हृदयी होतसे
सर्प जणू डसे अंतरंगी
धीर धरी परी पुन्हा येई नीर
डोळ्या लागे धार अनिवार
‘ध्यानी मनी बाळा नव्हते मरण
लौकर सुटून भेटशील
मरावयासाठी बाळ हा चालला
विचार न आला कधी मनी
मेघाची चातक चंद्राची चकोर
घनाची मयूर वाट पाहे
तृषार्तास जल क्षुधार्थास अन्न
तैसे होते मन तुझ्याकडे
तुझ्या वाटेकडे होते सदा डोळे
शतवार आले झाले बाळा
हाती रे माउली दिन ते मोजीत
घास नसे घेत अश्रुवीण
आठवण तिला क्षणाक्षणा यावी
सदगदित व्हावी वृत्ति बाळा
आशावेलीवरी वज्र रे कोसळे
हृदय हे जळे काय करु
कोणाचा आधार संसारी आम्हाला
तुझ्या या मातेला केण बाळा
कोणाला ती प्रेमे हाक मारील
हात फिरविल कोणावरुनी
बाळा कैसा काय गेलास टाकून
दोघांस लोटून दु:खपूरी
तुरुंगात माझ्या नको जाऊ बाळा
सांगितले तुला वारंवार
अश्रु मी ढाळिले पदर पसरीला
दृढनिश्चयाला वरिले तुवा
नाही तू ऐकीले तुरुंगी गेलास
होती परी आस भेटशील
भेटशील आम्हां सुखाचा सोहळा
पाहू आम्ही डोळा होती आशा
आता कसची आशा आकाश फाटले
हृदय दाटले माझ्या बाळा
आशेचे जळून झाले कोळसे
जळावीण मासे तैसे आम्ही
एक माझा बाळ तोही देव नेत
आम्हाला ठेवीत रडावया
आणि लग्न केले नुकते रे थाटाने
अभागी पित्याने बाळा तुझे
मांडोनी सोहळा मानिला आनंद
अभागी मतिमंद ठरलो परी
आठ वरुषांची लहानशी बाळा
जाणे ना मरणाला अजून जी
लग्न म्हणजे वाटे जिला एक खेळ
तोच आली वेळ वैधव्याची
वैधव्य ते काय मरण ते काय
संसार तो काय ना कल्पना
हसावे खेळावे सुखे खावे प्यावे
जनांनी म्हणावे विधवा तिला
मांडीवर जिने प्रेमाने लोळावे
जनांनी म्हणावे विधवा तिला
तिच्या जीवनाची आम्ही केली माती
कल्पना परी ती नाही तिला
तिच्या जीवनाची आम्ही केली राख
नाही ते ठाऊक परी तिला
मांडीवरी मान तिने ठेवियेली
आम्ही मुरगळिली रुढीदासी
रडताना आम्हा पाहुनी रडेल
परी न समजेल गंभीरता
मोडिली हो मान गोड या मैनेची
हृदयास जाची शल्य तीव्र
करोनीया आम्ही विवाहसोहळा
दाबियेला गळा कोकिळेचा
फुटेल जे कंठ गावया स्फुरेल
मैना ना काढील गोड शब्द
बाळ-कोकिळा ही मोठी जै होईल
मनात झुरेल अपरंपार
शोक-गीते सदा बाळा आळवील
टिपे ती गाळील टपटप
घळघळ अश्रुधार ती सोडील
हातांना जोडील जगन्नाथा
जळेल अंतरी जेव्हा का कळेल
मरणाचा खोल अर्थ तिला
जळेल अंतरी जेव्हा तो कळेल
विवाहाचा खोल अर्थ तिला
आग लागो आम्हा आग त्या रूढीला
बळी हो दिधला बाळिकेचा
काय आईबाप तिचे ते करतील
द:खाने जळतील क्षणाक्षणा
नयनांसमोर बाळेला पाहोनी
जातील जळोनी अंतरंगी
घेतील पोटाशी कन्या ती अजाण
अश्रूभरे स्नान घालितील
काय करि देवा कोठे तरी जाऊ
कोठे बाळा पाहू राजसाला
कशाला हा पैसा कशाला व्यापार
एक जो आधार तोही गेला
ज्याच्यासाठी केली आटाआटी
त्याशी ताटातुटी केली देवा
शोक-वन्हि आता जिवंत जाळील
प्राण न घेईल परी माझा
दाही दिशा ओस भरला अंधार
डोळ्यांना ही धार आता सदा
हिचे तरी केवी करु समाधान
देईल ही प्राण शोकवेडी
आम्ही दोघे आता कोणाकडे पाहू
एकमेकां दाउ दीन अश्रु
हाय काय झाले केवढा आकांत
केवढा आघात आम्हावरी’
मनी हे विचार मनी हे उदगार
मनावरी भार फार पडे
असह्य तो झाला वृक्ष उन्मळला
भार फार झाला पिता पडे
माय धरणीला पिता धरणीला
तेथ उचंबळला शोकसिंधु

खिन्नता

(त्या उभयतांचे सांत्वन करण्यास शेजारी येतात.)

जमुनिया जन ते समजाविती
रडू नका रडणार तरी किती
जशी असेल तया प्रभुची मती
मिळतसे सकळांस तशी गती।।

रडुनि काय, विवेक मनी धरा
उपजणे मरणे न चुके नरा
अजि स्वदेशहितार्थ मरे सुत
सुकृति तो करि वंश समुन्नत।।

जरि जगी मरणे, मरणे तरी
करुनिया कृति, जी जन उद्धरी
वदति संत असे वच सतत
करुनि तेच कृतार्थ भवत्सुत।।

रडु नका मुळी, ना मळवा मुख
गिळुनि दु:ख मनी धरणे सुख
अमरता मिळवी मिरवी यश
धवळितो सुत आज दिशा दश।।

रडु नका मुळी धीर मनी धरा
अमरता न जगात कुणा नरा
सुत गुणी रुचला परमेश्वरा
धरिल तो हृदयी प्रिय लेकरा।।

करु नका हृदयी मुळी खंत ती
नुरलि की आपणाप्रति संतती
भरतभूमिमधे किति बाळक
तुम्हि बना करुणाघन पाळक।।

रडु नका मुळि अश्रु न ढाळणे
भरत-माय-मुले तुम्हि पाळणे
निजसुतानन तेथच पाहणे
मति धरुन अशी जगि राहणे।।

(लोक जातात. अंधार पडू लागतो. मातापितरे खिन्न बसतात.)

ते माय-बाप पुशिती निज लोचनांते
अश्रूच ते न उरले मुळि मोचनाते
ते बसले वरुनि शांत मनी सचिंत
ना दु:ख पुत्रनिधनासम ह्या महीत।।

राहे कुणी, सकल ते बहुतेक गेले
येतीच अश्रु फिरुनी भरतीच डोळे
आकांत ना परि अता रडणे मुक्याने
ये हुंदका मधुनि ऐकु कुणास काने।।

अंधार आज भरला भरल्या घरात
त्याहून दाट भरला भरल्या मनात
लावी कुणी तरि तदा सदनात दीप
आशा नसे तिळ परी हृदयासमीप।।

ती बैसली उभयतां पुतळेच खिन्न
आधारहीन सुमने जणु वृतहीन
भूमीवरी उभय ती पडली अशांत
डोळा क्षणैकभऱ लागतसे तशात।।

रात्रीचे बाहेरचे स्वरूप

(बाहेर रात्र बरीच होते. जगात शांतता असते.)

अंधार। निबिड पसरला बाहेर
आकाशी। मावळला उगवून शशी
अश्रु जसे। तारे चमकति नभी तसे
गार सुटे। वारा, पर्णध्वनि उमटे
सळसळती। पाने जणू ती तडफडती
रातकिडे। त्यांचा कानी ध्वनी पडे
फांद्यांत। वडवाघुळ ते फडफडत
वरि फिरत। पुंज तमाचा जणु उडत
शांत परी। सृष्टी होती ही सारी
जग हमले। दमुनी झोपी ते गेले
एक घरी। जागे मधुनी कुणी तरी
अश्रुसरी। पडती त्थ् धरेवरी

मृत पुत्राचे दर्शन

(अशा त्या रात्री मृतबालक दिव्य वेष धरुन आईबापांचे सांत्वन करण्यास येतो. तुळशी वृंदावनाजवळ उभा राहून तो आई, बाबा अशी मंजुळ हात मारतो. माता दचकून उठून बाहेर येते. वगैरे.)

रात्रीच्या त्या समयि निजली शांतशी सृष्टी सारी
‘आई, बाबा’ कुणितरि अशी हाक मंजुळ मारी
झाले शांत क्षणि परि, जशी लाट मंदा उठोनी
शांतांभोधीवर पुनरपि जावि तेथे विरोनी।।

वृक्षच्छाखातति तुळशिच्या हालती अंगणात
अंधाराला जणु निजविण्या वृक्ष ते आंदुळीत
झाला होता जणु की अखिल प्रांत तो स्तब्धतेचा
‘आई, बाबा’ मृदू करुणशी ये पुन्हा ऐकु वाचा।।

“आईबाबा, पुनरपि तुम्हा बाळ भेटावयाला
वात्सल्याने विरुन तुमच्या येथ बाहेर आला
आई, बाबा! तुम्हि तुळशिच्या अंगणामाजि याना
द्यावा प्रेमे मजसि तुमचा अंतिम प्रेमपान्हा”।।

‘आईबाबा’ पुनरपि उठे शब्द माधुर्य-राशी
“मारी का हो” दचकुनि वदे “बाळ हाका अम्हासी?”
‘आईबाबा’ पुनरपि असे शब्द ती म्लान माता
ऐके, धावे, भ्रम जणु तिला दु:खदग्धा अनाथा।।

“आला आला फिरुनि अपुला बाळ आला घराला
हाका मारी, झणि तुम्हि उठा बाळ बाहेर आला”
धावे वेगे, पदर अथवा केशही सावरी न
“आले बाळा” करुण नदली गायशी माय दीन।।

“आई” ‘आली, बघ बघ तुझी पाडसा माय आली’
शोकावेगे हलत वदली, मागचे दार खोली
“कोठे आहे? दिसत नयना ना कसा बाळ माझा
झाला भास क्षणिक? न दिसे राजस प्राणराजा”।।

“आई, पाही तव सुत इथे, येत कैसे न तात?”
श”आले, तेही बघ” “तुम्हि बसा शांत, ऐका निवांत”
माता धावे परि करितसे खूण तो दिव्य बाळ
बोले ‘श’आई, हृदयी धरणे तो न गे आज काळ”।।

देवाचा मी, परि तुमचिया भेटीलागून येत
युष्मच्छोके गहिवरुन मी जाहलो सदगदित
आले चित्ती समजउ जरा अपुले तात माय
आलो आई म्हणुनि दुरुनी वंदितो पूज्य पाय।।

आई, माझ्यावरि जरि तुझे प्रेम आहे अपार
संसारी या अमर असला देखला ना प्रकार
भूमातेच्या प्रिय जननि गे मोचनासाठि आज
लाखो जावे मरुनि, जरि ती राहिलीसेल लाज।।

माता तू मत्प्रिय खरी परी आज सर्वाजणांची
ही भूमाता रडत बसली दास्यदारिद्रय जाची
मातांची जी परम सदया मंगला थोर माता
त्राता नाही तिजसि उरला झालि लोकी अनाथा।।

यासाठी मी त्यजुनि सगळे आइ धावून गेलो
गेलो, देवे मज उचलिले, मी तुम्हांलागि मेलो
मोहत्यागे भरतजननीकारणी लागतील
सारे बंधू, मजसि मग तू धन्य गे मानिशील।।

झाले ना गे मुळी बघ तिथे आइ थोडेहि हाल
क्लेशांची ती अम्हि मिरवितो नित्य कंठात माळ
मृत्यूला ना मुळि भरत-भूपुत्र आता भिणार
हे त्वदबाळे सकल जगता दाविले थोर सार।।

होते माते जवळ किति ते थेर स्नेहार्द्र मित्र
भूमातेचे भजक सगळे दिव्य ज्यांचे चरित्र
काही माते पडु न ह्धले ते उणे त्या सख्यांनी
नाही होऊ स्मरण तुमचे ते दिले, सत्य मानी।।

माझ्या ओठावरि तुळशिचे ठेविले पूज्य पान
मद्देशाचे स्मरण करुनी सोडिले शांत प्राण
माते, माझ्यास्तव न रडणे, का म्हणोनी रडावे?
देशासाठी फिरफिरुनी हे प्राण माझे पडावे।।”


(त्या मातेला हे पटत नाही. शतस्मृति तिच्या हृदयात उचंबळतात. हृदय भरून येऊन ती पुढीलप्रमाणे बोलते.)

“काय बाळा हे बोलसी कठोर
भरुनि येतो मम शोकभरे ऊर
प्रेम करुन किती तुला वाढवीले
जाशि विसरुन का सर्व बाळ बोले।।

तुला हातांचा करुनि पाळणा रे
खेळवीले झेलिले किती बारे
जरा दुखले खुपले कि जपे बाळा
स्मरण तुज उरले काय न वेल्हाळा।।

तुझा पाहुनि मुखचंद्र बाळराजा
हृदयसिंधु उचंबळुन जाई माझा
जरी मूर्ति तुझी अंगणात खेळे
दुरुनि बघति तुला हे मदीय डोळे।।

जरी जाशी क्षण दूर, हुरहुर
सुरू होई मम चित्ति हळूवार
तुझा कानी पडताच गोड सूर
पुन्हा यावा मत्सौख्यरसा पूर।।

तुला लावावी दृष्टी तिन्ही सांजा
तुला जपले मी सांगु किती राजा
असे आम्हाला एक तुझी जोड
म्हणुनी झाला संसार सर्व गोड।।

जसा वणव्यामधि भाजतो कुरंग
तसा तुजला जाचील का तुरुंग
याच चिंतेने झोप मुळि न यावी
रामनामावळि उठुन म्या जपावी।।

रामराया बाळास सुखी ठेवी
हाल सोसाया शक्ति तया देई
बाळ माझा सुखरुप घरा आणी
असे विनवित मी नयनि येइ पाणी।।

रात्र व्हावी जग सर्व हे निजावे
परी निद्रासुख नाहि अम्हां ठावे
आळवावा भगवंत जिवेभावे
तुला बाळा हृदयात आठवावे।।

दिवस होत्ये मी मोजित रे बाळा
मला ठाउक कंठिले कसे काळा
पोटि प्रेमाचा भरुनि ये उमाळा
गळति गालांवर अश्रु ते घळाळा।।

परी रडणे हे अशुभ मनी येई
पुसुनि नयना विनवित प्रभूपायी
मातृहृदय तुला ज्ञात असे रामा
ठेवशील कसा दु:खि सदा आम्हा।।

जीव माझा धरि आस, जरी झुरला
एक महिना चो फक्त अता उरला
बाळ माझा येईल धरिन पोटी
अश्रु वदतिल, वदवेल जरि न ओठी।।

सुखाचा तो पाहीन सोहळा मी
बाळ माझा येईल पुन्हा धामी
अशी आशा हृदयात खेळवीत
बाळ होत्ये रे दिवस रात्रि नेत।।

अकस्मात परी मरण आयकेन
रडत बाळा मी धाय मोकलून
कसा गेलासी टाकुनिया बाळा
कसा काळ तुला ओढित वेल्हाळा।।

किती आले हृदयात रे विचार
हृदयहादक जे शोक देति फार
कशी बाळाची जाहली असेल
स्थिती तेथे, तो कोमल जणु फूल।।

तुरुंगात तिथे एकला असेल
जवळ त्यच्या कुणि तेथ ना बसेल
कोण मातेसम दयाक्षमा दावी
आईनेच जगी शुश्रुषा करावी।।

दिली असती मृदु मांडि मी उशीला
तुला असते निजविले रे कुशीला
तुला मृदु गादी दिली असति बाळा
तुझे असते चेपले मी कापळ।।

सदोदित मी राहून उशापाशी
तुझी बाळा रे बनुन एक दासी
तुझी सेवा प्रेमार्द्र असति केली
परि काय पहा दैवगती झाली।।

जरी असते मी जवळ तुझ्या बाळा
धैर्य होते ना न्यावयास काळा
तुझे असते मी प्राण वाचवीले
परी बाळा हे काय बरे झाले।

कोण होते रे औषधास द्याया
कोण होते तव चरण चुराया
कोण होते पडताच हात द्याया
कुणी दाविल का तुरुंगात माया।।

शब्द तेथे मधु ऐकण्या न येई
कुणि न कोणाची वास्तपुस्त घेई
दुधाताकाचा थेंब नसे कोणा
जरी पडला आजारि दीनवाणा।।

सुखामाजी तू बाळ वाढलास
दहिदुधाविण तव जात नसे घास।।
जरा येइ जरि वास तो तुपास
रुसुन जाशी तू करिशि रे उपास।।

केवि कारागृह सौख्य तुला देई
बाळ जाणे रे सर्व तुझी आई
तुझा घुटमळला जीव रे असेल
घोट न दुधाचा लाभला असेल।।

कशासाठी गेलास रे तुरुंगी
सुखे असतासी मातृमृदूत्संगी
कशालागी आगीत बाळ गेला
पुन्हा भेटाया नाहि जगी उरला।।

तुझ्या आजारीपणाची कथा ती
दगड परिसुन होतील विरुन माती
बाळ कैसे मम अश्रु थांबतील
हृदय फुटते रे तुटत तीळ तीळ।।

मरण चुकले जरि नाहि जगी कोणा
मृत्यु यावा ना असा दीनवाणा
निज-प्रियजन-मधुसंगतीत यावा
मृत्यु होइल तो सह्य तरी जीवा।।

तुझी बाळा ती दूर मायबापे
तुला भेटू शकली न पूर्वपापे
तुझे दर्शन घडले न शेवटील
कसे अश्रू हे बाळ थांबवील।।

तुझे गेले असतील गाल खोल
तसे नयन तुझे तारका-विलोल
शक्ति उठण्याची उरलि ती नसेल
कसे अश्रू हे बाळ थांबतील।।

जरी उघडे ग्लानीत पडे अंग
हळुच पांघरुणा कोण घालि सांग
जरी तुजलागि लागली तहान
दिले अविलंबे जळ कुणी उठून।।

कोण केसांवरुनिया हात फिरवी
कोण मृदु बोले हृदय तुझे रिझवी
कोण प्रेमभरे मुके तिथे घेई
कोण प्रेमाने स्निग्ध तुला पाही।।

अनास्थेने मदबाळ मला मुकला
अनास्थेने मदबाळ अहा सुकला
बाळ आम्ही उभयता रे अभागी
काहि करु शकलो ते न तुझ्यालागी।।

घरी गायिगुरे केवढे खिलार
किती संपत्ती तव पिता कुबेर
घरी होती ती कशाची न वाण
परी कारागृहि जाइ तुझा प्राण।।

आम्ही घरि होतो बाळ रे सुखात
तूपसाखर जरि रडत तरी खात
तुला नव्हता सुग्रास त्याच वेळी
कसे अश्रु न गळतील बाळ गाली।।

तुझा बाळा श्रीमंत किती बाप
परी ओढवले पहा पूर्व पाप
एक पैहि न खर्चता बाळ आली
कसे अश्रु न गळतील बाळ गाली।।

कोण कुरवाळी तेथ तुझ्या अंगा
कोण दावि तिथे प्रेम-हृतरंगा
कुणी मांडी का दिली प्रेमरंगा
कुणी घातली का सांग मुखी गंगा।।

बाळ जाते फाटून चित्त माझे
कसे कुसकुरले फूल मधुर ताजे
बाळ माझा ना वाचविला कोणी
मृत्युवार्ता ती फक्त पडे कानी।।

फत्तरासहि फुटतील झरे राजा
किती पडतिल हृदयास घरे माझ्या
काय समाजाविशि? बोलशी कशाला
जगी समजावी कोण माउलीला।।

भेट होउ न दिलि गायवासराची
काय पूर्विल ते पाप बाळ जाची
पुत्रनिधनासम अन्य न हृद्रोग
बाळ साहे ना क्षण तुझा वियोग।।

तुला बिलगू दे धरिन तुला पोटी
मुके अगणित घेईन देइ भेटी
निकट राही तू सदा पाखरा रे
खेळ बागड मधुरा न दूर जा रे।।”

पिता

(असे बोलून माता मुलास पोटाशी धरण्यास धावते. परंतु तो देवाघरचा सोवळा बाळ दूर होतो व आईला दूर होण्यास खूण करतो. आईचा विलाप चालला असता पित्याची मन:स्थिती कशी होती ती पहा-)

पिता परी खिन्न उगीच राहे
मधेच नेत्रांतुन नीर वाहे
उदास ऐके हृदयार्द्र बोल
रुतोनि चित्ती बसती सखोल।।

संचित राही मिटि लोचनाते
तुटोनी जाई अजि पुत्रनाते
विचारकाहूर उठे मनात
निवांत राहे हृदयी अशांत।।

न दु:ख जे शब्दविभाव्य होई
मनास अत्यंत असीम दाही
तसा न अंगार तनूस जाळी
उफाळ जैसा तनुलागि पोळी।।

समुद्र जसा वडवानळाने
पिता जळे आत तसा मनाने
न बोलला शब्द-वदेल कायी
फुटे तदीयांतर जेवि लाही।।

मूकेपणा दावि तदीय शोक
गमे तया शून्य समस्त लोक
मुखावरी खिन्न दिसे निराशा
शिरे मनीही करण्या निवासा।।

मनावरी तो जरि दु:खभार
करीत होता स्वमनी विचार
विचार ते ऐकुन बाळकाचे
तरंग येती हृदयी तयाचे।।

मनात होता जरि दु:खभग्न
पिता दिसे खोल विचारमग्न
दिसावया लागत त्या स्वदेश
यदर्थ तत्पुत्र वरी मृतीस।।

मातेचे बोल

(बाप मुका व खिन्न आहे असे बघून मातेला पुन्हा उमाळा येतो. ती मुलाला ‘ये रे’ म्हणते व ‘मुलाला काही सांगा’ असे पतीला विनविते)

“येई येई रे
मनोहरा
सुकुमारा सुंदरा
राजस पाडसा
स्नेहाळा
बाळा गुणगंभीरा।। येई....।।

सांगा हो तुम्ही
लवलाही
बाळ कसा तरि राही
येथे ज्या योगे
नच जाई
सुखविल दु:खी आई।। येई....।।

तुम्ही मूक कसे
पुत्रला
चार शब्द तरि बोला
मातृप्रेमाचा
ओलावा
आणा तदहृदयाला।। येई....।।

प्रेमाचा पान्हा
पाजु कुणा
येइ न कोणा करुणा
हे करुणावंता
दयाघना
दे मज मम बाळ पुन्हा।। येई....।।

बाळ समजावतो

(ती माता पुन्हा पुत्राला कवटाळावयास धावते. तो स्वर्गीय पुत्र खुणावतो व दूर होतो. तो तिची पुन्हा समजूत घालतो.)

“आई नाही हृदय मम हे जाहले गे कठोर
आहे माते परि निशिदिनी अंतरी एक घोर
त्वत्प्रेमाची स्मृति विमल ती कैशि जाईल आई
पूज्या मूर्ती तव सतत ह्या अंतरंगात राही।।

आई वाटे तुजसि करुणा फक्त त्वदबाळकाची
दु:खी सारी खितपत परी लेकरे भारताची
वाटे पुत्रे तव कितितली सोशिले हाल कारी
पाही डोळे उघडुन परी बाळके दीन सारी।।

ना खायाला मिळत कळही ना करी पाव आणा
आपदग्रस्ता सकल जनता ना मिळे एक दाणा
राहायाला घर न उरले वस्त्र ना नेसण्याला
आई नाही उरलि मिति गे भारती आज हाल।।

कित्येकांना घरि न मिळते देतसे जे तुरुंग
होती गादी मजसि जननी तेथ लाभे पलंग
होते तेथे नियमित भिषग् औषधे द्यावयाते
केव्हा केव्हा मिळत जननी दूधही प्यावयाते।।

लाभे कोणाप्रति जननि गे तेथे ती पावरोटी
सायंकाळी कधि कधि मिळे ताकही अर्धलोटी
राहे कोणी कधिहि न तिथे एकही तो उपाशी
राहे अन्नाविण जरि कुणी येति ते चौकशीसी।।

बाहेरी ह्या परम जपता, पुत्र कोटी उपाशी
माते देता घृत मधु हधी, ना पुशी कोणि त्यांसी
हिंदुस्थानी हरहर किती जाहलीसे हलाखी
कोणा ये ना हृदयि करुणा, सर्व आई उदासी।।

श्रीमंतांचे सजति उठती बंगले ते महाल
मोटारीही उडति, बघतो बंधुचे कोण हाल
पाषाणाचेहुन अदय हे गांजिती सावकार
हाहा:कार ध्वनि उठतसे, ना दया, ना विचार।।

माझे रात्रंदिन तळमळे चित्त बंध्वापदेने
धुव्वा जावे उडवित गमे भीमसेनी गदेने
सौख्यी नांदे पतसमुख तो नित्य श्रीमंत एक
दारिद्रयी हा मरत दुसरा ना जगी या विवेक।।

एके सौख्यी सतत असणे अन्य लाखो मरावे
एकासाठी झिजुनि झिजुनि बाकीचे दीन व्हावे
श्रीमंताचे घरि झडतसे रोज ती मेजवानी
लाखो अन्नाविण मरति हे बंधु गे दीनवाणी।।

माझ्या नेत्री अविरल जळा घोर वैषम्य आणी
मच्चित्ताने विरघळुनिया आइ हे होइ पाणी
ऐके आर्तस्वर उठतसे अंबरी जाय हाय
आई नाही ह-दय सधना शुद्ध पाणाण काय?।।

आलस्याला मिळती सगळे भोग सारे विलास
कष्टे रात्रंदिन परि तया ना पुरे दोन घास
अन्याया या सहन करिती वेदवेदांतवाले
गीता ओठी परि विषमता घोर ही त्यांस चाले।।

अन्नभावे मरत असता बंधु, जाई घशात
लाडु जिल्बी, हरहर कसे चित्त लागे अशांत
कैसे झाले स्वजन कठीण-स्वांत कारुण्यहीन
बंधू लाखो तळमळती हे मीनसे वारिवीण।।

चित्ती आई लव तुम्हि विवेका करा धर्म काय
मानव्याचे निज मनि बघा उज्ज्वल ध्येय काय
विश्वामाजी किती विषमता दु:खद प्राणघेणी
झाला येथे नरक दुसरा लक्ष देई न कोणी।।

श्रीमंताच्या सदनि भरल्या रम्य गाद्या पलंग
रस्त्यामध्ये श्रमुन पडतो दीन टाकून अंग
श्रीमंताचे घरि झळकती दिव्य विद्युत्प्रदीप
अंधारी तो मजुर मरतो सर्प विंचू समीप।।

श्रीमंताचे ललितभवनी नृत्यसंगीत होत
होत प्राणांतिक कहर त्या चंद्रमौळी घरात
श्रीमंताने किति सुखि शुक श्वान मार्जार मैना
मदबंधूंची हरहर परी काय ही हाय दैना।।

श्रीमंतार्थ श्रमत असता घर्मधारा सुटाव्या
पर्जन्यी त्या जमिनित जशा उपळा हो फुटाव्या
सारा जावा दिन परि घरी काहि ना खावयाते
नाही त्याला मिळत तुकडा ना पुरे ल्यावयाते।।

थंडीवा-यामधि चिमुकली लक्ष बाळे मरावी
आईबाप व्यथितमती तदवृत्ति वेडीच व्हावी
हिंदुस्थानी गरिब विपदे अंत ना पार देखा
श्रीमंताचा तरिहि पुरवी दानवी देव हेका।।

‘गंगे गोदे’ वदुनि जननी अर्पिती बाळकांना
पोटामध्ये तटिनि धरिती दीन त्या अर्भकांना
खाया नाही म्हणुन किति ते आत्महत्या करीत
आई नाही मुळिच उरली भारती न्यायनीत।।

दारिद्रयाने मरत असता पोटाचे गोड गोळे
देवाला हे बघवत कसे त्यास ना काय डोळे
गेला गेला सदय तुमचा देव आई मरून
घ्यावा आम्ही झगडुन निजोद्धार आता करून।।

पाडायाते सकळ असती उद्धाराया न कोणी
मारायाते सकल उठती तारण्या नाहि कोण
साहाय्याला कुणि न, वदती शब्द ना सानुकंप
आई आता अम्हिच करणे स्वोद्धृती ती विकंप।।

राहे पायांवर निज उभा भाग्य त्यालाच लाभे
जो जो आई जगति वरितो स्वावलंबनास शोभे
ऐश्वर्याची कधी न घडते प्राप्ति आशाळभूता
होते प्राप्ति त्वरित परि ती उत्कटोत्साहयुक्तां।।

सूर्याचे ते विभव उसने घेतसे चंद्र मिंधा
अर्धा केव्हा कधि मुळिच ना डागही नित्य बंदा
तारे कैसे मिरवति परी नित्य तेजे स्वतंत्र
स्वोद्धाराते करुनि मिरवू घेउ स्वातंत्रमंत्र।।

अन्नभावे तडफडत हे जोवरी आइ बंधू
मदरक्ताचा पसरिन सडा सांडुनि बिंदु बिंदु
अन्नवस्त्राविण न भुवनी जीव कोणी रहावा
त्याच्यासाठी झिजुनी झिजुनी आई मज्जन्म जावा।।

माझे बंधू अधन अधमी सावकारी पिळावे
तैसे नानाविध कर किती लागती त्यांस द्यावे
बंधूंना ना लवणहि मिळे चाटिती भूमि खरी
आई, ऐशी सुकरुण कथा चित्त माझे विदारी।।

लोकांपाशी कण न उरला तो उरे शोकापूर
बोलायाचे बळ न उरले तो उरे शोकसूर
नाही धंदा उतर उरला मृत्युवाचून आता
त्राता नाही निजजनहि ना देति साहाय्य हाता।।

खेडोपाडी दिसत सगळे लोक बेरोजगार
दारुमध्ये बुडति विपदा वर्णवे ती न घोर
दारुमध्ये धुळिस मिळती खानदानी घराणी
आई ऐशी सुकरुण कथा लोचनी पाणि आणी।।”

मातेचे उद्गार

(मुलगा भावनाभरात भारताची दैन्यदशा वर्णन करीत असतो. परंतु मातेला पटत नाही. ती एकदम पुढीलप्रमाणे बोलू लागते.)

“मला ना कळते बाळा समजावी तुझा पिता
म्हणती खोटि स्त्रीबुद्धि ऐकेन तुमच्या कथा।।

पित्याला पटवी बोल जरि त्या पटती तरी
मला त्यातच आनंद तन्मना तुष्ट तू करी।।

तुमचा हितसंवाद बसुनी येथ ऐकते
प्रकाश पडला चित्ती अल्पसाही बरेच ते।।

तुझ्या गोड मुखा बाळा बसते येथ पाहत
तुझ्या गोड कथा बाळा बसते येथे ऐकत।।

जरि ना कळले माते त्वदबोल मज अमृत
ऐकते लक्ष लावून मुक्याचे घेउनी व्रत।।”

पिता पुत्र संवाद

(पिता मुलाजवळ बोलू लागतो.)

“बाळ मी ऐकले बोल तुझे जे खोल गंभिर
ऐकता कंठही दाटे शोकाने भरतो उर।।

देशाची स्थिती ही हीन लोक सर्वहि निर्धन
समस्त दिसती दीन येते हे भरुनी मन।।

उपाय ना परी बाळा आम्हाला एकही दिसे
बघून तुमचे यत्न सारेच जग हे हसे।।

ईश्वराच्या कृपेनेच येतील दिन चांगले
अंधारामागुनी जेवी प्रकाशकर ते भले।।”

(हा दैववाद ऐकून मुलगा त्वेषाने बोलू लागतो.)

“बाबा हे बोलता काय प्रयत्नदेव तो तरे
प्रयत्नास सदा आधी धरावे हृदयी नरे।।

नरका नंदनाचे ते यत्न तो रुप देतसे
प्रयत्न करिती राष्ट्रे पृथ्वीवर पहा कसे।।

यत्न जो करि त्या देव साहाय्य करितो सदा
संकटात पुढे जातो हरि देव तदापदा।।

गोवर्धनास ते काठ्या आधि गोपाळ लाविती
मग तो लावितो बोट श्रीकृष्ण वदु मी किती।।

बोलतो फक्त मदबंधू कृतीचा शंख तो परी
करील देव तो काय बघतो कोण अंतरी।।

भावनांचा अस्त झाला विचार उरला नसे
दिसती निजलि सारे मदबंधू पशु ते जसे।।

झाले सकल मदबंधू शिश्नोदरपरायण
नारायण कसे त्यांना करि मोक्षसमर्पण।।”

लोकांची मनोवृत्ती

(लोकांच्या मनोवृत्तीचे तो तरुण पुत्र वर्णन करतो.)

“न केवळाहि भावना न केवळाहि वल्गना
विचार भावना कृती तरीच होइ उन्नती।।

उदार भावना नसे विचार ना मनी वसे
कृती म्हणाल शून्य ती कशी घडेल उन्नती।।

मनास टोचणी नसे मती सखोल ती नसे
खुशालचेंडु बैसती कशी घडेल उन्नती।।

जिवंत भाव ना तिळ तुटे न चित्त तिळतिळ
न मान-कीर्ती-चाड ती कशी घडेल उन्नती।।

पशूसमान जीवन पशूंतही किती गुण
न सत्यवस्तुची रती कशी घडेल उन्नती।।

स्वदेश न स्वधर्म न स्वकर्म न स्वशर्म न
उगीच व्यर्थ जल्पती कशी घडेल उन्नती।।

स्ववस्त्र न स्ववस्तु न स्वशस्त्र व स्वशास्त्र न
उगीच नंदि डोलती कशी घडेल उन्नती।।

मत स्व न मति स्व न कुठेच काहि राम न
अजागळापरी गती कशी घडेल उन्नती।।

समस्त हे परभृत खरा न एक पंडित
करील आत्म-आरती कशी घडेल उन्नती।।

मदांध ग्रस्त मत्सरे प्रमत्त देत उत्तरे
घमेंड की अम्हा मती कशी घडेल उन्नती।।

सदैव वृत्ति उर्मट सदैव एक तर्कट
करी टवाळि दुर्मति कशी घडेल उन्नती।।

गंभीरता विशुद्धता न ठाउकीच उद्धटा
सदैव छद्म दाविती कशी घडेल उन्नती।।

स्ववर्तनात वक्रता स्वभाषणात आढ्यता
जगास तुच्छ लेखिती कशी घडेल उन्नती।।

जगात आम्हि शाहणे नसे जणू अणू उणे
पदोपदी परि च्युति कशी घडेल उन्नती।।

हुशार राजकारण अम्हिच जाणतो खुण
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती।।

अम्हीच डाव जाणतो अम्हास कोण सांगतो
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती।।

सदुक्ति ती पटेच ना सुबुद्धि ती असेच ना
वदे तशी नसे कृती कशी घडेल उन्नती।।

समीप बुद्धि ती नसे दिली तरी न घेतसे
मनी सदा अहंकृती कशी घडेल उन्नती।।

दिवाळखोर हा असे हसे जगात होतसे
मनी परी न लाज ती कशी घडेल उन्नती।।

स्वतास मार्ग ना दिसे परास नित्य जो हसे
न यत्न ना पुढे गती कशी घडेल उन्नती।।

टपे सदे बकापरी स्वरुप साजिरे वरी
मध्येच चोच मारिती कशी घडेल उन्नती।।

महान खरे जगदगुरु सदैव यत्पदा धरु
करी न त्या नमस्कृती कशी घडेल उन्नती।।

जगात काय चालले स्वभूत केय चालले
न हे कुणीही पाहती कशी घडेल उन्नती।।

पलंगपंडिता-करी घडेल केवि चाकरी
न जोवरी खरे व्रती कशी घडेल उन्नती।।

असावि एकतानता असावि भाव-तीव्रता
तरीच होतसे कृती कृतीविणे न उन्नती।।

परंतु काय ही दशा बघुन दु:ख मानसा
न देशभक्ति ती दिसे खुशाल खातपीतसे।।

बघून देशदुर्गती खुशाल खेळ खेळती
क्षुधार्त बंधु पाहुन सुचे तयांस भोजन।।

खुशाल नाच चालती अनंत द्रव्य ओतिती
विचार येइ ना मनी दरिद्रता किती जनी।।

सहानुभूति-बिंदु न सुखी समस्त निंदुन
न चिंधि एक देतिल परस्व मात्र घेतिल।।

न सत्य ते मुळी उरे कसा समाज हा तरे
असत्यदेव पूजिती असत्य नित्य वागती।।

न बंधुभाव अल्पही दया क्षमा न नावही
न ऐक्य ते कुठे दिसे सदैव भांडखोरसे।।

घरात रोज भामडती पथात नित्य भांडती
मनी सदैव भांडती जनी समस्त भांडती।।

मजेत खेळ मांडिती तिथेही भांडु लागती
गंभीर प्रश्न काढिती तिथेही भांडती किती।।

करंट लोक हे असे कशास भाग्य येतसे
विदीर्ण होइ मन्मन बघून आपुले जन।।

यदा सुबुद्धि येइल तदाच कार्य होइल
विचार भावना मनी कृती घडेल हातुनी।।

म्हणून म्हणतो बाबा विचारा पेटवू जरी
पेटवू जनचित्ताते कृति होईल ती खरी।।

तुरुंगी असताना मी होउनी भावनिर्भर
लिहिले गीत मी एक म्हणु का गोड सुंदर।।”

मातेचे निवेदन

(एकदम प्रेमाने आई बोलू लागते)

“बाळ माझा कवी झाला केव्हापासून रे गड्या
लबाडा गीत तू केले सुराने म्हण रे खड्या।।

आवाज तव आकर्षी आधीच हृदया मम
त्यात स्वकृत गीतास वदता अमृतासम।।

केव्हापासून झालास कवि पंडित शहाणा
गाई ते गीत तू बाळा आनंदे भरि मन्मना।।

पहा हा थांबला वारा त्वदगीत परिसावया
सखया ते तुझे गाणे लाग रे लाग गावया।।”

पुत्राचे गीत

(मुलगा गाणे म्हणतो)

दीनशरण्या शुभलावण्या धन्या तू माउली
होतिस तप्त जगा साउली।।

तुझ्या विचारे येते माझे गहिवरुन गे मन
येतो कंठ किती दाटुन
इतिहास तुझा क्षणैक बसता येतो नयनांपुढे
शोके पिळवटते आतडे
हृदय गजबजे दृष्टी भरते पडति अश्रुचे सडे
वाटे सकळ चराचर रडे
अनंत देखावे भरभर गे चलच्चित्रपटसम
दिसती हृदय निर्मिती तम
उदात्त वाङमय कुठे, कुठे त्या कला कुठे ज्ञान ते
वैभव माते! आहे कुठे?
किती तपस्या त्याग किती तव वैराग्य तुझे किती
सत्त्वा नव्हति तुझ्या गे मिति
झाला अंतर्बाह्य भिकारी पुत्र तुझा आज गे
गुलाम केवळ म्हणुनी जगे
अनुकरण करी दुस-यांमागुन मंद जातसे सदा
पूजी भक्तीने परपदा
कला असो सादित्य असो वा असो राजकारण
जाई जगताच्या मागुन
स्वयंस्फूर्तिचा झरा आटला स्वतंत्र मति ती नूरे
प्रतिभा दिव्य सर्व ती मरे
जुनी संस्कृती जिवंत नाही उरले केवळ मढे
तरि किती कवटाळिति बापुडे
नव संस्कृति ती कळली नाही विचार कुणी ना करी
दारे लावुन बसती घरी
नवीन-गंभीर-विचार-गगना उड्डाणा मारुनी
तारक येइ न कुणी घेउनी
जसा मारुती गगनि उडाला जन्मताच निर्भय
दिसता रक्तभास्करोदय
मृत्युसमीपहि नचिकेता तो ज्ञानास्तव जातसे
आजी त्वत्सुत कोठे तसे
विद्या नाही, सदगुण नाही, बसलो कर जोडुन
जाई भाग्य अम्हा सोडुन
दया नसे सद्धर्म नसे तो नुरला एकहि गुण
जाई भाग्य म्हणुन सोडुन
गुणांजवळ नांदते अखंडित लक्ष्मी चंचल नसे
चंचल जनमत माते! असे
अम्ही भांडलो म्हणुनि कष्टलो, कष्टतसो रडतसो
कृतकर्मफळे भोगीतसे
सदगुण येतिल तेव्हा होइल भाग्योदय आमुचा
तोवरि पाश राहि शत्रुचा
माते! अमुच्या दुष्कृत्यांनी रडत अहा असशिल
कसचे पुत्र मनी म्हणशिल
एक सिंह तो बरा नको हे पस्तिस कोटी किडे
जाती चिरडुन ते बापुडे
एक चंद्र तो बरा कशाला अनंत त्या तारका


ज्या ना अंधकारहारिका
विशालशाखा पसरुन उभा एक पुरे वटतरु
नलगे क्षुद्रवनस्पतिभरु
येत असे असतील तुझ्या का विचार मनि अंबिके!
विमले स्नेहाळे सात्त्विके
अम्ही करंटे दुर्गुणखाणी सुत न तुझे शोभत
बसलो श्वानासम भुंकत
परिस्थिती न आकळ कळेना सांगितले ना वळे
पडलो तरिहि गर्व ना गळे
सरपटणारे सरडे सकळहि गुरुत्मान् कुणी नसे
जो तो बिळात घुसुनी बसे
चिखलामध्ये खडे फेकितो तिथेच घेतो उड्या
घेई न कोणी सागरी बुड्या
कूपमंडुकापरि अद्यापी उगाळितो गे जुने
एकच वाजवितो तुणतुणे
जगी नगारे प्रचंड भेरी वाजत माते! किती
सुस्त त्वत्सुत परि बैसती
ध्येयवाद तो नुरला, परि जरी दिसला, करिती टर
झाले पशूच उदरंभर
हसू की रडू उदास होते निराश होते मन
येइ प्रकाश का कोठुन
चैतन्याची कळा आमिच्या अंतरंगि संचरो
दिव्य स्फूर्तीने मन भरो
उत्कटता उज्वलता येवो भव्य नव्य आवडो
ध्येयी विशाल दृष्टी जडो
अनंत तेजे ज्वलन्निव असे धगधगीत लोळसे
पेटुन करु रुढी-कोळसे
किती विषारी किती भिकारी रान गवत माजले
सगळे पाहिजेत जाळले
नव प्रकाशा पहावयाला होवो सुरु धडपड
करु दे जीवात्मा तडफड
बंदिवास हो सरो, विचारा विश्व असो मोकळे
पंखा फडफडवू दे बळे
सकळ बंधने जीवात्म्याची बुद्धीची स्फूर्तिची
तुटुनी जाउ देत आजची
विशाल सुंदर नवीन गंभिर प्रश्न किती जीवनी
जाऊ भेटाया त्या झणी
होवो विक्रम मृतवत् अस्मत् स्थिति आता पालटो
त्वन्मुखशशि नवतेजे नटो
जाउ दे जाउ दे देवा! अस्तास सर्व दुर्भाग्य
येउ दे येउ दे देवा! ते मंगल शुभ सौभाग्य
होउ दे होउ दे बंधू! त्वत्कार्य कराया योग्य
शोभो पुनरपि भारतमाता जशि पूर्वी शोभली
सत्या शिवा सुंदरा भली। दीनशरण्या....।।

मातेचे उत्तर

(मुलाचे गाणे संपताच माता गहिवरून म्हणते)

“बाळा अतीव मधुरा कविता तुझा रे
कोणी तुला शिकविले मति ही भरे रे
गाणी परी कवण ऐकवि बाळ आता
जाशील सोडुन मला करुनी अनाथा।।

बाळा तुझी हृदयहारि रसाळ गाणी
साधी किती सरळ सुंदर रम्य वाणी
तू आणिशी अमुचिया नयनांत पाणी
जाशील रे करुनिया मज दीनवाणी।।

त्वत्काव्यगंध मुळि ना कळला जगाला
आला कसा तुजवरी घनघोर घाला
बाळा कळीसमच जीवन जो तुझे रे
येते तुला मरण, निघृण काळ तो रे।।”

आईची समजूत

(मुलगा आईची समजूत करावयासाठी बोलतो)

“स्वातंत्र्यसंगीत तो दिव्य भगवंत निर्मीतसे मायभूमीवर
ही जीवने आमुची त्यात होतील तानापरी आइ गे सुंदर
मज्जीवनाची तिथे गुंफिली जात सत्तान झालो अमर्त्यापरी
आई नसे स्वार्थ, या भारताची प्रभा फाकु दे रम्य विश्वांतरी।।

जरि ना लिहिले काव्य काव्याचा विषय स्वता
आइ मी जाहलो आज तू मान मनि धन्यता
स्वातंत्र्य-सत्कथा निर्मू तदर्थ मम जीवन
आइ ना दु:ख ते वाटो तू शांत करि गे मन।।

मोक्षाची पावन गंगा निर्माया भारतांतरी
मज्जीवन सदबिंदु मिळाला शोक न करी।।

बाबा तेथे तुरुंगात विचार मनि खेळत
पेटवावे जागवावे हे समग्रहि भारत।।

जेधवा तीव्र वृत्तीचे उत्कट-स्वांत ते नर
उठतील हजारांनी आपल्या भारतावर।।

तेधवा तेज ये ईल देव ना सुखलोलुपा
देव येईल मागूनी मरा आधी तुम्ही खपा।।


जेव्हा राष्ट्रामधि निपजति उन्नत ध्येयवादी
त्यागी तेजोमय तरुण ते सुव्रती सत्यवादी
खेडोपाडी करितिल जरी ते विचारप्रसार
देशोद्वारा मग तुम्हि वदा काय लागे उशीर।।

खेडोपाडी झणि उडवुनी कल्पनांचे फवारे
स्वातंत्र्याचे प्रबळ भरुनी भारती दिव्य वारे
‘कैसे तुम्ही मनुज असुनी राहता रे गुलाम
याच्यापेक्षा मरण बरवे या म्हणू सर्व राम।।

मेलेले ना पडुनि असणे मर्दसे हो उठावे
स्वीय स्थानाप्रति पुनरपि पौरुषे शीघ्र घ्यावे’
ऐसे लोकांप्रति कथुनिया पेटवू अंतरंग
पाशा तोडू करु उठुनिया शृंखलांचा विभंग।।

कोणी नाही धरणिवरि या आपणावीण दीन
तेजे तुर्क स्थिर मिरवतो तो उभा चंड चीन
पोलादाचे परि चिमुकला धन्य पोलंड देश
अफगाणाते नमुन असतो आंग्लभूचा नरेश।।

झाले जागे खडबडुन ते आज इजिप्त सुप्त
दावी तेज:प्रसर प्रगटी स्वीय सामर्थ्य गुप्त
ईशान्येला डुलत असतो वैभवाने जपान
छोटी मोठी कृति परि, तया अग्रराष्ट्रांत मान।।

आयर्लंड प्रथित भुवनी मेळवी स्वीय मोक्ष
भव्य क्रांती करित रशिया विस्मये पाहि विश्व
देशोदेशी सकळ जनता पेटलेली पहा ती
हिंदुस्थानी परि न उठती सर्व झोपाच घेती।।

स्वातंत्र्याने हसति खुलती राष्ट्रके सानसान
हिंदुस्थानाहुन शतपटीने जरी ती लहान
उत्कर्षाला करुन करिती चित्कलावाग्विलास
विश्वा देती, जरि लघु तरी, संस्कृतीचा प्रकाश।।

दु:खी पंगू पतित दुबळे राहिलो हो भिकारी
आता पृथ्वी दिपवु उठुनी तेज दावून भारी
शक्ती आहे जगति अतुला एक ती निश्चयाची
लक्ष्मी, ज्याला अविचल असे नित्य निर्धार, त्याची।।”