स्वातंत्र्यशाहिराचे स्फूर्तीगीत

समुद्रलाटा अदळताती कविचित्ता ज्या सदा मोहिती
निळे मनोहर सागरपाणी अनंत रत्नांची ती खाणी
अस्तोदय ते रविचे सुंदर दिनरजनी वा प्रशांत अंबर
अनंत तारे सुरम्य इंदु तरुवेलिलता ते दवबिंदु
फुले सुगंधी मुले मनोहर विहंगगण पाखरे खेळकर
मयूर कोकिळ चकोर चातक हरिणपाडसे तैसे हंस
चक्रवाक वा भेसुर घुक गजेंद्र वा ते सिंहशावक
चंचळ चपळा अंबद काळे चपळ वायुचे वेडे चाळे
सरित्सरोवर कमळे सुंदर मिलिंद मंजुल-गुंजारवकर
वने उपवने आम्रबकूल अशोक चंपक कदली मृदुल
पुष्करिणी कारंजी निर्झर चंदनचर्चन माळा सुंदर
हिरवे हिरवे गवत चिमुकले द-या खोल ज्या भिववित डोळे
पहाड मोठे प्रचंड पर्वत नभास शिर जे देउन उचलित
प्रेमे विव्हल रमणी रमण लताकुंज ते प्रेमराधन
चुंबन अलिंगन प्रकार विषयि जनांचे हे शृंगार
काव्य सृष्टिच्या ह्या संसारी मला न गोडी भरे शिसारी
ह्या वस्तूंचा मी ना भक्त यावर मन्मन ना आतक्त
असे भिकारी खरा फकीर ह्या वस्तूंची मज न फिकीर
हृदय कवीचे परी मम आहे प्रबळ भावनावारा वाहे
प्रतिभा स्फुरते मदंतरंगी काव्य नाचते मनस्तरंगी
चिता भडकली मदीय चित्ती गीत थरथरे ओठावरती
गीत कशाचे? मद्देशाचे स्वातंत्र्याचे समानतेचे
स्वतंत्रतेची गाइन गाणी जनात अथवा निर्जन रानी
स्वतंत्रतेचे विचार-वारे वातावरणी भरीन सारे
स्वातंत्र्याचे रणसंग्राम हृदयोद्दीपक जगदभिराम
स्वातंत्र्याचे झगडे भीषण जेथे चाले मारण मरण
त्यांची गाणी विशंक गाइन तदभक्तांची गाणी गाइन
प्राण अर्पिले ज्या वीरांनी त्यांना गुंफिन माझ्या कवनी
स्वतंत्रतेचा मी शाहीर करीत आहे जगजाहीर
नसानसांतुन ओतिन जोम स्वार्थाचा मग कराल होम
सिंहाचे परि तुम्ही उठाल धीर गर्जना तुम्ही कराल
देशभक्तिचा प्रवाहपूर खळखळाट वाहवीन धीर
देशभक्तिचा सागर खोल हृदयी निर्मिल माझा बोल
कठोर हृदये मृदु नवनीते करितिल माझी नवीन गीते
मृदु नवनीता वज्र करीन दिव्य असे मी निर्मिन कवन
पाषाणाला फोडिल पाझर ऐसे निर्मिन वाक्कल्लोळ
वेदजडांची वृत्ति हलेल ऐसे निर्मिन काव्य रसाळ
षंढहि होतिल रणझुंजार ऐसा ओतिन कवनी जोर
त्यागा उन्मुख मरणा सन्मुख मानितील त्यामध्ये खरे सुख
अशी जनांची वृत्ती करीन स्वातंत्र्याची गीते निर्मुन
होय, कशाला विचारता रे स्वातंत्र्याचा असे कवी रे
हसा, हसा, परि रडाल अंती मदध्येयाची मला संगती
स्वातंत्र्याचे सरोवरात मरालिनी मत्कविता रमत
स्वातंत्र्याचे सुमंदिरात विचार माझे सदैव गुंगत
स्वातंत्र्याचे स्वर्गीमाजी सदैव चमके प्रतिभा माझी
स्वातंत्र्याचे नभोवितान तेथे घेतो मी उड्डाण
स्वातंत्र्याचे विशाल गगन तेथे घेतो विशंक तान
स्वतंत्रतेचा, मायभूमिचा प्रियकर माझ्या भारतभूचा
पवित्र माझ्या भारतभूचा उज्ज्वल माझ्या भारतभूचा
मंगलतम मम भारतभूचा स्वातंत्र्योन्मुख भारतभूचा
कवी असे मी धीर नवीन सदैव पूजिन भारत-चरण
भारतभूची मंगल धुळी सतत माझ्या भाळी
भारतमाते तव शुभ गान मजला वाटे अमृतपान
तुलाच गाइन तुलाच ध्याइन तुलाच वंदिन मी गहिवरुन
हीच प्रतिज्ञा माझी माते पुरवी प्रेमाकरे अमृते
त्वांवंदेऽहम् तवैव गेऽहम्

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा