राणा प्रताप

स्वातंत्र्यसूर्य राणा। चित्ती प्रताप आणा
चारित्र्य दिव्य त्याचे। त्याचा अभंग बाणा
रजपूत पूतकीर्ती। कुळशील बाटवीत
परि थोर पूर्वजांची। राखी प्रताप नीती
तो मानसिंग तैसे। दुसरेहि अन्य मोठे
स्वार्थांध होउनीया। ठरले जगात खोटे
अभिमानशून्य झाले। रिपुगौरवास गाती
स्वकरीच पूज्य धर्मा। देतात मूठमाती
स्वार्थांदि नीचवृत्ति। याचाच पंक माजे
परि त्यामधून दिव्य। रमणीय पुष्प साजे
रजपूतभूमिपंकी। कमनीय दिव्य गंध
कमल प्रताप एक। दे भूस सौख्यकंद
सर्वत्र अंधकार। भरला भयाण घोर
त्यात प्रताप शोभे। शुभकांति चंद्रकोर
रिपु-सैन्यसागरात। भूमाय तारण्याला
धैर्य प्रताप एक। नौका अभंग झाला
जयमत्त शत्रु मागे। लोटावया न कोणी
परि एकटा प्रताप। ठाके सुरेंद्रवाणी
समरात सेलिमाला। दावून दिव्य भाला
तत्तेज हारवीले। निस्तेज शत्रु केला
हळदीत खळखळाट। रिपु-रक्त वाहवीले
निज अल्प सैन्य तरिही। आश्चर्य थोर केले
केले अनंत कष्ट। रानावनात गेला
निज शत्रुशी सदैव। लढण्यात जन्म नेला
विख्यात सत्कुलाची। ती कीर्ति निष्कलंक
राहो, म्हणून मानी। झाला प्रताप रंक
घेईन ना जरी मी। मत्प्राण तो चितोड
पेंढ्यावरी निजेन। कोंडाच अन्न गोड
सुखभोग सर्व वर्ज्य। रिपु जो धरी चितोड
करुनी अशी प्रतिज्ञा। पाळी न त्यास तोड
सिंहासमान शूर। मेरुपरी सुधीर
भीष्मापरी प्रतिज्ञा। पाळीत थोर वीर
आपत्ति घोर आल्या। तरि त्या न तो जुमानी
तारामती पतीच्या। सम सत्त्व स्वत्व मानी
निजा-मायभूमि-सेवा। करिता, न ते कुटुंब
स्मरले, सदैव हृदय। भू-भक्तिने तुडुंब
स्वातंत्र्य-रक्त वीरा। रिपु-दुर्जया सुधीरा
देवी-स्वतंत्रतेच्या। कंठामधील हिरा
स्मरण प्रभावशाली। तेजस्वि त्वत्कृतीचे
देशास जोवरी रे। भय तो न ते मृतीचे
त्वन्नाम दिव्य-मंत्र। उठवील भारताला
देईल दिव्य शक्ति। अर्पील वैभवाला
स्वातंत्र्यरक्त जीवा। त्वन्नाम स्फूर्ति देई
स्वार्थादि नीच वृत्ति। सगळ्या लयास नेई
भ्याडां करील शूर। नि:सत्त्व चेतवील
उठवील धूलीपतिता। त्वन्नाम दिव्य-शील
तू लाज भारताची। तू आस भारताची
चंद्रार्क जोवरी तो। तू कीर्ती भारताची


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा