झेंडागीत

ऊठा बंधुनो! प्रभात झाली झेंडावंदन करु चला
प्रतापशाली गगनी फडके अमरध्वज तो पाहु चला।।

जेवि चराचरि वायु वाहुनी जीवनरस तो ओतितसे
प्रभातकाळी तेवी ध्वज हा अस्मन्मानस फुलवितसे।।

प्रभातकाळी दिनकर कोमल सुमगण जेवी हसवितसे
सुंदर हसरा ध्वज हो विजयी तेवि मनाला खुलवितसे।।

हसवी चित्ता, आशा निर्मी, स्फूर्ति अंतरी संचरवी
तेजोदायक तिमिरविदारक तळपे ध्वज हा जसा रवी।।

पहा स्वकीया करा हलवुनी आपणास तो बोलवितो
माझ्याखाली गोळा व्हा रे तमाम सारे तो वदतो।।

झेंड्याखाली तमाम सारे जमाव करु या मोदाने
अंतरंग रंगवू चला रे शौर्ये धैर्ये वीर्याने।।

राष्ट्राचा हा प्राण अमोलिक राष्ट्राचे हे जीवन हो
सर्वस्व असे अपुले जे जे ते ते झेंडा दावित हो।।

ज्या राष्ट्राते झेंडा नाही त्याते नाही जगी मान
मान तयाची वरी न होई करिती त्याचा अपमान।।

विद्या वैभव कला कीर्तिचे अब्रूचे अभिमानाचे
संरक्षण होतसे जरि वरी गगनी झेंडा हा नाचे।।

झेंडा म्हणजे जीवन अपुले झेंडा म्हणजे स्वप्राण
झेंडा म्हणजे राष्ट्र अपुले झेंडा दैवत ना आन।।

स्वातंत्र्याचे चिन्ह सुमंगल म्हणजे झेंडा हा आहे
झेंडा फडके झळके जोवरि तोवरि वैभवयश राहे।।

झेंडा चमके जोवरि अपुला विश्वी विजयी विक्रांत
राहू तोवरि आपण तेजे निर्भय निर्मळ निभ्र भर्रां
झेंडयाला या वित्ताहून प्राणांहुनहि जपा सदा
झेंडा अपुला जीव धर्मही झेंडा अपुला देव वदा।।

ऐक्याच्या वातावरणाचा झेंडा असतो निर्माता
स्वातंत्र्याच्या संगीताचा झेंडा असतो उदगाता।।

झेंड्यासाठी नाना देशी नाना विरी निजरक्त
दिले, प्राणही फेकुन दिधले, झेंड्याचे व्हा तुम्ही भक्त।।

लाखो करिती बलिदान मुदे एका या झेंड्यासाठी
झेंड्याचा महिमा न वर्णवे कधी कुणाही या ओठी।।

सर्वस्वाचे सर्वैक्याचे राष्ट्रत्वाचे हे चिन्ह
एकचित्त समूर्त जाहले धरा अंतरी ही खूण।।

एका अत्तर थेंबामध्ये लाखो कोटी सुमनांचे
ओतिले असे सर्वस्व तसे झेंड्यामध्ये राष्ट्राचे।।

झेंडा दावी परंपरेला झेंडा संस्कृति गात असे
झेंडा तुमच्या पूर्ववैभवे सदगुणवृंदे चमकतसे।।

मधमाशा त्या पोळ्यासाठी निशिदिन जेवी जपताती
झेंड्याला या राखू आपण करू प्रतिज्ञा प्राणांती।।

जे आताचे जे पूर्वीचे भविष्य काळातीलहि जे
अपुले मंगल सुंदर उज्वल ते या झेंड्यामधे सजे।।

झेंडा सुंदर थोर तिरंगी ललामभूत त्रिजगाते
त्रैलोक्य उभे अभिराम अशा या झेंड्याला नत नमते।।

प्रात:स्मरणीया रमणीया वरणीया झेंड्या नमन
तुला करितसे, तव भक्तीने जावो अमुचे भरुन मन।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा