महात्माजींस

विश्वाला दिधला तुम्हीच भगवन् संदेश मोठा नवा
ज्याने जीवन सौख्यपूर्ण करणे साधेल या मानवा
ते वैराग्य किती! क्षमा किति! तपश्चर्या किती! थोरवी
कैशी एकमुखे स्तवू? मिरवता भास्वान् जसा तो रवी।।

आशा तुम्हि अम्हां सदभ्युदयही तुम्हीच आधार हो
ते चारित्र्य सुदिव्य पाहुनि अम्हां कर्तव्यसंस्फूर्ति हो
तुम्ही भूषण भारता, तुमचिया सत्कीर्तिची भूषणे
हे त्रैलोक्य धरील, धन्य तुमचे लोकार्तिहारी जिणे।।

बुद्धाचे अवतार आज गमता, येशूच किंवा नवे
प्रेमाभोधि तुम्ही, भवद्यश मला देवा! न ते वानवे
इच्छा एक मनी सदा मम भवत्पादांबुजा चिंतणे
त्याने उन्नति अल्प होइल, अशी आशा मनी राखणे।।

गीता माझि तुम्ही श्रुतिस्मृति तुम्ही तुम्हीच सत्संस्कृति
त्यांचा अर्थ मला विशंक शिकवी तो आपुली सत्कृती
पुण्याई तुम्हि मूर्त आज दिसता या भारताची शुभ
धावे दिव्य म्हणुनी आज भुवनी या भूमिचा सौरभ।।

तुम्ही दीपच भारता अविचल, प्रक्षुब्ध या सागरी
श्रद्धा निर्मितसा तुम्हीच अमुच्या निर्जीव या अंतरी
तुम्ही जीवन देतसा नव तसा उत्साह आम्हां मृतां
राष्ट्रा जागविले तुम्ही प्रभु खरे पाजूनिया अमृता।।

तुम्ही दृष्टी दिली, तुम्ही पथ दिला, आशाहि तुम्ही दिली
राष्ट्रा तेजकळा तुम्ही चळविली मार्गी प्रजा लाविली
त्या मार्गे जरि राष्ट्र सतत उभे सश्रद्ध हे जाइल
भाग्याला मिळवील, भव्य विमल स्वातंत्र्य संपादिल।।

विश्रांति क्षण ना तुम्ही जळतसा सूर्यापरी सतत
आम्हाला जगवावया झिजविता हाडे, सदा राबत
सारे जीवन होमकुंड तुमचे ते पेटलेले सदा
चिंता एक तुम्हां कशी परिहरु ही घोर दीनापदा।।

होळी पेटलिसे दिसे हृदयि ती त्या आपुल्या कोमल
देऊ पोटभरी कसा कवळ मदबंधूंस या निर्मळ
ह्याची एक अहर्निश प्रभु तुम्हां ती घोर चिंता असे
चिंताचिंतन नित्य नूतन असे उद्योग दावीतसे।।

कर्मे नित्य भवत्करी विवध ती होती सहस्त्रावधी
ती शांति स्मित ते न लोपत नसे आसक्ति चित्तामधी
शेषी शांत हरी तसेच दिसता तुम्ही पसा-यात या
सिंधु क्षुब्ध वरी न शांति परि ती आतील जाई लया।।

गाभा-यात जिवाशिवाजवळ ते संगीत जाले सदा
वीणा वाजतसे अखंड हृदयी तो थांबतो ना कदा
झोपे पार्थ तरी सुरुच भजन श्रीकृष्ण श्रीकृष्णसे
देवाचा तुमचा वियोग न कदा तो रोमरोमी वसे।।

वर्णू मी किति काय मूल जणु मी वेडावते मन्मती
पायांना प्रणति प्रभो भरति हे डोळ्यांत अश्रू किती
ज्या या भारति आपुल्यापरि महा होती विभूती, तया
आहे उज्ज्वल तो भविष्य, दिसते विश्वंभराची दया।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-अमळनेर, १९२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा