भृंग

( मणिबंध वृत्ताच्या चालीवर )

भृंगा ! दंग अहा ! होसी,
गुंगत धांत वनीं घेसी;
तुजमागुनि वाटे यावें;
गोड फुलें चुम्बित गावें !

रवि येत असे उदयातें,
अरुणतेज विलसत दिसतें;
तरी तिमिर हें विरल असे,
धुकें भरुनि न स्पष्ट दिसे !

कविच्या ह्रदयीं उज्वलता
आणिक मिळती अंधुकता;
तीच स्थिति ही भासतसे,
सृष्टी कवयित्रीच दिसे !

तिच्या कल्पना या गमती
कलिका येथें ज्या फुलती
सुगंध यांतुनि जो झुकतो
रस त्यांतिल तो पाझरतो !

भृंगा ! आणि तुझें गान
सृष्टीचें गमतें कवन !
गा ! तूं गा ! नादी भ्रमरा !
मी गणमात्रा जुळणारा !

शुक पंजरबन्धीं घालूं,
त्यां पढवूं नरवाग‍ बोलूं.
श्रुतिवैचिच्या बघणारे
आम्ही मात्रा जुळणारे !

‘ कवि ’ आम्हांलागुनि म्हणणें
कविशब्दार्था लोळवणें !
अस्मद्‍गान नव्हे ’ गान
तें गाना चिंध्यादान !

परंनु भृंगा ! तव गान
परमानंदैं परिपुर्ण !
उदासीन ही जगाविशीं
तव तन्मयता सृष्टीशीं !

अस्मदीय ह्रदयीं ठरलें
कीं जग हें दुःखें भरलें !
म्हणुनी सुंदरतेलाही
कुसें अम्हां दिसती पाहीं !

परि तव गानांतुन, अले !
थबथबला हा भाव गळेः---
‘ गुङ्‍ गुङ्‍ गुङ्‍ गुङ्‍ !--- भान नसे !
सृष्टि अहा गुङ्‍ ! मधुर असे !

‘ दुःख-वदा तें केंवि असे ?
अश्रु-तें हो काय ! कसें ?
फुलें फुलति, परिमल सुटती,
रस गळती-गुङ्‍ सौख्य किती !”

जाइ, जुई, मोगरी भली,
कमलिनीहि सुन्दर फुलली;
मघु यांचा सेवुनि गोड
पुरवीं तूं अपुलें कोड !

प्रीति, चारुता, आनन्द
यांचे गा मधुरच्छन्द;
प्रीति, चारुता, आनन्द
सिंचिति सृष्टीचा कन्द !

वरुनि नभांतुनि चंडोल
ओतितसे हेची बोल;
खालीं तव गुंजारव हा
प्रतिपादितसे तेंचि अहा !

( वसंततिलका )

होईल का रसिकता तव लब्ध मातें ?
गुंगी मिळेल मजला तव केधवा ते ?
येतें मनांत तुझियासम भृंग व्हावें,
वेलींमधूनि कलिकांवरुनी झुकावें ।


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- खेड, १९ नोव्हेंबर १८९०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा