बाताराम आणि वाघ

 बाताराम आणि त्याचे दोन मित्र जंगलामध्ये भटकत असता हिंडत हिंडत ते मनुष्यवस्तीपासून अतिशय दूर गेले आणि रस्ता चुकले. परत कसे यावे हे काही त्यांना कळेना. अशा परिस्थितीत त्यांनी त्या जंगलात तीन दिवस आणि तीन रात्री घालविल्या. चौथ्या दिवशी त्यांना त्या जंगलात एक झोपडी आढळली‚ पण त्या झोपडीत कोणीच राहत नव्हते. हिंडून हिंडून ते अतिशय दमलेले होते. तेव्हा त्यांनी झोपडीत मुक्काम करायचे ठरविले. थंडी-वाऱ्यापासून आणि श्वापदांपासून रक्षण करून घेण्यासाठी जंगलातील निवारा म्हणून त्यांना त्या झोपडीचा उत्तम उपयोग झाला. तथापि अन्न नाही‚ पाणी नाही. अशा स्थितीत आणखी एक-दोन दिवस त्यांनी त्या झोपडीत कसेबसे काढले. मग मात्र त्यांची क्षुधा अनावर झाली. आता जर आपल्याला खायला काही मिळाले नाही तर आपण जगणे शक्य नाही‚ असे त्यांना वाटले. तेव्हा बाताराम आपल्या दोन मित्रांना म्हणाला‚ ‘‘मित्रहो‚ तुम्ही स्वस्थ या झोपडीमध्ये बसा. मी जंगलातले एखादे तरी जनावर मारून तुमच्यासाठी खायला घेऊन येतो. मग वाघ जरी मारायची मला पाळी आली तरी बेहत्तर आहे! पण काहीतरी तुम्हाला घेऊन आल्यावाचून राहणार नाही.’’ असे म्हणून भक्ष्याच्या शोधार्थ तावातावाने बाताराम झोपडीतून बाहेर पडला. तो जंगलात जायला आणि तिकडून भुकेने वखवखलेला एक भयंकर वाघ यायला एकच गाठ पडली. बाताराम दृष्टीस पडताच वाघाने एकदम डरकाळी फोडली आणि जबडा वासून तो बातारामच्या अंगावर धावून आला. तेव्हा बाताराम जीव घेऊन झोपडीकडे पळत सुटला. बाताराम पुढे पळतोय आणि वाघ मागून धावतोय! कसाबसा बाताराम झोपडीच्या दाराशी पोहोचला‚ पण उंबरठ्यावर ठेच लागून तो सपशेल पालथा पडला. वाघाने मागून जी एकदम झेप घेतली तो बाताराम खाली पडल्यामुळे त्याच्या अंगावर न पडता तो दारातून थेट झोपडीत जाऊन आदळला. त्याबरोबर बातारामने टणकन् उडी मारून झोपडीचे दार लावून घेतले आणि आत असलेल्या आपल्या दोन मित्रांना तो ओरडून म्हणाला‚ ‘‘दोस्तहो! या वाघाचे कातडे सोलून त्याला तुम्ही नीट कापून ठेवा‚ तोपर्यंत मी दुसरा वाघ घेऊन आलोच!’’ असे म्हणून बातारामने मागल्या पावली जो सुंबाल्या ठोकला तो पुन्हा काही तेथे परत आलाच नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा