जिराफाची मान

 भूगोलाचे मास्तर वर्गात आफ्रिकेचा भूगोल शिकवत असता‚ आफ्रिकेत आढळणाऱ्या निरनिराळ्या प्राण्यांची आणि पशूंची चित्रे मुलांना दाखवित होते. दाखविता दाखविता त्यांनी जिराफाचे चित्र वर्गासमोर धरले आणि हसून म्हणाले‚ ‘‘मुलांनो‚ पाहिलात हा प्राणी? किती लांब आणि उंच आहे. बघा याची मान! असा विचित्र प्राणी दुसऱ्या कोठल्याही खंडात आढळून येणार नाही!’’

जिराफाचे ते चित्र पाहून सारी मुलं आश्चर्यचकित झाली. कारण इतक्या लांब मानेचा चमत्कारिक प्राणी त्यांनी कधीच पाहिला नव्हता. चिमुकल्या चिंतूच्या मनावर त्या चित्राचा फारच परिणाम झाला‚ आपल्या जागेवरून तो उठून उभा राहिला आणि गंभीर चेहरा करून त्याने मास्तरांना विचारले‚ ‘‘पण मास्तर मला हे कळत नाही. या जिराफाची मान इतकी लांब काय म्हणून?’’ तेव्हा मास्तर हसून ताबडतोब म्हणाले‚ ‘‘हात् वेड्या इतकी साधी गोष्ट तुला का कळत नाही? अरे या जिराफाचे डोके त्याच्या शरीरापासून अतिशय लांब असल्याकारणाने परमेश्वराला त्याची मान लांब करणे भागच पडले. न करून करतो काय तो! कळले आता?’’ वर्गातल्या साऱ्या मुलांनी ताबडतोब माना डोलावल्या. चिंतू डोके खाजवित खाली बसला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा