कादंबरी आकर्षक करण्याचा मार्ग

एक नवोदित लेखक होता. त्यानं महप्रयासानं एक कादंबरी लिहिली. ती घेऊन तो पु.लं.ना भेटला. त्याने पु.लं.ना विनंती केली की ही कादंबरी वाचून आपण मार्गदर्शन करावं. पु.ल. त्याला टाळत होते. कादंबरीबाबत मी फारसं सांगू शकेनच असं नाही अशा अर्थानं ते त्याला समझावीत होते. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यानं ती कादंबरी पु.लं.च्या घरी ठेवलीच! काही दिवसांनी तो पु.लं.ना भेटला व ‘कादंबरी कशी काय वाटली’ असं विचारू लागला. पु.ल. ‘ठीक आहे’ असं म्हणाले. तरीही त्यानं ‘मनाला पटतं ते सांगा. खरं सांगितलं तरी मी रागावणार नाही’ असं सांगायला सुरुवात केली.


फारच आग्रह झाल्यावर पु.लं.नी कादंबरी त्या नवोदिताच्या हातात परत देत म्हंटलं,

‘‘कादंबरी ठीक आहे पण ही कादंबरी अधिक आकर्षक व वाचनीय करायची असेल तर तिचा शेवट हा जितका अलीकडे घेता येईल तितका घ्यावा!’’

इन्फ्लेमेबल भारत?

 पु.ल. आणि त्यांचे मित्र गाडीतून प्रवास करीत होते. गाडी हायवेवर होती. पुढं एक टँकरक चालला होता. त्यावर लिहलं होतं − Highly Inflammable मेरा भारत महान.

हे पाहताच पु.ल. म्हणाले, ‘‘त्या टँकरवाल्याला आपल्या देशाची खरी परिस्थिती समजली. म्हणून त्यानं सत्य ते वर्णन टँकरवर लिहलंय.’’

विजया जयवंतचा खोटेपणा

सुप्रसिद्ध अभिनेत्री व नाटकदिग्दर्शक म्हणून विजया मेहता सुपरीचित आहेत. त्यांच्या नाटक कलेच्या सुरुवातीच्या काळातील हा किस्सा आहे. त्या नाटकाच्या तालमीला येत, पण एक दिवस त्यांना उशीर झाला.


‘‘कुठे गेलीस, वेळ का झाला?’’ असे नाटकदिग्दर्शक विचारू लागले. त्या काळी त्या विजया जयवंत होत्या. दुर्गा खोटे यांचे चिरंजीव हरिन खोटे यांच्या त्या प्रेमात पडल्या होत्या. कदाचित त्या हरिन खोटेंना भेटायला गेल्या असल्यामुळे नाटकाच्या तालमीला जायला वेळ लागला असेल. त्या नाटक कलाकारांत पु.ल.ही होते. विजया जयवंत उशीर का झाला याचं काहीतरी उत्तर द्यायला लागल्या. तेवढ्यात पु.ल. म्हणाले, ‘‘काही सांगू नकोस. तुझा खोटेपणा आम्हाला माहीत आहे!’’

दामुअण्णांचा डोळा चुकवून?

दामुअण्णा मालवणकरांची लोचने तिरळे होती. त्यांचा तिरळा डोळा हे व्यंग होते; पण व्यंगावर मात करून त्या व्यंगाचा विनोदासाठी वापर करून दामुअण्णा मालवणकर हे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात अमर झाले. ‘ब्रह्मचारी’, ‘लग्न पहावं करून’ असे कितीतरी चित्रपट त्यांनी गाजविले.


त्यांची कन्या भारती मालवणकर. ती सुवर्णरूप, देखणी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली आहे. तिचे डोळे तेजस्वी आहेत. त्यावर पु. लं.ची कोटी प्रसिद्ध आहे—


“भारती ही दामुअण्णांचा डोळा चुकवून जन्माला आलीय हं!”

 विनोदी लेखक वसंत सबनीस हे पु. लं.चे खास दोस्त. त्यांनी विनोदी अभिनेते शरद तळवलकरांची पु. लं.शी ओळख करून दिली.


“हा माझा मित्र शरद तळवलकर.”


त्यावर पु. ल. म्हणाले, “साधा सरळ माणूस आहे!”


वसंत सबनीसांना काही कळेना. आता तर ओळख करून दिली आणि भाई एकदम हा सरळ माणूस म्हणून प्रशस्तिपत्रक कसे काय देतो!


त्यावर पु. लं.नी खुलासा केला—


“याच्या नावात काना, मात्रा, उकार काहीही नाही. संपूर्ण नाव सरळ आहे — शरद तळवलकर!”

 एक अंत्ययात्रा चालली होती. बाईचं प्रेत होतं. प्रेतयात्रेत पुढे त्या बाईचा नवरा हातात गाडगं धरून चालला होता. मागे खूप गर्दी होती.


एवढी मोठी प्रेतयात्रा चाललेली असल्याने एक माणूस ती पाहत बाजूला उभा होता. त्यानं एक चमत्कारिक दृश्य पाहिलं. त्या प्रेतयात्रेत पुढे एक कुत्रा होता आणि कुत्र्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला होता.


तेव्हा त्या गृहस्थाने प्रेतयात्रेतून चाललेल्या एका इसमाला, “हा काय प्रकार आहे?” म्हणून विचारले.


“या ज्या बाई वारल्या आहेत, त्या भयंकर खाष्ट होत्या. नवऱ्याला सतत आपल्या मुठीत ठेवायच्या. त्या बाईंना या कुत्र्याने चावलं व त्यामुळे त्या गेल्या. नवरा त्यांच्या तावडीतून सुटला. कुत्र्याचे आभार मानायचे म्हणून त्यानं कुत्र्याला हार घालून मिरवणुकीत अग्रभागी मान दिलाय!”


“फार गुणी आहे हो हा कुत्रा!” तो गृहस्थ म्हणाला. “मला एखादा दिवस घरी न्यायला मिळेल का?”


“मिळेल! पण बराच काळ लागेल. कारण ही जी प्रेतयात्रेत गर्दी दिसतेय, ती त्या बाईसाठी नसून कुत्र्याच्या बुकिंगसाठी आहे!”

एका गावात एक महाराज होते. त्यांच्या वाड्यावर मेजवानीचा कार्यक्रम होता. गावातील अन्य दरबारी मंडळी, श्रीमंत लोक यांना आमंत्रणे गेली होती. महाराज हे समाजहितदक्ष होते. सामान्यांची विचारपूस करायचे. त्यांना ज्यांनी शिकविले त्या गुरुजींनाही त्यांनी मेजवानीचे आमंत्रण पाठविले.

मेजवानीला सारी संस्थानिक मंडळी खास दरबारी पोशाखात उपस्थित होती. गुरुजीही आले होते; पण ते आपल्या साध्या वेषात होते. बाकीची मंडळी कुचेष्टेने, ‘या बड्या पार्टीत हा कोण साधा माणूस?’ या भावनेने त्यांच्याकडे पाहत होती. गुरुजी मुकाटपणे हे सारं सहन करीत होते.

मेजवानीचा थाट खास राजेशाही होता. भोजनप्रसंगी आपली मनोगते व्यक्त करावीत, अशी महाराजांनी उपस्थितांना बोलण्याची विनंती केली. एक-दोघांची छोटीखानी भाषणे झाल्यावर महाराजांनी गुरुजींना बोलण्याची विनंती केली. गुरुजींनी ती मान्य केली व आपल्या भाषणास सुरुवात केली.

“आदरणीय श्रीमंत महाराज आणि अन्य सन्माननीय महोदय, मी आपणांस नम्रपणे प्रणाम करतो. आपणांसारख्या उच्चपदस्थ, श्रीमंत जनांमध्ये मला गरीब शिक्षकाला महाराजांनी बोलावले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.


मला जेव्हा या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, तेव्हा जसा आनंद झाला, तशीच थोडी काळजीही वाटू लागली. मी मनाशी विचार करू लागलो की, तिथे मेजवानी समारंभास सर्व निमंत्रित सुरवार, लांब कोट अशा डौलदार पोशाखात येणार आणि मी अशा धोतर-सदऱ्याच्या वेषात कसा जाऊ?


यावर मार्ग म्हणून मी माझ्याकडील बचतीची सर्व रक्कम बरोबर घेतली व शिंप्याकडे गेलो. त्याला खास दरबारी पोशाख शिवून देण्याची विनंती केली. पण आता समारंभास तीन दिवस राहिले आहेत आणि एवढ्या वेळात हे कपडे शिवून मिळू शकणार नाहीत, असे त्याने सांगितले.


तयार कपड्यांच्या दुकानात तर असे खास पोशाख नसतातच. मग मी अगदी शेवटचा उपाय म्हणून नाटक कंपन्यांना भाड्याने कपडे देणाऱ्या दुकानात गेलो. त्यांना माझी गरज नीट समजावून सांगितली. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले, ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो म्हणाला, ‘महाराजांकडे पार्टी आहे. तेव्हा सर्व संस्थानिक त्या पार्टीला वापरण्यासाठी सर्व दरबारी पोशाख भाड्याने घेऊन गेलेत. आता तुमच्यासाठी काहीही शिल्लक नाही!’”


गुरुजींना हसणाऱ्या बड्यांची तोंडं बघण्यासारखी झाली नसती, तरच नवल!