पाउलें

 पलीकडच्या पातळ अंधारांतून 
पाहिलेंस मला.
उन्मन होऊन रेषांच्या तसूतसूंत
वितळलें होतें मी....
. शिल्पध्यान... मायकेलेंजेलोचें.
— अचानक निघून गेलास न थांबतांच, 
भाद्रपदांतील शेवटच्या लहरी मेघाप्रमाणें 
तेव्हांपासून सांभाळीत आलें आहें, 
कस्तुरीच्या मातीवर उमटलेलीं
राजहंसाचीं पाउलें.
नंतरचे आशीर्वाद प्रस्तरांत पुरलेस 
वाचतां येऊं नये म्हणून मलाच माझ्या 
नियतीची भाषा.... संज्ञाहीन. 
तरीहि जातात कधीकधीं
माझ्याच मनाच्या कांठाकांठानें,
स्मरणाच्या मुक्तीचा ऊद् जांळीत
अबोल रानाला साद घालणाऱ्या 
सुतार पक्ष्याचे पडसाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा