जियें थांबावें तूं तिथुन झरते सांद्र करुणा
कुणाच्या श्वासांची नितळ पडली भूल सजणा
इथें दुःखाचा हा बहर पिकला सांज गहिरा
तुझ्या केसांचा कीं धुळिंत पडला खिन्न गजरा....
मला झाडांपाशी कुणि न दिसले शिल्पभरले
निळ्या वस्त्रांच्या कीं कुशिंत सजुनी अंग हरलें
जुन्या तृष्णेनें ही सहज ढळती मुक्त शिखरें
कुणाला सांगावें बहर इथला दूर बहरे....
उभीं रानें त्यांचा विकल विहगें ताल धरिती
जशीं नक्षत्रांचीं फिकट किरणें दूर हलती
तुझ्या डोळ्यांचा मी सदय गिळला अश्रु पहिला
तरी माझ्या देहीं कुठुनि तव हा देह उरला....
जळा सोडी मासा म्हणुनि तुकया संत बनतो
कुठें कल्पान्ताला प्रलय- भरला कंठ फुटतो
पुन्हा भेटीसाठीं सघन तम ये आज जवळी
फुलें सर्वांगाचीं टपटप गळावीत सगळी....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा