कलश


सांज-घनांच्या मिटल्या ओळी 
मिटले माझे नयन निळे 
शिरिष फुलांच्या शय्येवरतीं 
क्षितिजावरचें रान जळे

तळ्यांची ही फुटकी ओंजळ 
जोग असा का हा विटका ? 
उंच उडाली धूळ म्हणोनी 
क्षणांत झालों मी बुटका...

दुःखाचें बन उधळित सुटला 
मातीवरचा घन वारा
घरांत माझ्या ओघळल्या मग
अधरविणेच्या मधुधारा

इथें बांधिले घरकुल कोणी 
अंधाराला भ्रांत पडे
तीरावरच्या रेतीपाशीं
समुद्र हळवा आज रडे.

प्राक्तन ओढुन निजल्या गायी 
प्राण तुझे मग हंबरले 
इथें दिठीवर उमले पाणी 
कलश दुधाचे कुणीं भरले ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा